अंदाज अपना अपना

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

अर्थविशेष

मंदीत खरेदी आणि तेजीत विक्री हे सूत्र धरून काम करणे योग्य. आपला अंदाज त्याप्रमाणे बदलणे महत्त्वाचे.

मा गील आठवड्यात एचडीएफसी बँक व बजाज फायनान्सने जरी थोडीफार निराशा केली तरी बाजार फारसा खाली आला नाही, उलट दोन दिवसांच्या मंदीनंतर शेअरबाजार उसळलाच. निष्कर्ष एकच; जसा १६५००चा हट्ट तात्पुरता बाजूला ठेवायचा, तसाच १५२००चा ठेवायला हवा. मंदीत खरेदी आणि तेजीत विक्री हे सूत्र धरून काम करणे योग्य. आपला अंदाज त्याप्रमाणे बदलणे महत्त्वाचे.    

‘नावडतीचं मीठ अळणी अन आवडतीचं कारलंही गोड!’ अशी एक म्हण आहे. आयटीसीचे जून अखेरचे निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहेत. सिगारेटची विक्री व नफा अपेक्षेप्रमाणे वाढतच आहे. त्याचबरोबर ग्राहक उपभोग्य उत्पादनांची विक्री मागील वर्षीच्या वाढीव कामगिरीत अधिक सुधारणा दर्शविते. पेपर व पेपर बोर्डची विक्री ५४ टक्के वाढली तसाच नफाही! फक्त अपेक्षेप्रमाणे हॉटेल व्यवसाय लॉकडाउनमुळे तोट्यात आहे. बाजार मात्र, जोपर्यंत शेअरची विभागणी होऊन सिगारेट व्यवसायाची वेगळी चूल मांडली जात नाही तोपर्यंत या शेअरकडे पाठ करून बसेल असे दिसते. तरीही भावात थोडीफार धुगधुगी यावी. २०० रुपयांच्या जवळ खरेदी झाल्यास जोखीम कमी आहे. याउलट बजाज फायनान्सचे निकाल जरी फारसे नेत्रदीपक नसले तरी व्यवस्थापनाचे भाष्य, पुढील काळात येणारे अॅप, वगैरे ऐकून; कोविडमुळे वाहनकर्जाच्या परतफेडीला होत असलेला विलंब (विशेषतः रिक्षांच्या बाबतीत) व तरतुदी याकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. शेअर खाली आलाच नाही. ‘आवडतीचे कारले तब्येतीला चांगले’ असे म्हणत बाजाराने पसंत केले. 

इलेक्ट्रिक कार लोकप्रिय होण्यास अनेक अडचणी असू शकतात. पहिल्याप्रथम किंमत. कितीही किफायतशीर असली तरी पेट्रोल किंवा डिझेलच्या बचतीतून ती वसूल होणे कठीण. दुसरी अडचण, सर्वत्र चार्जिंगची व्यवस्था असणे. शहराबाहेर वाहन नेण्याचा आत्मविश्वास चालकांत निर्माण करणे. तिसरी वाहनक्षमता. चौथी बॅटरीचे आयुष्य! इलेक्ट्रिक स्कूटर मात्र सहज खपू शकते. शहराबाहेर सहसा नेली जात नाही, घरीच चार्जिंग करण्याची सोय असते आणि थोडी महाग असली तरी खिशाला परवडते. बजाज चेतक, बिगॉस व ईथरच्या जोडीला आता ओलाची ई-स्कूटर आली आहे. जेमतेम एक लाख रुपये किंमत व ५०० रुपयात आगाऊ नोंदणीची सवलत या प्रलोभनांमुळे पहिल्याच दिवशी एक लाख वाहनांचे बुकिंग झाले. किमान एक कोटी स्कूटर्स तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कृष्णगिरी (तमिळनाडू) येथील ५०० एकर जागेत कारखान्याची उभारणीही लौकरच पूर्ण होईल. या प्रकल्पात २४०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. मुख्य पुरवठा लिथियम आयन बॅटरी व इलेक्ट्रिक मोटर्सचा लागेल. गेली काही वर्षे लिथियमच्या किमती घसरत होत्या. मात्र आजच्या अलोह धातूंच्या वारेमाप तेजीमुळे किमती वाढत आहेत. पुढे एक लाख रुपयांना स्कूटर देता येणार का? हा कळीचा मुद्दा आहे. फक्त पाचशे रुपये भरून नोंदणी होत असल्याने, वाहनाबद्दलचे कुठलेही असमाधान झाले तर आगाऊ नोंदणीचे आकडे खाली येतील. ओला ई-स्कूटरचा जागतिक पुरवठा भारतातून होणार असल्यामुळे गुणवत्तेबद्दल कुठलीही तडजोड होणार नाही अशी अपेक्षा आहे. झोमॅटोच्या यशामुळे, तोटा झाला तरी शेअरबाजारातून मोठे पैसे उभे करता येतील असा ओला व्यवस्थापनाला विश्वास आहे. 

बजाजचे धोरण मात्र निराळे आहे. कंपनीकडे २४ हजार कोटी रुपयांची गंगाजळी आहे. तसेच भारतभर विक्रेत्यांचे जाळे पसरलेले आहे. याखेरीज निर्यातीत युरोप व आफ्रिका खंडात मोठे बस्तान बसले आहे. युरोपमधील फ्रेंच कंपनी पिहा मोबिलिटी (Pierer Mobility) बजाज चेतक विक्रीत सहभागी आहेच. त्यात कंपनीचा मुख्य भर मोटारसायकल उत्पादनावर असल्यामुळे, इलेक्ट्रिक स्कूटरमुळे एक वेगळे दालन कंपनीशी जोडले जाईल व विक्रीत मोठी भर पडेल. 

