हर कदम, एक नयी जंग है!

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

अर्थविशेष

रशियाने कितीही हूल दिली तरी सोमवारी व मंगळवारीदेखील (ता. २१ व २२) निफ्टीने १७ हजारच्या वर बंद दिला. २७ डिसेंबरपासून निफ्टी १७ हजारच्या वरच आहे. पण निर्देशांक टिकून असला, तरी रोजची अस्थिरता थरकाप उडवते. धडधडत्या छातीने रात्री अमेरिकन बाजार पाहावे, आणि रोजच भेडसावणारी एसजीएक्स निफ्टी बघावी, बाजारात विक्री करायच्या धोरणाने शिरावे, तर तो तीन चारशे अंश खालीच उघडलेला दिसतो. जिवावर उदार होऊन भांडारातील बहुमोल रत्ने विकावी, तर दिवसभरात तो वर जाऊन शेवटी जेमतेम शंभर अंशच खाली बंद होतो. सामान्य गुंतवणूकदार गोंधळून जाऊन चुकीचा निर्णय घेऊ शकण्याचे पूर्ण रसायन तयार आहे. निर्देशांक स्थिर वाटला तरी उरलेल्या बाजाराचे पाणी झाल्यामुळे स्वतःचे गुंतवणूक भांडवल कमी झालेले दिसते. ही तत्कालिक मंदी आपल्या मानसिक सामर्थ्याची सतत परीक्षा घेत असते. 

भाऊसाहेब पाटणकरांची कल्पना स्मरून  सांगायचे तर  -

वाटते नागीण ज्याला, खेळण्या साक्षात हवी 

तोच ठेवे पाऊल येथे छाती हवी, मस्ती हवी!

मन चिंती ते वैरी न चिंती, अशी भावनाविवश अवस्था असल्यामुळे, विक्रीचा निर्णय चुकू नये म्हणून खालील क्लृप्त्या वापरता येतील. 

  •     मुळात आपण विकणार आहोत तो शेअर काय गृहीतके विचारात घेऊन घेतला होता ते आठवावे. त्यात काही बदल झालाय का? ह्याचा अभ्यास करावा. शेअरशी कुठलाही संबंध नसलेल्या, बाह्य घटनांमुळे त्यात काही बदल होणार नसेल, तर ही विक्रीची संधी आहे की खरेदीची हे तपासून पुढे जावे.
  •      खरेदी निर्णयच जर चुकला असेल तर विक्रीखेरीज पर्याय नाही. मग ती निधड्या छातीने करावी.
  •     प्रथम बाजाराला शांत होऊ द्यावे. त्याची स्वत:ची त्या दिवशीची दिशा ठरवू द्यावे. मगच कृती करावी.
  •     मी शेअर विकतोय ते भांडवल हवे म्हणून की बाजार खाली येतोय म्हणून, हे प्रथम ठरवावे. पैशाची गरज असेल व ती इतर मालमत्तेतून पूर्ण होत नसेल तर विक्रीखेरीज पर्याय नाही.
  •     बाजार खाली येतोय म्हणून विक्री होत असेल तर पुढील काळात, मंदी सुरू असेपर्यंत जागरूकपणे विकलेले शेअर पुन्हा खरेदी करायची संधी शोधत राहावे.

    फक्त घबराटीमुळे, उद्वेगाने विकत असू तर प्रथम अर्धेच शेअर विकावेत. विक्रीनंतर अपेक्षेप्रमाणे विकलेला शेअर खाली आला का की वर गेला हे तपासून घेत उर्वरित विक्री करावी. आपल्या भांडवलाचा शेअर बाजारातील आभासी तोटा, फंडाच्या तुलनेत अधिक वाटतो ह्याचे प्रमुख कारण फंडातील गुंतवणुकीचे वैविध्य आहे. त्यात गेल्या काही लेखात वारंवार सुचवल्याप्रमाणे, लार्ज किंवा फ्लेक्झी कॅप फंडात गुंतवणूक केलेली असेल, तर ती बाजाराच्याच कमीअधिक प्रमाणात खाली आलेली दिसते. मनाच्या समाधानासाठी अशा वेळी तेजीत दिसलेला आभासी नफाही फंडाच्या तुलनेत अधिक असतो हे ध्यानात घ्यावे. म्हणूनच, सतत जमेल तिथे जमेल तसा थोडाफार नफा खिशात टाकावा म्हणजे आभासी तोटा सहन करण्याचे धैर्य येते. असो.

रशिया-युक्रेन तणाव, त्याला असलेले विविध आर्थिक पदर, ‘एलआयसी’ची प्राथमिक भागविक्री, ‘एनएसई’च्या माजी संचालकांवरील कथित आरोप, त्यात उल्लेखलेला हिमालयातील योगी, या साऱ्या बातम्या बाजाराचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या आहेत. पुढील भविष्याचे कितीही गोजिरवाणे चित्र रंगवले तरी त्यातून आजचे ‘पॅनिक’ कसे थांबणार? 

