थोडी खुशी, थोडा गम...

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

अर्थविशेष

तेरा ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात निफ्टीने उच्चांकी बंद दिला आणि तेजीवाले अक्षरश: भांगडा करायच्या मूडमधे आले. १६,५०० अंशाचे स्वप्न व अंदाज आपण मागील सप्ताहात वर्तवला आणि चक्क तसेच झाले. पंधरा जून पासून बाजाराने १५,९०० च्या आसपास दीड महिना रेंगाळावे, अन नंतर पुढे १६५०० पर्यंतची वाटचाल फक्त दहा सत्रात करावी याला मुव्हमेंटम किंवा गतीवेगाची कमाल असेच म्हणावे लागेल. 

एखाद्या ढकलस्टार्ट गाडीला धक्का मारताना तिने अचानक वेग घ्यावा आणि ढकलणाऱ्या जवानांना गाडीत बसता येणे कठीण व्हावे तसे काहीसे शेअर बाजाराच्या मागच्या दहा सत्रांमध्ये झाले. ३ ऑगस्ट आणि १३ ऑगस्ट दोन्ही दिवशी तुफान खरेदी झाली. (या दोन दिवशी, परदेशी संस्थांनी अनुक्रमे २११६ कोटी व ८१९ कोटी रुपये बाजारात ओतले) गेला आठवडाभर बाजार स्थिरच होता. शुक्रवारी, १३ ऑगस्ट रोजी मात्र तेजी थांबलीच नाही. निर्देशांकातले, बरेच दिवस तेजीत मोठा सहभाग नसलेले, वजनदार व भारदस्त शेअर ‘टीसीएस’, ‘एलॲण्डटी’, ‘एचसीएल टेक’, ‘लिव्हर’, ‘पॉवर ग्रीड’, ‘रिलायन्स’ आदी निफ्टीला नव्या उच्चांकावर घेऊन गेले. मात्र मागेही निर्देशित केल्याप्रमाणे छोट्या गुंतवणूकदारांचे लाडके स्मॉल व मिड कॅप शेअर्स दहा पावले मागे आले. बाजाराची व्याप्ती कमी झाली. अॅडव्हान्स डिक्लाईन रेशो (वर जाणाऱ्या व खाली येणाऱ्या शेअरचे गुणोत्तर) जवळजवळ एकास तीन झाले. तात्पर्य हे की निर्देशांकाची पातळी जरी आनंद देऊन गेली तरी मिड व स्मॉल कॅप शेअरची सद्दी संपली की काय? ही चिंता गुंतवणूकदारांना नव्याने भेडसावू लागली आहे.

बाजारात क्षेत्रबदल व मार्केट कॅप बदल अधूनमधून होतच असतो. दीड महिना निर्देशांक रेंगाळले याचा अर्थ लार्ज कॅप वा मोठे शेअर एका पातळीवर टिकून होते, बाजाराची भावना तेजीची असल्यामुळे स्मॉल व मिड कॅप वाढत होते. आता लार्ज कॅपने आघाडी सांभाळायचे ठरवल्यामुळे उर्वरित बाजार थोडा नरम झाला इतकेच. 

मागील आठवड्यात मुंबई स्टॉक एक्स्चेंजनेदेखील बाजाराला एक हूल दिली. बाजाराच्या वारेमाप तेजीला लगाम घालण्याच्या उद्देशाने बीएसईचे एक नवे सर्क्युलर आले. यापुढे दर तीन महिन्यांत शेअर किती वर किंवा खाली जाऊ शकेल याचे नवे बंधन घालायचे एक्सचेंजने ठरवले आहे, असे जाहीर झाले. हे बंधन प्रत्येक सप्ताहाअंती, महिन्याअंती व तिमाहीअंती लागू करणार व शेअर तीन महिन्यात कमाल तीस टक्केच वर जाऊ शकणार या शक्यतेमुळे तंबूत घबराट व धावाधाव झाली. आपण गुंतवणूक दीर्घ पल्ल्याची केली आहे हे सोईस्करपणे विसरून, वाढलेला प्रत्येक छोटा व मध्यम भांडवल मूल्याचा शेअर विकायची बाजाराला घाई झाली. सुक्याबरोबर ओलेही जळावे तसे चांगले व्यवस्थापन असलेले शेअरही या विक्रीच्या माऱ्यातून सुटले नाहीत. नऊ ऑगस्टच्या परीपत्रकानंतर, दुसऱ्याच दिवशी; माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता उर्वरित सर्व क्षेत्रीय निर्देशांक, उदा. सार्वजनिक बँका, धातू, स्मॉल कॅप, मिड कॅप किमान एक ते दोन टक्के घसरले. तब्बल ६०० शेअर खालच्या सर्किटवर बंद झाले. (म्हणजेच इतक्या शेअरमध्ये दिवसातील नीचतम पातळीलादेखील विकत घेणारे कोणीही उरले नाही, मजेची बाब अशी की दोनच दिवसापूर्वी यातल्या अर्ध्याअधिक शेअरमध्ये दिवसातील सर्वोच्च पातळीला कुणी विक्री करायला धजावत नसे.)  ही सगळी वाताहत झाल्यानंतर ११ तारखेला एक्सचेंजने स्पष्टीकरण दिले की, हे सर्क्युलर फक्त ‘ड’ दर्जाच्या म्हणजे X, XT, Z, ZP, ZY व Y या ग्रुपच्या शेअरलाच लागू आहे व तेही जर त्या कंपनीचे बाजार भांडवल एक हजार कोटीहून कमी असेल तरच. (सामान्य गुंतवणूकदाराला ‘ड’ दर्जाच्या शेअरमध्ये इतके विविध गट आहेत हेही ठाऊक नसावे.) सुटकेचा निःश्वास सोडत बाजार पुन्हा पूर्ववत झाला. कमी अधिक नुकसानीतून गुंतवणूकदार व सट्टेबाज जरी सावरले असले तरी यातून काही धडे नक्कीच घेता येतील. 

