राजधानी एक्स्प्रेस सुटली रेऽऽऽ

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 17 जानेवारी 2022

अर्थविशेष

वाचकहो, गेले दोन आठवडे आपण तेजी आली, आली अशा गप्पा मारतोय. पाहता पाहता ती वाऱ्याच्या वेगाने  पुढे चालली की! जणू काही राजधानी एक्स्प्रेस सुसाट निघावी तशी! मुंबई नंतर बोरिवलीला नाही पकडता आली तर थेट सुरतच गाठावे लागेल.  हे आपले नेहमीचेच आहे. शेअर बाजार खाली आला तर आणखी खाली येण्याची वाट पाहायची, आणि नंतर बाजार अचानक वर गेला अन  सौदा हातातून सुटला की हळहळत, पुन्हा बाजार खाली यायची वाट बघायची. असो! 

निफ्टीने १८०००चा व सेन्सेक्सने ६००००चा गड पुन्हा सर केला आहे. गेल्या मंगळवारी (ता. ११) आपल्या बाजाराने पराक्रमच केला. ‘डाऊ फ्युचर’ सकाळी ४०० अंशाने खाली होते व एसजीएक्स निफ्टी १०० अंश खाली होती, तरीही आपली निफ्टी डगमगत तोल सांभाळत फारशी खाली गेली नाही. उलट ५२ अंश वरच बंद झाली. आपण अमेरिकेच्या तालावर  डोलतो की ते आपल्या? हा कळीचा मुद्दा आहे. बँक निफ्टीला साथीला घेऊन आपला बाजार वर जाईल, असे आपले प्रमेय. ते खरे ठरले! त्याबरोबर ‘रिलायन्स,’ माहिती तंत्रज्ञान, फार्मा, वाहन उद्योग, बांधकाम क्षेत्र आणि कच्च्या धातूबाजारानेही साथ दिली. थोडे आढेवेढे घेत निफ्टी १८२०० व सेन्सेक्स ६१०००ला स्पर्श करेल असे दिसते. 

तर, आता यापुढील धोरणात खरेदी व विक्री यांचा तराजू समतोल हवा. नवी खरेदी करतांना कुठेतरी विक्री करून नफा खिशात टाकल्यास नवे भांडवल लागणार नाही. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘पेनी स्टॉक्स’चा. वादळात जसा पालापाचोळा वर जातो, तसेच हे पेनी स्टॉक्स देखील प्रत्येक तेजीत वर जातात. त्यात अनेक स्वयंघोषित तज्ज्ञ मल्टी बॅगरच्या नावाखाली पेनी स्टॉक्स सुचवीत असतात. अशा शंभरावर शेअरचा अभ्यास केल्यानंतर दोन तीन खरेखुरे अनेकपट वाढणारे शेअर हाती लागतात. त्या गुंतवणुकीवर आपला विश्वास बसेपर्यंत तो वाढलेला असतो. पुढे किती वाढेल या द्विधा मन:स्थितीत हातातली संधी निसटून जाते. अभ्यास करण्याचा कंटाळा असल्यास, त्या ऐवजी चोख व खानदानी शेअरची निवड करणे सोयीचे. 

खरंतर फार जुन्या आठवणी काढायला मला आवडत नाही. पण तरीही पुनरावृत्तीचा दोष पत्करून मागील लेखातील काही भाग उद्धृत करतो. 

२६ जुलैच्या लेखात पारंपारिक वाहनांना सुटे भाग पुरविणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष द्या, असे सुचवले होते. ‘मिंडा कॉर्प’ त्यावेळी ₹    १३०-१३२ होता तर ‘मिंडा इंडस्ट्रीज’ ₹    ७३० ते ७५० या दरम्यान घुटमळत होता. आज ‘मिंडा कॉर्प’ ₹    २०० तर ‘मिंडा इंडस्ट्रीज’ ₹    १२०० ला जाऊन पोहोचला आहे. ‘‘लार्सन इन्फोटेक’ आणि ‘एलटीटीएस’ ह्या जुळ्या भावंडांनी तसेच ‘मास्टेक’, ‘टीसीएस’, ‘इन्फोसिस’ आदींनी कामगिरी तर उत्कृष्ट दाखवलीच पण त्यानंतरचे त्यांचे पुढील काळाची चाहूल देणारे भाष्य अत्यंत आशादायक होते,’’ असे वाक्य १९ जुलैच्या लेखात होते त्यावेळी ‘लार्सन’ जुळे अनुक्रमे ₹    २९९० आणि ₹    ४००० रुपयांना तर ‘इन्फोसिस’ ₹    १५५०, ‘टीसीएस’ ₹    ३१९० भाव दाखवत होता. आजचे भाव बघितले तर डोईची टोपी खाली पडते. अनुक्रमे ₹    ५६००, ₹    ७२००, ₹    १८८० व ₹    ३८८५ असे भाव आहेत. त्या त्या वेळी हे सर्वच शेअर महाग वाटत होते. पण भविष्यकाळ उज्वल असल्यामुळे पुढे वाढत गेले. इतर आठवणी पुढील खेपेस. 

