पॉज अॅण्ड प्ले

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

अर्थविशेष

विघटक तंत्रज्ञानाला नेहमीच मान व विजय  मिळतो. भारतीय माहिती तंत्रज्ञानाने व त्यातील कुशल क्षमतेने सॉफ्ट वेअर क्षेत्रात क्रांती घडवली, तसेच गुगल, अॅमेझॉन, अॅपल आदी कंपन्या नवनवे कल्पनाविष्कार प्रत्यक्षात आणत आपल्या रोजच्या सवयीच बदलून टाकीत आहेत व स्वतःचे मूल्यांकन वाढवीत आहेत.

आयुष्यात आणि शेअर बाजारातही धकाधकीच्या काळात थोडा पॉज घेणे सोयीचे असते. त्यानंतर पाहिजे तसा खेळ करता येतो. गेला आठवडा, तेजी -मंदीच्या द्विधा अवस्थेतच गेला. तेजीवाले तेजीचा खुंटा हलवून बळकट करायच्या प्रयत्नात तर मंदीवाले तो खुंटा उपटून टाकायच्या आवेशात! त्यात अमेरिकन बाजारातही उत्साह कमीच. तिथे कोविडच्या डेल्टा अवतारामुळे रोजच बाधित रुग्णांची संख्या वर जातेय, त्यात फेड बॉण्ड खरेदी नक्की केव्हा कमी करणार याची अनिश्चिती. तेव्हा गेल्या शुक्रवारी (ता. १०) निफ्टी जेमतेम ४६ अंश वर जाऊन थबकली. निफ्टी शुक्रवारी १७३५९ अंशावर तर मुंबई सेन्सेक्स ५८२५० वर बंद झाला. विशेष म्हणजे ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असे म्हणत मिड व स्मॉल कॅप शेअर्सची आगेकूच पुन्हा सुरू झाली. ‘सीडीएसएल’, ‘कॅम्स’, ‘बीएसई’, ‘अँजेल ब्रोकिंग’, ‘आयआरसीटीसी’ तसेच आपल्या पसंतीचे नोसील, ‘अतुल’, ‘एसआरएफ’ आदी शेअर तेजी अजून संपली नसल्याची खबर देत होते. 
एक

निरीक्षण मात्र महत्त्वाचे आहे. आपण शेअर बाजाराच्या एका महत्त्वाच्या पातळीवर उभे आहोत. १६९०० ते १७५०० अशी निफ्टीची माफक चाल असू शकते. मात्र या दरम्यान आपली गरुड नजर अजूनही नवनवीन घडामोडी व बातम्यांवर आरूढ होऊन वर जाणाऱ्या शेअरवर केंद्रित असायला हवी. गेला आठवडा ‘इंडियन टेक’चा होता. ‘इन्फो एज’ ५०० रुपयांनी (₹  ६६८४) तर ‘इंडिया मार्ट’ ७०० रुपयांनी (₹  ८८८१) वर गेला. तसेच ‘झोमॅटो’ने नवीन वार्षिक उच्चांक नोंदविला. ह्या समूहातल्या शेअरची गुणवत्ता व मूल्यमापन कसे करायचे याचे विवेचन मागे याच सदरात केले आहे. किंबहुना ते इतके महाग का आहेत व तरीही परदेशी गुंतवणूक संस्थांचा ओढा अजूनही तेथे का आहे, याचे उत्तर शोधतांना, आपले जुने निकष बाजूला ठेवावे लागतील. विघटक तंत्रज्ञानाला नेहमीच मान व विजय  मिळतो. आठवा! चेंगीज खानाने घोड्यावरची मांड पक्की करणाऱ्या रीकीबीचा शोध व वापर केला व तो जगजेत्ता झाला. बाबराने पानिपतच्या पहिल्या युद्धात प्रथमच बंदुकीचा वापर केला आणि विजयी झाला. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब वापरला आणि युद्ध जिंकले. भारतीय माहिती तंत्रज्ञानाने व त्यातील कुशल क्षमतेने सॉफ्टवेअर क्षेत्रात क्रांती घडवली, तसेच गुगल, अॅमेझॉन, अॅपल आदी कंपन्या नवनवे कल्पनाविष्कार प्रत्यक्षात आणत आपल्या रोजच्या सवयीच बदलून टाकीत आहेत व स्वतःचे मूल्यांकन वाढवीत आहेत. येथे समभाग मूल्य पी/ई किंवा वर्षात होणारा व पुढे होऊ घातलेला नफा यावर ठरत नाही. या नवीन टेकच्या मागे असलेली जनसंख्या (साध्या मराठीत ‘फुटफॉल’) यावर त्याचे मूल्य ठरते. 

