हलकासा झटका...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 21 जून 2021

अर्थविशेष

मागील अंकात शेअरबाजाराने सुजाण गुंतवणूकदाराला भरभरून दिले याची पावती दिली होती. निफ्टीची १६ हजार ही सीमारेषा काही फार दूर नाही हे आता सर्वमान्य झाले आहे. मुळात ती सीमारेषाच आहे का? हेदेखील बघायला हवे.

गेल्या सोमवारी बाजारात मोठी  उलथापालथ झाली पण नवा उच्चांक नोंदविण्याच्या आड ती आली नाही. या पातळीवर निफ्टीची २००-३०० अंशांची किंवा सेन्सेक्सची ५००-१००० अंशांची घसरण हसत सहन करता आली पाहिजे. या तात्पुरत्या पीछेहाटीआड नवी तेजी दडली असते. या पातळीवर काही पथ्ये पाळली पाहिजेत. कुठल्याही भावात, बेफाम आवेशाच्या आविर्भावात तेजी करता येणार नाही. जुन्या उच्चांकानजीक एखादा शेअर आला तर तेथून खाली येतोय का हे बघावे, न आल्यास नव्या उच्चांकाची वाट बघावी. अन्यथा थोडा नफा वसूल करावा. डेरिव्हेटिव्ह बाजारात काम करायचेच असेल तर फ्युचरऐवजी ऑप्शनचा मार्ग त्यातल्यात्यात कमी जोखमीचा. आता पैसे वाट पाहून, थांबून, नफा नोंदवून  मिळणार आहेत. 

