जीतम् जीतम् ...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

अर्थविशेष

शेवटी तेजीवाल्यांनी १६ हजार अंशापुढे मजल मारून निफ्टीचा गड सर केलाच! गेले दोन महिने चाललेल्या धुमश्चक्रीची परिणती शेवटी विजयात झाली. या तेजीमंदीच्या लढाईत १६ हजार अंशापुढे जाताना बरेच मध्यम व लहान भांडवल असलेले शेअर (स्मॉलकॅप व मिडकॅप) थकून खाली आले व यापुढचे तेजीचे नेतृत्व त्यांनी लार्जकॅपकडे (मोठे भांडवलमूल्य असलेल्या शेअरकडे) सोपवले. 

गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे जुलैत इतर आशियायी बाजार पडले तरी आपले बाजार स्थिर होते. गेल्या महिन्यात वाढलेली विक्रमी विजेची मागणी (दोन लाख मेगावॉट) तसेच जीएसटी संकलन व निर्यातीतील वाढ, तेजीवाल्यांना नवे बळ देऊन गेली. त्यामुळेच ३ ऑगस्ट या दिवशी जगभरातले शेअरबाजार नर्व्हस असले तरी आपल्या बाजाराला मात्र तेजीचे उधाण आले होते. पुढे शुक्ल पक्षात वाढणाऱ्या चंद्रासारखे तेजीचे बळ वाढतच गेले आणि आठवड्याची अखेर चांगली घसघशीत १६,२३८ अंशावर झाली. आपला अंदाज खरा ठरून निफ्टी पुढे लवकरच १६,५०० होणार याचे जरी समाधान असले तरी या अपेक्षापूर्तीला एक काळी किनार आहे. ती म्हणजे बाजाराची व्याप्ती (Market Breadth) कमी होत आहे. रोजच्या व्यवहारात वर जाणाऱ्या शेअरपेक्षा खाली येणारे शेअर संख्येने जास्त आहेत. छोट्या गुंतवणूकदारांच्या लाडक्या पेनी स्टॉक्सनी मान टाकली आहे. वर्षात उच्चांक केलेल्या शेअरची यादी रोजच येत असते. त्यात आता वर्षभरात निचांक केलेल्या शेअरची हळूहळू भर पडते आहे. हे असे होतच असते. कालचक्र, अर्थचक्राच्या मागोमाग फिरतच असते. असो.

माहिती तंत्रज्ञानाचे शेअर तेजीत होतेच, त्यांना खासगी बँका व भारती एअरटेलने साथ दिल्यामुळे व ‘आयटीसी’ही आळसावत जागा झाल्यामुळे निफ्टीचा नवा उच्चांक साध्य झाला. तरी रिलायन्स अजून मैदानात उतरलेला नाही. रिलायन्सने केलेले फ्युचर ग्रुपचे आग्रहण सुप्रिम कोर्टाने रद्दबादल केले आहे. हे मळभ दूर होण्यास काही काळ जावा लागेल. तसेच बाजार उत्सुकतेने रिलायन्स समूहाच्या येणाऱ्या घडामोडींकडे पाहात आहे. जाहीर केलेले मनसुबे आणि कृती यातील अंतर जसजसे कमी होत जाईल तसा हा शेअर पुन्हा तेजीत येऊ शकतो.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एजीआर देणे प्रकरणी दिलेल्या निकालामुळे दूरसंचार कंपन्यांचे, विशेषतः व्होडाफोन-आयडियाचे कंबरडे मोडले आहे. मार्च अखेर, या कंपनीचे कर्ज एक लाख वीस हजार कोटी होते. जूनमध्ये बिर्ला समूहाचे अध्वर्यू कुमार मंगलम बिर्ला यांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा ह्यांचेकडे, स्वतःचा हिस्सा सरकार वा अन्य कोणाकडेही सुपूर्द करण्याची तयारी दर्शवली. व्होडाफोनच्या ब्रिटिश भागधारकांनीही यापुढे नवीन भांडवल कंपनीत ओतणार नाही असे जाहीर केले आहे. सदरहू कंपनीला टाळे लागल्यास, काय होईल हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कुंभकर्णाने मेल्यावरदेखील अंगावर पडून मोठ्या वानरसेनेचा बळी घेतला होता. तेरा हजार कर्मचारी बेकार होतीलच, पण जवळपास एक लाख अप्रत्यक्ष रोजगार जातील. स्मार्ट फोनला सरावलेले २७ कोटी ग्राहक उरलेल्या दोन दूरसंचार कंपन्यांकडे हस्तांतरित होण्याचा प्रयत्न करतील. रिलायन्स जिओ व भारतीकडे तेव्हढ्या ध्वनिलहरी आहेत का किंवा एवढा ग्राहक ओघ त्यांना सामावून घेता येईल का, हा प्रश्न आहे. मोबाईल सेवा महाग होईल यात शंकाच नाही. स्टेट बँक, पंजाब बँक, इंडसइंड व आयसीआयसीआय वगैरे बँकांना फटका बसेल तो वेगळाच. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने सरकारला जे ५३ हजार कोटी मिळणार असून, फक्त वसूल करायचे आहेत, तेही बुडतील. रिलायन्स कॉम, एअरसेलच्या मागोमाग एकेक करत सर्वच दूरसंचार कंपन्या बंद झाल्यास जगभर नाचक्की होईल ती वेगळीच. 

