गन्स ऑफ नॅव्हेरॉन...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 10 जानेवारी 2022

अर्थविशेष

भारताची आर्थिक स्थिती निर्देशित करणारी आकडेवारी आकर्षक आहे. नव्या करदात्यांमध्ये झालेली भरघोस वाढ, जीएसटीचे भरभरून संकलन, सुधारते कंपनी कामकाज, तसेच जगात सर्वोच्च जीडीपी वृद्धी या सर्व बाबींमुळे आपल्या बाजाराकडे  दुर्लक्ष करता येणार नाही.

साठीच्या दशकात ‘गन्स ऑफ नॅव्हेरॉन’ नावाचा चित्रपट आला होता. ग्रेगरी पेकचा हा हॉलिवूडपट त्यावेळी हिट झाला होता. एका ग्रीक बेटावरच्या या जर्मन  तोफा आग ओकीत असत. अतिशय शिताफीने तेथे जाऊन दोस्त राष्ट्राचे कमांडो त्या काबीज करतात आणि आपल्या दोन हजार सैनिकांना सोडवतात, अशी काहीशी कथा होती. तद्वतच आग ओकणारी परदेशी संस्थांची विक्री आपल्या शूर सामान्य गुंतवणूकदारांनी थोपविली व १७६००चे बेट गेल्या सोमवारी (ता. ३ जानेवारी) सर केले. गेले अडीच महिने परदेशी संस्थांच्या विक्रीमुळे दहा टक्के खाली आलेला बाजार झपकन वर गेला. तेजी आहे की मंदी ही द्विधावस्थाच बाजाराने संपवून टाकली. 

दुसरे रूपक वापरायचे तर नवीन वर्षाचे स्वागत करताना ढोल, ताशे कमी पडले म्हणून स्थानिक व परदेशी गुंतवणूकदारांनी दोन तोफांची सलामी दिली. सेन्सेक्स ९२९ तर निफ्टी २७१ अंशांनी वर झेपावली. १७६२५ पातळीवरचा निफ्टीचा बंद तेजीवाल्यांना सुखावून गेला. येथेच निफ्टीचा श्वास संपणार की नव्या तेजीला सुरुवात होणार ते या आठवड्यात कळेलच. कदाचित १७६००च्या आतबाहेर घोटाळत शेअर बाजार काही वेळ काढेल. पण आजचा शेअर बाजाराचा विस्तार (ब्रेड्थ ) पाहिल्यास थोडा दम घेत तेजी होत राहील असे दिसते. आपला किंवा जगातला कुठलाच बाजार सध्यातरी ओमायक्रॉनचा फार बागुलबुवा करणार नाही, असे आपण मागल्या लेखात म्हटले होते, ते गुंतवणूकदारांनी ऐकलेले दिसते. बजेटबद्दलच्या अपेक्षा आता वाढत जातील आणि बजेटमध्ये त्या पुऱ्या न झाल्यास अपेक्षाभंगाचे दुःख होऊ शकते! थोडक्यात काय १ फेब्रुवारीच्या आधी एक विक्रीची संधी बाजार देईल,  हे नक्की. (२० डिसेंबरला १६६१४ या पातळीवर खरेदीची संधी दिली होती.)  अशा  प्रत्येक संधीचा वापर केल्यास ट्रेडिंग झोनमधे असलेला बाजार सुसह्य होईल व दोन पैसे देऊन जाईल.

गेले वर्ष तर साऱ्यांनाच सुखावून गेले. सेन्सेक्सने आपल्या झोळीत २२ टक्के तर निफ्टीने २४ टक्के दान टाकले. मिड व स्मॉल कॅप यांनीदेखील आपापला परतावा देताना कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. आपली भूक कधीही न शमणारी असल्यामुळे, ‘ये दिल मांगे मोअर’ ही अवस्था नेहमीचीच! गेली दोन वर्षे कोविड असूनही आपले भांडार भरलेले आहे. मात्र आता वाटेत पाय मुरगळण्याची शक्यता कमी करायची असेल तर अत्यंत लक्षपूर्वक खरेदी केली पाहिजे.

आपले पहिले प्रमेय असे होते की वर्षअखेर जवळ आल्यामुळे परदेशी संस्था विक्री करीत आहेत. ₹    ३४५-३५०च्या दरम्यान आयसीआयसीआय तर ₹    ९००ला एचडीएफसी बँक व तितक्याच स्वस्तात अॅक्सिस बँक आदी शेअर त्यांनी जमा केल्यामुळे, योग्य वेळी  विक्री करून नफा खिशात टाकला. बँका व फायनान्स कंपन्यांचे शेअर पडले ते ह्यामुळे. बाजार १५ ऑक्टोबरपासून नरम आहे तोही याच कारणामुळे. आपण वारंवार निदर्शनात आणले  होते की निफ्टीने नवीन उच्चांक केला पण बँक निफ्टीने केला नाही. दुसरे म्हणजे त्यांनी फक्त भारतातच शेअर विकले असे नाही, तर सर्वच इमर्जिंग बाजारात विकले. २०२२ची मोर्चेबांधणी करताना परदेशी संस्था परतल्या तर त्या हेच शेअर पुन्हा विकत घेतील. तुम्हाआम्हाला वाटते तसे विकलेल्या किमतीच्या वर खरेदी करताना त्यांना फारसे वाईट वाटत नाही. 

