अथांग...  खोल खोल

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 14 मार्च 2022

अर्थविशेष

कितीही तात्पुरत्या अडचणी आल्या तरी त्या दूर होतील यावर विश्वास ठेवला पाहिजे. चालू दशक आपले असेल अन बाजार दीर्घ पल्ल्यात वरच जाणार असेल तर अवेळी संयम सुटून त्यातून बाहेर पडण्यापेक्षा बाजाराबरोबर राहिलेले चांगले.

इंग्रजीमधे अ’बीस (Abyss) असा शब्द आहे. अर्थ आहे खोल.. खोल, ज्याचा तळच सापडत नाही असा खड्डा किंवा विवर. जितके खाली जाऊ, तितका तळ अधिकच खाली आहे असे भासते, अन तितकेच नैराश्य वाढते. सध्या शेअर बाजाराचे असेच झाले आहे. रोजच नव्याने खाली येणारे निफ्टी, सेन्सेक्स, नॅस्डॅक, डाऊ जोन्स निर्देशांक, फक्त बातम्यांवर हेलावणारा बाजार, रोमारोमात तेजी भरलेला गुंतवणूकदारदेखील गोंधळून जाईल अशी अवस्था. या ‘‘अ’बीस’’मधून बाहेर यायचे तरी कसे? यावरही एक सोपा उपाय सांगितला आहेः ज्ञानाच्या  पंखावर बसूनच अथांगाच्या कक्षेतून बाहेर पडता येते. (Come out of abyss using the wings of wisdom )  

हे पंख कोणते? पहिल्या प्रथम हे लक्षात घेणे की शेअर बाजाराच्या निर्देशांकाची रचनाच अशी असते की दीर्घ मुदतीत ते वरच जातात. याचे कारण असे की सतत बाजार भांडवलात वृद्धी होणारे शेअर आपसूकच निर्देशांकाचा भाग होतात व तसे  न होणारे शेअर बाहेर फेकले जातात. आता हेच बघा, येत्या ३१ मार्चपासून निफ्टीत ‘इंडियन ऑईल’ची  जागा ‘अपोलो हॉस्पिटल’ घेणार आहे. या आधीही ‘झी टेली’ची जागा ‘डीव्हीज लॅब’ने घेतली होती तर ‘गेल’ची जागा ‘टाटा कन्झुमर’ने!  एकेकाळी ‘रिलायन्स’ कॅपिटल निफ्टीचा भाग होता, पुढील दैन्यावस्थेत बाहेर फेकला गेला. खाली येणारा शेअर निर्देशांकात फार दिवस टिकत नाही, आणि बाजार भांडवलही  चांगल्या कामगिरीनेच वाढते. तेव्हा निर्देशांकातील चांगली कामगिरी करणारे  शेअर जवळ बाळगले तर आपलेही भांडवल वाढणार हे नक्की! याला पर्याय नाही. 

दुसरी बाब अशी की आपली तरुणाई (जवळजवळ अर्धी लोकसंख्या तरुण गटात मोडते), देशांतर्गत सतत वाढणारी मोठी बाजारपेठ, दमछाक होणारी  मागणी व उत्पादनांचा खप पाहिल्यास चालू दशक भारताचे आहे हे ठळकपणे  लक्षात येते. यापूर्वीही दुसरे महायुद्ध धरून छोटी मोठी अनेक युद्धे होऊन गेली. बाजार तात्पुरते खाली आले, पुन्हा वरच गेले. सर्वात अधिक काळ चाललेल्या व्हिएतनाम युद्धातही अमेरिकन बाजार वरच गेले. कितीही तात्पुरत्या अडचणी आल्या तरी त्या दूर होतील यावर विश्वास ठेवला पाहिजे. चालू दशक आपले असेल अन बाजार दीर्घ पल्ल्यात वरच जाणार असेल तर अवेळी संयम सुटून त्यातून बाहेर पडण्यापेक्षा बाजाराबरोबर राहिलेले चांगले. कोविड महासाथीचा प्रादुर्भाव झाल्यावर शेअर बाजारातून अवेळी बाहेर पडलेल्या पश्चातापदग्ध गुंतवणूकदारांसाठी ही पुन्हा मिळालेली संधी आहे. तसेच कोविड साथीत धैर्य दाखवलेल्या अनुभवी गुंतवणूकदारांसाठी पुनर्प्रत्ययाचा आनंद. अर्थात एकदम सर्व भांडवल न गुंतवता टप्प्याटप्प्याने गुंतवलेले कधीही श्रेयस्कर. आता जोखीम/ परतावा गुणोत्तर अधिक आकर्षक झाले आहे. 

