महागाई करतेय दिरंगाई...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 4 एप्रिल 2022

अर्थविशेष

मार्चच्या ८ तारखेला १५,६७१चा तळ दाखवल्यानंतर निर्देशांकांनी ९ -१० टक्के तेजी दाखवली, पण पुढची वाटचाल अडखळत होते आहे. महत्त्वाची बाब अशी की आपल्या जुन्या आधारपातळीचा (निफ्टी १७ हजार अंश) योग्य तो मान राखत बाजार त्याखाली यायला तयार नाही. बाजार १७००० ते १७४५० ही रेंज तोडताना दिसत नाही. हा टप्पा ओलांडण्यास तेजीवाले सज्ज आहेत. माहिती तंत्रज्ञान, औषध उद्योग, बांधकाम क्षेत्र, लोह व अलोह धातू ह्या सर्व क्षेत्रांच्या जोडीला बँकिंग क्षेत्रही तेजीत येऊ घातले आहे. 

शेअर बाजाराला अर्थव्यवस्थेची अनिश्चितता आवडत नाही. आपला बाजार गेले दोन महिने अनेक घटनांची उकल होण्याची वाट पाहात होता. पाच राज्यांच्या निवडणुका, सत्ताधारी पक्षाला बळ देतात की नाही ही पहिली समस्या. निवडणुकीचे निकाल शेअर बाजाराच्या दृष्टीने संतोषजनक लागले, तेजीवाल्यांनी पहिला निश्वास टाकला. दुसरे प्रश्नचिन्ह होते अमेरिकन व्याजदरांचे. व्याजदर वाढणार याबद्दल बाजाराने अटकळ बांधली होती आणि जी येईल ती बातमी हसत स्वीकारण्याची तयारीही होती. बाजाराला आवडत नव्हती ती अनिश्चितता! कधी? कितीदा? किती टक्क्यांनी? हे प्रमुख प्रश्न. त्याचेही उत्तर मिळाले. ‘फेड’ ने पाव टक्क्यांनी व्याजदर वाढवले, पुढेही प्रत्येक बैठकीत याच दराने वाढणार हेही दर्शवले. बाजाराचे समाधान झाले. ज्या दिवशी व्याजदर वाढले त्यादिवशी अमेरिकन बाजार वरच गेले. तिसरी समस्या होती रशिया युक्रेन संघर्ष! तीन दिवस नाही तरी एक दोन आठवड्यात युक्रेन शरणागती पत्करेल, हा सर्वसाधारण समज. पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की फारच चिवट निघाले. युक्रेन रशियाला तिखट उत्तर देत आहे. संपूर्ण शरणागतीऐवजी सन्मानजनक तडजोड व्हावी ह्यासाठी निकराने प्रतिकार चालू आहे. दुसऱ्या बाजूला देशाच्या  अर्थव्यवस्थेचे बारा वाजले तरी चालतील, पण  युक्रेनला अंकित करूनच घेणार ह्या निश्चयाने रशियाची वाटचाल चालली आहे. चर्चा सुरू आहेत, पण हे युद्ध आता  चिघळले, हे बाजाराने गृहीत धरले आहे. वातावरण लवकरच निवळेल, चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा सर्वच बाजारांना (शेअर, धातू, खनिज तेल, अॅग्री) आहे.  मुख्य समस्या आहे ती युद्धामुळे वाढत असलेले खनिज तेलाचे दर  आणि धातुबाजारातील तेजी. अर्सेलर मित्तलचा एक मोठा पोलाद निर्मितीचा कारखाना युक्रेनमध्ये आहे. तिथले उत्पादन बंद आहे. तसेच गहू, मका, सूर्यफुलाच्या तेलबिया इत्यादी धान्यांचा युरोप व इतर जगातील  पुरवठा युक्रेनमधूनच होतो. पुरेशा पुरवठ्याअभावी ह्या सर्व वस्तू महागल्या  आहेत. 

