रात्रंदिन आम्हा...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 9 मे 2022

अर्थविशेष

सध्या तरी मंदीवाल्यांची सरशी झाल्यासारखी वाटते आहे. पण आपणच संयम ठेवून ही सरशी काही काळापुरतीच आहे, ह्याची आठवण ठेवली पाहिजे. तात्पुरत्या खाली आलेल्या शेअरचे ‘खानदान’ व कामगिरी बघूनच त्यात गुंतवणूक केली पाहिजे.

युद्ध एकीकडे मनात सुरू आहे, तर दुसरीकडे बाह्य जगात सुरू आहे. सतत होणाऱ्या जीवघेण्या  आघातांचे निवारण आम्ही करत आहोत. ते आघात परतवून लावत आहोत.

गुंतवणूकदाराचा सर्वात मोठा शत्रू आहे त्याचे मन! ‘मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल...’ असे म्हटलेच आहे. मागील लेखात (साप्ताहिक सकाळ- ७ मे) तीन मोठ्या अर्थवादळांचा उल्लेख केला होता. ह्या बातम्या समोर येतात आणि त्यापाठोपाठ येतात अनेक मते. सोबत व्हॉट्सअॅप फॉरवर्ड. मग निफ्टीचे भविष्यातले नवनवे तळ सांगण्यात येतात. जोडीला काही नमुनेदार दृक्श्राव्य माध्यमे आहेतच. स्वतःचे मनच वैरी होऊन दीर्घकाळ सांभाळलेले चांगलेचुंगले शेअर विकले जातात, हातातून निघून जातात. ही वादळे ओसरली आणि आपण विकलेले शेअर पुन्हा एकदा वर जाताना पाहिले तर पश्चात्तापापलीकडे हाती काही उरत नाही. विक्रीकडे ओढ घेत असलेले, आपले मन ताब्यात ठेवले तरच दीर्घकाळात मोठा लाभ संभवतो. आपण रात्रंदिन म्हणतो कारण,  रात्री अमेरिकी बाजारांचे शिरकाण पाहायचे आणि दिवसा आपल्या बाजारात कत्तल होण्याची वाट बघायची! असो!!

शेअर खरेदी ही त्या उद्योगातील भागीदारी आहे ह्याची जाणीव ठेवून पडत्या भावात विक्री करताना दहा वेळा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा.  

दुसरे युद्ध, जे बाह्य जगात सुरू आहे, ते आहे तेजी आणि मंदिवाल्यांमध्ये. सध्या तरी मंदीवाल्यांची सरशी झाल्यासारखी वाटते आहे. पण आपणच संयम ठेऊन ही सरशी काही काळापुरतीच आहे, ह्याची आठवण ठेवली पाहिजे. तात्पुरत्या खाली आलेल्या शेअरचे ‘खानदान’ व कामगिरी बघूनच त्यात गुंतवणूक केली पाहिजे.    

आता दोन शब्द निर्देशांकाविषयी. गेल्या आठवड्याच्या शुक्रवारी (ता. २९ एप्रिल) संपलेल्या सप्ताहात मागील आठवड्याच्या तुलनेत दोन्ही निर्देशांक कांकणभर खालीच आले. सेन्सेक्स ५७,१९७ वरून ५६,३५६ तर निफ्टी १७,१७१ वरून १७,१०२ चा बंद देती झाली. (सरासरी १.५ व ०.४ टक्के घसरण) अमेरिकी बाजाराचे याच दरम्यान झालेले शिरकाण बघितले, तर आपले बाजार वरचढ आहेत याचे समाधान होते. याच दरम्यान डाऊ जोन्स निर्देशांक २.४ टक्के घसरला, तर नॅसडॅक ३ टक्के खाली आला. लक्षात घेण्याजोगी एक बाब म्हणजे, दोन्ही अमेरिकी निर्देशांक २०० दिवसांच्या चलसरासरीच्या खाली आहेत. आलेखाप्रमाणे हे बाजाराच्या मंदीचे लक्षण आहे. आपले निर्देशांक अजून मंदीत गेलेले नाहीत. पण कधीही जाऊ शकतात. ‘राजा बोले प्रजा डोले’ असे म्हणतातच. 

