वाऱ्यावरची वरात

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 6 सप्टेंबर 2021


अर्थविशेष

तेजीच्या सुरुवातीला वीरेंद्र सेहवाग किंवा रिषभ पंत यांच्या सारखा खेळ करावा. तेजीच्या मध्यावर विराट कोहली आपला हिरो. अन् शेवटी शेवटी मात्र चेतेश्वर पुजाराला देव मानावे.

‘सेन्सेक्स’ व ‘निफ्टी’ची वाऱ्यावरची वरात वाजतगाजत चालू आहे. गेल्या आठवड्यात वजनदार शेअरनी प्रसन्न व्हायचे ठरवले, मग काय होणार? निफ्टी सप्ताहाअखेर २५० अंश वाढली होतीच, त्यात सोमवारी सव्वा दोनशे अंशाची भर पडली. या आठ दिवसात सेन्सेक्स चक्क दीड हजार अंशांनी वर गेला. ही ‘मुमेंटम’ची कमाल आहे. शेवटी तेजी पोटात असली तर प्रत्येक वाईट बातमीचाही बाजार चांगलाच अर्थ काढतो. जॅकसन होल अर्थविषयक परिसंवादात पॉवेल साहेब काय बोलतात या उत्कंठेमुळे जगभरचे बाजार २६ ऑगस्टच्या गुरुवारी नरमले होते. पण शेवटी ती आवईच ठरली. ‘मी बॉण्ड खरेदी कमी करणारच आहे, पण इतक्यात नाही. महागाईचा दर वाढल्यासारखा वाटतोय खरा, पण तो कमी होईल असा मला विश्वास आहे,’ यासारखी ‘नरो वा कुंजरो वा’ टाइप विधाने करून ‘फेड’ने तेजीला नवे खतपाणी दिले. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मजबूत होत असलेला रुपया. रुपया जसजसा मजबूत व्हायला लागतो, तसतसा परदेशी गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा होतो. आता नवा उच्चांक केल्याशिवाय निर्देशांक थांबणार नाहीत. असो. 

आपल्या सर्व लाडक्या शेअरनी अपेक्षापूर्तीचे समाधान दिले. ‘बजाज फायनान्स’, ‘इन्फो एज’ (नोकरी), ‘नवीन फ्लोरिन’, ‘एसआरएफ’, ‘लार्सन इन्फोटेक’, ‘कोफोर्ज’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘डीव्हीज’ हे सारे शेअर वेळोवेळी या सदरात सुचवलेले आहेत. सर्वच गुंतवणूकदार आपापल्या पसंतीचे शेअर वारेमाप वाढलेले पाहून समाधानाने विसावले असतील. नवे नवे उच्चांक आता आपल्या साक्षीने होतील. असे म्हणतात की मंदीत आपण घेतलेले शेअर खाली येतात आणि तेजीत आपण ‘न’ घेतलेले वर जातात. या सदराचे सुज्ञ वाचक व एरवीही तेजीवर विश्वास ठेऊन अधेमधे झालेल्या घसरणीत, खाली आलेली रत्ने गोळा करणारे गुंतवणूकदार याला नक्कीच अपवाद असतील. नव्या उच्चांकाला मान देत थोडासा नफा खिशात तर टाकायलाच हवा व दुसऱ्या एखाद्या क्षेत्राकडे मोर्चा वळवायला हवा. बँकिंग क्षेत्र त्या दृष्टीने रंगात येत आहे. ‘आयसीआयसीआय’ व ‘एचडीएफसी बँके’सह ‘ॲक्सीस बँक’ही आलेखात तेजी दाखवीत आहे. तेव्हा काय घ्यायचे हे ठावूक आहे, कुठे नफा खिशात टाकायचा हेही माहीत आहे. मग वाट कसली बघायची? 

आपली वाटचाल १७,०००-१७,२५० या निफ्टीच्या पातळीकडे चालली आहे हे लक्षात असलेले बरे.

