चाहूल की ‘हूल ’

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 4 जुलै 2022

शेअर बाजार आता किती खाली येईल याचा विचार न करता इथून पुढे जोखीम/ परतावा गुणोत्तर कसे आहे, हे बघणे महत्त्वाचे आहे. शेअर बाजार खाली आल्यास टप्प्याटप्प्याने प्रत्येक खालच्या पातळीवर गुंतवणूक केली पाहिजे. तसेच निफ्टी तिच्या दीर्घ पल्ल्याच्या टार्गेटपर्यंत थांबायची तयारीही ठेवली पाहिजे. असा विचार केल्यास गुंतवणूक सोपी होईल व त्यात अपेक्षाभंग होणार नाही.

मागील लेखात अचानक आलेल्या तेजीबद्दल लिहिले होते. ती औटघटकेची आहे की आठवडाभर चालेल ह्याचा अंदाज येत नव्हता. पण गुंतवणूकदारांना दिलासा देत गेल्या सप्ताहात जवळजवळ रोजच (एका दिवसाचा अपवाद वगळता ) निर्देशांक तेजीतच होते. मार्केटची ब्रेड्थही चांगली सशक्त होती. या लेखमालेत सतत अधोरेखित केलेल्या वाहन उद्योगाचे शेअरही समाधान देऊन गेले. 

मंगळवारी शेअर बाजार नकारात्मक सुरुवातीनंतरही मामुली का होईना पण तेजीतच बंद झाला. निफ्टीचा १५८५० व सेन्सेक्सचा ५३१७७ चा बंद आश्वासक आहे. वर जाणाऱ्या शेअरचे प्रमाण खाली जाणाऱ्या शेअरपेक्षा अधिक होते. (१०३२:९०१). मिड कॅप निर्देशांकही थोडीशी तेजी दर्शवत होता. साहजिकच प्रश्न उभा राहतो की ही बाजाराची चाल निव्वळ ‘हूल’ आहे की ‘तेजीची चाहूल’ आहे. शेअर बाजाराच्या सर्व घटकांचा अभ्यास करता व आलेखातील निरनिराळे सूचक (इंडिकेटर) बघता ही तेजीची चाहूल असण्याची शक्यता वाटते. त्याची काही कारणे-

    रोजच्या ट्रेडिंगचा  डेटा बघता  बरेचसे ‘सूचक’ शेअर बाजारातील अतिविक्रीमुळे हैराण (ओव्हरसोल्ड) झालेले दिसतात .  

    सतत वाढणाऱ्या सर्वच धातूंच्या किमती चांगल्याच घसरल्यामुळे उद्योगविश्वात उत्साह संचारेल अशी बाजाराची धारणा. लंडन मेटल एक्स्चेंजमध्ये तांबे $११ हजार प्रती टनावरून $८,२४० , अॅल्युमिनियम $३,९८४वरून $२,४५०, टीन $५० हजारपासून $२६,००० तर निकेल $४३,००० वरून $२३ हजारांपर्यंत घसरले. इतरही धातूंचे भाव असेच खाली आले. त्याबरोबर भारत सरकारनेही निरनिराळे आयात निर्यात निर्बंध लादल्यामुळे पोलाद व तत्सम सर्व उत्पादने त्यातल्यात्यात वाजवी किमतीला आली. कमोडिटी बाजाराचा हा अवतार बघता वाहन उद्योग नक्कीच उभारी धरेल असे बाजाराला वाटले. 

    कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यास साहजिकच महागाई दर कमी होईल व पुढील व्याजदर वाढ तितक्या घाईघाईने होणार नाही ही अपेक्षा. 

    चीनने लादलेले कोविड निर्बंध (प्रमुख शहरातील  लॉकडाउन) जगाला बोचत होतेच. ते थोडे सैल केल्याची बातमी आल्यामुळेही बाजाराला थोडे हायसे वाटले असावे. 

    अमेरिकन फेड अशा प्रसंगी मोठ्या बँकांची स्ट्रेस टेस्ट 

घेत असतो. सर्व मोठ्या बँकांनी ही परीक्षा गुरुवारी पास

केली. त्यातून  आर्थिक संकट  आलेच तर त्यास  तोंड देण्यास बँकिंग क्षेत्र सक्षम आहे असा निष्कर्ष काढण्यात आला. 

    तसेच अमेरिकन व भारतीय अर्थव्यवस्थेतही रोजगार निर्मिती वाढत आहे असे वृत्त आहे. तेही तेजीला चालना देणारेच आहे. 

अर्थात याचा अर्थ असा नव्हे की आता बाजार मागे वळून पाहणारच नाही. तेजी-मंदीचे हे युद्ध चालूच राहील. मंदीवाले पुन्हा जोर धरतील, पुन्हा एकदा तंबूत घबराट करतील व निफ्टीला १५०००पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न करतील. यावेळी जर निफ्टीने नवा, अधिक खोल तळ केला नाही, तर शेअर बाजारात सारे आलबेल होण्याची सुरुवात झाली आहे असे समजता येईल. (जुना तळ १७ जून रोजी १५१८३ असा लागला होता). या सर्व प्रवासाला ३ ते ४ महिने लागावेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील पेच कसे सुटतात यावर हा कालावधी कमीजास्त होऊ शकतो. 

