स्वागत नव्या आर्थिक वर्षाचे

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 11 एप्रिल 2022

अर्थविशेष

कमोडिटी बाजाराचा गतीवेग कमी झाल्यासारखा वाटला तरी किमती चढ्याच आहेत. तेव्हा पुढील काळात जर निर्देशांकांनी नवा उच्चांक केला, तर आपली विक्रीची यादी तयार ठेवली पाहिजे.

नवे आर्थिक वर्ष सुरू झाले. या हिंदू नववर्षाचे स्वागत शेअर बाजाराने मोठी गुढी उभारून केले. एक एप्रिल रोजी बाजारात एक नवचैतन्याची लाट दिसून येत होती. सेन्सेक्सने ७०८ अंश तर निफ्टीने  २०५ अंश तेजी दाखवली. पुढील सप्ताहात काहीतरी मोठे घडणार याची चाहूलच जणू साऱ्या बाजाराला लागली होती. आणि सोमवारी बाजार सुरू व्हायच्या आतच ती बातमी आली. एचडीएफसी व एचडीएफसी बँक ह्यांच्या विलीनीकरणाची! ही बातमी ह्या दोन्ही संस्थांना नवसंजीवनी देणारी ठरली. खरे तर गेले दोन वर्षे अधून मधून ही चर्चा रंगत असे. एचडीएफसी बँकेकडे असलेला कमी व्याजांच्या सीएएसए (CASA) डिपॉझिटचा वाटा नसल्यामुळे; एचडीएफसीला गृह वित्त वितरणासाठी भांडवल मिळवण्यासाठी किरकोळ व ठोक मुदत ठेवींवर अवलंबून राहावे लागे, ती अडचण आता दूर होईल. कर्जाचे व्याजदर कमी झाल्यामुळे, डिपॉझिट व कर्ज यातील कमी झालेली दरी वाढेल व नफा सुधारेल. एचडीएफसी बँकेचा कर्ज व्यवसाय किमान ४२ टक्के वाढून, १८ लाख कोटींवर जाईल. स्टेट बँकेपाठोपाठ ही नवी बँक देशात दोन नंबरला असेल. परदेशी संस्थांना गुंतवणुकीसाठी प्रवेशास अधिक सवड मिळेल. दीपक पारेख, केकी मिस्त्री यांचा उत्तराधिकारी निवडणे सोपे जाईल. 

एचडीएफसीच्या भागधारकाला २५ शेअर मागे बँकेचे ४२ शेअर मिळणार आहेत. दोन्ही शेअर त्या गुणोत्तरात बाजारात वाटचाल करत राहतील. एचडीएफसी बँकेच्या ६,३०० शाखा आहेत. त्या सर्व शाखांतून गृहकर्ज वितरण अग्रहक्काने तर होईलच, खेरीज या सर्व नव्या ग्राहकांना एचडीएफसी बँकेतर्फे विमा, क्रेडीट कार्ड  व बचतीचे अनेक पर्याय देता येतील.  

