बाजाराचे रंग

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 18 एप्रिल 2022

अर्थविशेष

शेअर बाजार महाग नाही तसाच स्वस्तही नाही. त्यामुळेच प्रत्येक घसरण एक संधी देऊ शकते. गुंतवणुकीतून अल्पकालीन नफा बाजूला काढणे व दीर्घकालीन गुंतवणूक करणे ह्याचे प्रमाण समसमान असायला हवे.

चार एप्रिल रोजी एचडीएफसी लिमिटेड आणि बँक ह्यांच्या विलीनीकरणाची बातमी निफ्टीला स्वप्नवत अशा अठरा हजाराच्या पातळीवर घेऊन गेली, पण लागलीच पुढील तीन दिवस दचकून जागे होत; अमेरिकन व्याजदर, रशियावरील नवीन निर्बंध, चीनमधे आलेली कोविड विषाणूची नवी लाट इत्यादी बातम्यांचा धसका घेऊन बाजार लागलीच घसरला. रिझर्व्ह बँकेने पतधोरणात पुन्हा दिलासा दिल्यामुळे शुक्रवारी, ८ तारखेला, बाजार सावरला व तेजीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. सोमवारी ११ एप्रिल रोजी मात्र, येरे माझ्या मागल्या करीत निफ्टी पुन्हा अडखळली. हा आठवडा तर तीनच दिवसांचा आहे, तेव्हा पाश्चात्त्य बाजारांचा मागोवा घेण्यापलीकडे काही  मोठी वधघट होऊ नये अशी अपेक्षा. मग त्या तेजीचे काय झाले ? 

कदाचित पूर्वीचा एक उखाणा समोर ठेवून असे म्हणता येईल... 

बाजाराचे रंग दिसतात तर बरे,

तेजी होईल तेव्हा खरे!

शेअर बाजारातला आंतरप्रवाह तेजीचा आहे का? ह्याची काही कारणे तपासून बघू...

    दोन्ही निर्देशांक, निफ्टी व सेन्सेक्स ३०, ५०, १०० आणि २०० दिवसांच्या चलसरासरीच्या वर आहेत. हे तेजीचेच निदर्शक आहे. 

    निफ्टी व सेन्सेक्स जरी खाली आले तरी मिड व स्मॉल कॅप निर्देशांक तेजीच दाखवत आहेत. ११ मार्चपासून मिडकॅप निर्देशांक, सीएनएक्स मिडकॅप तेजीत आहे आणि ११ मार्च ते ११ एप्रिल या दरम्यान तीन हजार अंशाने वाढला आहे. थोड्या फार फरकाने तीच स्थिती स्मॉल कॅप निर्देशांकाची आहे.

    वरील निर्देशांक नुसतेच वाढले नाहीत तर निर्देशांकाबाहेरील शेअरही वर गेले आहेत. निफ्टी घसरली तरी ‘मार्केट ब्रेड्थ’ किंवा वृद्धी/घसरण प्रमाण (आपल्या चालू मराठीत अॅडव्हान्स डिक्लाईन रेशो) सतत सकारात्मक आहे. बाजाराच्या सेंटीमेंटचा त्यातून अंदाज येतो. 

    इंडिया विक्स अत्यंत समाधानाने १८-१९च्या पातळीवर विसावला आहे. 

    रशिया युक्रेन संघर्षामुळे निफ्टी २४ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत १५,६००-१६,०००चा तळ दाखवून गेली. एकाच गुन्ह्याला जशी दोनदा शिक्षा होत नाही, तसेच काहीसे आहे हे. आता पुन्हा १५,६००-१५,९००चा स्तर दाखवायला अधिक गंभीर कारण लागेल. तसे काही होऊ नये अशीच अपेक्षा आहे. 

    अमेरिका व अरब राष्ट्रे आपला राखीव साठा काढून खनिज तेल अधिक भडकणार नाही ही काळजी घेत आहेत. 

मात्र या तेजीला चिंतेची किनार आहे.

अमेरिकन व्याजदर व बॉण्ड उतारा तर चढा आहेच, (आपला बाजार अमेरिकेचे बॉण्ड यील्ड्स २ टक्क्यांजवळ गेले म्हणून मागे चिंताग्रस्त झाला होता, ते आता २.७५ टक्के झाले आहेत.) अमेरिकी अर्थव्यवस्था मंदीत जाते की काय अशी भीती तज्ज्ञांना भेडसावते आहे. त्या पाठोपाठ भारतीय सरकारी रोख्यांचा उतारादेखील, मे २०१९ नंतर प्रथमच, ७.१५ टक्क्यांवर गेला आहे. महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच उपाय योजेल, या अपेक्षेने व भीतीने  व्याजदर वर जाऊ पाहात आहेत. 

खनिज तेलाच्या किमतीत बॅरल मागे १० डॉलरची वाढ, महागाई दर अर्ध्या टक्क्याने वाढवते. कच्च्या मालाचा पुरवठा अनियमित तर आहेच पण किमतीही खाली येत नाहीत. त्याजोडीला वीज व कोळशाचा प्रश्न आ वासून उभा आहे. भारनियमनाचे संकट येऊ घातले आहेच. उत्पादनातील अडचणींचा पाढा काही संपता संपत नाही.

