वादळे येऊन गेली, वादळे येतीलही ...

भूषण महाजन,शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 2 मे 2022

अर्थविशेष

स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणवणारी अमेरिका आता जागतिक व्यापार संघटनेला म्हणते, आम्हाला आता विकसनशील म्हणा आणि त्याप्रमाणे आर्थिक फायदे द्या, यातूनच कोविडमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर किती खोल परिणाम केला आहे याची जाणीव होते. आपला देश जर या थंडीतापापासून वाचवायचा असेल तर कल्पक उपायांना पर्याय नाही.

चक्रीवादळांना वेगवेगळी गोजिरवाणी नावे देण्याची पद्धत आहे. तो अधिकार त्या त्या ठिकाणचा -देशाचा असतो. त्यातूनच ‘निसर्ग’, ‘गती’, ‘निवार’ अशी नावे आली. ही वादळे नुकसान करून जातात पण ते तात्कालिक असते, पुन्हा उभारणी करणे शक्य असते. पण गेल्या दोन वर्षात मोठी आर्थिक वादळे येऊन गेली. एकातून सावरत नाही तर दुसरे घोंघावते आहे. त्याचा बंदोबस्त करायला जावे, तर तिसरे उफाळते आहे. ह्या आर्थिक वादळांच्या पुनर्उभारणीला वेळ लागू शकतो. खरे तर अशा ‘ब्लॅक स्वान’ घटना पूर्वी दशकात दोन तीन असायच्या. आता मात्र तसे नाही. 

चीनमध्ये प्रादुर्भाव होऊन जगभर पसरलेल्या कोविड-१९मुळे जगाचे अर्थचक्र थंडावले. लक्षावधी मृत्यू थांबवता आले नाहीत; लॉकडाउन, मुखपट्ट्या, लसीकरण आदींद्वारे त्याचा सामना करता आला. त्यातही भारत सरकारचे काम स्पृहणीय होते. जोडीला सर्वच मध्यवर्ती बँकांनी मोठे भांडवल अर्थव्यवस्थेत ओतले. हे वादळ जेमतेम आटोक्यात येत नाही तोच रोगापेक्षा उपाय जालीम असावा तसा त्यातून महागाईचा राक्षस उभा राहिला. हे महागाईचे वादळ अजूनही काबूत आलेले नाही. व्याजदर वाढवणे हा त्यावर उपाय असला तरी त्यातही प्रत्येक मध्यवर्ती बँकेला तारतम्य ठेवावे लागेल, कारण त्यातून जगाला मंदीच्या खाईत लोटले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. ही लढत चालू असतानाच, रशिया युक्रेन युद्धाच्या निमित्ताने तिसरे अर्थवादळ जगासमोर आले आहे. 

कच्चे तेल, नैसर्गिक वायू यातील भरमसाठ दरवाढ, धातुबाजारातील अमर्याद तेजी, त्यात दोन वर्षांपासून उद्योगांना अडचणीत ठेवणारा चिप्सचा अपुरा पुरवठा, एकूणच पुरवठा साखळीत सतत येणारे व्यत्यय, याखेरीज युद्धग्रस्त युक्रेनला आता व नंतर द्यावी लागणारी मोठी आर्थिक मदत अशा एक ना अनेक कारणांनी जगाची झोप उडाली आहे. त्यात भरीला चीनमधील कोविड साथीच्या चौथ्या लाटेमुळे बीजिंगचे व्यवहार थंडावतील या भीतीने गेल्या शुक्रवारी (ता. २२ एप्रिल) अमेरिकी, तर सोमवारी (ता. २५ एप्रिल) आशियायी बाजार कोसळले. आपलाही शेअर बाजार त्याला अपवाद नव्हता. अपुरे मनुष्यबळ व लॉकडाउनमुळे शांघायच्या बंदरात जहाजांचा ट्रॅफिक जाम झाला आहे. कंटेनरचा तुटवडा आहेच, कंटेनरची भाडीही चौपट झाली आहेत.

अमेरिका शिंकली तर संपूर्ण जगाला कापरे भरते, असे म्हणतात. चीनच्या शिंका तर काही थांबतच नाहीत. स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणवणारी अमेरिका आता जागतिक व्यापार संघटनेला म्हणते, आम्हाला आता विकसनशील म्हणा आणि त्याप्रमाणे आर्थिक फायदे द्या, यातूनच कोविडमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर किती खोल परिणाम केला आहे याची जाणीव होते. आपला देश जर या थंडीतापापासून वाचवायचा असेल तर कल्पक उपायांना पर्याय नाही. अशी अर्थवादळे यापूर्वीही येऊन गेली आहेत व यापुढेही येतील. कालांतराने ती आटोक्यातही  येतील. गरज ही शोधाची जननी आहे या उक्तीप्रमाणे, नवे पर्याय उभे राहतील. 