कोविड साथीच्यावेळी अर्थव्यवस्था आजारी असताना शेअर बाजार तेजीत होते. आता आपली अर्थव्यवस्था चांगली उभारी घेत आहे. कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता कमी होत चालली आहे. आलीच तर ती सौम्य असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. बाकी उद्योगांची कामगिरी अपेक्षेपेक्षा उत्तम होत आहे. बँकांचेही अनार्जित कर्जांचे प्रश्न आटोक्यात येत आहेत, असे दिसते. वानगीदाखल अॅक्सिस बँक व इंडसइंड बँकेचे तिमाही निकाल बघू. अॅक्सिस बँकेच्या अनार्जित कर्जासाठीच्या तरतुदी कमी झाल्या आहेत. चौथ्या तिमाहीचा नक्त नफा अपेक्षेपेक्षा किमान १५ ते १६ टक्के जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५पर्यंत भागभांडवलावर किमान १८ टक्के परतावा अपेक्षित आहे. विशेष म्हणजे ढोबळ मालमत्तेवर बँकेचे उत्पन्न किमान १.६ टक्के असणार आहे. ही सगळी आकडेवारी गोजिरवाणी असूनही शेअर बाजाराने वरील निकालांकडे पाठ फिरवली आहे. बारा हजार ३२५ कोटी रुपये खर्चून सिटी बँकेचा व्यवसाय विकत घेणे बाजाराच्या पसंतीस उतरले नसावे. बँकेचे पदाधिकारी मात्र अत्यंत उल्हसित व उत्साहित आहेत. सिटी बँकेचा व्यवसाय विकत घेतल्यामुळे ३० लाख नवे ग्राहक, २५ लाख क्रेडीट कार्ड घरात येतील, आणि म्युच्युअल फंड, विमा आदी थर्ड पार्टी सेवा आता विकता येतील. हा व्यवसाय अॅक्सिस बँक अत्यंत आग्रही पद्धतीने करते. किमान २५० कोटी  रुपयांचा नफा यातून तत्काळ अपेक्षित आहे. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या नापसंतीची दखल घेऊन, अधिक आकर्षक किमतीला हा समभाग मिळू शकेल असे वाटते. ₹   ६५० ते ७०० ही किंमत व्यवहार्य वाटते. आपल्या सल्लागाराला विचारूनच निर्णय घ्यावा. 

इंडस इंड बँकेची कथा पूर्ण वेगळी आहे. जेमतेम काठावर पास होईल असे भाकीत असलेला विद्यार्थी प्रथम श्रेणीत यावा, तसे झाले. अतिसूक्ष्म वित्त पुरवठ्याच्या (मायक्रोफायनान्स) सर्व व्यथा आटोक्यात आल्यासारखे दिसते. तसेच व्यापारी वाहन उद्योगही चमकदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. त्या क्षेत्राच्या  वित्त पुरवठ्यात, तरतुदींचे प्रमाण कमी राहील अशीही अपेक्षा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मिळकतीत ५५ टक्के वाढ, मागील तिमाहीच्या तुलनेत ९ टक्के वाढ उत्साहवर्धक आहे. बाजारानेही निकालाचे हसून स्वागत केले आहे. 

