भ्रमाचा भोपळा

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

अर्थविशेष

शेवटी एकदाचे व्हायचे ते झालेच. भ्रमाचा भोपळा फुटलाच. म्हणजे त्याचे असे झाले.. गेले वर्ष दीड वर्ष चाललेल्या अविरत तेजीमुळे, शेअर बाजारात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाचाच आत्मविश्वास वाढत चालला होता. काही जणांना तर आपण नव्याने  ‘तज्ज्ञ’ झाल्याचा साक्षात्कारही झाला होता. यात सामान्य गुंतवणूकदार, ‘एच एन आय’ या पदवीने गौरवला जाणारा श्रीमंत गुंतवणूकदार (तसे आता सारेच निवेशक या पदवीला पात्र आहेत), ब्रोकर्स, टीव्ही अँकर्स, फंड व्यवस्थापक, उद्योजक, प्रवर्तक सारेच मोडतात. आपली नेमकी मिथके कोणती ते व निराशा टाळण्यासाठी काय पावले उचलावी ते बघू. 

नवीन शेअर विक्री शेअर बाजार तेजीत असतानाच होते. बाजार खाली असताना पडेल भावात पूर्वी सरकारी निर्गुंतवणूक होत असे. आता तिथले सल्लागारही चलाखीने तेजी यायची वाट पाहतात. तेव्हा नवीन शेअर विक्रीला येतो, तो सामान्य गुंतवणूकदाराला फायदा मिळवून देण्यासाठी, हे मनातून काढून टाकले पाहिजे. नफा झालाच तर त्यात नशिबाचा भाग मोठा असतो.

    नवीन शेअर विक्री होण्याआधीच, सूचीबद्ध नसलेल्या शेअर्सचा व्यवहार होण्याचे प्रमाण आता खूप वाढले आहे. त्याला सोप्या भाषेत ‘ग्रे मार्केट’ म्हणतात. हा व्यवहार कायदेशीर असला तरी त्यात गुंतवणूकदारांचा सहभाग अल्प असल्यामुळे किमतीचा योग्य शोध घेतला जात नाही ( Improper Price discovery). त्यामुळेच ग्रे मार्केटचे प्रीमियम बघून गुंतवणूक करणे हे चुकीचेच आहे. ग्रे मार्केटमध्ये भाव मोठा म्हणून अर्ज करणे टाळता आले तर बघावे. संदर्भासाठीच या प्रीमियमचा उपयोग करावा.

    सेबीने शेअर विक्रीला हिरवा कंदील दाखवला आहे, याचा अर्थ त्यात गुंतवणूक करण्याची शिफारस आहे असे नाही. गुंतवणूकदाराने योग्य तो सल्ला घेऊन किंवा स्वतःचा अभ्यास करूनच गुंतवणूक केली पाहिजे अशी सेबीची अपेक्षा असते. 

    शेअर विक्रीतून येणारा पैसा भांडवल उभे करणाऱ्या कंपनीला मिळणार आहे, की प्रवर्तकांच्या खिशात जाणार आहे हे बघितलेच पाहिजे. ऑफर फॉर सेल असेल, तर व्यवसाय सुरू करताना टाकलेले जोखीम भांडवल (Risk Capital) भागधारकाकडून वसूल करून इतरत्र वळवणे प्रवर्तकाला शक्य होते. प्रवर्तकांच्या हाती अल्प मालकी हिस्सा राहतोय असे दिसल्यास किमान व्यवस्थापन निपुण हातात आहे अथवा नाही हे तरी बघायला हवे.  सेबीने आता यापासून बोध घेऊन नवीन शेअर विक्रीमध्ये ऑफर फॉर सेलचा हिस्सा मर्यादित करायचे ठरवले आहे.

    नवीन विक्री होण्याआधी व नंतरचा जाहिरातींचा भर पूर्णपणे ओसरू द्यावा. किमान पुढील तिमाही निकालापर्यंत थांबावे. बऱ्याच वाजवी किमतीला नंतर शेअर्स मिळू लागतात. दोनच उदाहरणे देतो. आजचा बहुचर्चित सीडीएसएल जून १७ मधील लिस्टिंगच्यावेळी २०० रुपये वाढून ४८४ रुपयांवर गेला होता. त्यानंतर जवळपास तीन वर्षे २५० ते ३०० रुपयांत घुटमळत होता. त्यांनतर तो वाढू लागला. एमटीआर टेक मार्च २०२१मधल्या पदार्पणात १,१८० रुपयांपर्यंत गेला होता, आठवडाभरातच ८७० रुपयांपर्यंत खाली आला. आज खाली आलेल्या बाजारातदेखील १,८०० रुपयांना मिळतोय. असो!   