बाजाराची निसरणी आणि पुनःश्च सावरणी 
अदानी समूहाच्या शेअरनी आठवड्याच्या सुरुवातीला बाजाराला मोठी हूल दिली. गेल्या सोमवारी (ता. १४ जून) शेअरबाजार उघडण्याच्या आधीच समाज माध्यमात एक संदेश फिरत होता. शेअरबाजारातला एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आणण्याचे श्रेय गाठीला असलेल्या एका पत्रकाराच्या ट्वीटचा संदर्भ पंटर्सनी अदानीच्या शेअरशी जोडला. नाहीतरी अदानी समूहाचा शेअरबाजारातील अतुलनीय उत्कर्ष अनेकांच्या डोळ्यात खुपत होताच. वर्षभरापूर्वी जेमतेम १५० रुपये भाव असलेला अदानी एन्टरप्राईझेस १७०० रुपयांना पोहोचला. तसेच समूहातील सर्वच शेअरचे भाव अनेकपट झाले. याबद्दलचीही कुजबूज बाजारात होतीच. त्यात अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या तीन विदेशी कंपन्यांचे डीमॅट खाते व निधीखाते ‘एनएसडीएल’ने गोठवल्याची अफवा बाजारात वाऱ्यासारखी पसरली. सामान्य गुंतवणूकदाराला विक्रीची संधी मिळायच्या आतच, बाजार उघडताच, अदानी समूहाच्या शेअर्सना खालचे सर्किट लागले. सर्किट उघडल्यावर भाव पुन्हा खाली आले. घबराटीमुळे तेथेच विक्री झाली असावी. खालील भावातील विक्री पचवून बाजाराने श्वास घेतला तर ‘एनएसडीएल’चा खुलासा हाती आला. त्यापाठोपाठ अदानी समूहानेदेखील कुठलेही खाते गोठवलेले नसल्याचा खुलासा केला. सर्व शेअर पुन्हा वधारायला लागले. बातमीचा आधार घेऊन मंदीवाले खिसा भरून गेले. जोखीमक्षमता असलेल्या तेजीवाल्यांनी खालच्या पातळीवर माल भरला. नुकसान कुणाचे झाले तर झुंडीत चालणाऱ्या निरागस गुंतवणूकदारांचे. इंग्रजीत एक बोचरी म्हण आहे, In share market, bulls make money, bears make money, but pigs and hares get slaughtered. दिवसअखेर लक्षात आले, झटका हलकासाचाच होता पण लागला जोरात! असो. छोट्या गुंतवणूकदाराने यातून योग्य तो बोध घ्यावा. 
‘दबंग’ चित्रपटात सलमान खान व्हिलनला सांगतो, ‘उतना ही मारो जितना सह सको’. आपल्या शेअरबाजारातही हे लागू पडते. सहन करता येईल इतकीच जोखीम घ्या. मागील दोन्ही सदरात, कारण न कळता, ‘जॉनच्या पावट्याच्या वेलाप्रमाणे’ सरळ वर जाणाऱ्या शेअर पासून सावधान, असा धोक्याचा इशारा दिला होता. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय हात लावू नका, कुठल्याही किमतीला घेऊ नका, खाली आल्यावरच विचार करा असा आपले म्हणणे होते. किमान स्टॉप लॉस तरी खोलवर ठेवावा व आपल्या जोखीमक्षमतेप्रमाणे असावा अशी अपेक्षा. 
तेजीचा पुढील अंक बघायचा असेल तर ‘रिलायन्स’ला आखाड्यात उतरावे लागेल असे मागील लेखात म्हटले होते. तसेच झाले. अदानीने मारले पण अंबानी मदतीला धावले. हा समभाग बरेच महिने सुस्त होता, त्याकडे अभ्यासपूर्वक लक्ष देता येईल. सौदीची महाप्रचंड तेल कंपनी ‘आरामको’चे चेअरमन यासिर अल रुमाय्या ‘रिलायन्स’च्या संचालक मंडळात सहभागी होण्याची चर्चा आहे. ‘रिलायन्स’च्या जोडीला खासगी बँका तेजीत आल्या तर १६ हजारची पातळी काही फार दूर नाही. 
या आठवड्याची अजून एक चांगली बातमी म्हणजे यंदा प्रत्यक्ष कर संकलनात झालेली ५४ टक्के वाढ. ‘विवाद से विश्वास तक’ या मोहिमेचे यश तसेच जीएसटी व आयकर विदा सुसूत्रीकरण हे या मागील प्रमुख कारण आहे हे नि:संशय. आयकर खात्याच्या  पोर्टलचे नूतनीकरण व पुनरुज्जीवन करण्याचे ठरले आहे. सामान्य करदात्याला कर भरणे सोयीचे जावे हा यामागचा उद्देश! हे पोर्टल कसे वापरावे ह्यासाठी; सोपी व सुटसुटीत (?) फक्त ९९८ पानी मार्गदर्शिका उपलब्ध आहे. नवे पोर्टल सुरू होण्याची वाट पाहणे सोपे जावे म्हणून जुनी व्यवस्था मोडीत काढली आहे. कंपनी करदात्याच्या कष्टात त्यातून भर जरी पडली तरी तो जीएसटी अंमलबजावणीची आठवण ठेवत नव्या बदलाला सामोरे जाईल. टीका बाजूला ठेवीत या बदलाचे स्वागतच केले पाहिजे. प्रामाणिक करदात्याला कुठलीही तोशीस लागणार नाही पण सरकारच्याच निरनिराळ्या आस्थापनांना निरनिराळी माहिती देणाऱ्या करदात्यांना चाप बसेल हे निश्चित. 
डाळी व खाद्यतेलांच्या वाढत्या किमतींची झळ सर्वाधिक बसत आहे, कारण देशांतर्गत उत्पादन आपल्या गरजा भागवू शकत नाही. या क्षेत्रातील आपली आत्मनिर्भरता किमान ५० टक्क्यांवर आणण्याचा मानस पुरा करण्यासाठी या खरीप हंगामात बारा लाख हेक्टर नवे क्षेत्र तेलबियांच्या लागवडीखाली आणण्याचा निर्धार आहे. तो कितपत यशस्वी होतो यावर महागाई दराची पुढील वाटचाल दिसेल. आजतरी महागाईच्या दराने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल व डिझेल आपल्या परीने त्याला हातभार लावत आहेतच. यंदाही मॉन्सून प्रसन्न राहील असा अंदाज आहे. पीकपाणी भरपूर झाल्यास व ‘लो बेस’ इफेक्ट बाजूला होऊन, भाव स्थिर राहिल्यास, महागाई कमी झाल्याचे समाधान मिळू शकते. 
महागाई वाढली तरी व्याजदर स्थिर ठेवायचे असे सर्वच मध्यवर्ती बँकांनी ठरवले आहे. कोविड बाधितांची संख्या कमी होत चालली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याची जबाबदारी प्रामुख्याने केंद्र सरकारने घेतली आहे. यापुढे गाफील न राहता कोविडची तिसरी लाट जर आलीच तर सामना करण्यास सज्ज राहायचे असे देशाच्या आरोग्यरक्षकांनी ठरवले आहे. लघु व मध्यम उद्योजकांना ५० कोटी डॉलरची मदत वर्ल्ड बँकेने देऊ केली आहे. तिमाही निकाल समाधानकारक आहेत, मग तेजीला उधाण आले तर काय नवल? 
सावकाश पण वरच जाणाऱ्या, कच्च्या तेलाच्या किमती नक्कीच बोचतात व त्याबरोबर बोचतेय ते ‘ड’ दर्जाचे शेअर वर जाणे. प्रत्येक तेजीत हे होत असते आणि त्यात अडकलेल्या गुंतवणूकदारांना देव पाण्यात ठेवून पुढील तेजीची ४-५ वर्षे वाट बघावी लागते.मागेही ‘टाटा स्टील’ची भलावण केली होती. कर्ज कमी करण्याचे प्रयत्न, युरोपीय बाजारपेठेतील आश्वासकता (युरोपिअन सेफगार्डस मुळे भारतातील पोलादाची आयात दोन वर्षात तिप्पट झाली आहे), त्यात या शेअरमध्ये नुकतीच होऊन गेलेली घसरण या मुळे गुंतवणुकीच्या अभ्यासासाठी ‘टाटा स्टील’कडे बघावे. ‘सेल’चा शेअरदेखील पुढे चाल घेऊ 
शकतो.
(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या