सरकारही, उशिरा का होईना काही पावले उचलीत आहे. लायसन्स शुल्क व स्पेक्ट्रम शुल्क व त्यावरील व्याज कमी करणे विचाराधीन आहे. तसेच एका क्रांतिकारी निर्णयात (दुसऱ्या एका प्रकरणात) पूर्वलक्षी पद्धतीने करण्यात आलेली करवसुली, आता सरकारने मागे घेतली आहे. व्होडाफोन या निर्णयाचा एक लाभार्थी आहेच. 

वरील उलटसुलट बातम्यांमुळे ह्या शेअरमध्येही या आठवड्यात बरेच चढ उतार झाले. ऑगस्टच्या ५ तारखेला ४.५५ रुपयांचा निचांकी भाव दाखवून हा शेअर सध्या ६.५० ते ७ दरम्यान घुटमळतो आहे. पाच-सात रुपये गेले तरी चालतील अशी तयारी असेल तरच या दिशेला बघावे. सहसा ही कंपनी दिवाळखोर होऊ नये अशी सरकारचीदेखील इच्छा असावी. पण बायको आणि सरकार आपले ऐकतीलच ह्याची काय हमी?

परंतु वरील बातम्यांबरोबर भारती एअरटेलने आपले मासिक शुल्क वाढवण्याची इच्छा प्रकट केल्यामुळे शेअरची किंमत बरीच वाढली. यापुढे किमान रिचार्ज शुल्क ४९ रुपयांवरून ७९ रुपये करण्यात आले आहे. अशा ग्राहकांची संख्या तीस कोटी तरी असावी. जगात सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा आपल्या देशात आहे. ‘अगं अगं म्हशी…’ करत रिलायन्स जिओदेखील याच वाटेने जाईल असे दिसते. तेजीची वाटचाल करताना भारती ६००-६२० या पट्ट्यात अडखळतो. हा अडथळा पार केल्यास पुढील चालीस चांगलाच वाव आहे. जून अखेरच्या तिमाहीत कंपनीने २८४ कोटी रुपयांचा नफा जाहीर केला आहे. यात आफ्रिकेतील टॉवर विक्रीतील १२०० कोटी रुपये नफा धरला आहे. हा नफा विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा कमी असला तरी मागील वर्षी जून अखेर झालेल्या १५,९०० कोटी रुपयांच्या तोट्यासमोर, भरघोस वाटतो. 