शेअर बाजार हा अल्प काळात फारसा तोलून मापून प्रत्येक शेअरचे मूल्यांकन करीत नाही. तो भावनेत भरकटत जाऊ शकतो. बेन्जामिन ग्रॅहॅमने म्हटल्याप्रमाणे, “In short term, market is not a weighing machine, but a voting machine” हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

बाजारातील खचलेल्या मनोवृत्तीचा फायदा घेऊन दीर्घ पल्ल्यासाठी आपल्याला कुठे गुंतवणूक करायची आहे, हे ठरवून; न डगमगता ती केली पाहिजे. 

अफवा आहे की बातमी, अफवा असल्यास तिची संभाव्य शक्याशक्यता, बातमी असल्यास तिचा तपशील, पडताळून पाहणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते. 

अति घबराट व अति लोभातून कुठलीही कृती करणे ही सट्ट्याची पहिली पायरी आहे हे ध्यानात घ्यावे. ‘Restrict your actions in Panic or Fear’ हे कुणीतरी तज्ज्ञाने म्हटले असेलच. म्हटले नसेल तरीही लक्षात ठेवावे. 

शेअर बाजार जोखीमयुक्त आहेच, तेव्हा प्रत्येक निर्णय विचारपूर्वकच घ्यायला हवा.   

‘एपीएल अपोलो’चे तिमाही निकाल मजबूत आहेत. तिमाहीत विक्री १५ टक्के कमी झाली असली  तरीही नफा वाढताच आहे. इतर स्पर्धकांची विक्री २२ ते २५ टक्के कमी झाली आहे, म्हणजेच बाजारपेठेतील हिस्साही वाढला असावा. गेली पाच वर्षे कंपनी २५ टक्के विक्री व नफ्यातील वृद्धी दाखवीत आहे. कच्च्या मालाच्या किमती टनामागे पाच हजाराने वाढल्या असल्या तरी तयार मालाची किंमतही टनामागे ८५०० रुपयांनी वाढली आहे. गेल्या तिमाहीपेक्षा नफा २३ टक्के वाढीव आहे. उत्पादन प्रक्रियेत एक पाऊल पुढे जात कच्च्या मालाची काही उत्पादने कंपनी स्वतःच करीत असल्यामुळे ढोबळ नफ्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तिमाहीत टनामागे ६८०० रुपये ढोबळ नफा झाला. (हा उच्चांक आहे.) हे नफ्याचे प्रमाण पाच हजार रुपये प्रतीटनाच्या खाली येऊ न देता, उलट किमान दहा हजार रुपये प्रती टनपर्यंत पुढील तीन वर्षात वाढवावे अशी आकांक्षा आहे. बुलेट ट्रेन, मोठी इस्पितळे व उद्योग हे कंपनीचे प्रमुख ग्राहक आहेत. भारतभर ११ ठिकाणी कारखाने व ८०० वितरकांचे जाळे पसरले आहे. विक्रीचे पैसे सरासरी सात दिवसात जमा होतात. 

व्यवस्थापनाचे भाष्य व भविष्याबद्दल  आत्मविश्वास आपल्याला खरेदीचे बळ देतो. हा शेअर, या क्षेत्रातील इतरांच्या तुलनेत अत्यंत महाग आहे, पण तरीही प्रत्येक खालच्या पातळीवर संग्रहित करावा असा आहे. 

‘सीडीएसएल’, ‘कॅम्स’, ‘डिक्सन’ (आता खाली आला आहे) , तसेच सिमेंटचे शेअर खाली येत आहेत. ‘अल्ट्राटेक’, ‘बिर्ला कॉर्प’ व सर्वकाळ लाडका ‘बजाज फायनान्स’ यांकडे लक्ष असू द्यावे. खाली आलेले मिड कॅप शेअर्स व्यवस्थापन बघून निवडावे. काहीच सुचत नसेल तर आयटी आहेच.

शेअरबाजाराच्या तत्कालीन लहरीला बिचकून न जाता खरेदीची निवड करावी ही इच्छा.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या