याठिकाणी, संदर्भ म्हणून फिनटेक संबंधी थोडी माहिती घेणे आवश्यक आहे. सरकारी प्रोत्साहनाने प्रथम कोट्यवधी जनधन खाती भारतभर बँकांमध्ये उघडली गेली. शासकीय अनुदान थेट लाभार्थींच्या खात्यात जाऊ लागले. त्यापाठोपाठ सहा वर्षांपूर्वी भारताने ‘यूपीआय’ तंत्रज्ञान आणले. जगात त्यावेळी कुठेही ही सोय नव्हती. स्मार्ट फोन भारतात बहुतांश लोक वापरत. तो वापर जनसामान्यांच्याच उपयोगात आणावा, ही दूरदृष्टी व प्रोत्साहन निःसंशय सरकारचे, त्याला साथ मिळाली नंदन निलेकणी यांनी अहोरात्र कष्ट घेऊन सादर केलेल्या तंत्रज्ञानाची. आज कुणीही कुणालाही दोन लाख रुपयांपर्यंत कितीही पैसे मोबाईलने पाठवू शकतो. ह्या हस्तांतरणाचा कुठलाही खर्च दोन्ही पक्षांना येत नाही. सर्व खर्च सरकारचा. पाठोपाठ अनेक प्लॅटफॉर्म आले. भीम पे, गुगल पे, फोन पे, पेटीएम, भारत पे वगैरे. हे  सर्व प्लॅटफॉर्म ‘फिनटेक’ या सदरात मोडतात.  यापैकी कुठल्याही ‘फिनटेक’ला या उपक्रमापासून काही उत्पन्न होत नाही. मग त्यांना काय मिळते? तर त्यांना  मिळतो, लक्षावधी वापरकर्त्यांचा डेटा! या डेटाचा पुढे उपयोग करून, गिऱ्हाईकांची  विश्वासार्हता तपासून; त्यांना अनेक प्रकारची अल्प मुदतीची कर्जे विकता येतील अशी संकल्पना. यामुळेच  आजकाल ‘फिनटेक’चे पीक आले आहे. फिनटेकमुळे बँका बंद पडणार का? येथपर्यंत चर्चा रंगत असत. ‘मिंटओक’ ही अशीच एक प्लॅटफॉर्म फिनटेक. एचडीएफसी बँकेकडे तिचे ६ टक्के भागभांडवल आहे. नव्या युगात अवतरलेल्या ‘फिनटेक’ कंपन्यांना प्रतिस्पर्धी न मानता, त्यांच्याबरोबर  भागीदारी करीत, त्यांनी जोपासलेल्या डेटा संग्रहाचा योग्य वापर करून नवतंत्रज्ञानाचे युग या निमित्ताने एचडीएफसी बँक व त्यापाठोपाठ संपूर्ण बँकिंग व्यवसायात येईल असे वाटते. एचडीएफसी बँकेचा विस्तार आयसीआयसीआय बँकेच्या तुलनेने दुप्पट होणार आहे. त्यात फिनटेक व इतर नव्या तंत्रज्ञानाची साथ मिळाल्यास एक मोठी अर्थसंस्था उभी राहील हे नक्की. तिला ‘फॉर्च्यून १००’मध्ये नक्कीच स्थान असेल.  

वरील ऊहापोहामुळे बहुचर्चित ‘पेटीएम’ शेअर बाजारात का गडगडला हे लक्षात येईल. 

मुख्य म्हणजे आपली भाकिते खरी ठरली. चिंतेचे मळभ थोडे दूर होताच (अगतिकतेने का असेना) दुसरा सक्षम पर्याय नसल्यामुळे परदेशी संस्था पुन्हा गुंतवणुकीसाठी परतल्या. गेले वर्षभर परदेशी संस्था भांडवल बाजारात जरी तुफान विक्री करीत असल्या, तरी थेट परदेशी गुंतवणूक (FDI) वाढतच होती. याच कारणामुळे चलन फारसे घसरले नाही. आपले दुसरे गृहीतक इंडिया विक्स निर्देशांक २७ ते ३०च्या जवळ आल्यास ती वेळ छोट्याश्या स्टॉप लॉसने खरेदीची असते हे होते. कारण त्यावेळी बाजाराचे सेंटीमेंट पूर्णपणे नैराश्यात गेलेले असते, हेही खरे ठरले. (त्याप्रमाणे १५९०० निफ्टी पातळीवर खरेदीची शिफारसही या सदरात केली होती). आता इंडिया विक्स पुन्हा १९च्या खाली आहे. म्हणजे काही दिवस तरी तेजीला मोठा धोका नाही. सर्व काही आलबेल असतानाच स्वतःच्या शेअरभांडाराचे सिंहावलोकन करणे श्रेयस्कर ठरते. 

