मुझको भी लिफ्ट करा दे..

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 20 डिसेंबर 2021

अर्थविशेष

निफ्टी १७००० ते १७६०० या दरम्यान घोटाळत राहण्याची शक्यता मोठी आहे. अशा वेळी आपण कुठले शेअर घेतो किंवा सांभाळतो याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते. ‘टाइम करेक्शन’चे महत्त्व वाढते ते यामुळे.

गेला आठवडा संपताना तेजीची झुळूक दाखवून गेला. गेल्या सोमवारी (ता. १३ डिसेंबर) मात्र निफ्टीत पुन्हा पडझड होऊन १७३६८चा बंद मिळाला. त्यादिवशी १६९१२ या पातळीवर बंद झालेली निफ्टी आठवड्याभरात वर गेली असली, तरी तेजी; सासरी निघालेल्या माहेरवाशिणीसारखी अडखळते आहे. ‘इंडिया विक्स’ सोळा सतराच्या दरम्यान आहे, त्यामुळे थोडेसे हायसे वाटतेय, पण ‘पुट’ व ‘कॉल ऑप्शन’ची बांधणी बघितली तर  १७६०० ही तेजीची लक्ष्मणरेषा आहे असे वाटते. ती पार करण्यासाठी ‘शाश्वत’ सोन्याचे हरिणच यायला हवे. 

ते हरिण परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीचे असू शकते, किंवा जर आघाडीच्या कंपन्यांनी भरघोस आगाऊ कर भरणा केल्यास तसे होऊ शकते. कंपनी कामकाजातली सुधारणा नक्त नफ्यापर्यंत जायला हवी. तसेच जागतिक बाजारांचीही साथ हवी. रिझर्व्ह बँकेचे ‘जैसे थे’ धोरण किमान सहा महिन्यांसाठी राहायला हवे. कच्च्या मालाच्या किमती कमी व्हायला सुरुवात तरी व्हावी. असे जर का झाले किंवा होणार असेल तर रिलायन्स, खासगी बँका व तत्सम मार्केटचे महारथी जे ‘मुझको भी लिफ्ट करा दे..’ म्हणताहेत त्याकडे गुंतवणूकदार गांभीर्याने बघतील आणि त्यांना डोक्यावर घेतील.  

तेजीला १७६००च्या जवळ अडसर असेल, असे मानले तर या उलट म्युच्युअल  फंडांच्या योजनांना मिळणारा प्रतिसाद स्थानिक गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास दर्शवतो. निफ्टीमध्ये नवी क्षेत्रे सामील करण्याचे घाटते आहे. कदाचित ‘इंडियन ऑईल’ची जागा ‘इंफोएज’ किंवा ‘अपोलो हॉस्पिटल’ घेतील. २३-२४ सालचा निफ्टी इपीएस ९००च्या दरम्यान असल्याचे अनुमान बरोबर ठरले, तर चालू निफ्टीची पातळी स्वस्त वाटायला लागेल. थोडक्यात काय, १७६०० सारखीच १७००० हीदेखील दुसरी लक्ष्मण रेषा आहे. त्याखाली जायला आणि टिकायला बाजाराला बरेच कष्ट घ्यावे लागतील. 

तात्पर्य हेच की, निफ्टी  १७००० ते १७६०० या दरम्यान घोटाळत राहण्याची शक्यता मोठी आहे. अशा वेळी आपण कुठले शेअर घेतो किंवा सांभाळतो याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते. ‘टाइम करेक्शन’चे महत्त्व वाढते ते यामुळे. एकदा का हा टाइम करेक्शनचा कालावधी संपला की, निफ्टी अगदी १८६०० व पुढे २० हजारपर्यंत चाल करू शकेल. सहसा तेजीच्या मोठ्या वाटचालीत छोट्या मंदीचा हा कालखंड दोन ते तीन महिन्यांपुढे टिकत नाही. हे गणित बघितल्यास १५ ऑक्टोबरनंतर सुरू झालेली घसरण १५ डिसेंबर २१ किंवा १५ जानेवारी २२च्या दरम्यान कधीही  थांबू शकते.

हा सगळा ऊहापोह एका बाजूला ठेवून भविष्याकडे नजर टाकल्यास (व मधले चारसहा महिने बाजाराकडे दुर्लक्ष करू असे ठरवल्यास) आपले नेहमीचेच यशस्वी भविष्यवेधी व गुणवत्ता असलेले शेअर घ्यावे व सांभाळावे. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे ‘एपीएल अपोलो’ ₹    ८५० ते ९००च्या दरम्यान मिळत होताच. ‘गोदरेज प्रॉप’, ‘बजाज फिनसर्व्ह’, ‘बजाज फायनान्स’, ‘आयसीआयसीआय’, ‘एचडीएफसी’, ‘एसआरएफ’, ‘केपीआर मिल्स’ आदी या लेखमालेत वेळोवेळी निर्देशिलेल्या शेअरकडे सूक्ष्मपणे बघून, अभ्यासपूर्वक खरेदीचा निर्णय घ्यावा.

