पानिपत! पानिपत!!

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

अर्थविशेष 

सध्याच्या परिस्थितीत माहिती तंत्रज्ञान, कॅपिटल गुड्स, खास रसायने व बांधकाम ही चारही क्षेत्रे आपण तपासून, अभ्यासून घेतली पाहिजेत, व त्यात आपल्या गुंतवणुकीची पूर्तता टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे.

पानिपतच्या पराभवाची जी अनेक कारणे सांगितली जातात, त्यातले एक कारण म्हणजे मराठी फौजेत असलेल्या बाजारबुणग्यांचा भरणा! पानिपताचा इतिहास आज आठवण्याचे कारण एवढेच, की आपल्या शेअर बाजारातही आज ‘पानिपत’ चालू आहे. सध्या जरी तेजीवाल्यांची पीछेहाट होत असताना दिसत असली तरी प्रत्येकाने आपल्या फोलिओत किती आणि कोण ‘बाजारबुणगे’ आहेत हे ओळखले पाहिजे. तरच आपण मोठा मार खाणार नाही. ‘बाजारबुणगे’ याचा अर्थ ज्यांना काही गुणवत्ता नाही. कुठल्यातरी टिपच्या आधाराने घेतलेले किंवा जमा केलेले निरनिराळे शेअर ज्यांना दुसरे कुठलेही अधिष्ठान नाही. कोणीतरी सांगितला, तो घेतला, तो वर गेला, खाली आला, तरी आपण तो सांभाळून ठेवला. आता मात्र या अटीतटीच्या सामन्यामध्ये पहिल्यांदा या ‘बाजारबुणग्यांना’ बाहेर काढले पाहिजे. यांना बाहेर काढल्यानंतर जे खरे लढवय्ये, चांगली गुणवत्ता असलेले शेअर हातात राहतील ते या लढाईत थोडे जखमी होतील हे खरे! पण तेच आपल्याला विजय मिळवून देणारे आहेत. याच नीतीने आपण आपल्या फोलिओकडे बघूयात. बाजारबुणगे हद्दपार करू व चांगली गुणवत्ता असलेले शेअर्स आपल्याकडे ठेऊ आणि या मंदीचा सामना करू.

मित्रहो, मागील लेखात मी म्हटले होते, १७००० ते १७५०० या टप्प्यात बाजार फिरण्याची शक्यता जास्त आहे. आपण १७५०० ही ‘लक्ष्मणरेषा’ मानली होती कारण १७५००च्या पुढे जाण्यासाठी कुठलेतरी ‘सोनेरी शाश्वत हरिण’ आपल्याला दिसले पाहिजे. सध्यातरी असे हरिण दृष्टिपथात नाही. त्यामुळे ही लक्ष्मणरेषा इतक्यात तरी पार करता येईल असे वाटत नाही. 

लक्ष्मणरेषा सोडूनही आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे; ती म्हणजे, बाजारात पहिल्यांदाच १३ टक्के घसरण झाली आहे. ही किमतीमधील घसरण आहे. पण कालावधीची घसरण (Time Correction) अजून झालेली नाही. टाइम करेक्शनला जेमतेम दीड ते दोन महिने झाले असतील. हे अजून एक महिना चालावे. हा जो घसरणीचा कालावधी आहे (Time Correction Period) तो सर्वच तेजीवाल्यांना, गुंतवणूकदारांना बाजारात सहभागी होणाऱ्या सर्वच घटकांना शेअरबाजाराच्या पातळीवर विश्वास ठेवण्यास सांगत असतो. वेगवेगळ्या घटना घडून जातात. वेगवेगळ्या बातम्या येतात. पण अंतिम लक्ष्य दूरचे असेल तर प्रत्येकाने हा कालावधी कितीही वेदनादायी असला तरी, सहनच करायला हवा. तेव्हा मागे सुचविल्याप्रमाणे हा कालावधी होईपर्यंत चार महिने आपण काही केले नाही तरी चालते. किंवा काही निवडक शेअर टप्प्या-टप्प्याने घेत राहिले तर, आपल्याला फारशी चिंता करण्याचे कारण नाही. मोठे गुंतवणूकदार (HNI) त्यांची गुंतवणूक कशी करतात?, हे मध्यंतरी एका सर्वेक्षणातून लक्षात आले. हे मोठे गुंतवणूकदार रोजच्या चढ-उताराकडे लक्ष देत नाहीत. जे दोन-तीन वर्षात चांगला उतारा देऊ शकतील, मार्जिन वाढू शकेल, त्यांचा नफा वाढेल, विक्री वाढेल असे मोक्याचे शेअर ते घेतात व वेळोवेळी त्या शेअरच्या खालच्या पातळीवर त्यात वाढ करतात. हीच मंडळी मोठे पैसे कमावतात. मित्रहो! हाच मार्ग आपल्याला अनुसरायला हवा. काय घ्यावे? हे वेळोवेळी सुचवले असले, तरी पुन्हा एकदा विचार करू. 