त्यांचे सहकारी वृतपत्रातल्या ‘वाँटेड’च्या जाहिराती बघण्यात बराच वेळ घालवतात असे १९९५च्या सुमारास संदीप बिकचंदानी ह्यांच्या लक्षात आले. मग जर या सर्व जाहिराती एकत्रित करून पेश केल्या तर त्यास चांगला प्रतिसाद मिळेल? हा विचार घेऊन ‘नौकरी डॉट कॉम’ची सुरुवात झाली. (आज हे अगदी प्राथमिक वाटेल, पण पंचवीस वर्षापूर्वी ते तसे नव्हते.) पाहता पाहता ‘नौकरी डॉट कॉम’ वाढू लागली व आज ऑनलाइन जॉब पोर्टलमध्ये तिचा ७५ टक्के वाटा आहे. गेल्या वर्षी १४०० कोटी रुपये नफा झाला आहे व तो उत्तरोत्तर वाढता आहे. ‘इंफोएज’कडे याखेरीज ‘जीवन साथी’, ‘99 एकर्स’, ‘शिक्षा’ आदी इतरही पोर्टल आहेत. (अजून त्यात नफा दिसत नाही, पण बाजाराला त्याची फिकीर नाही). शिवाय ‘इंफोएज व्हेन्चर्स’ नावाची एक उपकंपनीही आहे. तिथूनच ‘झोमॅटो’, ‘पैसा बाजार’ वगैरे गुंतवणुकी झाल्या, तज्ज्ञांना पटो अथवा न पटो, झोमॅटोचे बाजार मूल्यांकन वाढतेच आहे. ऑनलाइन विमा वितरणाचा ३० टक्क्यांवर हिस्सा पैसा बाजारकडे आहे. भारतात विमा वितरण अत्यल्प आहे, तेव्हा म्युचुअल फंडासारखा येथेही वृद्धीला भरपूर वाव आहे. आजच्या या अत्युच्च किमतीलादेखील या शेअरना मागणी आहे. आपल्याला पटत नसेल तर गुंतवणूक करण्याची कुठलीही सक्ती नाही, फक्त कारणमीमांसा माहिती असावी इतकेच.    

शेअर बाजार निर्देशांकाकडे लक्ष न देता संधी शोधत आहे हे नक्की. ‘सीडीएसएल’ ६५० रुपयांना पटत नव्हता पण १२०० रुपयांना त्याचा विचार करावासा वाटतो, यालाच ‘फोमो’ (Fear of Missing Out) असे म्हणतात. याच पद्धतीने ‘बाजार फार वाढला’ असे म्हणत १२ हजार वा १३ हजार या निफ्टीच्या पातळीवर सर्व भांडार विकून नफा कमावलेले गुंतवणूकदार कदाचित १७ हजार वा १८ हजार पातळीवर शेअर बाजारात  प्रवेश करतील. म्युचुअल फंडाच्या नव्या योजनांना मिळणारा भरघोस प्रतिसाद हेच दर्शवतो.  

महागाई निर्देशांकाने बाजाराला अधिक ऊब दिली आहे. महागाई दर, चार महिन्यातील नीचांकी पातळीवर (५.३ टक्के) आहे. विशेषतः रिझर्व्ह बँकेच्या दरनिश्चितीच्या पुढील बैठकी आधी हाच आकडा पायाभूत धरला जाईल. (ऑगस्टचा महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या बैठकीनंतर जाहीर होईल) त्यातून बँकेच्या पुढील धोरणात ढिलाई असेल असे बाजार गृहीत धरेल, व तेजीचा खुंटा बळकट होईल. याउलट न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आदी देशात कोविड संबंधित निर्बंध वाढत आहेत. तर आग्नेय आशियातील कोविडची साथ ओसरत आहे. शुक्रवारी खाली आलेला अमेरिकी बाजार व बॉण्ड खरेदी कमी होण्याची टांगती तलवार इतर जगातील शेअर बाजारावर आहे. तसेच निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी कॉर्पोरेट कर वाढवण्याचे सूचित केले होते. ‘वेज अॅण्ड मिन्स कमिटी’ कंपनी कर पुन्हा २१ वरून २६.५ टक्के व भांडवली नफ्यावरील कर २० वरून २५ टक्के करण्याच्या बेतात आहे.  यावरून कदाचित अमेरिकेला तात्पुरत्या मंदीला सामोरे जावे लागेल. तेथून भारतात गुंतवणुकीस येणारे भांडवल वाढेल का, हा कळीचा मुद्दा आहे. 

चीनला अचानक पुन्हा समाजवादाचा, खरं तर साम्यवादाचा उमाळा आलाय की काय अशी शंका यावी, अशा घटना घडत आहेत. बारकाईने पाहिल्यास, तसे नसून साम्यवाद होताच, फक्त आता नव्याने अहंकार युद्ध चालू झाले की काय असे वाटते. खरे तर पाच सहा वर्षांपूर्वीच, प्रदूषणाच्या भयावहतेमुळे, चीनने त्यांच्या स्टील, रसायने व कागदनिर्मिती उद्योगावर बडगा उगारला होता. याच उद्योगांनी चीनला जगाच्या नकाशात अग्रेसर केले होते. पण जनक्षोभाला मान देत चीनच्या नियामकांनी हे पाऊल उचलले होते. गेल्या वर्षी विदासुरक्षेत ‘अलिबाबा’ या महाकाय कंपनीला दोषी ठरवीत तब्बल २२ हजार कोटी रुपये दंड ठोठावला होता. पुढेही त्यांच्या नवीन शेअरविक्रीला लाल कंदील दाखवत ‘कोण बॉस’ आहे याची जाणीव करून दिली होती. आताही ऑनलाइन गेमिंग, ऑनलाइन शिक्षण यावरचे नवे निर्बंध ‘नागरिक प्रथम’ या चिनी भूमिकेचे समर्थनच करीत आहेत. या सर्व निर्बंधांचे आर्थिक परिणाम भोगण्यास देशाचे सरकार तयार आहे असे दिसते. या निमित्ताने आपलेही पर्यावरण विषयक कायदे व त्यांची अंमलबजावणी यावर चिंतन होणे आवश्यक आहे. असो. वानगीदाखल, माधव गाडगीळ समितीने निर्देशित केलेला पश्चिम घाटातील इको सेन्सेटिव्ह झोन मधील विकास, कर्नाटक व गोवा येथील खनिज उत्खनन. पर्यावरण स्नेही झाल्यास विकास तर होईलच व त्याबरोबर पुढील पिढीपोटी असलेली जबाबदारी पाळल्या गेल्याचे समाधानही असेल.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या