आता फक्त ...गनिमी कावा

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

अर्थविशेष

वाचकहो, जवळपास एक महिन्यानंतर आपल्या भेटीस येण्याचा योग येत आहे. मागील लेखात मी “थांबा , बघा आणि पुढे जा”, असे सुचविले होते. ऑक्टोबरच्या १२ तारखेला १८००० अंशाला टेकलेली निफ्टी आणि ६०२८४ अंशाला  स्पर्श केलेला सेन्सेक्स यांनी, मागे वळून न पाहता, त्याच वेगाने पुढील सात दिवसात निफ्टी १८६०० व सेन्सेक्स ६२२४५ अशी धाव घेतली. नंतर मात्र झाले तेव्हढे पुरे म्हणत लागलीच माघार घेऊन शेअर बाजाराने पुन्हा एकदा एका टप्प्यात राहायचे ठरवले. गेले तीन आठवडे हाच खेळ चालू आहे.

गेल्या सोमवारी (ता. १५) निफ्टीचा बंद १८१०९ असा होता. सध्यातरी १७६०० ते १८६०० या हजार अंशात निफ्टी राहील असे वाटते. देशांतर्गत गुंतवणूकदार तेजी सोडायला तयार नाहीत आणि परदेशी संस्था विक्री थांबवत नाहीत, मग होणार काय? एका टप्प्यात निर्देशांक फिरत राहणे! असो.

यापुढील लढाई गनिमी काव्याने लढावी लागेल. या चढ्या बाजारातही अल्पमुदतीच्या व दीर्घ पल्ल्याच्या अनेक संधी आहेत. त्या शोधून त्यात गुंतवणूक करावी लागेल. नवी गुंतवणूक करताना कुठे तरी मोह सोडून नफा कागदावरून खिशात टाकावा लागेल. बोलता बोलता औषध उद्योग, माहिती तंत्रज्ञान, खास रसायने, खासगी बँका, विमा कंपन्या यातील तेजीचा आपण वेळोवेळी पाठपुरावा केला व त्यात नफाही पदरात पडला. कॅपिटल गुड्स सेक्टर आता खुणावत आहे. कारण उद्योग जगताचे एकूण कर्ज गेल्या दहा वर्षातील नीचतम पातळीला आहे. (भाग भांडवल व गंगाजळी:कर्ज हे गुणोत्तर १:०.१७), सोप्या भाषेत सांगायचे तर, कॉर्पोरेट क्षेत्रात आताच्या स्वस्त व्याजदराने कर्ज उभारणी सहज होऊ शकते. दिवाळीत साऱ्याच बाजारपेठा गजबजल्या होत्या व खरेदीचे उधाण आले होते. तेव्हा मागणी आहे, आणि  पुरवठा करताना भांडवली खर्च करावा लागला तरी  त्याचीही  तयारी उद्योग जगतात आहे. ‘थरमॅक्स’, ‘सिमेन्स’, ‘एबीबी’, ‘पॉवर इंडिया’, ‘लार्सन’ आदी शेअरकडे लक्ष ठेऊन आपल्या भांडारात वेळोवेळी त्याचा समावेश करत राहिले पाहिजे. सूत्र असे की, खरेदीची  छोटी सुरुवात आहे त्या किमतीला करावी; नंतर मात्र प्रत्येक घसरणीत त्यात वाढ करत राहावे. कितीही कंटाळा आला तरी छोट्या मोठ्या घसरणीची वाट पाहणे योग्य.  

मागे ‘सकाळ’मधील एका लेखात (१८ जुलै २०२१) ‘आयपीओ’च्या मागे झुंडीने लागलेल्या छोट्या गुंतवणूकदारांचा विचार करताना मूल्यांकनाचा ऊहापोह केला होता. त्यात ‘झोमॅटो’ व ‘डीमार्ट’चे उदाहरण दिले होते. ‘झोमॅटो’च्या विक्री मूल्यासंबंधी मुख्य आक्षेप, कंपनी तोट्यात आहे तरी इतका भारी भाव कसा? हा होता. त्याचा प्रतिवाद करताना ई कॉमर्स क्षेत्रातले शेअर पी ई गुणोत्तर किंवा नफा तोटा बघून जोखले जात नाहीत, असे मी म्हटले होते. या वर्षी ‘झोमॅटो’ची विक्री बारा ते पंधरा हजार कोटीची होईल असा अंदाज आहे. विक्रीच्या पटीत या शेअरला मूल्यांकन मिळावे अशी अपेक्षा. सप्टेंबर तिमाहीत या शेअरची विक्री वाढली तसाच तोटाही वाढला, पण शेअर बाजाराने तोट्याकडे दुर्लक्ष केले व वाढीव विक्रीमुळे शेअरचा भाव दीडशे रुपयांवर टिकून आहे. (विक्री ३५०० कोटी आणि त्यांचे ढोबळ उत्पन्न ११०० कोटी.)

तसेच ‘नझारा टेक’ ला जरूर अर्ज करा असे सांगताना, या नूतन क्षेत्रातील ही भारतात सूचीबद्ध होणारी एकमेव कंपनी आहे; थोडी कळ काढल्यास किमान दुप्पट पैसे मिळावे असा आशावाद व्यक्त केला होता. ३० मार्च  रोजी ११०१ रुपयांना आलेला हा समभाग आजही २३००च्या आसपास टिकून आहे. तसेच सौंदर्य क्षेत्रातील ‘नायका’ ह्या इश्यूकडे दुर्लक्ष नको असे म्हटले होते. रु. ११२५चा हा शेअर आज दुप्पट झाला आहे. शेअर बाजार जोरात आहे. आयपीओचे वेड ओसरेपर्यंत चिंता करायचे कारण नाही व ते आयुर्विमा महामंडळाच्या शेअर विक्रीपर्यंत तरी किमान  टिकावे.  