चीनमधील लॉकडाउनमुळे खनिज तेलाची मागणी कमी होऊ शकते. (खनिज तेलाची मुख्य मागणी भारत व चीन या देशांकडून होते). रशियाचे तेल व वायू यांची रसद भारतापर्यंत येण्यास त्रास असला तरी आजकाल ‘ऑइल स्वॅप’ मिळतात, त्याचा प्रीमिअम देऊन ते खरेदी करणे शक्य आहे. अर्थव्यवस्थेचे रहाटगाडगे चालूच राहील. दीर्घपल्ल्याच्या गुंतवणूकदाराला ही वादळे म्हणजे एक संधी आहे. यावेळी दूरदृष्टीने केलेली खरेदी मोठा धनलाभ देऊन जाईल. अल्पमुदतीच्या गुंतवणूकदाराने पुढील चार महिने संयम पाळायचा आहे. शेअर बाजार फार वर जाण्यास मर्यादा आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. अत्यंत चोखंदळ खरेदी करणे अनिवार्य आहे. त्याखेरीज सतत विक्रीच्या, नफावसुलीच्या संधी शोधत राहिले पाहिजे. विकलेला शेअर पुन्हा खालील भावात मिळू शकतो. 

मागे दोन वेळा (पहिल्यांदा सहा ते सात महिन्यांपूर्वी) ‘सकाळ साप्ताहिक’च्या मुखपृष्ठ कथेत ‘इन्व्हीटस’चा पर्याय सुचवला होता. ‘इंडिया ग्रीड’ व ‘पीजीव्हिट’ असे दोन पर्याय आहेत. त्यावेळी त्यांचे भाव अनुक्रमे  ₹    १२६ व ११० होते. आज ते अनुक्रमे ₹    १५० व १४० असे आहेत. भाववृद्धी सोबत दर तीन महिन्यांनी मिळणारा लाभांश आहेच. मे महिन्यातील लाभांश वाटपानंतर दोन्ही बॉण्ड थोडे खाली येतील, त्यावेळी त्यांच्या विचार करायला हरकत नाही.

गेल्या तीन महिन्यांत किमान तीन कंपन्यांनी विलीनीकरण जाहीर केले. एचडीएफसी बँक व एचडीएफसी, झी टेलीफिल्म्स व सोनी आणि पीव्हीआर व आयनॉक्स. त्यातील एचडीएफसी बँकेचे एकत्रीकरण खास गाजले कारण निर्देशांकात वजन असल्यामुळे निफ्टीने तत्कालीन उच्चांक केला होता. पण ह्या तीनही वेळा विलीनीकरणाची बातमी आल्यावर तेजी एकच दिवस टिकली. यातून संयमाचे महत्त्व पटावे. ‘झी’कडे प्रादेशिक भाषेतील चित्रपट (किमान ४८०० टायटल्स)  व मालिकांचा प्रचंड मोठा संचय आहे. ‘सोनी’चे दर्शक प्रामुख्याने हिंदीभाषक आहेत. ही एकत्रित दर्शकसंख्या ह्या होणाऱ्या नव्या वाहिनीचे मोठे बलस्थान होऊ शकते. संपूर्ण भारत क्रिकेटवेडा आहे. कोविडमुळे कितीही निर्बंध आले तरी आयपीएल टीव्हीवर बघणारे वाढतातच. त्यात आता लाइफस्टाईल बदलामुळे घरटी किमान दोन टीव्ही संच आहेतच, त्याशिवाय स्मार्ट फोन, ओटीटी चॅनेल्स यांचा सुकाळ आहे. विलीनीकरणानंतर ‘आयपीएल’चे हक्क घेणे व त्यानिमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणे सोनीला शक्य आहे. झीच्या प्रवर्तकांच्या काही अडचणी वेळ खाऊ शकतात. किमान दोन ते तीन वर्षे वाट पाहण्याची तयारी ठेवून अभ्यासावा असा हा शेअर आहे. तसेच आयनॉक्स व पीव्हीआर एकत्र आल्यावर मल्टीप्लेक्स बाजारपेठेत त्यांचा हिस्सा ४६ टक्के असेल. निर्मात्यांबरोबर वाटाघाटी करताना अधिक माप पदरात पाडून घेता येईल. दोन्ही शेअरची आज जरी पीछेहाट झालेली दिसत असली, तरी खालच्या भावात, पुढे होणारे लाभ लक्षात घेऊन विचार करायला हरकत नाही. 

