शेअरबाजाराचे विश्‍लेषक मी जिंकलो मी हरलो

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 24 मे 2021

अर्थविशेष

कुठलीही गुंतवणूक करताना घेतलेली जोखीम व होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर तपासायलाच हवे. शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास ‘मी जिंकलो आणि जिंकतच राहिलो’ असे चित्र दिसेल. 

मित्रहो, धातू उद्योगाविषयी गेले दोन तीन महिने आम्ही लिहीत आहोत. सल्ला दिल्यानंतर गुंतवणूकदार लगेच अभ्यास वा गुंतवणूक करीत नाही. शेअर वर जायला लागला की तो मनात भरतो. कधीकधी त्यात गुंतवणूक करायला बराच उशीर होतो आणि मग पुन्हा करतोय ते बरोबर की चूक असे वाटायला लागते. टाटा स्टील ६०० रुपयांपासून सुचवल्यावर, पैसे आज गुंतवू, उद्या भाव खाली आले की करू असे म्हणता म्हणता ११५० रुपये झाला. इथे गुंतवणूक करताना अंगात साहस, संयम आणि सावधगिरी हवी. हे येरागबाळ्याचे काम नव्हे. हे साहस नसेल तर ‘हिंदाल्को’, ‘नाल्को’, ‘टाटा स्टील’, ‘प्राज’, ‘अदानी’ समूहातील कंपन्या अशांमध्ये गुंतवणूक करताच येणार नाही. स्टॉप लॉसचा विमा उतरवून मगच पाण्यात उतरायचे. मनात भीती असतेच. अशा वेळी शेअर विकत घेऊन परत विकणे हे एखादी चोरटी धाव काढल्यासारखे असते. मग १२४०च्या जवळपास विकला नाही आणि नेमकी ह्या साऱ्या क्षेत्रातच नफावसुली आली, किंवा शेअर जर आपल्या खरेदी किमतीच्या खाली गेला तर काय करावे, हा यक्षप्रश्न उभा राहतो; आणि मग ‘मी जिंकलो, मी हरलो’ अशी अवस्था होते.

अशा वेळी मी ही गुंतवणूक का केली? स्टॉप लॉस किती? टार्गेट किती? हे पुन्हा तपासावे. पोलादाच्या किमती वर जात आहेत म्हणून हा शेअर मी घेतला आहे, हे लक्षात घ्यावे. स्टील मार्केटमध्ये भाव पडलेत का?, तेजी आहे ना? याचा अभ्यासपूर्ण अंदाज घ्यावा. आपला स्टॉप लॉस काय होता हे आठवावे, तसेच आपली पोझिशन किती मोठी आहे हे बघावे. (मोठी पोझिशन, छोटा स्टॉप लॉस आणि याउलट छोटी पोझिशन मोठा स्टॉप लॉस!) स्टॉप लॉसचे दुसरे अधिष्ठान म्हणजे कितीही भांडवल असले तरी मानसिक दृष्ट्या आपण जो तोटा सहन करू शकतो तो आपला स्टॉप लॉस. आपण निवड केलेल्या शेअरवरील विश्वासच पैसे मिळवून देणार आहे. भरधाव चाललेली गाडी थोडा वेळ थांबली तर जिवाची घालमेल करून घेऊ नये. थोडा संयम ठेवल्यास तेजीमध्ये आपला भाव सहसा येतोच. इतका सुरेख गतीवेग असलेल्या क्षेत्रात अशी एकाएकी मंदी होत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलीही गुंतवणूक करताना घेतलेली जोखीम व होणारा नफा (Risk/Reward) याचे गुणोत्तर तपासायलाच हवे. त्यातही सतत दरवर्षी विक्री व नफा वृद्धी देणारे व चक्रवाढ पद्धतीने वाढणारे शेअर्स (Consistent Compounders) काही काळ विसावले तर त्यातली  गुंतवणूक काढायची घाई करू नये. परंतु चक्रीय (cyclical) मागणी पुरवठा दाखवणाऱ्या शेअरची खरेदी विचारपूर्वकच हवी. साखर, पोलाद, इतर अलोह धातू आदी उद्योग यातच मोडतात. इतकी शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास ‘मी जिंकलो आणि जिंकतच राहिलो’ असे चित्र दिसेल. असो. 

