घरात हसरे तारे असता...

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021


अर्थविशेष

निफ्टीने २४ सप्टेंबर रोजी १७९४७ अंशाचा उच्चांक केला आणि नंतर कृष्ण पक्षातल्या चंद्राप्रमाणे  रोजच निफ्टी खाली येत गेली. शुक्रवारी १७४५२ चा तळ करताना निफ्टी चक्क ५०० अंश (जवळपास ३ टक्के) खाली आली होती. आपण मागील ‘स्पीडब्रेकर’ किरकोळ निघाला याबद्दल खेद व्यक्त करीत होतो, तर त्याऐवजी चक्क आठवडाभर हा स्पीडब्रेकर मिळाला. निफ्टी थोडी खाली सरकल्यामुळे जोखीम/परतावा गुणोत्तरही किंचित आकर्षक ( ७:८) झाले. त्याबरोबर वित्तीय तूट अपेक्षेपेक्षा कमी असणे, जीएसटीचे संकलन पुन्हा एक लाख दहा हजार कोटींवर जाणे, आघाडीवरील कंपन्यांचा अग्रिम कर भरणा भरघोस होणे (मुख्यतः स्टेट बँकेसहित सर्वच खासगी व बहुतांश सरकारी बँकांनी त्यात वाढ दाखवणे) ह्या सर्व कारणांमुळे शुक्रवारी चांगल्या बंद झालेल्या अमेरिकन बाजारातून स्फूर्ती घेत आपल्या बाजाराचा वारू किंबहुना ‘बैल’, पुन्हा रंगात आला. सेन्सेक्स ५३३ अंश तर निफ्टी १५९ अंश उसळली. 

आता मात्र पुन्हा एकदा अमेरिकन व्याजदर किंवा बॉण्डदर वरखाली होणे व चीनमधील एव्हरग्रँडे कंपनीची कथित दिवाळखोरी ह्याचे निमित्त बाजाराला न मिळो. खरं तर जागतिक बाजारातील छोट्या मोठ्या संकटात, खाली आलेल्या शेअर बाजारात, आपल्या देशातील संधी शोधावी हे आम्ही नेहमीच सुचवले आहे. द. वि. केसकरांचे भावगीत ‘घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे’ त्यानिमित्ताने ओठांवर येते.  जगातील बाजाराचा संदर्भ घ्यावा, आपला बाजार पडला तर आपल्या ‘हसऱ्या ताऱ्यांकडे’ आपला मोर्चा वळवावा असे साधे सरळ सूत्र आहे. गेल्या आठवड्यात आपल्याकडील तेजीवर स्वार असलेले आपले आवडते काही शेअर उदा. ‘डीव्हीज’, ‘अतूल’, ‘आरती’, `डिक्सन’, ‘नोसिल’, ‘ओबेरॉय’ ५ ते १०  टक्के खाली आले होते; त्यांच्याकडे अशा वेळी दुर्लक्ष नको. 

‘पिरामल एन्टरप्राईजेस’ने ‘दिवाण हाउसिंग’चे आग्रहण केल्यापासून त्याला नवी झळाळी मिळाली आहे. ह्याचे एक कारण म्हणजे कंपनीला मिळालेले ग्राहकाभिधान. पगारी ऋणको हा एक मोठा वर्ग खासगी बँकांच्या नफ्यातला प्रमुख हिस्सा आहे. दिवाण हाउसिंगकडे पगारी कर्जदार मोठ्या प्रमाणात होते व तोच त्या खरेदीतील सर्वात आकर्षक भाग होता. पिरामलची बहुतांश कर्जे मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना दिलेली होती व त्याची वसुली म्हणावी तितकी वेगाने होत नव्हती. छोटी घरबांधणी कर्जे आग्रहित केल्यामुळे कंपनीला व्यापक पाया मिळाला आहे. त्यात बॉण्ड धारकांसह सामान्य ठेवीदारांचेही काही पैसे कंपनीने परत केल्यामुळे ‘गुडविल’ वाढले आहे. त्याचा पुढील कर्ज वितरणात नक्कीच फायदा होईल. तर दुसऱ्या बाजूला बांधकाम क्षेत्र मरगळ टाकत असल्यामुळे मोठी कर्जवसुलीही सुलभ होईल. हा शेअर आपल्या दृष्टिक्षेपात हवा. 

या निमित्ताने एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. ‘दिवाण हाउसिंग’चा शेअर ६०० रुपयांवरून १५ रुपयांवर आला, कंपनी दिवाळखोरीत गेलेली, केस एनसीएलटीमध्ये गेलेली, अशा वेळी शेकडो छोटे गुंतवणूकदार दिवाणचा शेअर बाजारातून विकत घेत होते. ‘१४-१५ रुपयात काय वाईट आहे?’ हे त्यांचे लॉजिक. डी मॅट खात्यातील मालकी सांगते की लहान गुंतवणूकदारांच्या संख्येत या दरम्यान लक्षणीय वाढ झाली होती. समोर खड्डा दिसत असतांना त्यात उडी मारून पाय मोडून घेण्याचाच हा प्रकार आहे. मजेची बाब अशी की दिवाण हाउसिंगचा (मालमत्तेवर आधारित) सुरक्षित, एकेकाळी AAA असे रेटिंग असलेला एक हजार रुपयांचा बॉण्ड (NCD) फक्त तीनशे रुपयांना मिळत होता. जेमतेम वर्षभरात पिरामलने या बॉण्डचे १००० रुपये परत केले. बुडीत कंपनीचे हजार शेअर १५ हजार रुपयांत  घेणे आणि  तेवढ्याच पैशात ५० बॉण्डस घेणे, यातील जोखीम सारखीच! फक्त नजरेचा फरक.

