द गूड, द बॅड ॲण्ड द अग्ली

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

अर्थविशेष

वीस ऑगस्टच्या शुक्रवारी शेअर बाजार नरमाईतच संपला. निफ्टीने जरी आपली पातळी राखली असली तरी निर्देशांका बाहेरील बाजार खालीच आला. याची चुणूक गेले दोन आठवडे दिसते आहे. आपण पुनःपुन्हा ती वाचकांच्या नजरेत आणून देत आहोत. शेअर बाजाराने आपले निफ्टीचे १६,५००-१६,६००चे टार्गेट पूर्ण केले खरे, पण त्याची किंमत छोट्या व मध्यम शेअर मधल्या मंदीने चुकवावी लागली. 

आता थोडे मागे जाऊन सिंहावलोकन करू. गेल्या वर्षी मार्चच्या २७ तारखेला ११,७६३ अंशावर बंद झालेला मिड कॅप निर्देशांक बोलता बोलता जवळजवळ अडीच पट वाढून ४ ऑगस्ट २०२१ रोजी २८,३७७ वर पोहोचला. या प्रवासात निर्देशांक तब्बल आठ/नऊ वेळा ११०० ते १९०० अंश घसरला. प्रत्येकवेळी घसरल्यानंतर पुन्हा नवीन उच्चांकावर जायला चार ते आठ आठवडे लागले. हा इतिहास पाहिल्यानंतर सोमवारी २६,८९२ अंशावर टेकलेल्या मिड कॅप निर्देशांकाची मंदी संपली की नाही ते बघू. खरे तर १४८५ अंशाची मंदी झाली आहे. इथे मंदीवाल्यांचे पोट भरले असेल असे वाटते. पण तरीही अधिक घबराट झाल्यास, (वाईटात वाईट परिस्थितीत) कदाचित २६ हजारची पातळी येऊ शकेल. त्याची तयारी ठेवली तर गुंतवणूक करणे सुसह्य होईल. प्रत्येक घसरणीत काही वेळही जाऊ द्यावा  लागतो. (साध्या मराठीत तज्ज्ञ त्याला ‘टाइम करेक्शन’ असे म्हणतात.) कदाचित दोन ते तीन आठवडे हे टाइम करेक्शन आपली परीक्षा पाहू शकेल. तसे न झाल्यास उत्तमच. आजही एका सपोर्टवर निर्देशांक उभा आहेच. ही वेळ दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकी जमा करण्याची आहे. त्यांची पुन्हा उजळणी करताना ‘ए पीएल अपोलो’, ‘डिक्सन’, ‘नोसील’, ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’, ‘दालमिया भारत’, ‘आरती’, ‘एसबीआय लाइफ’, ‘डीव्हीज’, ‘सुव्हेन’, ‘अपोलो हॉस्पिटल’ व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअरचीच आठवण होते. 

बऱ्याच वर्षापूर्वी हॉलिवूडचा एक हीट चित्रपट आला होता. क्लिंट ईस्टवूड, ली व्हॅन क्लिफ आणि इली वॅलाच यांचा ‘द गूड, द बॅड ॲण्ड द अग्ली’, १८६०-७० या काळात घडलेला वेस्टर्नपट! आजचा शेअर बाजार पाहिला तर या चित्रपटाची आठवण होते. कधीही घेता येतील, विश्वास टाकता येईल असे एव्हरग्रीन शेअर; ‘एशियन पेंट’, ‘इन्फोसिस’, ‘टाटा कन्झ्युमर’, ‘टायटन’, ‘बजाज फायनान्स’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘एचडीएफसी’ व ‘एचडीएफसी बँक’, ‘सिमेन्स’, ‘डीव्हीज’, ‘हॅवेल्स’, ‘पॉलीकॅब’ वगैरे गुड ह्या सदरात मोडतील. याशिवाय जिथे मार बसल्याशिवाय कळणारच नाही असे कुठलीही ताळेबंद शक्ती व क्षमता नसलेले; X, Y, Z गटातील बहुतांशी शेअर्स ‘बॅड’ समजले पाहिजेत. किंवा ट्रेडिंगसाठी घेतला आणि खाली आला म्हणून गळ्यात पडला व ‘मेरा तो डिलिव्हरी है’ म्हणत आयुष्यभर वागवलेला व गुंतवणूकदाराला पश्चातापदग्ध करणारा कुठलाही शेअर ‘बॅड’ म्हणत त्या नादात न पडता, दूर ठेवला पाहिजे. 

सतत वरचे किंवा खालचे सर्किट लावणाऱ्या पण कमी किमतीमुळे बरेचदा मोहात पाडणाऱ्या व हवेसे वाटणाऱ्या शेअरना ‘अग्ली’ म्हणायला हरकत नाही. ते का वाढतात हे सामान्यांना न कळणारे! उदा. ‘झोमॅटो’, ‘सिजीपॉवर’, ‘अदानी समूहा’चे सर्व शेअर, वाऱ्याशी स्पर्धा करत बातम्यांच्या जोरावर वरखाली होणारे साखर उद्योग, ‘आयडिया’, (स्टेट बँक सोडून) सार्वजनिक बँका या सदरातील. 

