फत्ते शिकस्त...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 7 जून 2021

अर्थविशेष

तेजीने चांगली गती घेतली आहे, १६,००० निफ्टी काही दूर नाही असे म्हणायला जागा आहे. गेले तीन महिने तेजी व मंदीवाल्यांची खडाखडी आपण बघत होतो. तेजीचे शिखर काबीज करण्यासाठी तेजीवाल्यांनी १५,०००च्या स्पर्शरेषेला धडक मारता मारता शेवटी ते शिखर मागील आठवड्यात काबीज केले. 

वाचकांना आठवतच असेल की सर्व नकारार्थी विचारांना दूर सारून निफ्टीच्या १४,३०० या पातळीचा आधार घेऊन खरेदी करायला आपण वारंवार सुचवत होतो. तशी संधीही पुनःपुन्हा आली. मार्च व एप्रिलमधील लेखात, कोविडचा विचार करण्यापेक्षा दूरचा विचार करा; आज अस्थिर बाजारात गुंतवणूक करा व १६,००० या निफ्टीच्या पातळीचे ध्येय ठेवा असे सुचवले होते. पातळी वर्षभरात जरी आली तरी १५ टक्के उतारा मिळेल असा होरा होता. पुढे तेजीची सुरुवात झाल्यावर ‘झुंजूमुंजू झालंय तांबडं फुटलंय’ या लेखाने छोट्या गुंतवणूकदाराला सावधही केले होते. आता तर तेजीने चांगली गती घेतली आहे, १६,००० निफ्टी काही दूर नाही असे म्हणायला जागा आहे. कारण गेले तीन चार महिने ‘रिलायन्स’ व ‘आयटीसी’ या जल्लोषात सामील झालेले नाहीत. बाजाराच्या क्षेत्रबदल चक्रात त्यांचीही वेळ येणारच आहे. असो. 

फत्ते शिकस्त झाली, पुढे काय? मोठा प्रवास केल्यानंतर आपण शिदोरी उघडतो, ताजेतवाने होतो अन मग पुढील प्रवास चालू करतो. तसा बाजाराला थोडा विसावा घ्यायला, या शिखराची सवय व्हायला थोडा वेळ द्यावा लागेल. प्रवास लांबचा आहे आणि दूरवर जायचे आहे. निफ्टीची पातळी ३१ मार्च २०१६ रोजी वाढून ७७१६ वर थांबली होती, आता पाच वर्षांनंतर ३१ मेचा बंद १५५८२ आहे, दुपटीपेक्षा कांकणभर सरसच. या पाच वर्षांत निश्चलनीकरण, ‘जीएसटी’ची  आग्रही अंमलबजावणी, ‘आयएलएफएस’ची दिवाळखोरी, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आणि शेवटी महाराक्षस कोविड असे अनेक गतिरोधक आले; पण शेअर निर्देशांक वाढलेच. या पुढील पाच सहा वर्षात निर्देशांक येथूनही दुप्पट होऊ शकतो. भारताची तरुण लोकसंख्या, समस्येतून वाट काढणारा भारतीय ‘जुगाड’, थोड्या पीछेहाटीनंतर पुन्हा भरारी मारण्याची उद्योगजगताची विजिगीषु वृत्ती या सर्वांवर हा तर्क आधारित आहे.  

शेअरबाजाराचे भांडवल मूल्य तीन लाख कोटी डॉलर ओलांडून पुढे गेले आहे. गेल्या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न ७.३ टक्क्याने आकुंचन पावूनदेखील हे घडले आहे. पुढील दोन वर्षांत ‘जीडीपी’ची ही पिछाडी भरून निघेल आणि सरकारतर्फे सुधारणांचा रेटा असाच सुरू राहिला तर पुढे दरवर्षी ८ ते ९ टक्के ‘जीडीपी’वृद्धी काही अशक्य नाही. 

