बिरबल की खिचडी... कब पकेगी?

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 12 जुलै 2021

अर्थविशेष

वाढत असलेल्या प्रत्येक शेअरमध्ये गुंतवणूक करावीशी वाटते पण करू नये. कुठलाही शेअर किंवा बाजार तुम्हाला सांगून खाली येत नाही. मोठ्या नफ्याचा हव्यास न धरता या पातळीवर भांडवल जपणे महत्त्वाचे.

बिरबलाच्या गोष्टी आपण लहानपणापासून पाहत, ऐकत आलो आहोत. शेअरबाजाराची अवस्था सध्या बिरबलच्या खिचडीसारखी झाली आहे. धड शिजतही नाही आणि किती वेळ वाट पाहायची तेही कळत नाही. विस्तवाची धग तरी वर पोहोचली पाहिजे किंवा भांडे तरी खाली घेतले पाहिजे. तरच खिचडी शिजेल. गेले तीन आठवडे निफ्टी तीन चारशे अंशात घोटाळते आहे. १५,९००-१६,००० पार करत नाही अन १५२००पर्यंत खालीही येत नाही. एकदा का निफ्टीत चांगली हजारएक अंशांची मंदी आली तर पुढे वर जाणे सुकर होईल. दुसऱ्या बाजूला, १६ हजार पार करून बाजार जर वर गेला तर मंदीवाले तात्पुरते का होईना शरण येतील आणि १६५००च्या टार्गेटचा ध्यास घेता येईल. अन् कदाचित १६६००च्या आसपास नवी मंदी उभी राहील. 

दोन जुलैला वॉल स्ट्रीटने ३४,८०० हा नवा उच्चांक नोंदवला. पे रोलमध्ये ८,५०,००० नव्या नोकऱ्यांची वाढ झाल्याचे निमित्त झाले. त्यामुळे आपलाही बाजार गॅपने उघडून १५,८३४ वर बंद झाला. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत कदाचित निफ्टी व सेन्सेक्स नव्या उच्चांकावर गेलेही असतील. तसे जर झाले नाही तर पुन्हा बाजार कन्सॉलीडेट करत राहील. एखाद्या अशांत सीमेवर वस्ती करणारे लोक जसे कायम जीव मुठीत धरून राहतात तसेच या पातळीवर गुंतवणूकदारांचे होते. मार्केट पडेल की अशी सतत भीती बाळगत राहिले तर ना धड खरेदी करता येत ना विक्री. त्यापेक्षा पडझडीची भीती न बाळगता, निर्देशांकांना दीर्घ मुदतीत वरच जायचे आहे, असा विश्वास बाळगणे केव्हाही चांगले. काही गुणवत्तापूर्ण शेअर निवडावे आणि त्यात प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूक करत जावी. ‘टायटन’,‘एपीएल अपोलो’, ‘अपोलो हॉस्पिटल’, ‘बजाज फायनान्स’,‘आयसीआयसीआय बँक’, ‘इन्फोसिस’, ‘टाटा स्टील’, ‘टाटा मोटर्स’, ‘एचडीएफसी’, ‘मारुती’ इत्यादी. शेअरची निवड स्वतःच्या अभ्यासावरून केली तर अधिक आत्मविश्वासानेही करता येईल. 

अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ‘पेनी स्टॉक्स’पासून दूर पळाले पाहिजे. आतापर्यंतच्या पेनी स्टॉकच्या खरेदी विक्रीत जर नफा झाला असेल तर तो ताब्यात घ्यावा आणि काही दिवस विश्रांती घ्यावी. वकुब नसताना वरचे सर्किट लागले म्हणजे तो शेअर चांगला असतोच असे नाही. ‘जेपी असोसिएटस’, ‘जेपी इन्फ्रा’ जसे सर्किट लागून वर जातात तसेच ते खालीही सर्किट लागूनच येतात. ‘पेंटाफोर’, ‘डीएसक्यू सॉफ्ट’, ‘टेलिडेटा’ आदी २००० साली शिखरावर असलेले शेअर काळाच्या ओघात कधी नष्ट झाले ते कळलेही नाही. विशेषतः सरडा जसे रंग बदलतो, त्याप्रमाणे वारा वाहील तसे नाव बदलणाऱ्या शेअर पासून तर अति सावध. अशा शेअरचे त्या त्या काळात पीकच येत असते. १९८५ साली लीझिंग कंपन्यांची चलती होती. त्याकाळी बंद पडलेल्या अनेक कंपन्या नावापुढे ‘लीज’ लाऊन पुन्हा बाजारात उभ्या राहत. पुढे ९९-२०००च्या सॉफ्टवेअर बूममध्ये कंपन्यांनी जुने कुंकू पुसून नावापुढे ‘सॉफ्टवेअर’ लावायला सुरुवात केली. पुढे एक्स्पोर्टची चलती आल्यावर प्रत्येक कंपनी अमुक तमुक अँड ‘एक्स्पोर्टस्’ झाली. तीच परिस्थिती पुन्हा २००८मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जोरात असताना आली. आजही एखादी कंपनी नाव बदलून नावात ‘स्पेशालिटी केमिकल’ किंवा ‘कॉन्ट्रक्ट फार्मा’ आणू शकते. स्पेशालिटी केमिकल हा काय प्रकार आहे ते ९० टक्के गुंतवणूकदारांना माहीत असेलच असे नाही पण ह्यातील शेअर्स तेजीत आहेत एव्हढे नक्की कळते. हे सर्व पुन्हा पुन्हा पोटतिडकीने सांगतो याचे कारण नवा गुंतवणूकदार तेथेच आकर्षित होतो व कपाळाला गुलाल लाऊन नवा बकरा म्हणून उभा राहतो. जत्रेत गेलेल्या मुलाला प्रत्येकच खेळणे हवे असते. तसेच प्रत्येक वाढत असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करावीशी वाटते पण करू नये. कुठलाही शेअर किंवा बाजार तुम्हाला सांगून खाली येत नाही. सतत सजग असणे आपल्याच हिताचे आहे. मोठ्या नफ्याचा हव्यास न धरता या पातळीवर भांडवल जपणे महत्त्वाचे. 