आपण कुणाचा पाठपुरावा करायचा ते ज्याच्या त्याच्या जोखीमक्षमतेवर अवलंबून! अग्ली शेअरदेखील सूज्ञपणे हाताळले तर पैसे देऊन जातात. असो.

निफ्टी पुन्हा एकदा एका रेंजमध्ये १६,२०० ते १६,८०० राहू शकते. जगभरच्या बाजाराला झटका बसण्याचे एक कारण म्हणजे अमेरिकेचा बॉण्ड खरेदीचा उत्साह कमी होणार हे. दरमहा आठ हजार कोटी डॉलर ऐवजी आम्ही सात हजार कोटी डॉलरची खरेदी करू असे ‘फेड’ने सुचवले आणि धातू व शेअर बाजारात मंदी आली. नंतर मात्र खरेदी पूर्णपणे बंद होत नाही हा साक्षात्कार झाल्यावर बाजार सावरले. आपल्याकडील कारण म्हणजे हे सर्वच बाजार ‘अशक्य’ वाढले होते एव्हढेच! हा काळ संयमाचा व परीक्षा पाहणारा नक्कीच आहे. कच्चा माल स्वस्त झाला तर उद्योगांना हायसे तर वाटेलच, त्याबरोबर महागाईचा दरही खाली येईल. तैवान सेमी कंडक्टर कंपनीने तसेच अमेरिकेच्या इंटिग्रीस कंपनीने, सेमी कन्डक्टर चिप्ससाठी नवे कारखाने सुरू केले आहेत. पुढील तीन ते सहा महिन्यात वाहनउद्योगाला त्यातून पुरवठा व दिलासा मिळावा. तेव्हा हा महिना /पंधरवडा खाली मान घालून काढला व समयोचित खरेदी केली तर पुढील दोन वर्षे चांगली जातील.

दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे अफगाणिस्तानचे तालिबानीकरण. प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की वीस वर्षापूर्वी अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य होतेच. त्यावेळी आपण त्यांना मान्यता दिली नव्हती, मात्र या दरम्यान तेथे भारताची मोठी गुंतवणूक (अंदाजे २३ हजार कोटी रुपये) झाली आहे. इराणमधून कच्चे तेल आयात करण्याच्या प्रकल्पाचे भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी तसेच तालिबानच्या पाकिस्तान व चीनच्या जवळीकीमुळे आपल्याला अति सावध राहावे लागेल. चाबहार बंदरातून सागरी मार्गाने भारताचे दळणवळण शक्य असले तरी इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्स्पोर्ट कॉरिडॉर या ७२०० कि.मी. खुश्कीच्या मार्गाने मध्य आशियातील उझबेकिस्तान व जवळील देश रशिया, इराण, अफगाणिस्तान व भारत ह्यामधील व्यापारांना मोठी चालना मिळाली असती व होती, त्याचा वापर भविष्यात  शांततेने होणार का हे कळत नाही. त्याखेरीज त्या देशात अनेक खनिजे मुबलक प्रमाणात आहेत. सोने, तांबे व लोहाखेरीज अनेक अलोह धातू जसे की लँथानम, निओडीमियम, आणि सर्वात महत्त्वाचे लिथियम तेथे सापडते. लिथियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी किती महत्त्वाचे आहे व भारताचा भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांचा महत्त्वाकांक्षी वापराचा मनोदय लक्षात घेतला तर तेथील शांतता किती आवश्यक आहे हे कळते.

गेल्या सोमवारी केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या घोषणेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सरकारी मालमत्तेच्या चलनीकरणातून पुढील पाच वर्षांत पाच लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची योजना आखली आहे. यात मत्तेची मालकी सरकारकडेच राहणार आहे, पण त्यांचे व्यवस्थापन योग्य तो मोबदला घेऊन खासगी क्षेत्राकडे देण्यात येणार आहे. याखेरीज निर्गुंतवणुकीसाठी; किमान १५० रेल्वे, दिल्लीतील स्टेडीयम व महत्त्वाच्या चार विमानतळातील सरकारचा हिस्सा ह्यांची वर्णी लागली आहे. नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन या नावाखाली चालू वर्षात ८० हजार कोटींवर निधी जमा होईल असे दिसते.  मनमोहन सिंग सरकारच्या काळात उभ्या केलेल्या १.३ लाख कोटी किमतीच्या तेल रोख्यांच्या परतफेडीचे दडपण त्यातून कमी होईल. 

आपल्या देशाचे कर्ज व जीडीपी हे गुणोत्तर विकसनशील देशात सर्वात कमी आहे. परदेशी संस्था त्यामुळे गुंतवणूक तर करतीलच व त्या बरोबर आपला स्थानिक गुंतवणूकदारही जागा झाला आहे. तात्पर्य एकच, मोठ्या मंदीची भीती न बाळगता ही अशी ८-१० टक्के घसरण सहन केली तर गुंतवणूक सुजाण होऊ शकेल.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या