निर्देशांकांच्या या पातळीकडे थोडे भानावर येऊन बघावे लागेल. जर ‘रिलायन्स’, ‘आयटीसी’, ‘लिव्हर’ आणि ‘आयसीआयसीआय’ सारख्या खासगी बँका तसेच ‘एचडीएफसी’ यामध्ये जर तेजी वाढत गेली तर निर्देशांक वाढले पण माझा फोलिओ काही वर जात नाही, असे आढळून येईल. ‘क’ आणि ‘ड’ दर्जाचे शेअर आग लागल्यासारखे वर जाताहेत. तिथली तेजी काही काळ तरी थांबावी. सालाबाद प्रमाणे प्रत्येक तेजीत लहान गुंतवणूकदार येथेच अडकतो. पेनी स्टॉक्स पासून तर लांबच पळावे. ‘सुझलॉन’ १० डिसेंबर रोजी ३.७० रुपयांना मिळत होता. रोजच वरचे सर्किट लावत स्वारी ७ जानेवारी पर्यंत ८ रुपयांना पोहोचली. सर्किटच्या मागे धावणाऱ्या छोट्या गुंतवणूकदाराला हा शेअर ८ जानेवारीला खालचे सर्किट लागल्यावर ७.४५ रुपयांना मिळाला. तो आजही ५.७० रुपये आहे. तीच गत ‘रिलायन्स पॉवर’ व ‘आरकॉम’ची. त्यांनी १५ डिसेंबरचे भाव आजही ओलांडलेले नाहीत. कृपया मृगजळाच्या मागे जाऊ नका. तसेच स्मॉल व मिडकॅपमधील, जॉनच्या पावट्याच्या वेलाप्रमाणे वर जाणाऱ्या शेअरमधून वेळीच नफा ताब्यात घेतलेला बरा. ‘बेचके पछताओ’ हे याबाबतीत जरूर लक्षात ठेवावे.

मात्र याला अपवाद, चांगले व्यवस्थापन असलेल्या, दरवर्षी १५ ते २० टक्‍के विक्री व नफा वाढता असलेल्या शेअरचा. ग्राहकाची पसंती बदलली किंवा तंत्रज्ञान बदलले तरच त्यातून बाहेर पडावे लागेल.  

‘महिंद्रा’ कंपनीने ढोबळ व नक्त नफ्यात घसघशीत वाढ नोंदवली आहे. मार्जिन १२ टक्क्यांवरून १६ टक्के झाले आहे. व्यवस्थापनाने पुढील तीन वर्षांसाठी १७,००० कोटी रुपयांचा भांडवली खर्चाचा आराखडा मांडला आहे. त्यातील ३,००० कोटी इलेक्ट्रिक वाहनांसाठी वर्ग केले आहेत. स्कॉर्पिओचे चकचकीत नवे मॉडेल व XUV 700 ह्या वर्षी बाजारपेठेत येतील. कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार या दोन्ही मॉडेल्सना चांगली मागणी मिळावी. ‘मित्सुबिशी’च्या सहकार्याने उत्पादित होणारे हलक्या वजनाचे ट्रॅक्टर्स तीन वर्षानंतर हाती घेणार आहेत. सहसा कर्ज उभारून केलेली मोठी भांडवली गुंतवणूक बाजाराला आवडत नाही. या शेअरच्या चांगल्या तिमाही निकालांचे, ह्या संदर्भावर शेअरबाजार कसे स्वागत करतो ते बघावे लागेल. 