तात्पर्य इतकेच की, आपल्याला आवडलेल्या व तेजीत असलेल्या किमान दहा शेअरची यादी करावी, अधून मधून ते खाली येऊन आपल्याला संधी देतातच, त्यावेळी जरूर खरेदी करावी. जोडीला स्टॉप लॉसचा विमा  आहेच. 

चीनचे नियामक व ‘अलीबाबा’चे प्रवर्तक यांच्यात अजूनही समेट झालेला दिसत नाही. नवनवे निमित्त काढून ‘अलीबाबा’ व ‘टेनसेंट’ कडून दंड वसूल करणे चालूच आहे. ‘टेनसेंट’सह ‘अलीबाबा’, ‘मितुआन’, ‘बिलीबिली’ आदींचे भाव गेल्या वर्षात ४० ते ६० टक्के गडगडले आहेत. चीन सरकारने मक्तेदारीच्या विरुद्ध आपली मूठ आवळली आहे. तसेच विदा सुरक्षेला अतिप्राधान्य द्यायचे ठरवले आहे. यातून आपण घ्यायचा धडा असा की नियामक व त्यांचे अनुपालन ज्या उद्योगांसाठी जाचक आहे, तेथे आपले गुंतवणूक धोरण आखू नये. आपल्याकडे ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’चेही असेच झाले होते. काही वर्षापूर्वी अचानक सरकारला आठवले की त्यांची विक्री संरक्षण खात्याला आहे, त्यामुळे कंपनीच्या नफ्यावर काही बंधने घातली होती. शेअरही ६० टक्के खाली आला होता. त्यानंतर व्यवस्थापनाने विक्री धोरण बदलून नफा वाढवला. आता तर ‘आत्मनिर्भर’ योजनेखाली मोठ्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत. एक अपवाद म्हणून रडारवर हा शेअर हवाच.  मात्र ‘कोल इंडिया’, ‘एनटीपीसी’ यात ‘दुरून डोंगर साजरे’ हेच धोरण असावे, खरेदी करायचीच असेल (लाभांशाच्या मोहाने) तर अल्पकाळच गुंतून राहावे. 

जसजसे अंदाजपत्रक जवळ येते, तसतसा सरकारचा धीर सुटून निर्गुंतवणुकीचा विषय ऐरणीवर येतो. २०-२१च्या अंदाजपत्रकामध्ये दोन लाख दहा हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. (त्यापैकी जेमतेम पस्तीस हजार कोटी जमा झाले) यावर्षी ते ध्येय कमी करून एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपये केले आहे. हे जरी आयुर्विम्याच्या जोरावर आखले असले, तरी ते पूर्ण होईलच असे नाही. किंबहुना जितके मोठे टार्गेट तितकीच मोठी तूट असेच गणित आहे. खरंतर बजेट आखतांना हा विषय बाजूला ठेवला पाहिजे, आणि विक्रीत जे  पैसे जमतील तो बोनस समजून, आपत्ती नियंत्रणासाठी वापरला पाहिजे. कारण दोन्ही गोष्टी पराधीन आहेत. असो. आता आयुर्विमा निर्गुंतवणुकीची घाई होईल. त्यात सरकारला त्याआधी २० टक्के परदेशी गुंतवणूक आयुर्विम्यात यावी, असे वाटते. कदाचित हा सारा विषय पुढील वर्षात जाण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीत ‘भारत पेट्रो’, ‘बीईएमएल’ आणि ‘शिपींग कार्पोरेशन’ यांचे प्रलंबित खाजगीकरण व्हायला हवे. तेही रेंगाळले तर कोविडची तिसरी लाट हे कारण आहेच!  

चक्रीय शेअरमधील गुंतवणूक सहसा अल्पकालीन असावी असे जाणकार सांगतात. साखरेच्या भावातील चढउतार व उसाचे पीक यावर थोडा अभ्यास करून साखर कारखान्यात गुंतवणूक करता येते. त्यात आता इथेनॉल मिश्रणाच्या धोरणामुळे वेगळा आयाम आला आहे. सर्वच शेअर थोडे कमी अधिक वाढले असले तरी ‘बलरामपुर चीनी’ आकर्षक आहे. तीच परिस्थिती वस्त्रोद्योग क्षेत्राची. या उद्योगातील ‘केपीआर मिल्स’, ‘हीमतसिंगका’, ‘वेलस्पन’ वगैरे शेअर मागेच (डिसेंबर २०)  सुचवले होते. अमेरिकेने चीनकडील आयात कमी करण्याचे ठरवल्यामुळे भारतीय निर्यात ३४ टक्के वाढली आहे. त्यात सरकारनेही प्रोत्साहन द्यायचे ठरवल्याने, तेजी अजून काही काळ कायम राहील असे वाटते. एक दिवसीय सामन्यात चिकी सिंगल काढावी तशी  येथे अल्पकालीन संधी आहे.

तुम्हा सर्वांना खरेदी विक्री धोरणात समतोल राखता यावा ही सदिच्छा!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या