मार्चच्या ८ तारखेला १५,६७१ चा तळ दाखवल्यानंतर निर्देशांकांनी ९ -१० टक्के तेजी दाखवली, पण पुढची वाटचाल अडखळत होते आहे. महत्त्वाची बाब अशी की आपल्या जुन्या आधारपातळीचा (निफ्टी १७ हजार अंश) योग्य तो मान राखत बाजार त्याखाली यायला तयार नाही. बाजार १७,००० ते १७,४५० ही रेंज तोडताना दिसत नाही. हा टप्पा ओलांडण्यास तेजीवाले सज्ज आहेत. माहिती तंत्रज्ञान, औषध उद्योग, बांधकाम क्षेत्र, लोह व अलोह धातू ह्या सर्व क्षेत्रांच्या जोडीला बँकिंग क्षेत्रही तेजीत येऊ घातले आहे. स्मॉल व मिड कॅप शेअर, झाली तेव्हढी घसरण पुरे झाली असे म्हणत आणखी खाली येत नाहीत, मग बाजार वर जाण्यात इतकी दिरंगाई का?  झालेली आणि होणारी महागाई हेच त्याचे मुख्य कारण! जसजशी महागाई आटोक्यात येईल, किंवा ग्राहकाला वाढीव किमतीची सवय होऊन वाढीव दराला मागणीही वाढती दिसेल, तसतशी निफ्टी पुन्हा १८ हजार किंवा त्यापुढे स्पर्श करेल हे नक्की. 

युक्रेन युद्धाचे भारताच्या दृष्टीने काही सकारात्मक संकेत आहेत. 

  • एकतर पाश्चिमात्य देशांनी (विशेषकरून अमेरिकेने) भारताची तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. ऊर्जेचे परावलंबित्व व परराष्ट्रीय धोरण ह्याचा समतोल राखणे आपल्याला शक्य झाले आहे. 
  • रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले आहे व त्यानुसार इंडियन ऑइल, हिंद पेट्रो आदींनी निविदाही भरल्या आहेत. पण रशियाकडून तेल आयात फारशी व्यावहारिक नाही. अमेरिकेची त्याला हरकत नसणे महत्त्वाचे. या कृतीमुळे भारतावर कुठलीही बंधने लादणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. हे वजन वापरून इराणमधून खनिज तेल आयात करणे जर जमले (अमेरिकेचे  निर्बंध असतांनाही, त्यांच्या संमतीने) तर ते व्यावहारिक व सयुक्तिक होईल. कारण तेथून भारताला पुरवठा करणारी  तेलवाहिनी तयार आहे. 
  • गहू, साखर, मका, यांची भाववाढ आपल्या पथ्यावरच आहे. सरकारकडे गव्हाचा भरपूर साठा आहे. उसाची मुबलक लागवड व साखरेचे भरीव वाढीव उत्पादन या जोडीला आंतरराष्ट्रीय अॅग्रो कमॉडीटीतली तेजी निर्यातीला प्रोत्साहन देत आहे. (चालू वर्षात सॉफ्ट वेअर वगळता ४० हजार कोटी डॉलरची निर्यात आपण करू शकलो.)
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात युक्रेन आपला प्रतिस्पर्धी आहे. युद्धामुळे तिथले कामकाज ठप्प झाले आहे, ही स्पर्धा कमी झाल्यामुळे माहिती क्षेत्राला नवी ऊर्जा मिळत आहे. 
  • उभरत्या अर्थव्यवस्थेत चार मुख्य देश येतात; ब्राझील, रशिया, भारत व चीन. रशियाचे शेअर बाजार अर्धमेले आहेत. तिथे विक्रीला बंदी असल्यामुळे बाजार स्थिर आहे एव्हढेच. निर्देशांक ५० टक्क्यांनी कोसळले आहेत. चीनच्या कठोर नियमनामुळे ‘अलिबाबा’ सारख्या शेअरचा सात वर्षांचा परतावा वार्षिक केवळ ५ टक्के आहे. गेल्या वर्षीचा आघाडीच्या शेअरचा उतारा उणे ३० ते उणे ५० टक्के होता. चीनमध्ये या दरम्यान २,६०० कोटी डॉलरची (जवळपास दोन लाख कोटी रुपये) गुंतवणूक झाली आहे. स्वस्त स्वस्त करत आणखी किती करणार?  भारतीय बाजारात विक्रीही भरपूर करून झाली आहे. जवळजवळ १,५०,००० कोटी रुपयांची विक्री करूनही भारतीय बाजार दहा  टक्क्याहून खाली आले नाहीत. तेव्हा भारतात गुंतवणूक करण्याशिवाय परदेशी संस्थांना फारसा पर्याय नाही. आज नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हे होणारच.