असे म्हणतात की, तेजीच्या सुरुवातीला वीरेंद्र सेहवाग किंवा रिषभ पंत सारखा खेळ करावा. ते जसे कुठल्याही चेंडूवर चौकार षटकारांची आतषबाजी करतात, तसेच कुठलीही गुंतवणुकीची आयडिया हाती घेऊन त्यात चोरट्या धावा किंवा चौकार मारावेत. तेजीच्या मध्यावर विराट कोहली आपला हिरो. थोडी नशिबाची साथ, थोडा आत्मविश्वास आणि थोडी सावधगिरी बाळगत  गुंतवणूक जमवावी. अने शेवटी शेवटी मात्र चेतेश्वर पुजाराला देव मानावे. तो जसा मनावर पूर्ण ताबा ठेऊन, बहुतांश चेंडू सोडून देतो, तसेच आपणही आलेल्या बऱ्याच ‘टीप’च्या अंगाने जाणाऱ्या गुंतवणुकीच्या कल्पना अभ्यासपूर्वक सोडून द्याव्या. आता आपले कष्टाने जमवलेले शेअर भांडार फक्त सांभाळायचे आहे. हे जर करता आले व ज्याला जमले तो मोठी संपत्ती गोळा करेल  यात काही शंका नाही. त्यातही शेअर बाजारात रोजच खरेदी विक्री करायला हवी, असा कुठलाही नियम नाही, ते डे ट्रेडर्सचे काम आहे. तेही करायला हरकत नाही पण शक्यतो शेअरचा वकुब बघून, व शिस्तीने करणे चांगले. डिलिव्हरी घ्यावी लागली तर तयारी हवी. तेव्हा तेजीचा आनंद घ्या. एखादी चांगली कल्पना सुचली तरच त्यात सहभागी व्हा. त्या दृष्टीने येणाऱ्या ‘नायका’ या प्राथमिक भागविक्रीकडे लक्ष ठेवा. स्त्री-पुरुषांचे सौंदर्य व सौंदर्य प्रसाधने या क्षेत्रात काम करणारी ही कंपनी. कोरियात सौंदर्य प्रसाधने व त्यांच्या वापरासाठी सोयीची उपकरणे विकणाऱ्या दहा दहा मजली मॉल आहेत. प्रत्येक मजल्यावर हजाराहून अधिक आउटलेट आहेत व ती सर्व वयाच्या स्त्री-पुरुष ग्राहकांनी गजबजलेली असतात. तीच गत इतर विकसित देशांची. आपल्याकडेही हे लोण पोहोचलेच आहे.

‘भारती एअरटेल’च्या शेअरने नुकतेच डोके वर काढले होते. पण कंपनी पुन्हा भागधारकांकडून हक्कविक्रीने भांडवल गोळा करणार हे कळल्यावर तेजीवाल्यांचे अवसान गळाले. पण गेल्या सोमवारच्या पत्रकार परिषदेत कंपनीचे सर्वेसर्वा सुनील भारती मित्तल यांनी फोनचे किमान भाडे व वापर शुल्क वाढवण्याचा विश्वास व्यक्त केला आणि शेअरने पुन्हा उभारी धरली. या शेअरचे भविष्य चांगले आहे. भारतीय दूरध्वनी सेवा जगात सर्वात स्वस्त आहे. त्यातल्या महसूलवाढीला नक्कीच जागा  आहे. सरकारलाही 5G लिलावातून भरघोस भांडवल हवे आहे, लक्षावधी मोबाईल धारकांकडून अल्पसा महसूल वाढवून घेण्याला (रिलायन्स जिओ खेरीज) कुठलीही आडकाठी येऊ नये. ‘जिओ’लादेखील महसूलवाढीची कास धरावीच लागेल. याखेरीज सॅटेलाइट ब्रॉडबॅण्ड डेटा सेवा पुढील वर्षापासून भारतात येऊ घातली आहे. सॅटेलाइट व 5G दोन्ही सेवा एकत्रित नांदू शकतील. भारतीच्या ‘वन वेब’ लो ऑर्बिट सॅटेलाइट सेवेत कोरियाच्या ‘हान्व्हा सिस्टीम’ने ८.८ टक्के भाग भांडवल घेतले आहे. जवळपास २३ हजार कोटी रुपये कंपनीने भाग भांडवलातून जमा केले आहेत. आजतागायत २५४ सॅटेलाइट अंतराळात पाठवले आहेत. (एकूण ६४८ पाठवण्याची योजना आहे.) या सर्व उपक्रमासाठी लागणारे भांडवल, कुठलेही कर्ज न घेता तयार आहे. ह्या सर्व योजना पाहता ‘भारती एअरटेल’चा शेअर व राईट घेणे सोयीचे ठरेल असे वाटते.