जगाचे गुंतवणूक गुरू वॉरन बफे त्यांच्या २०२१च्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रकात म्हणतात, ‘मी व चार्ली स्टॉक्स निवडत नाही, आम्ही व्यवसाय निवडतो व त्यात गुंतवणूक करतो. व्यवसाय निवडताना त्याचे नेतृत्व कोणाकडे आहे हे बघतो,  त्यानंतर व्यावसायिक कामगिरीचा अभ्यास करतो. ही गुंतवणूक नसून भागीदारी आहे असे समजतो. कुठलाही संबंध नसलेल्या धंद्याबाहेरच्या तात्कालिक घटनांमुळे तात्पुरती थोडी माघार घ्यावी लागली तरी आम्ही सहसा भागीदारी मोडत नाही.’ असो. त्यांचे बोट धरायचे तर आपल्यालाही तसेच वागायला हवे.

खरेतर युद्ध इतके लांबेल याची कल्पना पुतीन ह्यांनादेखील नसावी. हे युद्ध सर्वांनाच नको आहे. कारण युरोपची इंधनाची गरज मोठ्या प्रमाणात रशियातून पूर्ण होते, त्यासाठी नॉर्ड स्ट्रीम-२ ही पाइपलाइन बाल्टिक समुद्राखालून  रशियन कंपनीने टाकली आहे. हा सारा खर्च केल्यानंतर तिचा उपयोग न करता येणे महागच. अमेरिकाही निर्बंध लादण्यात अग्रेसर असली तरी प्रत्यक्ष युद्धात भाग घेणार नाही. परस्परांना हूल देऊन जेव्हढे पदरात पाडता येईल, तेव्हढे पाडावे असा माफक उद्देश पुतीन ह्यांचा असायला काही हरकत नव्हती. आता ते फार पुढे निघून गेलेत. डोन्टेस्क व लुहान्स्क हे प्रांत स्वायत्त (खरा अर्थ -अंकित) केल्यानंतर रशियाने एकतर्फी युद्धबंदी केली असती तर पुतीन ‘हिरो’ झाले असते. युक्रेनलाही वचक बसून रशियाच्या पूर्ण आधीन नाही तरी त्याच्या कलाने राज्यकारभार झाला असता. आता, ‘अगं अगं म्हशी…’ करीत कुणाचे शेपूट धरून माघार घ्यावी हा रशियाचा प्रश्न आहे. त्यात भारताला इस्राईलच्या मदतीने पुढाकार घेता आला तर हा गतिरोध दूर होईल व आपली प्रतिमा अधिकच उंचावेल. रशियाने ३० टक्के सवलतीत भारताला खनिज तेल देऊ केले आहे. ही सवलत स्वीकारावी किंवा कसे याबद्दल सरकारची द्विधा मन:स्थिती आहे. इराणच्या पाइपलाइनवर एव्हढा खर्च करूनदेखील तेथील आयात चालू झालेली नाही. अमेरिकेला न दुखावता तोडगा काढणे आपल्या परराष्ट्र धोरणाची अग्निपरीक्षाच आहे. हा तिढा संपला की भारताचा मार्ग मोकळा. 