अमेरिकेने चीनमधून होणारी वस्त्र आयात थांबवली अशी एक बातमी आहे. ती मुख्यत्वे शीन जांग प्रांतातील उत्पादनाशी संबंधित आहे. उईगूर मुस्लिमांचे ( Xinjiang uygher)  सतत होणारे शोषण व कथित शिरकाण यास कारणीभूत आहे. वस्त्रोद्योगात पाकिस्तान, बांगलादेश व व्हिएतनाम हे आपले प्रतिस्पर्धी आहेत. त्यात पाकिस्तानमधील पूर, कापसावरील कीड व कर्जबाजारीपणा यामुळे तेथील निर्यात रोडावली आहे. भारतीय वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने ही बातमी चांगली आहे. कापसाचे भाव तेजीत असले तरी अमेरिका वाढीव भावाने खरेदी करू शकते. ‘केपीआर मिल्स’, ‘वेलस्पन इंडस्ट्री’, ‘हिमतसिंगका’ आदी उद्योगांकडे अभ्यासासाठी बघता येईल.  

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर जगभर सुरू आहे. त्यातूनच बिटकॉइन व इतर क्रिप्टो चलनांचा जन्म झाला. यापुढे असंख्य अनेक क्षेत्रात ब्लॉक चेनचे अनुप्रयोग होतील व ते सामान्य ग्राहकाच्या हिताचेच असेल. विदा सुरक्षेइतकेच (Data Security and Privacy). मात्र या विषयी ठोस सरकारी धोरण आवश्यक आहे. गेल्या वर्षी भारतातील हा बाजार साडेसहाशे टक्के वाढला. त्यामुळे बिटकॉइन वगैरे आभासी चलनांना सरसकट बेकायदा ठरवणे चुकीचे आहे हे सरकारला कळले, हे बरे झाले.  आता आभासी चलनाचे अस्तित्व व आग्रहणास मान्यता देऊन त्याबद्दल एक कायदा करण्याचे घाटते आहे. सेबी किंवा तितक्याच सक्षम नियामकाकडे त्याचे नियमन देण्यात येईल.  प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्याकडील आभासी चलनांचा साठा जाहीर करावा लागेल. हे वाटते तेव्हढे सोपे नाही. डोळ्यासमोर दिसणारी मालमत्ता (प्लॉट, फ्लॅट वगैरे) देखील पूर्णपणे घोषित झालेल्या नाहीत. त्यासाठी कडक बेनामी कायदा येऊनही! आणि ही तर आभासी मालमत्ता आहे. याच कारणाने कायदा मोडल्यास मोठा दंड व कारावासाची शिक्षा अशी तरतूद होण्याची शक्यता आहे. पुढे प्रत्येक व्यवहारावर कर येईलच. तसेच बिटकॉइनचे नामकरण आभासी चलन असे न करता ‘आभासी मत्ता’ (Cryptoassets) असे करणार आहेत. देशाचे अधिकृत चलन हा सार्वभौम अधिकार असल्यामुळे त्यात कुठल्याही आभासी चलनाला जागा नाही. या सर्व चर्चेतील मोक्याची व आनंदाची गोष्ट म्हणजे आजतरी कुठल्याही क्रिप्टो चलनावर बंदी घालण्याचे ठरत नाही. आभासी चलनाच्या मोहमयी दुनियेत अभिमन्यूसारखे शिरून पस्तावण्यापेक्षा, सनदशीर मार्गाने त्यात भाग घेता येणे कधीही हिताचेच! हा प्रस्तावित  कायदा चर्चेला आल्यानंतर पुढील ऊहापोह करूच. 

शेअर बाजार एका टप्प्यात (सोप्या मराठीत ‘एका रेंज’मध्ये) राहील असे अनुमान आहे. त्या टप्प्याच्या दोन्ही बाजूला मोठी चढाई अथवा घसरण होऊ शकते. मागे म्हटल्याप्रमाणे शेअरचा वकूब ओळखून खरेदी करावी आणि निर्देशांकांकडे लक्ष देऊ नये हे सर्वोत्तम. आपल्या मागोमाग परदेशी निवेशक येतील ही आशा करू. निर्देशांक ‘लिफ्ट करा दे...’ म्हणतात त्याला त्यातून बळकटी येईल.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या