हा सर्व ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे, आता पुढील पाच वर्षात रस्त्यावर ई-स्कूटर्स व इतर ई-वाहनांची गर्दी होईल. त्यातील वाहन निर्माते टाटा मोटर व महिंद्रा, कदाचित मारुती व बजाजदेखील, ह्यांच्या तुलनेत, सुट्या भागांचा पुरवठा करणारे काही शेअर आपल्या रडारवर ठेवता येतील. मिंडा कॉर्प, मिंडा इंडस्ट्रीज, लुमॅक्स ऑटो टेक, मदरसन सुमी हे सारे उत्पादक पारंपरिक वाहनांना सुटे भाग तर पुरवतातच पण त्याबरोबर इलेक्ट्रिक वाहनांसाठीही काम करू शकतात. कोविडचे संकट टळल्यावर वाहन उद्योग उभारी घेणारच आहे, दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक त्यामुळे फायदेशीर ठरू शकते.

मागील महिन्यात एसबीआय कार्ड्‌सचा समभाग गुंतवणुकीच्या दृष्टीने अभ्यासासाठी सुचवला होता. नुकतेच त्याचे निकाल हाती आले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत नफा २२.५ टक्के कमी जरी असला (३९३ कोटी रुपयांच्या तुलनेत ३०५ कोटी) तरी तो मागील तिमाहीपेक्षा ७३ टक्के जास्त आहे. या व्यवसायात अनार्जित कर्जे असतातच. पण तीही ५ टक्क्यांवरून ३.९१ टक्के झाली आहेत. रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडीट कार्ड विकण्यास मनाई केली आहे. तसेच मास्टर कार्ड या अमेरिकन कंपनीवरही निर्बंध घातले आहेत. या दोन्हीचा परिणाम एसबीआय कार्ड्‌सचा बाजारातील हिस्सा वाढण्यात होईल. हा शेअर किमान रु. ११००-११४० पर्यंत जाऊ शकतो. नफा कमी असून शेअर शंभर रुपयांनी वाढणे ह्या  बाजाराच्या लहरीपणामागील तर्कशास्त्र आता गुंतवणूकदारांच्या पचनी पडले आहे. 

झोमॅटोच्या शेअरनी प्राथमिक भागविक्रीत धमाल उडवली आहे. बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतरही घेणाऱ्यांना जवळपास ४० ते ५० टक्के नफा खिशात टाकता आला आहे. यापुढे भाव जरी वाढले तरी तो नफा माझा नाही, असे म्हणत आज रु. १४५च्या वर, वा या दरम्यान विक्री केल्यास भविष्यात समाधान होऊ शकते. हा आवेग ओसरल्यावर शेअर पुन्हा विकत घेता येईल. झोमॅटोच्या पावलावर पाऊल ठेवून जुबिलंट फूडनेदेखील स्वतःचे अॅप विकसित केले आहे. कंपनीकडे ग्राहकांचा प्रचंड मोठा डेटा आहे. फोन नंबर, घरच्या पत्त्यापासून घरातील माणसे, त्यातील तरुण व्यक्ती, त्यांच्या आवडीनिवडीचा अभ्यास करून त्यानुसार उत्पादन व विक्री धोरण आखता येणे शक्य आहे. जुबिलंट फूड्सची फूड टेक कंपनी म्हणून वेगळ्या चष्म्यातून किंमत ठरवली तर या शेअरकडे नव्याने बघता येईल व शेअर का वाढला तेही कळेल. या नव्या दृष्टिकोनानंतर शेअर २० टक्के वाढला. जर कुठल्या कारणाने खाली आलाच तर आपल्या रडारवर ठेवता येईल. 

या निमित्ताने झोमॅटो सारख्या शेअरची एक जोखीम अधोरेखित होते. स्वत:चे निष्ठावंत ग्राहक असतील तर प्रत्येकच नाममुद्रा असलेला फूडजॉइंट आपले अॅप विकसित करू शकतो. पुण्यासारख्या ठिकाणी चितळे, वैशाली वगैरे याद्वारे आपले झोमॅटोचे कमिशन वाचवू शकतात. 

पीएनबी हाउसिंग फायनान्सने ठरवलेली स्वस्तातली भागविक्री (रुपये ३९० प्रती शेअर) सेबीच्या कार्यवाहीनंतर न्यायप्रविष्ट आहे. तीच स्थिती बार्बेक्यू नेशन व एलआयसी हाउसिंगच्या संचालक मंडळाने ठरवलेल्या प्राधान्य भाग विक्रीबाबतही आहे. बीएसई व एनएसईने वरील कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. स्वतंत्र तज्ज्ञांतर्फे शेअरचे मूल्यांकन करून किंमत ठरवा, आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे कसोशीने पालन करून प्राधान्य विक्री करा, अशी सूचना आहे. त्यातील मजेची बाब अशी की बार्बेक्यू नेशन बाजारभावाच्या किरकोळ खाली तर एलआयसी हाउसिंग बाजारभावाच्या थोडी वर भागविक्री करू इच्छित होती. या प्रकरणाचा समारोप व त्यातून निघणारा पुढील मार्ग, अशा भागविक्रीसाठी दिशादर्शक ठरेल. 

शेअरबाजार दिवसेंदिवस अधिकाधिक आव्हानात्मक होत चालला आहे. रोज नवीन शेअर खरेदीसाठी शोधण्यापेक्षा नेहमीच्याच यशस्वी कलाकारांचा मागोवा घेणे उत्तम! पुन्हा पुन्हा सुचवलेले आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, टाटा कन्झ्युमर, लार्सन इन्फोटेक, एपीएल अपोलो जरी नव्याने घेता आले नाहीत तरी किमान सांभाळावे.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या