युद्ध काही संपलेले नाही. जोपर्यंत खनिज तेलाच्या किमती आटोक्यात येत नाहीत तोपर्यंत महागाई दराला विश्राम नाही. कमोडिटी बाजाराचा गतीवेग कमी झाल्यासारखा वाटला तरी किमती चढ्याच आहेत. तेव्हा पुढील काळात जर निर्देशांकांनी नवा उच्चांक केला, तर आपली विक्रीची यादी तयार ठेवली पाहिजे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी ही जबाबदारी फंड व्यवस्थापकांकडे सोपवली आहे. त्यांना काळजी नाही. असो. 

मागील आर्थिक वर्षातील चालू खात्यातील तुटीची आकडेवारी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. २१-२२ वर्षातील पहिल्या नऊमाहीत तूट २,३०० कोटी डॉलर आहे. ही नऊ वर्षातील सर्वोच्च आहे. गेल्या वर्षी तर तूट नव्हतीच. चालू खात्यात शिल्लकच होती. 

आयात व निर्यातीत झालेल्या प्रचंड तफावतीमुळे श्रीलंकेत महागाईचा भस्मासुर उभा आहे. तेथील सरकारी धोरणे त्याला कारणीभूत तर आहेतच, पण त्यात नशिबाचाही हात आहे. या लहानशा देशाची अर्थव्यवस्था तीन क्षेत्रांवर सर्वाधिक अवलंबून आहे. पर्यटन, चहा आणि कापड उद्योग. कोविडमुळे जगभरात लागलेल्या लॉकडाउनचा या तिन्ही क्षेत्रांना जबरदस्त फटका बसला. त्यात सरकारने कर कमी केले, त्यामुळे उत्पन्न कमी झाले. परकीय कर्ज प्रचंड आहे. त्याच्या परतफेडीचा सध्या कुठलाही मार्ग नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे याचना करत नवे कर्ज मिळवून आजचे मरण उद्यावर ढकलणे हा किंवा शेजाऱ्यांकडून उसनवारी करणे, हे दोन मार्ग आहेत. 

आपल्या शेजारच्या सर्व देशात महागाई वाढली आहे. युद्ध व खनिज तेलाचे दर ही जरी प्रमुख कारणे असली तरी चीनकडून कर्ज घेऊन उभे केलेले प्रकल्प पुरे न होणे, हा नाकर्तेपणाही श्रीलंका व पाकिस्तानच्या आर्थिक संकटाला कारणीभूत आहे. भारतावर तशी वेळ येईल का, याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. चालू खात्यातील तूट वाढली असली तरी वाढत्या निर्यातीने ती आटोक्यात येईल. (माहिती तंत्रज्ञान व अॅग्रो कमोडिटी) श्रीलंकेचे प्रश्न पाहता चहा व कॉफी निर्मिती करणारे उद्योग विचारार्थ घ्यायला हवे. पण बाजारात सर्वंकष तेजी परतल्यामुळे, आघाडीच्या शेअरकडे लक्ष वळवणे उत्तम. नेहमीचे यशस्वी बांधकाम क्षेत्र (‘ओबेरॉय’, ‘गोदरेज’, ‘डीएलएफ’ आदी) व बँकिंग क्षेत्र चांगल्या गतीवेगात आहे. आपल्या जोखीमक्षमते प्रमाणे अभ्यासावे व निर्णय घ्यावा. ए यू फायनान्स बँकेनेही चांगली प्रगती दाखवली आहे. तसेच अॅक्सीस बँक, सिटीचा संपत्ती व्यवस्थापनाचा व्यवसाय विकत घेतल्यामुळे, आकर्षक वाटत आहे. एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँकेबरोबर त्यांचाही विचार व्हावा. शेअर बाजार सलग तेजी करीत १८ हजार निफ्टी व ६० हजार सेन्सेक्स धरून उभा आहे. किरकोळ नफेखोरी वगळता नवा उच्चांक होण्यास जागा आहे.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या