आजच्या घडीला, मागील लेखात उल्लेखल्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आकर्षक वाटते. आयटी निर्देशांकाने ४ जानेवारी रोजी ३९,३७० अंशाचा उच्चांक केला. तेथून तो रशियन आक्रमणाच्या दिवशी, २४ फेब्रुवारी रोजी ६८२३ अंश म्हणजे १७ टक्के खाली आला. पूर्व युरोपमधील स्पर्धा कमी झाल्यामुळे आणि त्यात रुपया कमकुवत झाल्यामुळे हे क्षेत्र जोरात आहे. त्यात सर्वच आघाडीच्या कंपन्या मोठी कंत्राटे मिळवीत आहेत. जानेवारी ते मार्च ही तिमाही तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नेहमीच जोरकस असते. त्यातील अध्वर्यू असलेल्या ‘इन्फोसिस’, ‘टीसीएस’, ‘एचसीएलटेक’, ‘एलएनटी इन्फोटेक’ व त्याबरोबर ‘कोफोर्ज’ व ‘पर्सिसटंट’ अभ्यासासाठी सुचवायास योग्य वाटतात. 

त्याखेरीज बांधकाम क्षेत्राचा निर्देशांक नुकताच तेजीत ५६० अंशावर गेला होता, तो ३० टक्के खाली आला आहे. येथील दिग्गज नावे आहेत ‘डीएलएफ’, ‘ओबेराय’, ‘सोभा’, ‘गोदरेज’, ‘ब्रिगेड’ इत्यादी. या क्षेत्रातील कंपन्यांचे नफा तोटा पत्रक तपासूनच त्यात गुंतवणूक करावी. गुरगाव येथे गोल्फ क्लबजवळ उच्च विलासी शैलीतील सदनिका २५ ते ३५ कोटी रुपये किमतीत सहज विकल्या जात आहेत. सुपर लक्झरी वास्तूंना प्रमुख मेट्रो शहरात मागणी आहे. त्यातील काही नावे वानगीदाखल दिली आहेत. गुंतवणूकदाराच्या रडारवर ही नावे हवीत. 

ग्राहकांच्या रोजच्या वापरातील वस्तूंना महागाईचा चटका जाणवू शकतो. पेट्रोल डिझेल महागले, तर भाजीपाला महाग होईल. गव्हाच्या दराने उच्चांक गाठला आहे. निर्यात बंदी किंवा निर्यातकर आला नाही तर बळीराजा सुखावेल, पण ‘हिंद लिव्हर’, ‘ब्रिटानिया’ वगैरे कंपन्यांना उत्पादनात भाववाढ करावी लागेल. तीच गत पेंट क्षेत्राची. खनिज तेलाच्या भाववाढीमुळे पेंट, सिमेंट, टायर उद्योगांना कच्च्या मालाच्या वाढीव दरांना तोंड द्यावे लागेल. युरिया व इतर खतांच्या कच्च्या मालासाठी आपण रशिया, चीन ह्यांचेवर अवलंबून आहोत. चीनची युरिया निर्यात बंद आहे. तिथेही भाववाढ अपरिहार्य आहे. आता सेंद्रिय खतांकडे वळावे लागेल व ते आपल्या जमिनीचा कस वाढवण्यास हिताचेच ठरेल. 

अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शेअर बाजार आलेखाप्रमाणे एका महत्त्वाच्या पातळीवर आहे. तसेच निफ्टीची किंमत /उपार्जन गुणोत्तर (P/ E) दहा वर्षांच्या सरासरीच्या खाली येत आहे. मूलभूत कामगिरी व आलेख दोन्ही, शेअर बाजार आकर्षक होत आहे, हे सुचवीत आहेत. ही संधी सोडता कामा नये. प्रत्येक गुंतवणूकदार ज्ञानाचे पंख वापरून बाजाराला  सामोरे जावो  व ही संधी वापरत संपत्ती निर्माण करो ही सदिच्छा!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या