‘डिविज लॅब’ हा आपला एक आवडता शेअर. वेळोवेळी पाठराखण केलेला! मार्च अखेरचे निकाल तर समाधानकारक आहेतच पण त्याहीपेक्षा कंपनीचे सर्वेसर्वा मुरली डीवींचा आत्मविश्वास अधिक संतोषजनक आहे. प्राधिकार सोपवणूक या बाबतीत त्यांचा हात धरणारा कोणीही नाही. माझ्यासारखे शंभर ‘डीवी’ माझ्याकडे काम करतात हे ते अभिमानाने सांगतात. थोडे इतिहासात जायचे तर २००३ साली १४० रुपयांनी प्राथमिक समभाग विक्री झाली. त्या एका शेअरचे आता बोनस व स्प्लिटमुळे २००० शेअर्स झाले आहेत. १४,००० रुपयांची गुंतवणूक ६०० पट वाढून ८४ लाख रुपये झाली आहे. या प्रगतीतही मोठा गतिरोधक २००७ साली आला. पण त्या आव्हानाचा सामना करून आज कंपनीकडे एपीआय बाजारपेठेचा सिंहाचा वाटा आहे. उत्पादनात भरघोस वाढ करण्याचा लवचिकपणा, आश्वासक बाजारपेठ आणि चांगला ब्रँड या वैशिष्ट्यांमुळे प्रत्येकच पडझडीत या शेअरकडे लक्ष असू द्यावे. मार्च अखेरच्या तिमाहीत नफा २५ टक्के वाढला आहे. विक्री १८०० कोटी तर करोत्तर नफा ५०० कोटी झाला आहे. कोविडमुळे मागणीत वाढ आहे. ही मागणी कमी झालीच तर कंत्राटी संशोधन वाढवता येईल. ३५०० रुपयांच्या आसपास मिळाल्यास जरूर आपल्या भांडारात स्थान द्यावे. खाली आल्यास विचलित न होता, टप्प्याटप्प्याने खरेदी वाढविल्यास चांगला उतारा मिळू शकतो.

‘डिक्सन टेक्नॉलॉजी’ हा ८५०० रुपयांच्या दरम्यान सुचवलेला असाच लाडका शेअर. त्याचेही निकाल हाती आले आहेत. स्प्लिट नंतर एका शेअरचे पाच झाले आहेत व भाव ४१०० आहे. हा शेअर एक वर्षांच्या आतच अडीचपट झाला. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात विक्री ५० टक्के तर नक्त नफा ३० टक्के वाढला. मार्जिन मात्र कमी होऊन सव्वा तीन टक्क्यावरून २.१ टक्क्यांवर आली. २०१९मध्ये ३७०चा पीई रेशो होता, तो आता कमी होऊन ७६ वर आला आहे. तरीही अतिशय महागच आहे. पण विक्रीत दरवर्षी होणारी जबरदस्त वाढ परदेशी गुंतवणूकदारांना अत्यंत भावते. मार्जिन कमी जरी झाली असली तरी पुढील दोन वर्षे तरी वृद्धीचा हा वेग कायम राहील असे ऑर्डर बुक आहे. काही नशीबवान गुंतवणूकदारांनी कमी किमतीत घेतला आहे, त्यांनी नव्याने घेतला नाही तरी आहे तो सांभाळावा.

‘आमचे मालक येथेच जेवतात’, असे म्हटले की खानावळीत निःसंकोच आडवा हात मारता येतो. ‘सेबी’ने पुण्यात ही पाटी पाहिली असावी. नवीनतम आदेशानुसार, म्युचुअल फंडांच्या निधी व्यवस्थापनातील महत्त्वाच्या व्यक्तींनी व मालकवर्गाने स्वतःच्या पगारातील काही हिस्सा त्या त्या फंडात गुंतवावा असे ‘सेबी’ने म्हटले आहे. असे होणे नक्कीच स्वागतार्ह आहे. बिझनेस लाईन’ने केलेल्या सर्वेक्षणात आज तरी अनेक फंड्स या परीक्षेत जेमतेम काठावर पास वा नापास आहेत. जवळपास आठ लाख कोटींच्या इक्विटी मालमत्तेत म्युचुअल फंडांचे संचालक मंडळ व निधी व्यवस्थापनाने, स्वतःच्या योजनेत फक्त १०६३ कोटी (०.१३ टक्के) गुंतवले आहेत. ही टक्केवारी जरी नगण्य असली, तरी हा आदेश अमलात आल्यावर यात नक्कीच सुधारणा होईल. विशेषतः गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक बळकट होईल. त्यातल्यात्यात ‘मोतीलाल ओसवाल’ व पराग पारिख’ हे दोन फंड्‌स या निकषावर उठून दिसतात.  

शेअरबाजार तेजीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये जमेल तसा नफा खिशात टाकणे व आता काही दिवस ‘ए ग्रुप’ किंवा टॉप १०० शेअरकडे लक्ष वळविणे इष्ट.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअरबाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या