ए यू फायनान्स बॅंकेचेही तिमाही निकाल छान आहेत. फक्त राजस्थानात बस्तान बसवलेली ही बँक आता मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगण अशा राज्यांत शाखाविस्तार करीत आहे. मागील वर्षांच्या व मागील तिमाहीच्या तुलनेत निकाल उत्साहवर्धक आहेत. कासा गुणोत्तर ३७ टक्के आणि ५.७ टक्के व्याजदराची मार्जिन, नक्त नफा ८८ टक्के वृद्धी दाखवीत ₹   ११३० कोटी आणि ०.५ टक्के अनार्जित कर्जे, या बँकेकडे आकर्षित करीत आहेत. या निकालाबरोबरच बँकेने एकास एक बोनस दिला आहे. इपीएस ३६ रुपये आणि पी/ई  ३८, तर पी/बी ७ रुपयांच्या वर असलेली ही बँक अत्यंत महाग मूल्यांकनाला बाजारात मिळते. त्या तुलनेत इंडस इंड बँक सर्वात स्वस्त आहे. अदमासे साठ रुपयांचे उपार्जन, पी/ई १७ , पी/बी १.८ आणि बाजारभाव १०१८ रुपये. उणे बाजू एकच, प्रवर्तकांचे ४५ टक्के शेअर कर्जापोटी दिले आहेत (प्लेज केले आहेत). जसजसे हे शेअर कर्जातून सुटतील तसतसा बाजारभावावर सकारात्मक परिणाम होईल. या सर्व बँकांचा तुलनात्मक अभ्यास करून निर्णय घेतलेला चांगला. (याबरोबर सध्या भाव खाली आल्यामुळे एचडीएफसी बँकही २०.५ चा पी/ई व ३.७ च्या पी/बी ला मिळत आहे.)

सरकारने निर्गुंतवणूक मनावर घेतलेली दिसते. तीन वेळा नकार मिळालेल्या, तोट्यात असलेल्या पवन हंस हेलिकॉप्टरचे हस्तांतर स्टार मोबिलिटी कंपनीला करण्यात येईल. सरकारचा ५१ टक्के हिस्सा ₹   २११ कोटीला विकला जात आहे. उरलेला ४९ टक्के हिस्सा ‘ओएनजीसी’कडे आहे. विरोधी पक्ष, हा सर्वच हिस्सा ‘ओएनजीसी’ला का विकला नाही, अशी ओरड करीत आहेत. आपला व्यवसाय सोडून ‘ओएनजीसी’ने हेलिकॉप्टर बिझनेस करावा काय? हा कळीचा मुद्दा आहे. असो. 

‘अंबुजा सिमेंट’ गेल्या महिनाभरात ९० रुपये वाढला आहे. अचानक आलेली ही तेजी, हाती आलेल्या बातमीप्रमाणे, सज्जन जिंदाल समूहाने ही कंपनी खरेदी करायची ठरवल्यामुळे आली आहे. अर्थात त्यासाठी त्यांना काही कर्ज उभारणी करावी लागेल. अंबुजाकडे ३१ दश लक्ष टन सिमेंट उत्पादन क्षमता आहे. होल्सिम या स्विस कंपनीने २००४ साली अंबुजा व एसीसी सिमेंटचे आग्रहण केले. त्यायोगे जगातला सर्वात मोठा सिमेंट उत्पादक म्हणून मानही मिळवला होता. आता मात्र होल्सिम कंपनी भारतातील सर्व मालमत्ता विकायचे ठरवीत आहे. अडानी, बिर्ला आदी बडी मंडळी या शर्यतीत आहेत, असे अनधिकृतरीत्या कळते. ₹   ३७० ते ३८० रुपयांच्या वाढीव किमतीला हा समभाग छोट्या गुंतवणूकदाराने नव्याने विकत घ्यावा का? हा मुद्दा आहे. एव्हढी मोठी उत्पादन क्षमता असल्यामुळे या बड्या मंडळींची रस्सीखेच सुरू असताना भाव अधिक वाढू शकतो. त्यामुळे नव्याने विकत घेण्यापेक्षा असलेले शेअर सांभाळलेले बरे. भाव बघून पुढचा सौदा करता येईल.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक 
गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. 
शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या