तात्पर्य एकच. एका टप्प्यात बाजार चालेल. १७,४०० ते १८,००० हा तो टप्पा. कदाचित १७,००० ते १८,३०० अशीही मोठी रेंज असू शकते. मात्र कुठल्याही परिस्थितीत बाजाराबाहेर राहून चालणार नाही. कारण निर्देशांक जरी वाढले नाहीत तरी निवडक क्षेत्रातील शेअर वाढू शकतात. १२ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकातील लेखात (अथांग... खोल खोल) बांधकाम क्षेत्राकडे लक्ष वेधले होते. त्यात निर्देशलेल्या शेअरपैकी ‘डीएलएफ’ ₹    ३४० वरून ४०३, ‘ओबेरॉय’ ₹    ९०० वरून १००३ , ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ ₹    १५०४ वरून १६८८ असे महिन्याभरातच वर  गेले आहेत. ‘सोभा’ मात्र हलायला तयार नाही. (एखादा अंदाज चुकू शकतो) आयटी निर्देशांकही १००० अंशाने वाढला खरा, पण माहिती तंत्रज्ञांच्या पगारात अवाजवी वाढ होत आहे, हे दृष्टिपथात आल्यामुळे अल्पकाळात मंदी दाखवत आहे. येथे कामाचा रेटाच इतका प्रचंड आहे की पगारावर वाढीव खर्च करूनही विक्री व नफा वाढता राहू शकतो. आजच्या खालच्या भावात ‘इन्फोसिस’, ‘टीसीएस’, ‘पर्सिस्टंट’, ‘कोफोर्ज’ आदि समभागात  नक्कीच अभ्यासपूर्वक गुंतवणूक करता येईल. 

मागील आर्थिक वर्षात कर संकलन २७ लाख कोटींवर गेले आहे. ही रक्कम अंदाजपत्रकाच्या अंदाजापेक्षा पाच लाख कोटी रुपयांनी जास्त आहे. यावर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, अशी टीका होऊ शकते; पण त्याबरोबरच रोजगारनिर्मितीही वाढत आहे, ह्याकडेही लक्ष द्यायला हवे. ह्या खरेतर तेजीच्या बातम्या, पण अमेरिकी बाजारांचे सावट असल्यामुळे दुर्लक्षित आहेत. 

मागील लेखात (ता.१६ एप्रिल -स्वागत नव्या आर्थिक वर्षाचे) चालू खात्यातील तुटीचा उल्लेख केला होता. कच्चे तेल दहा डॉलरने वाढले तर चालू खात्यातील तूट ०.४ टक्के वाढू शकते. त्याचा रुपयाच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. प्रचंड मोठा परकीय चलनाचा साठा रिझर्व्ह बँकेकडे आहे, तो जरी स्थैर्य देत असला तरी खनिज तेलाच्या किमती हा आपला मुख्य शत्रू आहे हे नक्की. सरकारच्या व रिझर्व्ह बँकेच्या पुढील चालीकडे आता सूक्ष्मपणे पाहायला हवे. बँकेने व्याजदर जरी वाढवले नसले तरी आता महागाई दराकडे ती गरुड नजरेने पाहणार आहे. पुढील वर्षाचा आढावा घेताना, २२-२३ या आर्थिक वर्षात कच्चे तेल १०० डॉलरच्या आसपास राहिल्यास विकास दर ७.२ टक्के असेल असे गृहीत धरले आहे. गृहकर्जावरील व्याज येत्या ऑगस्टपर्यंत तरी वाढू नये.  

पुढील वर्षीचे निफ्टीचे उपार्जन ८७५ रुपये गृहीत धरले तर पी/ई गुणोत्तर १९.८८ येते. निफ्टीच्या गेल्या दहा वर्षातील पी/ई गुणोत्तराची सरासरी १९.८ आहे. शेअर बाजार महाग नाही तसाच स्वस्तही नाही. त्यामुळेच प्रत्येक घसरण एक संधी देऊ शकते. गुंतवणुकीतून अल्पकालीन नफा बाजूला काढणे व दीर्घकालीन गुंतवणूक करणे ह्याचे प्रमाण समसमान असायला हवे. 

दरम्यान ‘टीसीएस’चे २१-२२ आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीचे निकाल नुकतेच  हाती आले. विक्री ५० हजार कोटी, नफा ९ हजार ९२६ कोटी आणि ८६ हजार कोटी रुपयांचे ऑर्डर बुक. ‘टीसीएस’ने विश्लेषकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. बुधवारीच ‘इन्फोसिस’चे निकाल आहेत. ‘टीसीएस’ पाठोपाठ ‘इन्फोसिस’नेदेखील डोळ्याचे पारणे फेडणारे निकाल दिले तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची आगेकूच पुन्हा जोमाने सुरू राहील. संपूर्ण वर्षासाठी १९२ लाख कोटीची विक्री व ३८ हजार कोटींचा नफा सुखावणारा आहे. या क्षेत्रात मनुष्यबळ टिकवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. गेल्या तिमाहीत कर्मचाऱ्यांनी सोडण्याचे प्रमाण १७.४ टक्के होते. व्यवस्थापनाचे भाष्य आत्मविश्वासाने पुरेपूर  व पुढील वाटचालीबद्दल अत्यंत  आशादायक चित्र उभे करणारे होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अध्वर्यू असलेल्या ह्या दोन्ही कंपन्यांचे निकाल असेच आशादायक असले तर संपूर्ण शेअर बाजाराचा ‘मूड’ बदलू शकतो.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या