जरा भरवसा ठेवा...

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक 
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

अर्थविशेष

परदेशी संस्थांची मुख्य चिंता अमेरिकेतली वाढती व टिकलेली महागाई ही आहे. चाळीस वर्षात प्रथमच तिचा चिकटपणा व पटकन आटोक्यात न येणे दिसतेय. त्यामुळेच तेथील नियामकांचे हातपाय मारणे सुरू आहे. व्याजदर वाढणार हे जरी नक्की असले, तरी ते केव्हा? किती प्रमाणात? व वर्षात कितीदा? हे मुख्य उत्कंठा वाढवणारे विषय. 

अर्थसंकल्पाचे बाजाराने पायघड्या घालून स्वागत केले खरे, पण अर्थमंत्र्यांची  पाठ फिरताच त्या घाईघाईने काढूनही घेतल्या. ऋण काढून सण साजरा करणारी ही दोन दिवसांची दिवाळी कशी रुचणार? परदेशी संस्थांना इथला बाजार महाग वाटतो कारण चीनचे बाजार कोसळले आहेत. अमेरिकेतही रोजच एकेक बुरूज ढासळतोय! आज काय ‘फेसबुक’ २५ टक्के घसरला, तर परवा ‘ट्विटर’ खाली आला. ‘फोर्ड’, ‘पेपाल’ एकामागे एक घसरण चालूच आहे. मात्र डाऊ जोन्स व नॅसडॅक त्यांच्या आधारपातळीच्या फार खाली जात नाहीत, पुन्हा पुन्हा वर खेचले जातात. तरी दोन्ही निर्देशांक दोनशे दिवसांच्या चल सरासरीच्या आत बाहेर आहेत. मंगळवारी  सकाळी ‘अॅमेझॉन’ व ‘अमेक्स’ने बळ दिल्यामुळे  डाऊ जोन्स ३५,०२०च्या (२०० दिवसांची चल सरासरी) थोडासा वर आहे, पण त्याखाली जाऊन आलाय व पुन्हा जाऊ शकतो. तर नॅसडॅक १४७३० (ह्या निर्देशांकाची २०० दिवसांची चल सरासरी) या पातळी  खालीच येरझाऱ्या घालतोय.  राजा बोले, प्रजा डोले या उक्तीप्रमाणे आपले निर्देशांकही हेलकावे खात आहेत. आपली निफ्टी मात्र १६६४५ या २०० डीएमएच्या बरीच वर असली, तरी आलेख काही फार आश्वासक नाहीत. कधीही १६६४५ पर्यंत जाऊ शकतो. ती तयारी ठेवली पाहिजे. सेन्सेक्ससुद्धा याला फारसा अपवाद नाही, २०० दिवसांची चल सरासरी ५६०५०, तर मंगळवार सात तारखेचा बंद ५७८०८ आहे.  या दोन्ही आधारपातळ्या तोडून बाजार खाली जायला मंदिवाल्यांना बरेच परिश्रम करावे लागतील. निष्कर्ष हाच की शेअर बाजार फार खाली जाणार नाही, तसेच  मोठी तेजी होईल असेही दिसत नाही. प्राणिसंग्रहालयात वाघाच्या पिंजऱ्याशेजारी शेळीला बांधले आणि तिला भरपूर खाऊपिऊ घातले तरी तिचे वजन वाढत नाही. तद्वतच परदेशी संस्थांच्या विक्रीची टांगती तलवार दूर झाल्याशिवाय आपले निर्देशांक बाळसे धरणार नाहीत. 

परदेशी संस्थांची मुख्य चिंता अमेरिकेतली वाढती व टिकलेली महागाई ही आहे. चाळीस वर्षात प्रथमच तिचा चिकटपणा व पटकन आटोक्यात न येणे दिसतेय. त्यामुळेच तेथील नियामकांचे हातपाय मारणे सुरू आहे. व्याजदर वाढणार, हे जरी नक्की असले, तरी ते केव्हा? किती प्रमाणात? व वर्षात कितीदा? हे मुख्य उत्कंठा वाढवणारे विषय. अमेरिकेतल्या ‘रसेल २०००’ निर्देशांकातील अर्ध्याहून अधिक कंपन्या नफा मिळवत नाहीत. गेले दशक तेजीत गेलेल्या या बाजाराला जमिनीवर यावे लागतेय ते यामुळे!  जर व्याजदर वाढत गेले ( हा लेख छपाईला जाता जाता तिथले यील्ड्स दोन टक्क्याला टेकले आहेत) तर मोहरा जोखिमीतून सुरक्षिततेकडे वळेल. ह्या काही कारणांमुळे या संस्था  भारतातलेच नव्हे तर सर्वच विकसनशील देशातील भांडवल काढून घेत आहेत. भारतातही ‘एनएसई ५००’ निर्देशांकातल्या कंपन्यातले परदेशी भांडवल २० टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आले आहे. आपल्याकडे ‘एचडीएफसी’ द्वयांना सतत विक्रीला त्यामुळेच सामोरे जावे लागते .   