दुसरे प्रमेय असे की ओमायक्रॉनचा जोर वाढल्यास व रोखेबाजार आकर्षक झाल्यास, गुंतवणूक अमेरिकन ट्रेझरीकडे वळेल. पण डिसेंबर तिमाहीचे अमेरिकन व युरोपियन कंपन्यांचे निकाल खूप चांगले येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नव्याने शेअर विक्री होणार नाही. त्यात भारताची आर्थिक स्थिती निर्देशित करणारी आकडेवारी आकर्षक आहे. नव्या करदात्यांमध्ये झालेली भरघोस वाढ, जीएसटीचे भरभरून संकलन, सुधारते कंपनी कामकाज, तसेच जगात सर्वोच्च जीडीपी वृद्धी या सर्व बाबींमुळे आपल्या बाजाराकडे  दुर्लक्ष करता येणार नाही. त्यात पुढील वर्षाचा निफ्टीचा अपेक्षित इपीएस ८७३ रुपये आहे. (हे अंदाज नवनव्या सतत निकालांमुळे बदलत असतात) १८०००च्या पातळीला पी/ई  गुणोत्तर २०च्या दरम्यान दिसते.

मग सावध राहायचे म्हणजे कसे? खास रसायने क्षेत्रात काही नफा खिशात टाकला पाहिजे. नवीन ‘फ्लोरिन’ नुकताच ₹    ३४०० पर्यंत खाली घसरला होता. जुनी गुंतवणूक तशीच ठेऊन तिथे नवीन खरेदी केली असल्यास ती २० टक्के नफ्यात (₹    ४००० ते ४२०० या दरम्यान) विकता येईल. पुन्हा घसरण झाल्यास पुन्हा नवी खरेदी करता येईल. तसेच ‘अपोलो हॉस्पिटल’ ₹    ५८०० पर्यंत वाढला होता. उन्माद ओसरल्यावर तो ₹    ४७०० ते ४८०० च्या दरम्यान खाली आला. तिथे खरेदी झाली असेल तर पुन्हा ₹    ५४०० ते ५६०० या दरम्यान विक्री करता येईल. एकूण ‘डीपी’तले चांगली गुणवत्ता व मार्केटचे पाठबळ असलेले शेअर ट्रेडिंगसाठी वापरता येतील. या चालीत कदाचित काही शेअर हातातून निसटतील, त्याला इलाज नाही. निसटलेले शेअर, नव्या काही मूलभूत माहितीमुळे वरच जात असतील, तर भावाकडे न बघता ही नवी खरेदी आहे असे समजून कमी भांडवलात व्यवहार करता येईल. असो. 

नव्या वर्षांच्या मुहूर्ताला `अॅपल’चा शेअर नव्या उच्चांकाला पोहोचला (१८२ डॉलरच्या वर). बघता बघता ‘अॅपल’चे बाजार भांडवल मूल्य तीन  लाख कोटी डॉलर झाले. ते संपूर्ण भारताच्या बाजार भांडवलाएव्हढे आहे. या शेअरची कामगिरी सतत नेत्रदीपकच होत राहील असे जागतिक गुंतवणूकदारांना वाटते. गेल्या वर्षी विक्री ३३ टक्के वाढली. आताही ‘फाईव्ह जी अपग्रेड’मुळे यशाची कमान वाढतीच राहील असेच बाजारालाही  वाटते. विशेष म्हणजे जेमतेम सोळा महिन्यांतच बाजार मूल्यांकन दोन  लाख कोटी डॉलर वरून तीन लाख कोटी डॉलर झाले. ऑगस्ट २०२०मध्ये या शेअरचे विभाजन एकास चार या प्रमाणात झाले होते. वाढती विक्री व वाढता नफा (प्राइस अर्निंग ग्रोथ ) या निकषाला  गुंतवणूकदार कशी  किंमत देतात हे जरी यातून आपल्या लक्षात आले तरी पुरे. 

‘अॅपल’चे १०० कोटी ग्राहक आहेत व ते कंपनीच्या निरनिराळ्या सेवांचा वापर करीत असतात. दहा हजार कोटी डॉलरची रोख रक्कम मागील वर्षी ‘अॅपल’च्या खात्यात जमा झाली, तिचे  पुढे गुंतवणूकदारांना पूर्ण वाटप झाले. वचनबद्ध व भागधारकांच्या हिताचे रक्षण करणारे  व्यवस्थापन, शेअर मूल्यांकन कोठे घेऊन जाते हे यावरून कळते. अर्थात अॅपल टीव्ही, कार आणि अॅपल संगीत याचे वेड नव्या पिढीला आहेच. विशेष नोंद करायची म्हणजे तीन लाख कोटी डॉलरच्या मूल्यांकनाला ‘अॅपल’चे फॉरवर्ड पी ई गुणोत्तर जेमतेम तीस आहे. 

या बाजारातही खाली असलेल्या काही समभागांकडे आपले लक्ष वेधतो. मारुती व ‘टाटा मोटर’ यांची खरेदी पूर्वीच सुचवली आहे. तसेच ‘आयशर मोटर’कडे बघता येईल. खास रसायने क्षेत्रात रबर केमिकल्स उत्पादन करणारा ‘नोसिल’ अजूनही इतरांच्या मनाने स्वस्त आहे. तसेच ओमायक्रॉनच्या महासाथीमुळे टेस्टिंग लॅब डोके वर काढत आहेत. त्यात ‘लाल पॅथ’ व ‘मेट्रोपोलिस’ याकडे लक्ष देता येईल. 

तात्पर्य असे की तेजी संपली नाही. येथूनही बाजार दहा टक्के वर जाऊ शकतो. अधेमधे स्पीडब्रेकर्स येऊ शकतात एव्हढेच. नव्या वर्षांच्या गुंतवणुकीसाठी सर्व निवेशकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या