मागील लेखातील दोन वाक्ये इथे उद्धृत करतो. ‘‘गेले दोन महिने निफ्टी १५,०००च्या पातळीला अडखळते आहे. १५,०००ची पातळी ओलांडून वरचा बंद मिळतो का? एवढेच औसुक्य!’’ प्रत्यक्षात मागील सोमवारी १४,९०० जवळील बंद दिल्यावर निफ्टी मागे वळली. गेल्या दोन महिन्यात हे पाचव्यांदा झाले आहे. पुढील धडक १५,००० पार करून जाईल असे मानायला भरपूर जागा आहे. या आठवड्यातही सोमवारी (ता. १७ मे) निफ्टीचा बंद १४,९३८ आहे. इंडिया विक्स अगदी तळाला (२०च्याही खाली) आहे. आपण वाट पाहात असलेली तेजी या आठवड्यात दिसण्याची मोठी शक्यता आहे. बँक निफ्टीने ३३,००० वर मान काढली आहे. बँक निफ्टीवर स्वार होऊन निफ्टी या परिघातून बाहेर पडेल का? हा खरा सवाल आहे. कोविड केसेस अपेक्षेप्रमाणे तीन लाखाच्या खाली आल्या आहेत. तौते चक्रीवादळाने केलेले किनारपट्टीचे नुकसान विसरून सोमवारी तर मोठी तेजी झाली. सुज्ञ वाचकांच्या आतापर्यंत लक्षात नक्कीच आले असेल की बाजाराला वर जायचे असेल तर तो प्रत्येक वाईट बातमीचा चांगलाच अर्थ उचलतो. उदा. घाऊक महागाई दराने १०.४९ टक्के असा उच्चांक गाठूनही बाजाराने त्याकडे दुर्लक्ष केले. मागील वर्षी पूर्ण लॉकडाउनमुळे महागाई नव्हतीच (तुलनेने मागील भाव कमी होते इतकेच), साहजिकच आजचे भाव उच्चतम वाटतात असा बाजाराने ग्रह करून घेतला आहे. पुढे काय? घोडा मैदान जवळच आहे. बघू .

जाहीर झालेले तिमाही निकाल अजून तरी संतोषजनक आहेत. ‘टाटा स्टील’ने तर कमालच केली. सर्व विश्लेषकांचे अंदाज धुळीला मिळवीत सर्वोच्च नफा नोंदवला. दर टनामागे ढोबळ नफा २७,८०० रुपये, वर्षभरात ८,४०० कोटींचा नक्त नफा आणि शेअर मागे ७० रुपये उपार्जन (६५ टक्के वृद्धी), कमी केलेले २०,००० कोटी रुपयांचे कर्ज; वाढीव भावातही गुंतवणुकीला प्रोत्साहित करीत आहे. पोलादाच्या चढत्या किमती कंपनीच्या पथ्यावर पडल्या आहेत. आज १५–१६च्या किंमत /उपार्जनाला  (P/Eratio) मिळणारा हा शेअर पोलादाच्या चढत्या मागणीवर अजून लखलखाट दाखवू शकतो. किमान १३०० रुपयांची अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. 

‘दीपक नायट्राइट’नेदेखील उत्कृष्ट निकाल दिले आहेत. विक्री ४० टक्क्यांनी वर आहे, नफा ६९ टक्के आणि मार्जिन २४.८ टक्क्यांवरून ३० टक्के झाले आहे. शेअर मागे उपार्जन १२.६ रुपयांवरून २१.३ झाले आहे. फिनोलिक डिविजन आणि स्पेशालिटी रसायने यांची मागणी वाढते आहे. तसेच कर्जेही कमी केली आहेत. अर्थात हा शेअर चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा बाजाराला होतीच व ती पूर्ण झाली. त्यामुळे निकालानंतर फारसा वाढला नाही. काही काळ त्याकडे दुर्लक्ष करून ५ ते १० टक्के खाली मिळाल्यास जरूर विचार करावा. 

तसेच ‘सोलारा अॅक्टीव्ह’ या फार्मा क्षेत्रात संशोधन करणाऱ्या कंपनीने छान कामगिरी नोंदविली आहे. पुढील वर्षी जोरकस कामगिरी करण्याचा विश्वास व्यवस्थापनाने दिला आहे. विशाखापट्टणम येथे कोविड वरील फेव्हीपिराव्हीर या औषधाची निर्मिती होईल. मार्जिन्स अपेक्षेपेक्षा कमी, २० टक्क्यांवरून यावर्षी २४ टक्केच झाले आहे, कारण निर्यातीचे दर नियंत्रित केले होते. त्यातही सुधारणा अपेक्षित आहे. रु. ६१.६२ इतके उपार्जन असलेला हा शेअर १७०० रुपयांच्या आसपास मिळत आहे. त्यात अभ्यासपूर्वक निवेश करता येईल. कंपनीचे व्यवस्थापन आपले काही शेअर्स प्रायव्हेट इक्विटी फंडाला विकू इच्छिते. या बातमीमुळे शेअर मध्यंतरी कोसळला होता. आता बाजाराने ती बातमी पचवली आहे. 

पाच महिने आधीपासून आपण सतत नफा नोंदवण्यास सुचवीत होतो, १४,००० पासून, प्रत्येक ५०० अंशाला १० टक्के या दराने; १५,५०० ही निफ्टी पातळी येईपर्यंत नफा ताब्यात घेण्याचा आग्रह करीत होतो! फेब्रुवारीच्या १६ तारखेला १५,४३० हे लक्ष्य साध्य झाल्यावर बाजार खाली आला. तेव्हापासून संयम ठेवा व १४,३००च्या आसपास गुंतवणूक करा असा आपला आग्रह होता. ती पातळी प्रथम २५ मार्च, नंतर १२ एप्रिल आणि त्यानंतर २२ एप्रिल अशी सतत आली.

आता आपण १५४०० ते १५५००ची वाट पाहू व त्या दरम्यान पुन्हा थोडा नफा खिशात टाकण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या तेजीच्या वाचकांना शुभेच्छा. तेजी टिको अथवा ना टिको, आपला बाजारातला उत्साह टिकून राहो ही प्रार्थना.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या