आधी हाताला चटके, तव्हा मियते भाकर!

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

अर्थविशेष

कधीतरी लोभाचा अतिरेक होऊन प्रायमरी मार्केटचा बुडबुडा फुटणारच होता. शेवटी व्हायचे तेच झाले. ह्या प्राथमिक बाजाराच्या  भ्रमनिरासाचे पडसाद मुख्य बाजारातही उमटले. 

गेली दोन वर्षे फारशी तोशीस लागू न देता शेअर बाजार वरच जात राहिला. कोविडमुळे घरी राहणे अनिवार्य झालेल्या अनेक सुशिक्षित नेटस्नेही जनांनी शेअर बाजारात रमणे पसंत केले. डे ट्रेडिंग  असो वा शेअर पूर्ण खरेदी करून विकणे असो, नफा खिशात टाकायला काही फार कष्ट झाले नाहीत. तसेच लॉकडाउनच्या काळात म्युच्युअल फंड सल्लागारदेखील विविध मार्गाने शेअर बाजार खरेदीजन्य आहे हे सुचवीत होते. विशेष म्हणजे लॉकडाउन ही इष्टापत्तीच आहे, असे समजून म्युच्युअल फंड वितरकांनी व सल्लागारांनी जीव तोडून काम केले. अन्यथा बहुतांश फंड व्यवस्थापन कंपन्यांची कार्यालये बंद असताना त्यांच्या मालमत्तेत इतकी भरघोस वाढ दिसली नसती. घरबसल्या नव्या  गुंतवणूकदाराचा केवायसी नोंदवून घेणे शक्य होते व तसे झाले.  या सर्व नवागतांना  भरभरून पैसा तर मिळालाच, त्याबरोबरच  त्यातून शेअर बाजारावर विश्वासही बसला. कोट्यवधी डिमॅट खाती उघडली गेली, उच्चांकी नवी भागविक्री झाली. कुठल्याही आकाशातील भावाला नवा इश्यू आणला तरी त्याला अनेकपट मागणी असायची. प्राथमिक बाजारात येणारी प्रत्येक कंपनी पूर्वीपेक्षा वरचढ भावाला आपला किंमत पट्टा निर्धारित करीत असे. ह्या वाहत्या गंगेत हात धुवायचे राहिले ते निर्गुंतवणुकीसाठी बाजूला काढलेल्या सरकारी कंपन्यांचे! कधीतरी लोभाचा अतिरेक होऊन हा प्रायमरी मार्केटचा बुडबुडा फुटणारच होता.  शेवटी व्हायचे तेच झाले. ह्या प्राथमिक बाजाराच्या  भ्रमनिरासाचे पडसाद मुख्य बाजारातही उमटले. 

‘ही मंदी मंदी म्हणतात ती कशी असते रे भाऊ? ’असे निरागसपणे विचारणाऱ्या सर्व हौशा, नवशा गुंतवणूकदारांना  मंदी काय आहे ह्याची चुणूक नक्कीच मिळाली. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीची कारणे आपण गेल्या लेखात बघितली. नवागतांच्या नाजूक हातांनी ती विक्री स्वीकारली (व पचवली) आहे. हा धीर जर सुटला नाही तर या थोड्या फार विश्रांतीनंतर तेजी परतेल. कारण अजूनही दर महिन्यात सीपतर्फे फंडात येणाऱ्या भांडवलाचा ओघ वाढतोच आहे. पाहता पाहता फंडांची गंगाजळी ३८ लाख कोटीवर गेली आहे.

बहिणाबाई चौधरी त्यांच्या कवितेत म्हणून गेल्या आहेत. 

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,

आधी हाताला चटके, तव्हा मियते भाकर ।

शेअर बाजाराचे असेच आहे. थोडे मंदीचे दुःख सहन केले तरच तेजीचे सुख समोर येणार. मार्च- एप्रिल २०२०ची ४० टक्के घसरण सहन केली तेव्हाच पुढील मोठी तेजी अनुभवता आली. असो.    

पुढील काही दिवस मोजके चांगले शेअर गोळा करण्यात घालवले पाहिजेत. फंडातदेखील टप्प्याटप्प्याने (किमान सहा टप्पे) गुंतवणूक केलेली उत्तम. फार रक्तदाब वाढवायचा नसेल तर एक्झिट लोड नसलेला  बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड चांगला, तेजीची चाहूल लागताच साध्या वैविध्यपूर्ण मल्टी कॅप किंवा फ्लेक्झी कॅप फंडाकडे भांडवल वळवता येईल. थोडे धैर्य गाठीला असेल व  शेअर बाजाराच्या मंदीतून संधी शोधायची असेल तर साधा इक्विटी फंड उत्तम. 

