पेट्रोलियम कंपन्या तेजीत

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 21 जून 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
 

मागचा लेख लिहिल्यानंतर मंगळवारी १२ जूनला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरिया या कम्युनिस्ट राज्याचे सर्वेसर्वा अध्यक्ष किम जॉन युन यांची सिंगापूर येथे ऐतिहासिक बैठक झाली. अण्वस्त्रे बाळगून उत्तर कोरिया अनेक वर्षे अमेरिकेला वाकुल्या दाखवत होता व अमेरिका वेळ पडल्यास प्रचंड युद्ध सुरू करण्याची गर्भित धमकी देत होती. पण दोघांनाही सुबुद्धी झाली आणि ही भेट झाली. किम जॉन युन यांनी अण्वस्त्रे म्यान करण्याचे कबूल केले व प्रतिसाद म्हणून अमेरिकेने उत्तर कोरियाला संरक्षण जाहीर केले. आता महायुद्ध वा शीतयुद्धाचा धोका टळला आहे. जगाला दिलासा देणाऱ्या अशा दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी गेल्या ८० वर्षात अनेकदा झालेल्या आहेत. दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी २२ सप्टेंबर १९३८ ला ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान नोव्हेल चेंबरलेन व जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर यांची बैठक झाली होती. (वर्षभरातच दिलेल्या आश्‍वासनाला हरताळ फासून हिटलरने १ सप्टेंबर १९३९ रोजी पोलंडवर हल्ला केला आणि दुसऱ्या महायुद्धाची सुरवात झाली. ते पुढे सहा वर्षे चालले. रशियाचा प्रखर प्रतिकारनंतर ते थांबले. जर्मनी, इटली, जपानने जगावर लादलेले महायुद्ध अमेरिकेने जपानमधल्या हिरोशिमा, नागासाकीवर अणुबाँब टाकल्यावर संपले व मग विजिगोषु ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल, (अमेरिकेच्या अध्यक्षपदी आलेल्या रुझवेल्टनंतर योगायोगाने झालेले अध्यक्ष हेन्री ट्रुमन व रशियाचे सर्वेसर्वा जोसेफ स्टॅलिन यांची इथे बैठक झाली. उत्तर क्‍युबावर हल्ला करण्याच्या विचाराने, आरमार पाठवून क्‍युबाची नाकेबंदी उठवण्यासाठी जॉन केनेडी हे अमेरिकन अध्यक्ष व रशियाचे हुकूमशहा निकिता क्रुश्‍चेव्ह यांची बैठक झाली. (पण ती निष्फळ ठरली) नंतर चीनवरील बहिष्कार उठवून पहिल्यांदाच चीनच्या भेटीला गेलेले रिचर्ड निक्‍सन बरोबर झेडाँग यांची बैठक झाली. ‘शांघाय समझोता’ याचवेळी झाला. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी इराणचे शहा महम्मद पेहेलवी यांची गाठ घेऊन इराणला ‘स्थैर्याचे बेट’ म्हणून संबोधले. कार्टर यांना नंतर अनेक वर्षे या शब्दांनी सळो की पळो केले होते.  २५ मार्च १९७९ ला आणखी एका ऐतिहासिक बैठकीत इस्त्राईलचे पंतप्रधान मेनॅचेम बोगन व इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादर यांनी तह पुकारण्यासाठी गाठभेट घेतली. ती कॅंप डेव्हिड इथे झाली होती. त्यानंतर ८ नोव्हेंबरला अमेरिकन अध्यक्ष रोनाल्ड रेगन 

(जे प्रथम अभिनेता म्हणून प्रसिद्ध होते व ज्यांनी रशियाला तोडीस तोड म्हणून ‘स्टार वॉर्स’ची अंतराळतल्या लढाईची तयारी ठेवली होती.) व रशियन सर्वेसर्वा मिखाईल गोर्बोचेव्ह यांची गळाभेट झाली. यावेळी दोघांत शस्त्रसंधी करार झाला. 