अर्थसंकल्पातील पायाभूत उद्योगाला दिलेल्या चालनेतून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठी रोजगारनिर्मिती होईल हे नक्की. सरकार सतत देशांतर्गत उद्योगाला अनेक मार्गांनी प्रोत्साहन देत आहे. किमान दहा क्षेत्रात आयातकर वाढवून दीडपट  केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, वाहनांचे सुटे भाग, वस्त्रोद्योग, मशिनरी, पैलू न पाडलेले हिरे अशी अनेक नावे घेता येतील. या जोडीला ‘पीएलआयएस’ आहेच. देशातील निर्यातीचा वाटा गेल्या काही वर्षात दुप्पट झाला आहे याचीही नोंद घ्यायला हवी. आपली तरुणाई आणि वाढत्या लोकसंख्येची वाढती मागणी विचारात घेता या वर्षीचा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरेल हे नक्की.  परदेशी संस्थांच्या सततच्या विक्रीने नाउमेद न होता, अर्थमंत्र्यांवर विश्वास टाकून शेअर बाजाराकडे पाहिले पाहिजे. कदाचित अर्थमंत्री हेच सुचवीत असाव्यात.

गुरुवारी संपणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते धोरणाची अनुकूलता कमी करून ते तटस्थतेकडे झुकू शकते. त्यातून पुढील आढाव्यात कदाचित रिव्हर्स रेपोचे दर किंचित वाढू शकतात. ही अनिश्चिती संपली की शेअर बाजार शांत होईल असे वाटते. खनिज तेलाचे वाढते दर देशाला महागाईच्या दारात नेऊन ठेऊ शकतात. या अर्थसंकल्पात उत्पन्नाची बाजू मांडताना एक्साईज करातून येणारे उत्पन्न कमी होणार असे दर्शवले आहे. कदाचित कच्चे तेल आणखी भडकले तर एक्साईज कर कमी करण्याचे हे संकेत असावे.  

अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक बँकांना नव्या भांडवलपुरवठ्याची तरतूद नाही. सार्वजनिक बँका सक्षम झाल्या असाव्या हे मानण्याला जागा आहे. ‘स्टेट बँक’, ‘कॅनरा बँक’, ‘बँक ऑफ बडोदा’ आजही आकर्षक भावात उपलब्ध आहेत. गेली काही वर्ष गुंतवणूकदार या क्षेत्राबद्दल उदासीन होते. आजच्या घडीला आपल्या रडारवर हे क्षेत्र हवेच. बडोदा बँकेचे तिमाही निकाल वेधक आहेत. अनार्जित कर्जे यावर्षी किमान एक  टक्क्यांनी कमी होतील असा अंदाज आहे. पूर्वी केलेल्या बुडीत कर्जांच्या तरतुदीतून काही भांडवल जमा होत आहे व पुढेही असे उत्पन्न होत राहील. ₹   २२०० कोटींचा उच्चांकी नफा नोंदविल्यामुळे शेअरही दोन वर्षातील सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. आता व यापुढे खालच्या भावात मिळाल्यास, हा समभाग संग्रही हवाच. ‘स्टेट बँक’ या क्षेत्रातला अध्वर्यू आहे. तसेच निकाल व शेअर बाजारातील कामगिरी ‘कॅनरा बँके’ची आहे. सरकारी मालकीच्या बँकांबद्दल आकस असल्यास, पूर्ण अभ्यासाअंतीच निर्णय घ्यावा. अर्थात ह्या गुंतवणुकीतून अल्प काळात २० ते २५ टक्के नफा मिळाल्यास तो ताब्यात घेतला पाहिजे.  

तूर्त अत्यंत सावध भूमिका घेत शक्य तिथे नफा वसुली करीत व पुन्हा खालच्या पातळीला चांगले  गुणवत्तापूर्ण शेअर जमा करीत राहणे, हाच यशाचा मार्ग दिसतो.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या