ऊन-पाऊस

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 13 डिसेंबर 2021

अर्थविशेष

या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची बैठक आहे. त्यात पतधोरण कसे ठरते त्यावर शेअर बाजाराची पुढील वाटचाल ठरेल. सध्या तेजीचे नेतृत्व कोण करेल हा संभ्रम आहे. मात्र काही दिवसांच्या टाइम करेक्शनची तयारी ठेवावी लागेल.

डिसेंबर महिना थंडीचा, त्यामुळे ऊन हवेहवेसे वाटते, पण मिळतोय पाऊस. मग कधीतरी तीनही ऋतू समोर येतात. ऊन, पाऊस आणि थंडी. शेअर बाजारातही असेच चालले आहे. तेजी म्हणावी तर बाजार खाली येत आहे. पूर्ण मंदीची लाट म्हणावी तर काही निवडक शेअरना वरचे सर्किट लागलेले दिसते. एकेका दिवशी हजार अंशांनी घसरणाऱ्या शेअर बाजाराकडे पाहून नवशिक्याला हुडहुडी भरेल तर निष्णात गुंतवणूकदार त्यात मोठी संधी शोधताना दिसेल. शेअर बाजार अपेक्षेप्रमाणे १६६०० अंशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे एक मात्र निश्चित!  १६६००ची पातळी येईल का? की त्याच्याही खाली बाजार जाईल १६००० पर्यंत? हे ह्या घसरणीचा गतीवेग (मुमेंटम) ठरवेल. भरगच्च मालाने भरलेला ट्रक उताराच्या सिग्नलला थांबवताना थोडा आधीपासूनच ब्रेक मारावा लागतो, तसेच तेजीने ‘भारलेल्या’ बाजाराचे होते. म्हणूनच १२ ऑक्टोबरपासून १५ नोव्हेंबरपर्यंत सतत सावधगिरीच्या सूचना आपण देत होतो. आता संयमाची परीक्षा आहे. संकेताप्रमाणे या लेखमालेत कुठेही शॉर्ट करण्याचा सल्ला दिलेला नाही, फक्त नफा वसूल करून मंदीत पुन्हा खरेदी करण्याचे सुचवले आहे. असो.

चार्टिस्ट
सध्या आलेखाचा चाहता वर्ग वाढतो आहे. छोटेमोठे डे ट्रेडर्स, मोठे गुंतवणूकदार आणि परदेशी संस्था निःसंकोच आलेखाचा उपयोग करताना दिसतात, आणि त्यात काही चुकीचे आहे असेही  नाही. कारण आलेख शेवटी गुंतवणूकदारांच्या सामूहिक मानसिकतेचाच आरसा असतो. फक्त काही संज्ञा अनेकदा वापरून अंगवळणी पडल्या आहेत, त्यातली एक आहे ‘ब्रेक आउट’. कुठलाही शेअर रोजची वाटचाल करताना काही आकृतिबंध करत असतो. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर बहुतांश गुंतवणुकदारांना अमुक शेअर एका पातळीच्या वर जाणार नाही असे वाटते, कारण इतिहासात डोकावले तर असे दिसते की, जेव्हाजेव्हा तो त्या पातळीला धडकला तेव्हा तेव्हा  तेथून तो  खालीच आला. या पातळीला प्रतिकार पातळी (Resistance Level) म्हणू. उदाहरणार्थ, गेले दोन वर्षे ‘आयटीसी’  ₹    २४०च्या पातळीला अडतो आहे. त्याने १२ ऑक्टोबर २१ रोजी मोठी उलाढाल करीत या पातळीवरचा बंद दिला. दैनिक व साप्ताहिक बंदही वरच्याच पातळीवर झाल्यामुळे, ‘ब्रेक आउट’ मिळाला अशी खात्री वाटू लागली. सहसा ब्रेक आउटनंतर मोठी उलाढाल होते. अल्प मुदतीचे सौदे करणारे खरेदी करतात, तर ‘आयटीसी’ यावर जाणार नाही अशी ठाम समजूत असलेले गुंतवणूकदार तेथे नफा वसुलीला येतात. या धुमश्चक्रीत शेअर पुन्हा एकदा खाली येऊन प्रतिकार पातळीशी थबकतो. कुठल्यातरी मूलभूत कारणामुळे, नवी खरेदी होऊन, तो पुन्हा वर गेला तर ब्रेक आउटची अॅसिड टेस्ट पूर्ण झाली असे ठरते. आता त्याची दिशा वरची राहणार असे बाजार गृहीत धरतो. मात्र जर पुन्हा त्या पातळीच्या खालीच आला तर ब्रेक आउट खल्लास झाला असे समजतात. आता ‘आयटीसी’चे काय झाले ते बघू . १२ ऑक्टोबरला  ₹    २४१चा बंद दिल्यावर पुढे १८ तारखेला त्याने ₹    २६५चा उच्चांक नोंदवला व परत खालची दिशा पकडली व २२ ऑक्टोबरला ₹    २३६चा बंद देऊन त्याने पांढरे निशाण फडकावत ब्रेक आउट संपला हे जाहीर केले. येथे चार्टीस्ट बाहेर पडतात -प्रसंगी थोडे नुकसान सोसून देखील.