१३ सप्टेंबर १९९३ ला इस्राईलचे पंतप्रधान इझेक रॉबिन व पॅलेस्टाईन नेते अराफत यांनी शांती करारावर सह्या घेतल्या. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी यांनीही पाकिस्तानच्या शरीफ यांची १९९९ मध्ये घेतलेली भेट १८ एप्रिल २००९ ला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांची गाठ घेऊन दोन देशातील तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. या अनेक भेठीगाठींनी त्या त्यावेळी तरी जगाने तणाव निवळण्याचा आनंद व्यक्त केला होता. डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे अध्यक्ष यंदा नोबेल शांती पुरस्काराचे मानकरीदेखील ठरू शकतील. युद्धाची खुमखुमी असणाऱ्या ट्रम्पना नोबेल मिळणे हा एक चमत्कार समजावा लागेल.

जागतिक पडद्यावरून पुन्हा भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल विचार केला, तर येत्या पाच वर्षात नरेंद्र मोदी भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ दहापेक्षा जास्त टक्‍क्‍याने कशी होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट कसे होईल यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यांचे सहकारी नितीन गडकरी यांच्या दररोज ३० किलोमीटर महामार्ग बांधण्याच्या योजनेमुळे ही वाढ जोरात होणार आहे. उत्तम महामार्गासाठी लागणाऱ्या सिमेंट व पोलाद क्षेत्रातील कंपन्या ऊर्जितावस्थेत असतील. या महामार्गावर वा नजीक अनेक उपाहारगृहे, ढाबे, विश्रांतीगृहे उभी राहतील व रोजगार वाढेल. वाहनांच्या विक्रीत दरवर्षी १५ टक्के चक्रवाढ गतीने वाढ होणार असल्यामुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, ऑईल इंडिया अशा तेल वितरण कंपन्या महामार्गावर सतत नवीन पेट्रोलपंप उभारत असतात. सध्या त्यांचे ५७ हजार पेट्रोलपंप देशात चालू आहेत. येत्या वर्षात त्या आणखी २५ हजार पेट्रोलपंप नव्याने उभारतील. त्यांच्यासाठी कित्येक कोटी रुपयांची गुंतवणूक होईल व दोन ते अडीच लाख रोजगार उभे राहतील. नवीन ट्रान्स्पोर्ट कंपन्यांना व्यवसाय मिळेल. सार्वजनिक कंपन्यांप्रमाणे सध्या ६ हजार पंप असलेली रिलायन्स इंडस्ट्रीजसारखी खासगी कंपनीही काही मार्गावर आपले पंप सुरू करतील. शहरी भागातील एका पंपासाठी बॅंकांमध्ये २५ लाख रुपये तर ग्रामीण भागासाठी पंधरा लाख रुपये बॅंकेत ठेवावे लागतील. 

नुकत्याच भारतात आणि जगात बऱ्याच महत्त्वपूर्ण घडामोडी झाला, त्या सर्वांचा शेअरबाजारावर अप्रत्यक्ष परिणाम होणे स्वाभाविक होते. उत्तर कोरिया अनेक अण्वस्त्रे बाळगून अमेरिकेला अप्रत्यक्ष धमकी देत होता. (चीनची त्याला फूस असण्याचीही शक्‍यता होती.) पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ थाटात आपला हेका कायम ठेवला होता. परिणामी जून महिन्यात ट्रम्प व उत्तर कोरियाचे अध्यक्ष  किम जाँग युन यांची सिंगापूर इथे ऐतिहासिक भेट झाली.  किंम जाँगनी उत्तर कोरिया अण्वस्त्रबंदीला तयार राहील असे म्हटले व बदल्यात  ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला संपूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही दिली. 