गेल्या गुरुवारी (ता. १० फेब्रुवारी) रिझर्व्ह बँकेने पत धोरण पुढील बैठकीपर्यंत ‘जैसे थे’ ठेवायचे ठरवले. आपण हा अंदाज गेल्या लेखात व्यक्त केला होताच. अमेरिकन नियामकांना जेवढी महागाईची भीती वाटते, तितकी रिझर्व्ह बँकेला वाटत नाही हे नक्की. उलट पतधोरण निर्धारण समितीने पुढील वर्षाचा महागाई दराचा अंदाज खाली आणत ४.५ टक्क्यांवर नेला आहे. रेपो व रिव्हर्स रेपो दर कायम ठेवताना धोरणात अर्थव्यवस्थेला अनुकूल अशी सर्वसमावेशकता व लवचिकता दिसते. शेअर बाजाराने लागलीच नगारे वाजवीत हा निर्णय स्वीकारला. पण दुसऱ्याच दिवशी अमेरिकन बॉण्ड यिल्ड दोन टक्क्यांजवळ गेले हे निमित्त व किमान अर्धा टक्क्याने तेथील व्याजदर वाढतील या भीतीने जगभरचे बाजार कोसळले. आपलाही शेअर बाजार त्याला अपवाद नव्हता. त्यात भर पडली रशिया-युक्रेन सीमातणावाची. रशियाने युक्रेनवर हल्ला करू नये यासाठी अमेरिका व पाश्चात्त्य राष्ट्रे बराच दबाव आणीत आहेत. पण पुतीन काय करतील याचा नेम नाही. सात वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला करून क्रीमिया द्वीपकल्प ताब्यात घेतले, परिणामत: त्यावेळी रशियन मायसेक्स निर्देशांक ११ टक्के पडला होता. यावेळी तसेच होईल असे भाकीत करीत अमेरिकन निर्देशांक शुक्रवारी ११ तारखेला कोसळले. खनिज तेल ही १०० डॉलरवर जाणार या शक्यतेने घबराट झाली.  

आता इतिहास तपासला तर असे दिसते की क्रीमियावरील हल्ल्याच्यावेळी, फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्च २०१४पर्यंत रशिया -युक्रेन तणाव होता. सेन्सेक्सही त्या दरम्यान ६ टक्के खाली आला होता (२१५०० ते २००००) पण वरील आपत्ती टळल्यावर कोंडी फुटली आणि ३१ मार्च २०१४पर्यंत सेन्सेक्स पुन्हा १० टक्के वाढून २२४०० झाला. थोडक्यात काय, तर हे वादळ शमल्यावर आपला शेअर बाजार शांत होऊ शकतो.   

दुसरे असे की खनिज तेलाची वाढीव किंमत अमेरिका आणि रशिया, दोघांच्याही फायद्याचीच आहे. तेव्हा नुसतीच खडाखडी झाली व तेलबाजाराचे फक्त सेंटीमेंट सुधारले तरी दोघांचेही उखळ पांढरे होईल. दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक करताना या आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे संधी म्हणून पाहिलेले चांगले.  शेअर बाजार दिशाहीन वाटचाल करतोय. चीनमधील  हुआंग हो नदी जसे सतत पात्र बदलते, तसे सतत दिशा बदलणे चालू आहे. शुक्रवारच्या जोरदार घसरणीपाठोपाठ सोमवारच्या (ता. १४) घनघोर विक्रीमुळे सेन्सेक्स १७४७ तर निफ्टी ५३१ अंश पडला. वृत्तपत्रातल्या बातमीप्रमाणे गुंतवणूकदारांचे (मनातल्या मनात) नऊ लाख कोटींचे नुकसान झाले. खरेतर सोमवारी सकाळीच (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे ७.३० वाजता ) युक्रेनने नाटोत सामील होणार नाही व युद्ध टाळण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला जाईल, असे संकेत दिले होते, तरीही बाजारात रक्तपात झालाच. मंगळवारी (ता. १५) मात्र हाच साक्षात्कार नव्याने होऊन बाजाराने घुमजाव केले व निर्देशांक अनुक्रमे १७३६ व ५०९ अंश वाढले. असो.

मंगळवारी जरी तेजी झाली असली व निफ्टीने २०० दिवसांच्या चल सरासरीजवळ आधार घेतला असला तरी अजून संकट पुरते टळले नाही. अमेरिकन व्याजदर जाहीर व्हायचेत. कच्चे तेल थोडे कमी व्हायला हवे आहे. युरोपमधील इंधन तुटवडा संपायला हवा. वारेमाप वाढलेला धातुबाजार थोडा शांत व्हायला हवा. तसेच भारतातील पाच राज्यांच्या निवडणुका समाधानाने संपायला हव्यात. त्यातील किमान तीन ठिकाणी, काठावर का होईना, राज्यकर्ते बहुमतात आले तर शेअर बाजार मंदीच्या चकव्यात सापडणार नाही. गुंतवणूकदाराला इतके सारे ‘वर’ एकत्र मिळतील का? हाच खरा प्रश्न आहे. 

तूर्त आपण आपला जुनाच सिद्धांत पुन्हा मांडू. शेअर बाजारात किमतीचे करेक्शन झाले, आता वेळेचे हवे. काही काळ दिशाहीन असला तरी चालेल पण या अचेतन अवस्थेतून जागा झाल्यावर त्याने वरच्याच दिशेने धावायला हवे. 

सामान्य गुंतवणूकदाराला या पलीकडे काय हवे!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या