सावधान पुढे घाट आहे

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

अर्थविशेष

आपण निर्देशांकाच्या एका महत्त्वपूर्ण पातळीवर आहोत. शेअर बाजाराने तर आघाडी घेतली पण चेंडू आता उद्योगजगताच्या हातात गेला आहे. आघाडीच्या उद्योगांनी निफ्टीने दर्शविलेला व बाजाराला अपेक्षित असलेला नफा नोंदवून दाखवला पाहिजे. घोडामैदान फार दूर नाही, सप्टेंबर अखेरचे निकाल पुढील चाल ठरवतील.

गेले जवळजवळ वर्षभर मी या सदरातून आपल्या भेटीला येत आहे. सप्टेंबर २०२०पासून माहिती तंत्रज्ञान, खास रसायने, औषधे इत्यादी उद्योगात गुंतवणूक करण्यास सुचवतो आहे. एका वेळी एक पाऊल उचलत, प्रत्येकवेळी पटेल असे निफ्टीचे टार्गेट देत देत आपण १७,५०० ह्या महत्त्वाच्या पातळीवर येऊन पोहोचलो. सुज्ञ वाचकांच्या लक्षात असेलच की सतत या सदरात खरेदीचीच भलावण केली आहे.

विक्रीचा सल्ला देतानादेखील ५ ते १० टक्केच करा, कारण मोठी मंदी नाही. हेच पैसे क्षेत्र बदल किंवा क्षेत्र परिभ्रमण करत पुन्हा शेअर बाजारातच गुंतवावे किंवा आपापल्या जोखीमक्षमतेप्रमाणे अंतश: ठेव बाजारात पार्क करावी असे म्हणत, एखादा माळी पावसाळ्यात जशी बागेची कापणी करतो, तद्वत थोडा थोडा नफा खिशात टाकण्यास सुचवले आहे. श्रीयुत शेअर बाजार प्रसन्न असल्यामुळे आपले अंदाज बरेच बरोबर आले आहेत. तेजीने पोट भरले असल्यास पुन्हा काही काळ शेअर बाजार सोडून अन्यत्र लक्ष वळवावे असे वाटते. रीटस, इन्व्हीटस, अगदी ठेव बाजार, सोने (विशेषकरून चांदी) या प्रकारच्या गुंतवणुकी आपल्या रडारवर ठेवाव्या. मालमत्ता वर्गीकरण प्रत्येकच गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे आहे, किंवा थोडी (५ ते १० टक्के) घसरण आपण सहन करू शकत असलो तर पुढील तीन वर्षांच्या कालावधीत, अपेक्षेप्रमाणे कॉर्पोरेट नफा वाढल्यास शेअर बाजारही भरभरून देईल यात शंका नाही. आज तरी तेजीची पुढील चाल लार्ज कॅप शेअरकडे गेली आहे. आजपर्यंत तेजीच्या सरळ रस्त्याने आपण मार्गक्रमण करीत होतो, आता कदाचित घाटरस्ता येऊ शकतो. कुबेरनीती सांगते की घबाडयोग सिद्ध झाल्यास किमान अंतश: घबाड घरात घ्यावे. असो. 

या वर्षीच्या १६ जानेवारीच्या अंकात म्हटले होते की निफ्टीची १३६५०/१३७५० ही पातळी येऊ शकते व तिथे खरेदी करावी. तशी ती पुढे २९ जानेवारीला आलीही. किती गुंतवणूकदार खरेदीला पुढे सरसावले एवढाच प्रश्न आहे. बाजाराची भीती नेहमीचीच आहे, त्याचा इन्शुरन्स स्टॉप लॉस आहे. पण तरीही ‘डर के आगे जीत है’ हे नेहमी लक्षात घ्यावे.