या लेखमालेतून बांधकाम क्षेत्राकडे वारंवार लक्ष वेधले आहे. नुकतेच बंगलोरस्थित प्रेस्टीज इस्टेटसने २०२१-२२ आर्थिक वर्षातील आपल्या कामगिरीचा आढावा घेतला. बांधकामाच्या सुरूवातीसच  ₹    १० हजार कोटी रुपयांचे बुकिंग वेधक आहे. (बुकिंग पण विक्री नाही, कारण बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय विक्री  होत नाही), पुढील वर्षाचे निर्धारित लक्ष्य १५० लाख स्क्वेअर फूट बांधकामाचे आहे. ओबेरॉय, लोढा या शर्यतीत थोडे मागे पडल्यासारखे झाले आहेत. व्याजदर वाढणे ही एक चिंतेची बाजू असली तरी या क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली आहे, हे लक्षात घेऊन खरेदी ठरवायला हवी. 

फ्युचर समूहाचा रिलायन्स बरोबरचा करार फिसकटला. हा समूह आता एनसीएलटी पुढे दिवाळखोरीच्या कार्यवाहीला सामोरा जाईल. ‘एफईएल’वर पाट हजार कोटींचे कर्ज आहे. जनरालीच्या भागीदारीतला कंपनीचा विमा व्यवसाय विकून  तीन हजार कोटी उभे राहतील. शिल्लक कर्जाची पुनर्बांधणी शक्य आहे.  असे जरी असले तरी वित्त पुरवठादार आपली मागणी सोडतील असे वाटत नाही. गेले काही दिवस व्हॉट्‌सअॅपवर हा शेअर खरेदीसाठी सुचवण्यात येत आहे. छोटा गुंतवणूकदार ‘पाच रुपयांत काय वाईट आहे?’, असे स्वतःचे समाधान करून घेत त्याला बळी पडू शकतो. असे अनेक पडेल शेअर सुचवले जातात. काही वेळा बाजाराच्या मानसिकतेमुळे आणि नशिबामुळे त्यात पैसेही मिळतात. मालमत्तेपेक्षा कर्जे जास्त असतील तर भागधारकाच्या पदरी काही पडण्याची शक्यता कमी, हे येथे बघितले पाहिजे. समोर तारण असल्यास कुठलाही  ऋणको आपले भांडवल सहसा सोडत नाही. एनसीएलटी लवादापुढे कर्जबाजारी कंपनी जेव्हा येते तेव्हा कमी किमतीला मिळणारा व्यवसाय जर पूरक असेल तर तो घेण्यासाठी सक्षम उद्योग पुढे येतात, पण त्यातही मूल्य देताना भागधारकाला बाजूला ठेवून बाकीची मालमत्ता स्वस्तात मिळाल्यासच  व्यवहार होतो. त्यात नाममुद्रा, तितकी उत्पादन क्षमता स्वतः उभी करण्यासाठी लागणारा वेळ वगैरेंचा विचार होतो. भागभांडवलाची किंमत शून्यच धरली जाते. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीतच भागधारकाला रुपयाला दहा पैसे मिळू शकतात. त्यामुळे अशा अनाहूत टीपने उल्हासून शेअर खरेदी करून मालामाल होण्याचे दिवास्वप्न बघण्यापेक्षा अधिक अभ्यास करून, आजारी कंपनी लवादापुढे न जाता कोणी आग्रहित करीत असेल तरच विचार करावा, असा सावधगिरीचा इशारा. 

गुंतवणूकदार चातकासारखे वाट पाहात असलेली ‘एलआयसी’ची भागविक्री ४ मे पासून होणार आहे. किंमत पट्टा व्यवहार्य वाटतो. फक्त विक्रीसाठी असलेला हिस्सा कमी केल्यामुळे, पुढे भाव वाढले तर सरकार पुन्हा विक्रीसाठी तयार असेल ह्या ‘टांगत्या तलवारी’ची जाणीव असलेली बरी.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या