तात्पर्य असे की शेअर बाजार आता किती खाली येईल याचा विचार न करता इथून पुढे  जोखीम /परतावा गुणोत्तर कसे आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.  या पातळीवरून निफ्टी १००० ते १५०० अंश खाली येऊ शकते. ती जोखीम घ्यायची तयारी हवी, त्यासाठी शेअर बाजार खाली आल्यास टप्प्याटप्प्याने प्रत्येक खालच्या पातळीवर गुंतवणूक केली पाहिजे. तसेच निफ्टी येथून किमान ४ ते ५ हजार अंश वर जाऊ शकते. दीर्घ पल्ल्याचे निफ्टीचे टार्गेट किमान वीस हजार आहे. तिथे निफ्टी पोहोचेपर्यंत थांबायची तयारी ठेवली पाहिजे. असा विचार केल्यास गुंतवणूक सोपी होईल व त्यात अपेक्षाभंग होणार नाही. 

थोडक्यात काय, येऊ दे निफ्टीला खाली; मग करीन मी गुंतवणूक! असे म्हणून चालणार नाही. निफ्टीचा तळ काय असेल हे कोणीच सांगू  शकणार नाही. आपण फक्त अंदाज बांधू शकतो. भारताच्या नेतृत्वावर, तरुण लोकसंख्येवर आणि अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवूनच शेअर बाजार व त्यावर आधारित म्युच्युअल फंड्स आपलेसे केले पाहिजेत. हे विवेचन येथे करण्याचे प्रमुख कारण म्हणजे काही नवगुंतवणूकदार सतत विचारणा करत असतात की या तेजी-मंदीच्या भरती ओहोटीत केव्हा पाय ठेवावा ते कसे ठरवायचे ? 

म्युच्युअल फंडात वरील प्रमाणे टप्प्याटप्प्याने किंवा सिपमार्फत गुंतवणूक करणे तर नक्कीच सोपे आहे. प्रत्यक्ष शेअर बाजारात गेल्या वर्षी सर्वांना पैसे मिळाले, या पुढे मिळवायचे असतील तर थोडा अभ्यास करावा लागेल हे नक्की. निफ्टीच्या पन्नास शेअरपैकी अभ्यासपूर्वक किमान पाच शेअर निवडावे. दोन आठवड्यांपूर्वी लिहिलेल्या लेखात ‘महिंद्रा आणि महिंद्रा’, ‘मारुती’, तसेच ‘एबीबी’, ‘सिमेन्स’ व त्यापुढील लेखात ‘रिलायन्स’, ‘टाटा कन्झ्युमर’ ह्यांचा उल्लेख केला होता. ते सारेच थोडेफार वाढले आहेत. तरी थोडा दम धरून त्यात अभ्यासांती गुंतवणूक करता येईल. 

मागील वर्षी बांधकाम क्षेत्राकडे लक्ष वेधले होते. ९ जुलै २०२१ रोजी रियल्टी क्षेत्राचा निर्देशांक ३७०च्या आसपास होता. ते क्षेत्र आम्ही ‘हॉट’ म्हणून अधोरेखित केले होते. तो निर्देशांक पुढील चारच महिन्यात ५७० ला गवसणी घालता झाला. ही जवळपास ५० टक्के वाढ झाली. या निर्देशांकात ‘डीएलएफ’, ‘प्रेस्टीज’, ‘ओबेरॉय’, ‘गोदरेज प्रॉपर्टी ब्रिगेड’, ‘सोभा’ इत्यादी शेअर येतात. हा निर्देशांक पुन्हा ३७०-३८० च्या जवळ आला आहे. हा पट्टा वरीलपैकी एखादा चांगला शेअर खरेदी करण्याचा आहे. त्यात चांगली नाममुद्रा असलेला ‘ओबेरॉय’ तसेच याच श्रेणीत चांगली कमर्शिअल व राहती घरे बांधणारे ‘प्रेस्टीज इस्टेट’, ‘डीएलएफ’ यांचा विचार करता येईल . 

सोबत आलेख दिले आहेत. पुन्हा हा निर्देशांक ५५० होऊ शकतो. त्या निर्देशांकातील शेअरना तेजीत काय भाव मिळतील हे त्यांच्या गेल्या वर्षातील सर्वोत्तम भाव बघून ठरवता येईल. 

ह्या महिन्यात किंवा पुढील तीन महिन्यात शेअर बाजार जसजसा खाली येईल तसा दबा धरून खरेदी करता येईल. अंतिम विजय गुंतवणूकदाराचाच आहे.  ‘साहसे वसते लक्ष्मी’ हे वचन ध्यानी घ्यावे!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या