मुंबई निर्देशांक ५० हजारांवर पोहोचल्यावर मी म्हटले होते की हा एक मैलाचा दगड आहे. पुढील टप्पा ५५ हजार किंवा ६० हजारही असू शकतो. तसेच निफ्टीने १७,५०० गाठल्यावर कदाचित थोडी पडझड होईल, थोडे कन्सॉलीडेशन, टाइम करेक्शन होऊ शकते; पण भविष्यात निफ्टी २० हजारंकडे वाटचाल करीत आहे हे नक्की. 

हे सर्व तत्त्वज्ञान आठवण्याचे कारण म्हणजे आपण निर्देशांकाच्या एका महत्त्वपूर्ण पातळीवर आहोत. शेअर बाजाराने तर आघाडी घेतली पण चेंडू आता उद्योगजगताच्या हातात गेला आहे. आघाडीच्या उद्योगांनी निफ्टीने दर्शविलेला व बाजाराला अपेक्षित असलेला नफा नोंदवून दाखवला पाहिजे. घोडामैदान फार दूर नाही, सप्टेंबर अखेरचे निकाल पुढील चाल ठरवतील. 

१७ ऑक्टोबर २०२० रोजी श्री समर्थ रामदासांचे एक वचन सांगत मी म्हटले होते, 

वाट पुसल्याविण जाऊ नये 

फळ वोळखील्याविण खाऊ नये

पडिली वस्तु घेऊ नये 

येकायेकी

गेल्या महिन्यात नवीन शेअरविक्रीतील नुकसानीला (झोमॅटो खेरीज) छोट्या गुंतवणूकदाराला सामोरे जावे लागले, त्याचे कारण हेच! बाजारात वारेमाप तेजी असल्यामुळेच नवी शेअरविक्री नवे नवे उच्चांक करीत आहे. प्रत्येकच शेअर गुंतवणूकजन्य नसतो हेही लक्षात घेतले पाहिजे. तसेच मार्केटची शिकवणी खूप महाग असते व ती बरेच वेळा शाळा सोडायला लावते, हेही समजून घेतले पाहिजे. तेव्हा फ्युचर /ऑप्शनचे व्यवहार नीट समजून उमजून जपूनच करावे. 

गेल्या आठवड्यात जीडीपीचे आकडे जाहीर झाले. पहिल्या तिमाहीत झालेल्या २०.१ टक्के वाढीला मार्केटने तर सलामी दिली, पण या विषयावरून विरोधकांकडून सरकारवर टीकाच सुरू आहे. खरेतर मागील वर्षीच्या तिमाहीत जीडीपी २४ टक्के आकुंचन पावला होता, त्यामुळे ही वाढ नसून आकुंचनच आहे ही मुख्य टीका. शब्दशः घेतल्यास ती टीका खरीही आहे. पण चालू वर्षांच्या पहिल्या तिमाहीत देशभर लॉकडाउन जरी नसला तरी किमान दोन महिने कोविडच्या दुसऱ्या लाटेत अर्थव्यवस्थेवर बरेच निर्बंध होते. ते बघितल्यास जीडीपीबद्दल समाधान वाटू शकते. मागील सप्ताहातील लेखात सेबीच्या मार्जिन सर्क्युलरचा उल्लेख केला होता. ते समजण्यात वाचकांची एक बारीकशी चूक होऊ शकते. सेबीची परिपत्रके ‘सोप्या’ भाषेत असल्यामुळे, कधीकधी अर्थ काढताना अर्थ तज्ज्ञाऐवजी भाषा तज्ज्ञाकडे जाणे योग्य. थोडक्यात असे की शेअर विकताना ते जर तुमच्या ट्रेडिंग खात्याला जोडलेल्या डिमॅट खात्यात असतील तर मार्जिन लागणार नाही. इतरत्र कुठल्याही खात्यात असतील तर प्रथम ब्रोकरकडे वर्ग करावे लागतील. गेल्या काही महिन्यातील शिफारसींचा तक्ता सोबत देत आहे. 

तात्पर्य हेच की योग्य तो स्टॉप लॉस ठेऊन, शेअरच्या किमतीचा बागुलबुवा न करता खरेदी केल्यास आपले शेअर भांडार अधिक समृद्ध होते.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या