लगे रहो मुन्नाभाई...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 25 जुलै 2022

गेल्या आठवड्यात १६०००च्या थोडेसेच खाली जात निफ्टी पुन्हा खरेदीमुळे तरारली. शुक्रवार १५ जुलैचा निफ्टीचा बंद थोडी आशा लावून गेला आणि सोमवारी १८ तारखेला त्यावर कळस चढला. मंगळवारी ‘अगं अगं म्हशी’ करीत तेजी आलीच.

आता हेच बघा ना, मागील मंगळवारी १२ तारखेला (आपल्या) रात्री अमेरिकी बाजार नर्व्हस झाले. निमित्त होते खनिज तेल १०० डॉलरच्या खाली गेल्याचे आणि महामंदीच्या भीतीने अमेरिकन व त्यापाठोपाठ जगभरचे बाजार कोसळल्याचे. ‘एचसीएलटेक’चे तिमाही निकाल हाती आले, कंपनीची विक्री वाढली तरी नफा ४ टक्के कमी झाल्यामुळे शेअर बाजाराने त्याला नापास केले. कारखान्यांचे उत्पादन (आयआयपी) १९.६ टक्के वाढल्याची बातमी आली, धातूंचे भाव कमी झाले, पण बाजार रुसलेलाच! पुढे बुधवारी बातमी आली की परदेशी संस्थांनी फ्युचर्समधील मंदी कमी केली. पण तरीही डॉलर दमदार होत गेला आणि त्याबरोबर सारे शेअर बाजार घसरत गेले. गुरुवारी गोल्डमन सॅक्सने तांबे ६७०० डॉलर प्रती टन होईल असे निदान करीत धातुबाजारातील मंदीवर शिक्कामोर्तब केले. तरी बाजाराला उभारी येईना! ‘माईंड ट्री’ने अफलातून निकाल दिले. पण नावडत्या सुनेनी कितीही रुचकर स्वयंपाक केला तरी सासूने नाक मुरडावे, तसे ‘माईंड ट्री’चे निकाल बाजाराने केराच्या टोपलीत टाकले अन्‌ सब घोडे बारा टक्के करीत आपला विक्रीचा मोर्चा मिडकॅप आयटी स्टॉककडे वळवला ! 

सारखं काहीतरी होतंय आणि ते विस्कटून सांगता येत नाही अशी अवस्था! रोजच बाजार खाली, पण बंद मात्र वरचा द्यायचा प्रयत्न करायचा. काही फार चांगले होत नाही, असे  बघत असताना शेअर बाजारावरचा विश्वास टिकवून ठेवणे हे मोठे कठीण काम होते. आम्ही मात्र गुंतवणूकदाराला धीर देत होतो. एकच मंत्र पुन्हा पुन्हा उगाळत होतो! लगे रहो मुन्नाभाई!! 

मागील लेखात (सकाळ साप्ताहिकः प्रसिद्धी १६ जुलै २०२२) आम्ही नमूद केले की ‘फारा दिवसांनी मिळालेली ही संधी तेजीवाले सहजासहजी सोडणार नाहीत. प्रत्येकच वरच्या पातळीवर थोडीफार विक्री होणारच. ते गृहीतच धरायला हवे. कदाचित खाली १६०००ला स्पर्श करून निफ्टी पुन्हा वरची वाट धरेल. थांबा, पहा आणि पुढे जा ! असेच धोरण हवे’. अंदाज चुकला तर ती पुन्हा एकदा खरेदीची संधी असेल. 

नेमके तसेच झाले, १६०००च्या थोडेसेच खाली जात निफ्टी पुन्हा खरेदीमुळे तरारली. शुक्रवार १५ जुलैचा निफ्टीचा बंद थोडी आशा लावून गेला आणि सोमवारी १८ तारखेला त्यावर कळस चढला. मंगळवारी ‘अगं अगं म्हशी’ करीत तेजी आलीच. १९ जुलैचा निफ्टीचा १६३४० आणि सेन्सेक्सचा ५४७६७चा बंद तेजीचेच समर्थन करतोय. हे मंदीतील तेजीचे आवर्तन, निर्देशांकाला नवीन उच्चांक देऊन जाणार की १६६०० ते १६८००च्या दरम्यान धाप लागून माघारी फिरणार, ते अजूनही माहीत नाही. कदाचित ही धाव येथे संपेल, पण गुंतवणूकदारांचा व पंटर्सचा आत्मविश्वास नक्कीच वाढवण्याचे काम या तेजीने केले. खरेतर चांगल्या व्यवस्थापनाखालील कर्जभार अत्यल्प असलेले शेअर सतत खालच्या पातळीवर जमा करीत राहणे हे सर्वोत्तम! असो.

बँक निफ्टीने पुढाकार घेत मंदिवाल्यांवर आक्रमण केले, त्या तेजीच्या साथीत अनेक दिवसांची मंदी धुडकावून लावत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने जोशात पुढील वाटचाल सुरू केली, वाहन उद्योग तर तेजीत होताच! आणि पाहता पाहता निफ्टी १६३४० अंशावर बंद झाली. काही अघटित घडले नाही तर महिना अखेरपर्यंत तरी तेजीवाल्यांचा हा आत्मविश्वास टिकावा. 