पुतीन ह्यांनी डोन्टेस्क व लुहान्स्क या प्रांतांना मान्यता देण्याचे ठरवले आहे. दोन्ही ठिकाणी युक्रेन सरकार विरोधी बंडखोर प्रबळ आहेत. साहजिकच, रशिया युक्रेनचे तुकडे करणार ह्या शक्यतेने अमेरिकन बाजार सतत खाली जात आहेत. डाऊ जोन्स, नॅस्डॅक व एस ॲण्ड पी ५००; तीनही निर्देशांक २०० दिवसांच्या चलसरासरीच्या ( सोप्या मराठीत 200 डे मुव्हिंग अॅव्हरेज) खाली आहेत. हे तिथल्या मंदीचे पहिले लक्षण आहे. अशा वेळी युद्धामुळे आलेली अस्थिरता यापूर्वी तीन महिन्यांवर टिकलेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. रशिया अफगाणिस्तान, जॉर्जिया अथवा क्रीमिया तिन्ही वेळी बाजार तीन महिन्यांत सावरले. सोमवारी रशियन शेअर निर्देशांक १७ टक्के खाली गेले होते, ते थोडेफार सुधारले असले तरी चालू वर्षात २० टक्के घसरले आहेत. रुबलचा बाजा वाजला आहे. पुतीन यांच्या आक्रमकतेची मोठी आर्थिक किंमत, रशिया, अमेरिका व सारे जग मोजीत आहे. खरेतर नॉर्ड स्ट्रीम २ वायुवाहिनीतून ज्वलनवायू मिळवणे ही जर्मनीची नितांत प्राथमिक गरज आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या वचनबद्धतेमुळे, जर्मनी, फ्रान्स व इतर युरोपीय राष्ट्रे रशियाकडून वायू घेऊ इच्छितात. या अगतिकतेतून रशियाची आगळीक दुर्लक्षिली जाईल असा पुतीन ह्यांचा होरा सपशेल चुकीचा ठरेल असे दिसते. जर्मनीने वरील वायुवाहिनीचे प्रमाणीकरण रोखले आहे, तर ब्रिटननेही रशियावर निर्बंध लादले आहेत. युरोपीय बाजारपेठ गमावणे चीनलादेखील परवडणारे नाही. चीन व भारतासारखा सखा या विषयात रशियाच्या मागे उभा राहण्याची शक्यता धूसरच. ह्या घडामोडी पाहता, व वारंवार येणाऱ्या बातम्या बघता ‘रोज मरे त्याला कोण रडे’ ही अवस्था लवकरच येईल व बाजार सावरतील. ह्या दरम्यान राज्यांच्या निवडणुकांचे निकालही लागतील. तीन महत्त्वाच्या राज्यांत भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास बाजाराला पुढची चाल मिळेल. पुन्हापुन्हा निफ्टी १६,८०० ह्या आधारपातळीची लक्ष्मणरेषा पाळत आहे. तेव्हा महिनाभरात संयमाचे चांगले फळ मिळू शकेल असे वाटते.

‘एलआयसी’ची प्राथमिक भागविक्री मार्चमध्ये होणार आहे. शेअर बाजाराचे सेंटीमेंट कितीही उदासीन असले तरी हा आयपीओ येणारच असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. किंमतपट्टा निर्धारण भागविक्रीच्या थोडेसेच आधी होत असल्यामुळे, कदाचित तेथे थोडी तडजोड केली जाऊ शकते. सूचीबद्ध झाल्यानंतर आयुर्विमा व्यवस्थापन अधिक पारदर्शी होईल. इथे अर्ज करताना लक्षात घेण्याच्या बाबी खालीलप्रमाणे

    एलआयसी ही देशातील सर्वात मोठी व जगातील पाचव्या क्रमांकाची विमा कंपनी आहे. आपल्या १४ लाखांहून अधिक एजंटमार्फत तळागाळात विमा योजना पोहोचवणारी ही संस्था मध्यमवर्गाच्या पूर्ण पसंतीस उतरली आहे. 

    विमा व्यवसायाचा ६६ टक्के वाटा तर आहेच, देशभर पसरलेले २९ कोटी पॉलिसी धारक हे एलआयसीचे मुख्य शक्तिस्थान आहे. जर मी आयुर्विम्याची पॉलिसी घेतली असेल तर हा शेअर माझ्याकडे हवाच, असा विचार करून मागणी चांगली राहू शकते.  

    त्याशिवाय ही एक सरकारी कंपनी आहे हे विसरता कामा नये. वेळोवेळी शेअर बाजाराला आधार देण्यासाठी एलआयसी उभी राहिली आहे. त्याचा कधी मोठा नफा तर कधी तोटाही झाला आहे. सरकारची मालकी व व्यवस्थापन आणि त्याबरोबर येणारे कृतीनिर्देश यातून काही निर्णय घ्यावे लागू शकतात व ते भागधारकांच्या हिताचे असतीलच असे नाही, असे ड्राफ्ट प्रॉस्पेक्ट सेबीकडे मंजुरीसाठी पाठवताना एलआयसीने जाहीर केले आहे. 

    आकडेवारीसह या भागविक्रीचा ऊहापोह पुढील लेखात करू.

बाजारातील मोठी घसरण बांधकाम क्षेत्र व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअरमध्ये झाली आहे. ‘डीएलएफ’, ‘ब्रिगेड’, ‘ओबेरॉय’, ‘गोदरेज’, ‘सोभा’ तसेच ‘इन्फोसिस’, ‘टेक महिंद्रा’, ‘इंफोएज’, ‘केपीआयटी’, ‘टाटा इलेक्सी’ वगैरे शेअर आपल्या रडारवर ठेवून, त्यांचा अभ्यास करता येईल. (ही गुंतवणुकीची शिफारस नव्हे.) 

रिटेल गुंतवणूकदाराचे धैर्य टिकून राहावे व स्वतःच्या जोखीमक्षमतेप्रमाणे निवड करून या तात्पुरत्या घसरणीचा लाभ उठवावा ही शुभेच्छा. 

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या