  • आपले धोरण अल्पकालीन आहे की दीर्घकालीन ते ठरवून घ्यावे. सहसा छोटे गुंतवणूकदार लिस्टिंगच्या नफ्यासाठीच नवीन शेअर विक्रीमध्ये पैसे टाकतात. अशा वेळी नफा होवो अथवा तोटा, आठ दिवसांत निर्णय घेऊन भांडवल मोकळे केले पाहिजे. 
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसायाचे मॉडेल समजून घेणे व स्वतःची निर्णयक्षमता वापरून तो व्यवसाय अनेक पटींनी वृद्धिंगत होऊ शकतो का ते बघणे, तसेच नफा कधी होऊ शकतो याचा अंदाज बांधणे (स्टार्ट अपच्या बाबतीत). याखेरीज, इतर शेअरबाबत ताळेबंद व नफा तोटा पत्रक बघणे आणि जोखिमीच्या घटकांची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.  
  • शेवटचा मुद्दा, आपल्याला शेअर लागत नाहीत म्हणून प्रसंगी कर्ज घेऊन प्राथमिक समभाग विक्रीला अर्ज करणे. हे तर सरासर चुकीचे आहे. न करणे बरे. 
  • अनेक दिवसांपासून आपण ज्याची वाट पहात होतो ती घसरण एकदाची आली. आता हवे धैर्य. १९ ऑक्टोबर रोजी नोंदलेल्या १८,६०४ अंशाच्या उच्चांकापासून शेअर बाजार जवळजवळ ८ टक्के खाली आला आहे. याला कारणे अनेक आहेत. 
  • ‘रिलायन्स आराम्को’ व्यवहार पुढे ढकलला जाणे वा रद्द होणे. आता ‘आराम्को’च्या रमैय्या यांना ‘रिलायन्स’च्या संचालक मंडळातून डच्चू मिळतो का ते बघणे महत्त्वाचे. 
  • पेटीएम आयपीओने सूचीबद्ध होताना केलेली निराशा.
  • परदेशी संस्था विक्रीच्या मूडमध्ये आहेत. भरपूर नफ्यात असताना तो खिशात टाकून वर बोनसही खिशात टाकण्याचा प्रयत्न होणारच. डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून परदेशी संस्था नवीन खरेदी धोरण आखतील असे वाटते. पुढील पंधरा दिवस मंदी राहू शकते. ही छान संधी आहे. हे दिवस चोखंदळ खरेदीचे आहेत.  
  • कोविडची तिसरी लाट युरोपमधे थैमान घालत आहे. अर्थात तिथे काही नागरिक लस घेण्याच्या विरुद्ध आहेत, म्हणूनच बाधित वाढताहेत. लॉकडाउन फक्त हट्टाने लस न घेतलेल्या नागरिकांसाठीच आहे. त्याचाही अप्रत्यक्ष परिणाम बाजारावर आहे. 
  • अमेरिकेत महागाई दर वाढतो आहे, तसेच माफक प्रमाणात का होईना रोखे खरेदी कार्यक्रम कमी केला आहे. 
  • शेतकरी व शेतमाल कायद्यातील सरकारी घुमजाव शेअर बाजाराच्या पसंतीस उतरलेली नाही. त्यातून एक चुकीचा संदेश जागतिक गुंतवणूकदारांना मिळतोय व विक्रीला उत्साह येतो. हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून इतरही सुधारणा मागे घेतल्या जातील का, ही मुख्य भीती आहे.

आपण आखलेली १७,६००ची पातळी तोडून बाजार खाली आला आहे. १७,३०० निफ्टी पातळीला ही घसरण थांबली नाही, तर कदाचित शेअर बाजाराच्या या पुढील वाटचालीचे नेतृत्व कोण करणार हा मुख्य प्रश्न आहे. खासगी बँका, मशिनरी निर्मिती व प्रोजेक्ट उभारणी करणारे उद्योग, रिलायन्स, बांधकाम क्षेत्र व पुनश्च माहिती तंत्रज्ञान असा तो क्रम लागावा. आपल्याकडे निवड करायला १०-१५ दिवस आहेत. एक मात्र नक्की की तिसऱ्या लाटेचा अपशकून झाला नाही, तर बाजाराने उत्तम संधी दिली आहे. त्याचा नक्की फायदा करून घेतला पाहिजे.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या