थांबा... बघा... आणि पुढे जा

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

अर्थविशेष

एकाच वेळी लार्ज, मिड व स्मॉल कॅप शेअर नवीन उच्चांक करताना पाहून पट्टीच्या तेजीवाल्यालाही धडकी भरेल. आता कुठल्यातरी  निमित्ताने तेजी संपली जरी नाही तरी थोडा विसावा घेईल असे वाटते.

बोलता बोलता निफ्टीने १८००० अंशाच्या भोज्ज्याला स्पर्श केला आणि आशावादी पंटर्सच्या अपेक्षा पूर्ण केल्या. निफ्टीचा १७ हजार ते १८ हजार हा प्रवास जेमतेम चाळीस दिवसात झाला. २४ सप्टेंबर रोजी निफ्टीने केलेला १७९४७ अंशाचा उच्चांक शेअर बाजाराने पुन्हा सर केला. तीच गत सेन्सेक्सची. ६००००वरचा उच्चांक पुन्हा एकदा नोंदवला गेला. आता लोभ वाढत चालला आहे. डोळे आता १८५०० ते १९ हजारकडे लागले आहेत. मुहूर्ताला (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टॉक एक्स्चेंज मधे साग्रसंगीत मुहूर्ताचे व्यवहार होतात.) निफ्टी १९००० होणार का? हा प्रश्न सर्वतोमुखी आहे. हे बघता ओठावर एक शेर येतो :

उम्मीदोने नासमझी के नये रंग लिये 
जब चांद हाथ आया, आसमाँ चाहिये 

एकाच वेळी लार्ज, मिड व स्मॉल कॅप शेअर नवीन उच्चांक करताना पाहून पट्टीच्या तेजीवाल्यालाही धडकी भरेल. असे मागे डिसेंबर २०१७ -जानेवारी २०१८ या काळात झाले होते, तेजीचा तो पतंग काटण्याचे काम तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली ह्यांनी केले होते. यावेळी कुठल्यातरी निमित्ताने, तेजी संपली जरी नाही तरी थोडा विसावा घेईल असे वाटते. थोडक्यात, सिग्नलला आल्यावर दिवे चालू नसतांना आपण ‘थांबा, बघा आणि पुढे जा’ असे जे धोरण पाळतो, तसे करण्याची गरज आहे असे वाटते. आता नवी खरेदी करताना गुणवत्ता सर्वात महत्त्वाची! त्यानंतर क्षेत्र व त्याखालोखाल भाव बघण्याची गरज आहे. कितीही शनी-मंगळ युती असली तरी आयटीसीला आज न उद्या चांगले दिवस येतीलच. तीच परिस्थिती स्टेट बँक व इतर सार्वजनिक बँकांची. चिप्सचा तुटवडा वाहन उद्योगाला मागे खेचत असला तरी पुढील दोन तिमाहीत हा विषय निकालात निघेल. बाजारात चोखंदळ गुंतवणूकदाराला शेअरगणिक संधी शोधाव्या लागतील. फ्युचरचे व्यवहार टाळलेलेच बरे! करायचेच असतील तर शिस्तीचा बडगा हवाच! स्टॉप लॉस नक्कीच ठेवावा. आपण ठेवलेला स्टॉप लॉस कुणीतरी आकाशातून बघत असतो आणि बरोब्बर आपला स्टॉप लॉस करून, शेअर वर जातो या खुळचट समजुतीतून बाहेर पडलेले चांगले. आजकाल आलेखाप्रमाणे व्यवहार करणाऱ्यांची संख्या अमाप आहे. त्यामुळे शेअरची आधारपातळी जगात सर्वांना ठाऊक असते, त्याखाली शेअर आला की स्टॉप लॉस वाजतातच! असो. 

मागील आठवड्यातील एक लक्ष्यवेधी घटना म्हणजे एअर इंडियाचे होऊ घातलेले हस्तांतरण. अनेकांनी नाकारलेल्या ‘घोडनवरी’ला तिच्या जुन्याच प्रियकराने साद घालावी व गुंतलेल्या भावनांना आर्थिक पाया द्यावा तसे घडले. एअर इंडियावर असलेला कर्जाचा व व्याजाचा भार अंशतः टाटांच्या गळ्यात पडला. यारीतीने १९३२ साली सुरू झालेली कथा पूर्णत्वाला गेली. 

कराची ते चेन्नई विमानप्रवासाने सुरू झालेली टाटांची विमानसेवा- पुढील काही वर्षातच, भारतीय विमान वाहतुकीचा ३३ टक्के हिस्सा घेती झाली. टाटा एअर लाइन्सचे नाव बदलून १९४६ मध्ये एअर इंडिया करण्यात आले. भारत सरकारने १९५३ साली टाटांना २.८ कोटी रुपये मोबदला देऊन तिचे राष्ट्रीयीकरण केले. मात्र चालू समजुतीप्रमाणे एअर इंडिया सुरुवातीपासून तोट्यात नव्हती. खरं तर पुढील तीस वर्षे या उद्योगाने सरकारला भरभरून दिले. पुढे मात्र खासगी विमानसेवांबरोबर स्पर्धा करताना एअर इंडिया मागे पडली. तीस हजार कर्मचाऱ्यांचा भार पेलवेना. इतर कारणात न जाता इतकीच नोंद करू की ३१ ऑगस्ट रोजी असलेले कर्ज ६१,५०० कोटी रुपये होते. त्यातील १५,३०० कोटी टाटांच्या नावे वर्ग होईल. सरकारला असलेल्या ४६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या तारणदाखल काही मालमत्ता आहे, काही रक्कम बुडीत आहे. मुख्य म्हणजे यापुढे सरकारचा रोजचा ४० कोटींचा तोटा वाचला. कळीचा मुद्दा होता की कर्मचाऱ्यांचे काय? टाटांना किमान एक वर्ष कुणालाही नारळ देता येणार नाही. एक वर्षानंतर मात्र स्वेच्छा निवृत्तीची ऑफर देता येईल. टाटांना हा सौदा थोडा महाग वाटला तरी आता फक्त २७०० कोटी रोख व आजच्या कर्मचाऱ्यांचा एक वर्षाचा पगार त्यांच्या खिशातून जाणार आहे. त्याचबरोबर विमानतळावरील सोयीच्या जागा, दोन्ही नाममुद्रा आणि अनेक आंतरराष्ट्रीय मार्ग यांचा फायदा टाटांना होईल. तसेच इतरही दोन विमानसेवा ह्या समूहाकडे आहेत. ते बघता टाटांच्या छत्राखाली एअर इंडियाला नवी झळाळी मिळेल अशी आशा आहे. 