दुसरे उदाहरण ‘सीडीएसएल’चे. हा शेअर   ₹    ४२१ ते ₹    ५५० या टप्प्यात फिरत होता. (प्रतिकार पातळी ₹    ५५०) हा १५ फेब्रुवारी २१ रोजी अचानक वर जाऊन ₹    ५८४चा उच्चांक करत ₹    ५६५ला बंद झाला. पुढे आठवडाभर रोजच ₹    ५५०च्या आसपास येऊन तो वरचा बंद देत असे. २२ फेब्रुवारीला 

₹    ५९०चा बंद देत त्याने ब्रेक आउट निश्चित केला व त्यानंतर आजपावेतो मागे वळून पाहिले नाही. तसेच बहुतांश गुंतवणुकदारांना अमुक शेअर एका पातळीच्या खाली येणार नाही असे वाटते, किंवा त्या पातळीवर ते खरेदी करायला उत्सुक असतात. या पातळीला आपण आधार पातळी म्हणू. (Support) उदा. २०० रुपयांना ‘आयटीसी’ची किंवा  ₹    ६८३ वर ‘आयसीआयसीआय’ची आधार पातळी आहे कारण बहुसंख्य भागधारकांना त्या खाली तो येणार नाही असे वाटते. अर्थात ही आधार पातळी वाळूवरची रेघ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तिमाही निकालामुळे झालेला अपेक्षाभंग किंवा घसरणीचा गतीवेग ही रेघ पुसून टाकू शकतात, व त्याखाली नवी पातळी ठरते. 

  ₹    ७६५च्या वर ‘आयसीआयसीआय’चा शेअर निकालाच्या दिवशी गॅपने गेला व त्या उन्मादात पुढे  ₹    ८६७ रुपयांचा उच्चांक करीत ₹    ८४१वर बंद झाला. आपल्या प्रमेयाप्रमाणे पुन्हा ₹    ७६५वर आल्यावर तो त्या पातळीच्याही खालीच आला. याचा अर्थ ₹    ७६५चा ब्रेक आउट फेल गेला असाच घेतला पाहिजे. पुढील तेजीत तो त्यावर जाईल तेव्हा नवा ब्रेक आउट समजून चार्टीस्ट नव्याने खरेदी करतील.  आलेखाप्रमाणे ट्रेडिंग करणाऱ्यांच्या मदतीला स्टॉप लॉस असल्यामुळे छोटा तोटा स्वीकारून ते पुन्हा नव्या उत्साहाने उभे राहातात. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रेक आउटचे मूल्यमापन सक्सेस रेशोवरून ठरत नाही , म्हणजे १० वेळा ब्रेक आउट सापडला पण सहा वेळा तो चुकला तरी बिघडत नाही. जोखीम /नफा ह्यांचे गुणोत्तर किती चांगले आहे यावर ब्रेक आउटचे कौतुक होते. वरील उदाहरणात ‘आयटीसी’मधून किरकोळ तोटा घेऊन बाहेर पडता आले पण ‘सीडीएसएल’मध्ये ५ टक्के जोखीम घेताना ३०० टक्के नफा होऊ शकला.

ब्रेक आउट अनेक प्रकारे येऊ शकतो. ते त्या शेअरने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या आकृतिबंधावरून ठरते. फ्लॅग, पेनंट, हेड अँड शोल्डर वगैरे त्याचे प्रकार आहेत, त्या विषयात आता शिरायला नको. ढोबळमानाने एक साधी पद्धत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही गुंतवणूकदारांना वरील विवेचन क्लिष्ट वाटू शकते. पण तो दोष पत्करून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ब्रेक आउट मागील संदर्भ कळावा एवढाच यातील उद्देश आहे.

या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची बैठक आहे. त्यात पतधोरण कसे ठरते त्यावर शेअर बाजाराची पुढील वाटचाल ठरेल. सध्या तेजीचे नेतृत्व कोण करेल हा संभ्रम आहे. रिलायन्स आणि बँक निफ्टी दोघेही फॉर्मात नाहीत. आयटी क्षेत्र खूप धावल्यामुळे थकले आहे. उद्योगांचा विद्युत पुरवठा बराच सुरळीत होत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दरही घसरले आहेत. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे ग्राहपयोगी वस्तूंचे निर्माते मार्जिन बाबत चिंतित आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने चाल दिली तर बँक निफ्टीत तेजी येऊ शकते आणि तिला जोडीला घेऊन सिमेंट, औषध उद्योगाच्या, मशिनरी निर्मात्यांच्या मदतीने निफ्टीला नवी झळाळी येऊ शकते. आयटीही यथाशक्ती मदत करेलच. मात्र काही दिवसांच्या टाइम करेक्शनची तयारी ठेवावी लागेल.

‘आयसीआयसीआय’ बँकेने विश्लेषकांच्या बैठकीत चांगल्या कामगिरीचे संकेत दिले आहेत. बँक डिजिटल धोरण आखून वाटचाल करीत आहे. तसेच अनार्जित कर्जेही कमी होत आहेत. ह्या शेअरकडे लक्ष ठेवायला हवे. तसेच या तीनही बँकांच्या तुलनेत ‘अॅक्सीस बँक’ स्वस्त वाटते. ₹    ६५० ते ₹    ६८० दरम्यान नक्कीच गुंतवणूकजन्य आहे. 

‘नायका’मध्ये गुंतवणूक केलेल्या अँकर्सचा लॉक इन ८ डिसेंबरला संपतो आहे. त्यानंतर पडझड झाल्यास  ₹    १५०० च्या आसपास त्या शेअरकडे लक्ष देता येईल. 
कोविड ओमायक्रॉन उत्परिवर्तनाची भीती हळूहळू कमी होत आहे. नव्याने सर्वांनाच साक्षात्कार होतोय की आपल्याकडे लस, मास्क, तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य ते अंतर हे उपाय तयार आहेत. तसेच हा प्रकार जीवघेणा नाही. तेव्हा याचा सामना करणे शक्य होईल व शक्यतो लॉकडाउन करावा लागणार नाही, या अपेक्षेनेच अधूनमधून तेजीचे वारे वाहतात. हेही दिवस जातील व पूर्वीसारखी तेजी लवकरच परतेल अशी अपेक्षा आहे.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या