तेव्हा सबूर! ‘एनएसई’ म्हणते तसे ‘सोच कर समझ कर इन्व्हेस्ट कर’. 

आता सगळे ध्यान बँकनिफ्टीकडे लागले आहे. नुकतेच एचडीएफसी बँकेने ‘एनएसई’ला कळवले की ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेची रिटेल कर्जे दहा टक्क्याने तर मोठी कर्जे १७ टक्क्याने वाढली आहेत. ‘कासा’ गुणोत्तर ४५ टक्के आहे. (म्हणजे सोप्या भाषेत, चालू व बचत खात्यांत, जिथे न्यूनतम व्याज मिळते, असलेल्या पैशांचे एकूण ठेवींशी असलेले प्रमाण) वरील धावता आढावा खचितच संतोषजनक आहे. पुढे येणाऱ्या तिमाही निकालाची ही नांदी ठरावी. बँकिंग उद्योगावरचे हे मळभ दूर झाल्यास नवा उच्चांक अवघड नाही. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व अॅक्सीस बँक या तिघी बँक निफ्टीच्या पुढील वाटचालीचे नेतृत्व करतील. त्या खालोखाल एचडीएफसीने वार्षिक निकाल नोंदवताना खूप आशादायक चित्र रंगवले होते. त्यातील रंग फिके न पडल्यास निफ्टीला अजूनच जोर येईल. ए यू फायनान्स बँकेने मागील तिमाहीत निराशा केली होती, यावेळी चित्र बदलेल असे वाटते. त्याखेरीज, सिटी युनियन बँक प्रामुख्याने लघु व मध्यम उद्योगांना पत पुरवठा करते. त्या बँकेचे निकाल बघणे महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्था खरंच सुधारते आहे का? याचा निर्देश तो निकाल करेल. 

पेट्रोलियम मंत्रालयाने नुकताच ग्रीन एनर्जीला चालना देण्यासाठी संबंधित कायद्यात एक बदल सुचवला आहे. त्यात खनिज तेलाच्या व्याख्येत हायड्रोजनचा समावेश करावा असे सूचित केले आहे. हा बदल जरी स्वागतार्ह असला तरी फक्त कायदा बदलून फारसे साधणार नाही. पुढे प्रोत्साहनासाठी ठोस पावले उचलावी लागतील. तरीही ही दिशा व ह्या दृष्टिकोनाचे स्वागत करायला हवे. 

झोमॅटोत असलेल्या काही चिनी गुंतवणुकीचा मागोवा घेताना ‘सेबी’ने झोमॅटोची नवी भागविक्री थांबवली होती. त्यामुळे आपला लाडका ‘इन्फोएज’देखील खाली आला होता. नुकतीच ‘सेबी’ने आयपीओला परवानगी दिली आहे. कंपनी ७८७५ कोटी रुपयांची भागविक्री करेल. त्यात ‘इन्फोएज’कडे १८.५ टक्के हिस्सा आहे. त्यातील ३७५ कोटी रुपयांची विक्री इन्फोएजतर्फे होईल. या बातमीमुळे ‘नोकरी’ अथवा ‘इन्फोएज’ पुन्हा रंगात आला. झोमॅटोला मागील वर्षी २४८६ कोटींच्या विक्रीवर जवळपास तेव्हढाच तोटा झाला आहे. पण मार्केट त्याकडे दुर्लक्ष करेल, कारण हे नवे ई-कॉमर्स क्षेत्र जगाला आकर्षित करीत आहे. ‘अमेझॉन’ कंपनी १९९७ साली प्रथम शेअरबाजारात आली. पुढे सात वर्षे ती तोट्यातच होती. आज अॅमेझॉनचा नफा ३९ अब्ज डॉलरच्या विक्रीमागे १५२ कोटी डॉलर आहे व बाजारभाव $ ३५०० आहे.  इन्फोएजकडे ‘पैसा बाजार’ हे इन्शुरन्स विक्रीचे ऑन लाईन पोर्टल आहे. त्याचाही पुढेमागे शेअरबाजारात येण्याचा विचार आहेच. त्यामुळे ‘इन्फोएज’ची चलती राहील असे वाटते.

निर्देशांकाचे नवे उच्चांक ह्या महिन्यात दिसावे. त्यामुळे बेभान न होता, चांगले व्यवस्थापन व गुणवत्ता असलेल्या शेअरचा आत्मविश्वासाने पाठपुरावा करण्याचे साहस गुंतवणूकदाराला मिळो ही सदिच्छा.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या