या सर्व चर्चेत एक महत्त्वाची मेख आहे. ती म्हणजे वेळोवेळी नफा खिशात टाकणे. हे जर केले नाही तर नक्की निराशा पदरी पडू शकते.  ह्यात गृहीतक असे आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपले पोट केव्हा भरले आहे हे कळते. आपल्या सर्वांच्या पसंतीच्या ‘ब्लू चीप’ या सदरात मोडणाऱ्या दोनच शेअरचे उदाहरण देतो. 

पहिला शेअर आहे ‘इन्फोसिस’. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र त्यावेळी वायटूकेचा बोलबाला असल्यामुळे असेच अस्मानाला टेकले होते. जानेवारी २०००मध्ये ‘इन्फोसिस’चा भाव होता १६,५००. त्या एका शेअरचे आज बोनस व स्प्लिटमुळे ९६ शेअर्स झाले आहेत आणि भाव आहे १,८००. तरीही चक्रवाढ व्याजाने परतावा वार्षिक ११.८३ टक्के पडतो. दुसरे उदाहरण ‘विप्रो’चे. या शेअरच्या संपत्ती निर्मितीच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. ‘विप्रो’चा भाव २००० साली ४,१०० ते ९,८०० रुपयांच्या दरम्यान होता. सोयीसाठी सरासरी ७ हजार रुपये भाव धरू. त्या एका शेअरचे आज २६ शेअर झाले आहेत. आजच्या ६६० रुपयांच्या भावाला परतावा (उतारा) फक्त ४.३६ टक्के आहे.  तात्पर्य हे की वेळीच नफा ताब्यात घेणे व योग्य वेळ येताच तो पुन्हा गुंतवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसरा पर्याय, दरवर्षीच थोडी रक्कम त्यात गुंतवत राहणे हा आहे. (म्युच्युअल फंडाच्या सिप प्रमाणे). दरवर्षी जानेवारीत ‘इन्फोसिस’ घ्यायचे ठरवले असते आणि ते पथ्य किमान चार वर्षे जरी पाळले असते तरी आज उतारा १५ टक्क्यांवर गेला असता.  

दुसरी मोक्याची गोष्ट सांगतो. ‘इन्फोसिस’ रु. १३,५०० व ‘विप्रो’ रु. ७,००० रुपयांच्या अत्युच्च, असंभवनीय किमतीला असताना त्याच वेळी ‘लार्सन’ साठ रुपयांना मिळत होता. तो पुढे अनेक पट वाढलाच, आणि माहिती तंत्रज्ञानाचे शेअर्स घसरले. तसेच २००८ च्या तेजीत ‘सुझलॉन’ २,००० रुपये तर ‘डीएलएफ’ १,१०० रुपये होते. ते आज कुठे आहेत ते तुम्हीच बघा. त्यावेळी २४० रुपयांना  मिळणारा ‘सन फार्मा’ एकास एक बोनस देऊन २०१५ साली १ हजार रुपये झाला. (अंदाजे आठ पट, सात वर्षातील उतारा ३५ टक्के दरसाल). खरेदी इतकीच योग्य वेळी विक्री किती महत्त्वाची आहे हेच त्यातून अधोरेखित होते.

आजही बाजारात दुर्लक्षित शेअर आहेत. ‘आयटीसी’, तसेच इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय होतील या भीतीने दुचाकी वाहन निर्मिती करणारे शेअर, उदाहरणार्थ ‘बजाज ऑटो’, ‘हिरो’, ‘आयशर’ इत्यादी, या वर्षभरात वाढलेले नाहीत. शिवाय चीप शॉर्टेजचे तुणतुणे आहेच. चिप्सचा पुरवठा आज ना उद्या सुरळीत होणारच आहे असा विश्वास ठेऊन येथे खरेदी करता येईल. तसेच स्टील व इतर धातूतील तेजीही आटोक्यात येत आहे. त्याचाही फायदा वाहन उद्योगाला होईलच. याखेरीज पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रातील ‘केएनआर’, ‘पीएनसी इन्फ्रा’ वगैरे अनेक शेअर आहेत. आपल्या संयमक्षमते प्रमाणे वरील शेअरकडे लक्ष द्यावे. कारण किमान वर्षभर सांभाळण्याची तयारी हवी. 

शेवटी पुन्हा एकदा सांगतो, बाजाराला मुख्य भीती महागाई दराची होती. पेट्रोल व डिझेल सतत वाढत असल्यामुळे महागाई वाढली तर व्याजदर वाढतील ही धास्ती! केंद्र सरकारने एका फटक्यात एक्साइज कमी करून ती भीती 

कमी केली. जोडीला राज्य सरकारांनी साथ दिली तर प्रजेलाही थोडी सवड मिळेल.  पोलादाचे दर कमी होणे आणि कच्चे तेल ८५ डॉलरच्या पुढे न जाणे अर्थव्यवस्थेला तारून नेईल असे वाटते. बेभान नव्हे तर सावध खरेदी करणे हेच इष्ट!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या