यापाठोपाठ आयुर्विमा मंडळाचा नंबर लागावा. खासगीकरण नको म्हणून १० टक्के हिस्साविक्रीला विरोध असणारे, आता आम्हाला हक्काने शेअर मिळाले पाहिजेत अशी मागणी पुढे रेटत असल्याचे कानावर आले आहे. खरं तर १० किंवा २० टक्के विक्री हे खासगीकरण नाही. खासगीकरण व निर्गुंतवणूक यात फरक आहे. तोट्यात चाललेले उद्योग अधिक सक्षम हातात देऊन रोजगार निर्मिती साधावी व मत्तेचा योग्य उपयोग करावा असे धोरण आहे. आयुर्विमा मंडळाच्या निमित्ताने तळागाळातील गुंतवणूकदार बाजाराशी जोडला जाईल. 

वर्षानुवर्षे चिघळत असलेल्या अनेक समस्या सरकारने निकालात काढल्या आहेत. ह्या घटनेचा परदेशी गुंतवणूकदारांवर चांगला परिणाम होईल असे वाटते. 

दरम्यान रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक आढाव्यानंतर पतधोरणात कुठलाही बदल न करण्याचे ठरविले आहे. मार्च अखेर महागाई दर ५.७ टक्के होईल अशी अपेक्षा होती. तो अंदाज कमी करीत ५.३ टक्क्यांवर आणला आहे. कुठलाही बदल न झाल्यामुळे सार्वजनिक बँकांच्या शेअरना नवी चमक आली. मागे अनेकदा निर्देशित केल्याप्रमाणे, स्टेट बँकेचा शेअर आपल्या रडारवर हवाच. त्याखेरीज बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, सिटी युनियन बँकेकडेही लक्ष असू द्यावे. इतक्या तेजीत वाजवी किमतीला मिळणाऱ्या मोजक्या शेअरमध्ये वरील शेअरची गणना होते.  

‘मूडीज’ या जागतिक पतसंस्थेने नुकतेच भारताचे सार्वभौम मानांकन बदलले. ते Baa3 (Stable from Negative) करण्यात आले आहे. एक गुंतवणूक म्हणून भारताकडे बघण्याचे हे नीचतम मानांकन आहे. म्हणजे हे मानांकन आहे की ‘अपमानां’कन असा प्रश्न पडतो (Lowest Investment Grade Rating). कर्ज व व्याज बुडवण्याच्या तोंडाशी असलेल्या पोर्तुगाल, ग्रीस आदी अनेक देशांचे रेटिंग या दरम्यानच आहे. अर्थात अर्जेन्टिना आपल्या खाली आहे. जागतिक पतमापन संस्थांचा हा दुजाभाव आपण किती काळ सहन करणार हा प्रश्न आहे. सरकारी कर्जाचं प्रमाण भारतापेक्षा जास्त असलेल्या देशांनाही भारतापेक्षा वरचं मानांकन मिळतं, हा आपला आक्षेप आहे. भारताचं सरकारी कर्ज जीडीपीच्या सत्तर टक्के आहे, तर स्पेनचं १२७ टक्के, अमेरिकेचं १३० टक्के असं असूनही एस अ‍ॅण्ड पी या संस्थेने दिलेलं स्पेनचं मानांकन बीबीबी+ (भारतापेक्षा दोन घरं वर), अमेरिकेचं एएए (भारतापेक्षा दहा घरं वर)! भारताने आजवर कधीही कर्जफेडीच्या बाबतीत काचकूच किंवा दिरंगाई केल्याचा इतिहास नाही. भारत ही आता जगात सर्वाधिक विकासदर असणारी मुख्य अर्थव्यवस्था आहे. असं असूनही भारताचं पतमानांकन इतके खाली असणे पटत नाही. सरकारी पातळीवर व्यूहात्मक रचनेने हा प्रश्न सोडवला पाहिजे. असे असून देखील, मागील लेखात निर्देशल्याप्रमाणे, ‘मॉर्गन स्टॅनले’च्या विकसनशील देशातील भांडवल ओघ सूचित करणाऱ्या निर्देशांकात (MSCI Emerging Markets Index) भारताचे वजन ८.८ टक्क्यावरून १२.१ टक्के झाले आहे. यामुळे व पतमानांकन उंचावले तर परदेशी भांडवल विश्वासाने आपल्या बाजाराकडे वळेल हे नक्की.  

असो. पुन्हा एकदा, थांबा, पहा आणि पुढे जा ही सूचना देत बाजारात उतरणाऱ्या बाजीगरांना शुभेच्छा!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे, हेही ध्यानात घ्यावे.) 

संबंधित बातम्या