सध्या जागतिक पुरवठा साखळीत अन्नधान्यादी जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. सोमालिया, सुदान, येमेन, श्रीलंका, नायजेरिया असे अनेक देश वंचित आहेत. भारताकडे गहू व तांदळाचा अमाप साठा असल्यामुळे भारताने माणुसकीच्या दृष्टीने गव्हाची निर्यात सुरू केली होती. नेमके याच वर्षी गव्हाचे पीक कमी आल्यामुळे व देशांतर्गत भाव एका पातळीवर राहावे असे धोरण असल्यामुळे निर्यातबंदी लादली गेली. यावर जी-७ देशांनी बरीच टीका केली. नुकतेच अर्थमंत्र्यांनी जी -२० देशांच्या बैठकीत सरकारी गोदामातील गहू आम्हाला विकू द्या, असे साकडे घातले. (तसे करणे करारानुसार चालत नाही) त्यावरही बरीच टीका चालू आहे. ती काही प्रमाणात योग्यही आहे. खरे काय ते कळण्यासाठी या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवे.

  • प्रथमतः सरकारने हा गहू शेतकऱ्यांकडून जुलूम जबरदस्ती करून गोळा केलेला नाही. 
  • कुठलाही शेतकरी गहूच काय पण कुठलेही धान्य, बाजारभाव वरचढ असताना सरकारी गोदामात नियंत्रित किमतीवर पाठवणार नाही. 
  • म्हणजेच बाजारभाव पडलेले असताना हा गहू सरकारला विकत घ्यावा लागतो, साठवावा लागतो. कीड, उंदीर आदी प्राण्यांचा बंदोबस्त करून व मुख्य म्हणजे तो सडू न देता एक दोन हंगाम, पुढील पीक येईपर्यंत टिकवावा लागतो. 
  • सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ जुलै रोजी गव्हाचा साठा किमान पातळीच्या १० लाख टन वर होता. या वर्षी गव्हाचे पीक कमी आले आणि काही लागवड तांदळाकडे वळवली गेली. तसेच बाजारभाव अधिक असल्यामुळे सरकारला शेतकऱ्यांनी गहू विकला नाही. सरकारी खरेदी चालूच आहे व त्यामुळेच किमान दहा लाख टन गहू निर्यात करू द्या, ही सरकारची मागणी. (ती अर्थात अजून मान्य झालेली नाही.)

यावर दोन मार्ग निघू शकतात एक तर सरसकट निर्यातबंदी उठवावी व खासगी व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना गहू निर्यात करू द्यावा; सरकारनेही करावा. पण त्याचा तोटा असा की देशांतर्गत भाव वाढून, सणासुदीला हे मुख्य धान्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाईल. 

दुसरा मार्ग म्हणजे, शक्य असेल तिथे तांदूळ निर्यात करावा. त्याचा प्रचंड साठा गोदामात आहे. याखेरीज २३१ लाख टन तांदूळ भरडण्यासाठी तयार आहे. नाही तरी सरकार स्वस्त धान्य दुकानातून व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून गव्हाऐवजी तांदूळ पुरवतेच आहे. आफ्रिका व आशियातील उपासमारीचा आपल्याला एव्हढाच कळवळा असेल तर हे करता येईल.

या प्रश्नाला अजून एक आयाम आहे. गहू, तांदूळ व ऊस ही पिके प्रचंड पाणी पितात. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या देशातून ही धान्ये निर्यात करणे कितपत योग्य आहे याचाही विचार केला पाहिजे . 

असो. सिलॅबसच्या बाहेरील विषयावर माझ्या अल्पमतीप्रमाणे केलेले विवेचन पुरे झाले. मुद्दा इतकाच, की रुपयामधील आयातनिर्यात असो, निर्यात वाढवून व खुल्या बाजारात डॉलर विक्री करणे असो किंवा व्याजदर वाढवणे असो; रुपयाची घसरण थांबली पाहिजे. रुपया व डॉलरचा आजचा विनिमय दर परदेशी संस्थांच्या खरेदीसाठी अत्यंत आकर्षक आहे. मुख्य म्हणजे रुपया प्रथम स्थिर राहून पुढे बळकट व्हायला हवा तरच आजच्या आकर्षक मूल्यांकनाला परदेशी संस्था शेअर बाजारात खरेदीला उतरतील. 

परदेशी संस्थांनी दोन लाख पन्नास हजार कोटींची विक्री केली असताना शेअर बाजार फक्त १२ ते १५ टक्के खाली आले. याचे श्रेय आपण छोट्या गुंतवणूकदाराकडून सिपमार्गे म्युच्युअल फंडात येणाऱ्या भांडवल ओघाला देतो. त्याबरोबरच भविष्य निर्वाह निधी (EPF) मधून इक्विटी बाजारात होणारी गुंतवणूकही लक्षात घेतली पाहिजे. सध्या एकूण भांडवलापैकी १५ टक्के गुंतवणूक शेअर बाजारात होते. ती मर्यादा २० टक्क्यांवर नेण्याचे घाटते आहे. तसे झाल्यास भविष्य निर्वाह निधीतील अतिरिक्त ५ टक्के हिस्सा खरेदीसाठी येईल. याखेरीज राष्ट्रीय पेन्शन योजनेतील इक्विटी गुंतवणुकीचा हिस्सा ५० टक्क्यांऐवजी ७५ टक्के निवडण्याचे स्वातंत्र्य (पन्नास वर्षांच्या खाली वय असल्यास) निवेशकाला मिळते आहे. या सारख्या निर्णयामुळे तेजीला बळच मिळते.

ही तेजी काही दिवस तरी टिकावी. जशी आपण प्रत्येक खालच्या टप्प्यावर खरेदी करायला सुचवीत होतो, तसेच टप्प्याटप्प्याने विक्रीही करता आली पाहिजे. दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक एका बाजूला ठेवून त्याव्यतिरिक्त वेळोवेळी खरेदी विक्री करत राहिल्यास, बाजारात मनही रमते आणि दोन पैसेही गाठीशी राहतात.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या