पहिला विचार पातळीचा! आता १६६०० ही पातळी नक्की येईल किंवा १६०००ही येऊ शकते असे वाटते. या घसरणीची तयारी ठेवली पाहिजे. ही घसरण फारशी मोठी वाटत नाही. कारण १७००० पासून बाजार जेमतेम ५ टक्के खाली आला आहे. मात्र ही घसरण जेव्हा सेन्सेक्स किंवा निफ्टीच्या आघाडीच्या शेअरमध्ये होत असते तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की, मिड व स्मॉल कॅप शेअरमध्ये हीच घसरण १०-२५ टक्के होऊ शकते. पाहता-पाहता फोलिओचे पाणी होऊ शकते, आणि बाजार २ टक्के घसरला पण माझा फोलिओ ५ टक्के ते ७ टक्के खाली आला असे वाटू शकते. म्हणूनच मी म्हणतो प्रथम बाजारबुणगे हटवा, म्हणजे पुढे जायला आपल्याला चाल मिळेल. 

नुकतेच ‘एक्सेंचर’चे तिमाही निकाल हाती आले. निकाल अत्यंत स्फोटक असे आहेत. सर्वांगीण, अष्टपैलू वाढ प्रत्येकच क्षेत्रात कंपनीने दाखवली आहे. यावरून असे लक्षात येते की माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र हे काही दिवस मोठ्या तेजीत असेल. बोलता-बोलता एक वर्ष झाले, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची ही तेजी संपेल की काय? असे वाटत होते. पण तसे नसून पुढील एक ते दीड वर्ष या क्षेत्राकरता चांगलेच राहील. हे या निकालावरून लक्षात येते. 

‘इन्फोसिस’ या क्षेत्राचा दादा आहे. तसेच काही दिवस आपण सांगतो तो ‘पर्सिस्टन्ट’, ‘कोफोर्ज’, ‘टाटा एलेक्सि’ हे शेअरसुद्धा निवेशणीय आहेत, यांचा आपण नक्की विचार केला पाहिजे. लेखाच्या सुरुवातीला आपण जे म्हटले होते ‘बाजारबुणगे’ म्हणजेच अभ्यास न करता निवडलेले शेअर! म्हणूनच मी म्हणतो, की माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या आघाडीच्या दहा शेअरची यादी करावी. आणि त्यातील आपल्या निर्णयक्षमतेला किंवा जोखीम क्षमतेला चालतील असे दोन किंवा तीन शेअर निवडावे. यात ‘विप्रो’ची वर्णी लागली आहे. निफ्टीमध्ये ‘विप्रो’चा विचार करता येईल. नवीन नेतृत्वाने ‘विप्रो’ झळाळला आहे. तेव्हा ‘'इन्फोसिस’, ‘पर्सिस्टन्ट’, ‘विप्रो’ अशी यादी होऊ शकेल. क्षेत्र नक्की मात्र निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. 