नुकतीच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव  टक्का वाढ केली व यापुढेही दोन तीन टक्के वाढ करण्याचे संकेत दिले. भारतातही रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात पाव टक्का वाढ करून, चार वर्षांनी ती ६ ऐवजी सव्वा सहा टक्के केली. बॅंकांच्या कर्जरोख्यातील गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले व अनार्जित कर्जाप्रमाणेच बॅंकांना आता रोख्याचे खरेदीमूल्य बाजारमूल्यापर्यंत आणण्यासाठी बऱ्याच तरतुदी कराव्या लागतील. Mark to Market चा अवलंब करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने त्यांना मुदत दिली आहे. या बाबींमुळे गेल्या शुक्रवारी निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे ३५६५८ व निफ्टी १०८१७ अंकावर बंद झाले. 

समाधानकारक पावसाला, जून तिमाहीसाठी आगाऊ भरलेला कॉर्पोरेट कर, सप्टेंबर तिमाहीचे नफ्याचे आकडे, राजस्थान व झारखंड, मध्यप्रदेश राज्यात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणूक या गोष्टी बघितल्यावरच पुढचे अंदाज बांधता येतील.

अेपीएल अपोलो ट्युब्जबद्दल पूर्वी लिहिले होते. १८०० रुपयांवरून तो २५०० रुपयांपर्यंत गेला होता. आता पुन्हा तो १८०० रुपयाला उपलब्ध आहे. २०२० मार्च वर्षासाठी त्याचे शेअरगणिक उपार्जन १२५ रुपये असेल, व आजपासून तीन वर्षांनी, म्हणजे मार्च २०२१ वर्षांसाठी तर ते १७० रुपये असू शकेल. २०१८ मार्चसाठी ते ६८ रुपये होते. त्यामुळे येत्या तीन वर्षात ते पावणे तीनपट होणार असल्याने हा शेअर दीर्घ मुदतीसाठी घ्यायला हवा.

आदित्य बिर्ला कॅपिटल ही कंपनी बजाज फायनान्ससारखी आहे. बिर्ला समूहातल्या या कंपनीवर निवेशकांचे फारसे लक्ष नाही. पण देखरेखीखाली जिंदगीचा विचार करता हा शेअर सध्या १४० रुपयाला मिळत आहे. तो जरूर घेण्यासारखा आहे. वर्षभरात त्यात तीस टक्के नफा मिळू शकतो. बजाज फायनान्स रोज वाढत आहे व आता त्याने २२९० रुपयाची सीमा गाठली आहे. ज्याच्या भांडारात हा शेअर आहे त्याने कधीही तो विकू नये.

तसेच येते दीड वर्ष ग्रॅफाईट इंडिया व हेग हेही उतरते भाव दिसले तर जरूर घ्यावेत. ग्रॅफाईट इंडिया दीड वर्षात १२०० रुपयांवर जावा व हेगने ४६०० रुपयाची सीमा ओलांडावी.

जे कुमार इन्फा २६० रुपयाला आला आहे. तो ही वर्षभरात ४० टक्के वाढू शकतो. गुंतवणुकीसाठी योग्य असा रेडिंग्टन (इंडिया) सुद्धा खरेदी करण्यासारखा आहे. 

या शेअरचा भाव १२७ रुपयाच्या आसपास आहे. वर्षभरात तो १६५ ते १७० रुपयांपर्यंत वाढेल व गुंतवणूकदारांना ३२ टक्के नफा देऊन जाईल. गेल्या बारा महिन्यातील या शेअरचा कमाल व किमान भाव अनुक्रमे २०९ रुपये व ११३ रुपये होता. सध्याचा भाव किमान भावाच्या थोडा वर आहे. सध्याच्या किंमतीला कि/अु गुणोत्तर १०.५२ पट आहे. रोज सध्या ५, ६ लक्ष शेअर्सचा व्यवहार होत आहे. जगभर सप्लाय चेन सोल्यूशन प्रोव्हायडर म्हणून असलेल्या जगातील प्रमुख कंपन्या तिचा समावेश होतो. भारतात ती आयफोन्सचे वितरणही करते. रेडिंग्टन इंडियात गुंतवणूक हवीच. पण ग्रॅफाईट इंडिया ७८० रुपयांपर्यंत इंडिया १८० रुपयांपर्यंत आला तर ते प्रथम घ्यावेत. नंतर दिवाण हाउसिंग घ्यावेत. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या