शेतमालाचे भाव वाढल्यामुळे खाद्य पदार्थ व रोजच्या वापरातील ग्राहपयोगी वस्तू महाग होणार. दरवाढ बेताबेताने करावी लागते. ग्राहकांनी ती स्वीकारेपर्यंत ग्राहक क्षेत्र तणावाखाली राहील. अल्पमुदतीचे गुंतवणूक धोरण आखताना त्यापासून दूर राहिलेले बरे. मात्र ज्यांची वाट पाहायची तयारी आहे आणि भरपूर संयम आहे, त्या ‘व्हॅल्यू’ गुंतवणूकदारांसाठी ही पर्वणी आहे. ‘हिंद युनिलिव्हर’ ₹    २,०१९च्या भावात मिळतोय, ₹    १,९००च्या खाली तो जाऊ नये. तीच गत ‘ब्रिटानिया’ची. हा शेअर तर ₹    २,०१८च्या भावाला मिळतोय. आणि ‘गोदरेज कन्झ्युमर’ कोरोना काळातील भाव दाखवतोय. आपापल्या संयमक्षमतेप्रमाणे गुंतवणूक करावी. ‘आयटीसी’ असाच व्हॅल्यू शेअर म्हणून बरेच वर्ष पडून होता. आता मात्र त्याने कात टाकली आहे. सिगरेटची विक्री कोविड आधीच्या तिमाहीपेक्षा अधिक होत आहे. (आज ‘आयटीसी’कडे या बाजारपेठेचा ७८ टक्के हिस्सा आहे). त्याखेरीज पेपर व हॉटेल विभाग वेगाने घोडदौड करताहेत.  या शेअरमधली पाच वर्षाची तपश्चर्या आता फळतेय, एकाचवेळी स्वस्त आणि मस्त असलेला हा शेअर पुढे अजूनही उभारी घेऊ शकतो.   

कोविडच्या चौथ्या लाटेची आता फारशी भीती राहिली नाही. त्यामुळेच ‘ओपन अप’ अर्थव्यवस्थेचे शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. ‘इंडिगो’ (विमान वाहतुकीचा ४८ टक्क्यांवर हिस्सा) आज जरी तोटा दाखवत असली, तरी हा शेअर ₹    २,२०० पर्यंत जाऊ शकतो. त्या गटात ‘पीव्हीआर’, हॉटेलचे इतर शेअर, ‘इंडियन हॉटेल’, ‘लेमन ट्री’, ‘इआयएच हॉटेल्स’, ‘इझ माय ट्रीप’ (विमान वाहतुकीशी संबंधित पोर्टल) मोडतात. (बोनस नंतर ३५०च्या भावात) या सर्व शेअरचा संपूर्ण अभ्यास  करून, निर्बंध उठल्यामुळे ह्या क्षेत्रात येणारी तेजी पटत असेल तर जरूर विचार करावा. 

तेजी बोलता बोलता येईल, आणि तुमची खरेदी राहून जाईल. असे व्हायला नको. खनिज तेलाच्या दराची धाकधूक असल्यामुळे बाजार अधूनमधून खालीही येईल, पुढील तीन महिन्याची कुंडली तर अशीच दिसते. कसून खरेदी आणि जपून विक्री हे गणित जमले तर आणखी काय हवे?

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या