मृगजळ की... हिरवळ!

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 3 जानेवारी 2022

अर्थविशेष

शेअर बाजाराची पुढची चाल, डिसेंबर २१च्या तिमाही निकालानंतर दृढ होईल. निकाल चांगले असल्यास आजचे मूल्यांकन व विशेषतः २२-२३ व २३-२४चे मूल्यांकन वाजवी व आकर्षक वाटेल. तेव्हा बाजाराला खरी चाल तिमाही निकालानंतरच मिळेल, असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही.

एखादे तहानलेले हरिण जसे पाण्यासाठी मृगजळाच्या आशेवर धावत राहते, तसे तेजीवाल्यांचे झाले आहे. मागचा संपूर्ण आठवडा निफ्टी तळ्यात मळ्यात करत फक्त १८ अंशाने पुढे सरकली. डिसेंबरच्या २० तारखेला आपण अपेक्षित केलेली १६,६०० (प्रत्यक्ष बंद १६,६१४) ही पातळी आली. तेथे आसरा घेऊन रोजच कलेकलेने शेअर बाजार वाढत गेला. शेवटी तो भ्रमाचा भोपळा २४ तारखेला फुटणार होता, पण निफ्टीने लाज राखत १७ हजार अंशाच्या वरचा बंद दिला. आता परदेशी संस्थांची विक्री संपली का? की बाजाराने थोडे बाळसे धरल्यावर पुन्हा विक्रीचा मारा होणार? चला या प्रश्नांची उकल करायचा प्रयत्न करू. 

दर वर्षअखेरीला देशी-परदेशी संस्था खरेदीला येतात. कारण वर्षअखेरचे मालमत्ता मूल्य प्रत्येकच फंडासाठी महत्त्वाचे असते. कदाचित ही खरेदी निफ्टीला १७,३००पर्यंत घेऊन जाईल. परदेशी संस्थांची विक्री अद्यापही थांबलेली नाही. परंतु बँक निफ्टी, फार्मा सेक्टर, मेटल सेक्टर त्यांच्या आधार पातळीवर आहेत. (या पातळीवर परदेशी संस्था नवी विक्री करणार नाहीत) तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्र पूर्ण तेजीत आहे, तर ‘रिलायन्स’ तेजीची चाहूल दाखवीत आहे. ‘इंडिया विक्स’नेही आपली पायरी ओळखून १७च्या आसपासचा बंद दिला आहे. म्हणजेच मोठी मंदी होण्याची शक्यता दिसत नाही. तसेच ओमायक्रॉनची किती भीती बाळगायची, याचाही निर्णय घेतला पाहिजे. फ्रान्समध्ये कालच (ता. २७ डिसेंबर २०२१) एक लाख नवे रुग्ण सापडल्याची बातमी आहे. तीच स्थिती ग्रेट ब्रिटनची. तरीही तिथले बाजार सर्वोच्च पातळीच्या जेमतेम सव्वा टक्का खाली आहेत. (CACची सर्वोच्च पातळी ७१८३, शुक्रवार, २४ डिसेंबर २०२१चा बंद ७०८६). तिथले बाजार ओमायक्रॉनला किती किंमत देत आहेत याचा त्यावरून अंदाज येतो. भारतात तर रुग्णसंख्या तीन आकडी आहे. दक्षिण आफ्रिकेने ओमायक्रॉन निर्बंध सैल केले आहेत. शेअर बाजार कोविडच्या या नव्या अवताराला फारशी किंमत देत नाही असे दिसते. कोविडची भीती कमी झाली आहे हे दर्शवणारा अजून एक मुद्दा म्हणजे ‘पीव्हीआर’, ‘इंडिगो’, ‘व्हीआयपी’, ‘इंडियन हॉटेल’ इत्यादी ‘ओपन अप ट्रेड्स’वर आधारित, शेअर्स तेजीत येत आहेत. (आपल्या बाजाराला आपल्यापेक्षा जास्त कळते हेही लक्षात घेतले पाहिजे. Mr. Market is always right and knows better.) आपला शेअर बाजारही सर्वोच्च पातळीवरून १० टक्के खाली आलाच आहे. थोडक्यात काय, झाले तेवढे करेक्शन पुरे झाले अशी बाजाराची धारणा असू शकते.

शेअर बाजाराला खरी भीती वाटते ती व्याजदरांची. व्याजदर वाढते राहिल्यास काही भांडवल तिकडे वळू शकते. आजही विकसित देशातील सेंट्रल बँकांचे व्याजदर - १० ते ०.२५ टक्के या दरम्यान घोटाळत आहेत. त्यामुळे २०२२मध्ये व्याजदर वाढण्याचा संकेत फेडने दिला आहे, ते प्रत्यक्ष घडेपर्यंत  कमी-अधिक प्रमाणात शेअर बाजार कन्सॉलिडेट होऊ शकेल. मोठी मंदी दिसत नाही. यापुढची चाल, डिसेंबर २१च्या तिमाही निकालानंतर दृढ होईल. निकाल चांगले असल्यास आजचे मूल्यांकन व विशेषतः २२-२३ व २३-२४चे मूल्यांकन वाजवी व आकर्षक वाटेल. तेव्हा बाजाराला खरी चाल तिमाही निकालानंतरच मिळेल, असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही.