बाजारातील जोखीम/ परतावा गुणोत्तर फारसे आकर्षक नाही असे आपण म्हणतो. ही जोखीम आहे तरी कुठे? वर उल्लेख केलेल्या अमेरिकन व चिनी अर्थव्यवस्थेतील घडामोडी सोडल्या तर कच्चे तेल, नैसर्गिक वायू आदि इंधनांच्या किमतीत अपेक्षेबाहेर वाढ होणे, इंग्लंड व युरोपभर जाणवत असलेली वीजटंचाई व त्याचा उद्योगावर परिणाम, कंटेनर तुटवड्यामुळे आयात निर्यातीवर होणारा परिणाम, सेमी कंडक्टर चिप्सचा अपुरा पुरवठा वगैरे समस्यांची यादी करावी लागेल. शेअर बाजार अधूनमधून या कारणांनी खाली येऊ शकतो. याउलट लॉकडाउन बराचसा संपल्यामुळे आणि तिसरी लाट सक्षमपणे थोपविण्याचा आत्मविश्वास (९८ कोटी नागरिकांना किमान एक लस दिलेली आहे) असल्यामुळे चीनवरील सर्व संकटे भारताच्या फायद्याची ठरतील असे उद्योगांना वाटते. दुसऱ्या सहामाहीत कार्पोरेट जगताची कामगिरी उत्कृष्ट असेल असाही एक अंदाज आहे. 

भारत पेट्रोलियम आता एक हजार नवी बॅटरी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. पुढील पाच वर्षात एक लाख कोटी रुपये गुंतविण्याची योजना आहे. रिफायनिंग, ग्रीन एनर्जी, बॅटरी चार्जिंग आदि क्षेत्रात ही गुंतवणूक होईल. एकोणीस हजार पेट्रोल पंपांपैकी किमान सात हजार पंपावर कुठलेही इंधन भरण्याची सोय होणार आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग समाविष्ट आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पामुळे देशाचे कच्च्या तेलावरचे परावलंबित्व कमी होऊ शकेल. विद्युत वाहने लोकप्रिय झाल्यास त्यासाठी तयार राहणे हा प्रमुख उद्देश आहेच. 

परदेशी संस्थांनी भारतात दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक १९९७ ते २०२१ या कालखंडात केली. चीनमध्ये केवळ २०१९ पर्यंत झालेली गुंतवणूक १४ लाख ६० हजार कोटी डॉलर आहे. हा फरक दोन्ही देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील विषमता व दरी दर्शवतो. आज सरकारी धोरणांमुळे परदेशी गुंतवणूक वाढते आहे, तिचा परिणाम रोजगारनिर्मिती व शेअर बाजारावर भविष्यात दिसेलच. 

या निमित्ताने ‘शेअर बाजार खाली आल्यावर गुंतवणूक करू’, या मनोवृत्तीचे विवेचन केले पाहिजे. 

पहिला मुद्दा म्हणजे शेअर बाजार खाली आला तरी सारेच शेअर एकसारखे खाली येत नाहीत. शेअर बाजार नेहमीच खरेदीविक्रीच्या संधी देत असतो.  

दुसरा मुद्दा असा की बाजार  केव्हा खाली येणार हे भविष्य कोण सांगणार? 

कदाचित नशिबाने बाजार खालीही आला तरी त्यात गुंतवणूक करण्याचे धैर्य आपल्यात त्यावेळी असेल का? की आपण तो अजून खाली येण्याची वाट पाहू? 

आणि बाजार वर जाऊनही आपण घेतलेले शेअर खाली आले तर? चुकलेला निर्णय किती वेळ सांभाळायचा?

या प्रश्नाचे उत्तर असे की सुरुवात करताना आपापल्या ताकदीप्रमाणे चांगला लार्ज कॅप शेअर निवडावा. त्याचे उत्पादन किंवा सेवाक्षेत्राचे आपल्याला ज्ञान हवे. तेव्हढीच रक्कम ठेव बाजारात ठेवावी. निवड बरोबर असेल तर बाजार सांगेलच. मग त्यात वाढ करत जावे. चांगला व्यवसाय व त्याचे पारदर्शक व्यवस्थापन निवडले, अन बाजार खाली आला तर कदाचित एक वर्षांच्या व्याजाचा तोटा होईल, पण आपली निवड चोख असली तर काळ तो तोटा भरून काढेल. आपली ही वाट कितीही बिकट असली तरी संपत्ती आणि समृद्धीचा आपल्या ताब्यात असलेला हा राजमार्ग आहे. एकदा सुरुवात केल्यावर हळूहळू त्यात प्रावीण्य येईलच. 

हे सारे फार कठीण वाटत असेल तर चांगला फ्लेक्सी कॅप फंड निवडावा त्यासाठी योग्य तो सल्ला घ्यावा आणि त्यात दरमहा गुंतवणूक करीत राहावे. 

या महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांच्या लाटेवर शेअर बाजार झुलत राहील. निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आल्यास तेजीला पुढे चाल मिळेल. अपेक्षेप्रमाणे किंवा निराशाजनक आल्यास कदाचित खाली येईल. थोडक्यात हे दिवस कन्सॉलीडेशनचे आहेत. यात ट्रेडिंगसाठी भरपूर संधी मिळतील. लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी मात्र एखादी खोल घसरण १७००० निफ्टीच्या आसपास किंवा निफ्टीच्या याच पातळीवर एखाद्या क्षेत्रात शोधावी लागेल.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे, हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या