या बरोबर कॅपिटल गुड्स या क्षेत्रानेही उभारी धरली आहे. बाजार खाली गेला तरी हे शेअर वरच आहेत. आपण मागे ‘सिमेन्स’, ‘एबीबी’, ‘एलअॅण्डटी’ यांची चर्चा केली. या जोडीला ‘वॉलटॅम्प ट्रान्सफार्मर’ किंवा ‘भारत बिजली’ यांचाही विचार करता येईल. या मान वर काढलेल्या क्षेत्रातही तेजी येऊ शकते. बांधकाम क्षेत्र हे तिसरे क्षेत्र! हे क्षेत्र बरेच खाली आहे. बांधकाम क्षेत्र व बांधकामाला पुरवठा करणारे क्षेत्र दोन्ही नक्की गुंतवणुकजन्य आहेत. ‘सोमाणी सिरॅमिक’, `ओबेराय रियालिटी’, ‘सोभा डेव्हलपर्स, ‘ब्रिगेड एंटरप्राइजेस’ यांचा समावेश करता येईल. आपला नेहमीचा ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ हा कर्ताकरविता आहेच. याचबरोबर खास रसायने (Specialty Chemicals) या चौथ्या क्षेत्राकडेही लक्ष असावे असे वाटते. 

वरील चारही क्षेत्रे (माहिती तंत्रज्ञान, कॅपिटल गुड्स, खास रसायने व बांधकाम) आपण तपासून, अभ्यासून घेतली पाहिजेत, व त्यात आपल्या गुंतवणुकीची पूर्तता टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘केपीआयटी’चा समावेश करता येईल.  

मित्रहो थोडक्यात सांगायचे म्हणजे, १६६००ला कदाचित बाजाराला एक आधार मिळेल. निफ्टीच्या १६६००च्या पातळीचा आपण विचार करू या. बाजारात मंदी खूप भरली आहे. तेव्हा आज ना उद्या शॉर्ट कव्हरिंगच्या निमित्ताने त्यातील काही मंदी नक्की कव्हर होईल. मंदीचे सौदे पूर्ण होतील. त्यातून बाजार उभारी घेऊ शकतो. परंतु, बाजाराने उभारी धरली तरी नव्याने अडकलेले लोक तिथे विक्रीसाठी येऊ शकतात त्यामुळे १६६००ही पातळी बाजाराने राखली नाही तर आपण १६०००ची तयारी ठेऊयात. तयारी असली की अपेक्षाभंग होणार नाही. 

पूर्वी बाजार वर का जातोय? असा प्रश्न पडून गुंतवणूकदाराला वाटत होते की, इतके वाईट असून बाजार वर का जातोय? आता त्याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. इतके सगळे छान आहे तरी बाजार खाली का येतोय? जीडीपी ग्रोथ, जीएसटी कलेक्शन सर्वच चांगले आहे. मग बाजार खाली का? आज ना उद्या वाढेलच; चला मी टेकू देतोच बाजाराला. पण लक्षात घ्या ‘मार्केट’ असेच असते, तिथे तुमचे आमचे काही चालत नसते. ते स्वतःच्या मनाने चालते. आपण फक्त त्याचा पाठपुरावा करू शकतो. अंदाज बांधून आपली धोरणे आखू शकतो. परंतु आपण त्याला आकार किंवा भविष्य देऊ शकत नाही. बाजार आपल्याच मनाने तेजी-मंदीच्या आवर्तनात सापडणार आहे. कारण शेवटी आलेख हा सुद्धा आपल्या मनाचा आरसाच आहे. तेव्हा आपण स्वतःची फार दमछाक न करता, पॅनिक न करता बाजारात चांगली गुणवत्ता असलेले शेअर निवडण्याचा प्रयत्न करू. या दरम्यान बाजार जर शॉर्ट कव्हरिंगने वर आलाच आणि परदेशी संस्थांनी विक्री थांबवून खरेदी सुरू केली तर आपल्याला मागे वळून पाहणे नाही. फक्त निवडलेल्या शेअर मध्ये वाढ कशी करायची हेच बघायचे आहे. 

तेव्हा या थोड्याशा कठीण कालखंडासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या