नुकतेच सरकारने आयात धोरणात काही बदल करीत, चीनमधून आयात होणाऱ्या काही रसायनांवर (उदा. सोडियम हायड्रोसल्फाईट, हायड्रोफ्लुरोकार्बन्स वगैरे) दंडात्मक आयात कर लादला. (Anti-dumping Duty) योगायोगाने हे क्षेत्र मागील लेखात पुनर्सूचीत केले होते. अपेक्षेप्रमाणे आपले गेल्या दोन वर्षांतले लाडके, नवीन ‘फ्लोरिन’ व ‘एसआरएफ’ वाढले. येथेही दोन्ही कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढवली आहे. भाव अत्यंत महाग असले, तरी हे क्षेत्र गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत असणार हे नक्की. तीच गत माहित तंत्रज्ञान क्षेत्राची. या क्षेत्रातील ‘अध्वर्यू इन्फोसिस’, ‘विप्रो’, ‘एचसीएल टेक’, ‘टेक महिंद्रा’, ‘पर्सिस्टंट’, ‘केपीआयटी’, ‘कोफोर्ज’ आपल्या रडारवर हवेच. त्याचबरोबर ‘बजाज फायनान्स’तर्फे येऊ घातलेले अॅप कितपत यशस्वी होईल या संभ्रमामुळे तो शेअरही इतर बँकिंग व फायनान्स क्षेत्राबरोबर खाली आला आहे. ६५००च्या दरम्यान तो नक्कीच आपल्या भांडारात टाकला पाहिजे.  

नुकतेच ‘झी टीव्ही’चे ‘सोनी’ने आग्रहण केले. त्यासाठी झी-प्रवर्तकांना ११०० कोटी मिळणार आहेत. ‘सोनी’कडे ५० टक्क्यांहून अधिक भांडवल असणार आहे. तसेच संचालक मंडळावरही ‘सोनी’चे वर्चस्व असेल. (यामुळे ‘झी टीव्ही’ शेअरला प्रवर्तकांच्या नावाने लागलेले गालबोट थोडेसे दूर होईल.) यापुढे व्यवसायातील वाढ हेच मुख्य लक्ष्य असेल. नवे भांडवल उभारून आयपीएल व इतर आयसीसी खेळाच्या प्रक्षेपणाचे हक्क विकत घेण्याची योजना आहे. दृक्श्राव्य माध्यमांचे मूल्यांकन टीआरपी व्यतिरिक्त कन्टेंट क्षमतेवरही होते. ‘झी’कडे आधीच अनेक भाषातील भरपूर कन्टेंट आहे. तसेच यापुढे ओटीटी प्लॅटफॉर्ममध्येही गुंतवणूक करणार आहेत. हे सर्व पाहता या शेअरला जुने वैभव प्राप्त होऊ शकते. दोन ते तीन वर्षांसाठी ही गुंतवणूक चांगली ठरू शकते. अर्थात ‘झी’च्या प्रवर्तकांना आपला भांडवल हिस्सा २० टक्क्यांपर्यंत नेण्याची मुभा आहे. हे जरी त्रासदायक असले तरी, आजच्या बाजारभावात (३३० ते ३५० ₹   ) ११०० कोटी रुपयांत, जुन्या प्रवर्तकांना जेमतेम ३ ते ४ टक्के भांडवल जमा करता येईल. या समूहाकडे असलेली रोकड टंचाई पाहता, ही जोखीम फारशी मोठी नाही.

महागाईचे दर आटोक्यात आणणे हे सरकारचे व पर्यायाने रिझर्वे बँकेचे मुख्य काम आहे. रिझर्व बँकेने निर्देशित केलेल्या ५.२  ते ५.८ टक्क्यांच्या पट्ट्यात जर महागाईचा दर ठेवायचा असेल तर डाळी व तेलबियांच्या किमती कमी व्हायला हव्यात. एकीकडे किमती जास्तीतजास्त मिळाव्यात ही शेतकी उत्पादकांची मागणी, तर त्या कमीत कमी असाव्या ही ग्राहकांची. पंजाब-हरयाना पट्ट्यात तर गहू व  तांदुळाचे पीक काढणे व सरकारी दरात सरकारी गोदामात भरणे, हे वर्षानुवर्षे चालू आहे. त्याचा परिणामस्वरूप कोट्यवधी टन गहू सरकारी गोदामात पडून आहे. महागाई दर आटोक्यात आणण्याच्या  कामाला आता सेबीला वेठीस धरले आहे. सोयाच्या भावात मध्यंतरी मोठे चढ उतार झाले, त्यावर व महागाई दरावर उतारा म्हणून एक जालीम उपाय करीत सेबीने सोया, सोया पेंड, मोहरी, मूग इत्यादी धान्यावर वायदे (फ्युचर) व्यवहाराला बंदी केली आहे. सर्वच धान्याच्या भाव वाढीमध्ये फ्युचर व्यवहाराचा हिस्सा असला तरी या आदेशामुळे एखाद्या गरजू शेतकऱ्यावर अन्याय होऊ शकतो.  

महागाई वाढणे क्रमप्राप्त आहे व पुरवठा कमी आणि जर मागणी वाढली तर महागाई होणारच. थोडा वाढलेला महागाईचा दर हा कंपनी कामकाजात प्रगतीच आणतो. किंबहुना आपल्याला इक्विटी फंडात मिळणारा उतारा हा सकल राष्टीय उत्पन्न अधिक महागाईचा दर असा असतो, हे लक्षात घेतले तर त्याचे फारसे वाईट वाटणार नाही. 

पुढे येऊ घातलेल्या बाजाराच्या वाटचालीकडे सकारात्मक नजरेने गुंतवणूकदारांनी बघावे हीच इच्छा.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या