मागील लेखात, चीनच्या नियामकांचे ‘स्पुटनिक’ कुठल्या व्यवसायावर आदळणार याबद्दल तर्क केला होता. अंदाजाप्रमाणे ते गेमिंग कंपन्यांच्या उरावर बसले आहे. तिथल्या तरुणाईला ऑनलाइन गेमिंगचे वेड लागले आहे. ‘ऑनर ऑफ किंग्ज’ हा लोकप्रिय खेळ शाळकरी मुले आठ आठ तास खेळतात असे निरीक्षण आहे. या प्रकारच्या गेमिंगवर नवे निर्बंध येतील या भीतीने, ‘टेनसेंट’चे शेअर्स ११ टक्के घसरले. हे वर्ष चिनी गुंतवणूकदाराला आव्हानात्मक जाणार हे नक्की. 

गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने बैठकीत निर्णय घेतला की व्याज दर जैसे थे राहतील. महागाई दर ५.७ टक्के होण्याची शक्यता असली तरी जीडीपीवृद्धीसाठी सोईस्कर व लवचिक पतधोरण ठेवले आहे. आज बाजारात असलेल्या तेजीचा पाया या कमी व्याजदरांवर बेतला आहे. त्यात दशकात प्रथमच भांडवल उभारणीत कंपन्यांचे एकूण कर्जाचे प्रमाण कमी झाले आहे. कर्जाचे प्रमाण कमी व व्याजदरही कमी असणे तेजीस खतपाणी टाकीत आहे. त्याखेरीज गुंतवणुकीचे आकर्षक पर्याय कमी होत आहेत हेही एक कारण आहे. 

याच सदरात मागील एका लेखात ‘नझारा टेक’च्या आयपीओची चर्चा केली होती. जरूर अर्ज करा, न मिळाल्यास सूचीबद्ध झाल्यावर बाजारातून विकत घ्या, अशी शिफारस होती. ‘नझारा टेक’ने गुंतवणूकदारांचा चांगलाच फायदा करून दिला. तशीच एक नवी भागविक्री पुढील काही महिन्यात होणार आहे. संजय नायर व कुटुंबीय प्रवर्तक असलेली ‘नायका’ कंपनी बाजारात येत आहे. बँकिंग क्षेत्रातील गाढा अनुभव असलेल्या फाल्गुनी नायर नेतृत्वाची धुरा सांभाळतील. स्टार्ट अप असूनही तोट्यात नसलेली ही कंपनी सौंदर्य क्षेत्रात काम करते. या क्षेत्रातील भारतीय बाजारपेठ ७५ हजार कोटी असावी असा अंदाज आहे. मॅरिको प्रवर्तित ‘काया’ या क्षेत्रात आहे पण मागील वर्षीच्या जेमतेम २७५ कोटी विक्रीवर निव्वळ तोटा ३८ कोटी रुपये आहे. या नीरस कामगिरी समोर ‘नायका’ची विक्री २४४० कोटी व निव्वळ नफा ६२ कोटी आहे. स्टार्ट अप असूनही प्राथमिक भागविक्रीनंतर प्रवर्तकांचा कंपनीतील हिस्सा ५३ टक्क्यावर असणार आहे. कंपनी एका अॅपद्वारे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचाही वापर करणार आहे. या आयपीओत सहभागी होण्याच्या दृष्टीने विचार करावा असे वाटते. सूचीबद्ध झाल्यावरही भाव अभ्यासून गुंतवणूक केल्यास, ती दीर्घ पल्ल्यात नक्कीच सुखावणारी असेल असे वाटते.

‘एपीएल अपोलो’चे तिमाही निकाल व त्यानंतरचे भाष्य प्रसारित झाले आहे. (त्यात  मजबूत कामगिरी व व्यवस्थापनाचा भविष्याबद्दल आत्मविश्वास जाणवतो) त्याचे विवेचन पुढील लेखात. मात्र प्रत्येक पातळीवर गुंतवणुकीसाठी अभ्यास करणे इष्ट.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या