सेबीने मागे घोषित केलेले मार्जिनचे नवे नियम एक सप्टेंबर पासून लागू झाले आहेत. यापुढे, खरेदी असो वा विक्री, किमान २० टक्के मार्जिन लागणार आहे. (खात्यात असलेले शेअर विकतानासुद्धा.) ‘आज घ्या उद्या विका’ ही स्कीम यापुढे बंद झाली असेच समजले पाहिजे. तसेच शेअर खरेदी केल्यानंतर ते खात्यात आल्यावरच विकता येतील, म्हणजे खरेदीनंतर किमान तिसऱ्या दिवशी. तसेच शेअर विकल्यावर लगेच दुसरी खरेदी करता येणार नाही. एक दिवस थांबावे लागेल. या उपायांमुळे वारेमाप तेजीला आळा बसेल अशी कल्पना आहे. तसे झाल्यास व बाजार खाली आल्यास खरेदी करण्यास अनेक गुंतवणूकदार उत्सुक आहेतच. आपणही संधीचा लाभ घेऊ शकतो.

वीजनिर्मितीसाठी कोळसा वापरणे दिवसेंदिवस परवडेनासे होत आहे. टाटा पॉवर व अदानी मुंद्रा गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब व महाराष्ट्रात वीज पुरवठा करतात. विजेचे दर राज्य सरकारने बांधून दिले आहेत. ते दर कोळश्याच्या किमतीवर आधारभूत करावेत अशी मागणी या दोन्ही कंपन्यांनी नियामकांसह सुप्रिम कोर्ट, सेन्ट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटर व त्या त्या राज्य सरकारांकडे सतत केली आहे. ही वीज एनर्जी एक्स्चेंजवर विकायला परवानगी मिळाल्यास वीज निर्मितीत खंड पडणार नाही. सरकारची खरेदी २.२५ ते २.३५ रुपये प्रती युनिट या दराने होते. (तर IEX एनर्जी एक्स्चेंज वर किमान सहा रुपये दराने विक्री होऊ शकते). २०१८ साली कोळसा स्वस्त झाल्यामुळे राज्य सरकारांनी वीज खरेदी किंमत वाढवण्याचा करार रद्द केला होता. ह्या वर्षी चीनच्या वापरामुळे कोळश्याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. दोन्ही कंपन्यांकडे जेमतेम आठ दहा दिवसाचा कोळसा शिल्लक आहे. सरकारने हिरवा कंदील दाखविल्यास वीज निर्मिती तर चालू राहिलच पण दोन्ही शेअर अधिक आकर्षक होतील.  

सारे काही मनासारखे होत असताना, कुठे काही अपेक्षाभंगाची शक्यता आहे का हे पडताळून पाहणे महत्त्वाचे आहे. सेबीचे नवे परिपत्रक किंवा कोविडची तिसरी लाट तेजीला अल्पविराम देऊ शकते. त्याची तयारी ठेवल्यास संयमातून समृद्धीकडे जाता येईल.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या