खासगी बॅंकांच्या उत्पन्नात वाढ

डॉ. वसंत पटवर्धन,
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

अर्थनीती ः शेअर बाजार    

जो हान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेत सध्या आपले पंतप्रधान गेले आहेत. भारत, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका व ब्राझील या पाच ब्रिक्‍स राष्ट्रांच्या शिखर परिषदेसाठी ते गेले आहेत. अमेरिकेने आयात कर वाढविल्याने जागतिक व्यापार कमी होईल ही भीती सर्व राष्ट्रांना आहे. त्यामुळे त्यांनी एकमेकांत व्यापार वाढवायचा निर्णय घेतला आहे. मात्र दहशतवादाविरुद्ध लढाई आधी असल्याचा त्यांनी तिथेही पुनरुच्चार केला. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत क्रिकेटपटू इम्रान खानला जास्त जागा मिळाल्या आहेत. सत्ता हाती घेतली तर भारताबरोबर पुन्हा बोलणी करण्याचा इरादा त्याने स्पष्ट केला आहे.

भारतात कृषी उत्पादनासाठी पंजाब, हरियाना, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यात एक वेगळ्याच प्रकारचे नाते आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्राचे बाल (बाळ गंगाधर टिळक), लाल (लाला लजपतराय) हे राजकीय क्षेत्रातली प्रख्यात नावे होती. महाराष्ट्रातून संत नामदेवही पंजाबमध्ये गेले होते. त्यामुळे या दोन राज्यांत भावनिक नाते आहे. आता महामार्गामुळे दळणवळण सुरू झाल्याने महाराष्ट्र व पंजाबमधील जवळीक जास्त वाढेल.

‘देशातील अन्नधान्याची कोठारे’ अशा या दोन राज्यांत नुकतेच तीन सामंजस्य करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन ‘अटल महा पणन विकास अभियान’ राबवत आहे. त्याचा भाग म्हणून हे करार करण्यात आले आहेत.

‘पंजाब मार्कफेड’च्या ‘सोहना’ या कृषी प्रक्रिया उत्पादनांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. उत्तर भारतात या ब्रॅंडला खूप मागणी आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये असलेली उत्पादने पंजाबमध्ये पोचणार आहेत, याच पदार्थांचे ब्रॅडिंग करून ‘पंजाब मार्कफेड’च्या मॉलमधून विक्री करण्यास मोठा वाव आहे. तसेच पंजाबच्या ‘सोहना’ या ब्रॅंडसह अन्य उत्पादने ‘महामार्कफेड’ आणि विदर्भ पणन महासंघाच्या विक्री केंद्रातून महाराष्ट्रात विकल्या जाऊ शकतील.

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण चळवळ जोरात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आर्थिक बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तर कॉर्पोरेट क्षेत्राशी मी बोलायला तयार आहे (कारण त्यामुळेच अर्थव्यवस्थेची प्रगती होईल) असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. उद्योग आणि शेती एकत्रित वाढू शकले तर वाढीचा दर पुन्हा सहा टक्‍क्‍यावर जायला हरकत नाही. पण महाराष्ट्रात नवीन उद्योग सुरू करायला काही जणांचा विरोध आहे, त्यामुळे साडेतीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मध्यपूर्वेतून येत असूनही, नाणार पेट्रोकेमिकल्स प्रकल्प कोपऱ्यांत फेकला गेला आहे. नाणार नसला तरी मी दुसरे उद्योग आणून दाखवतो अशी ठाम भाषा कुणी करत नाही. त्यामुळे उद्योगधंदे अन्यत्र जातील. टाटांना विरोध करून ममता बॅनर्जींनी पश्‍चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या प्रकल्पावर पाणी फिरवले व तो गुजरातमध्ये गेला. महाराष्ट्रानेही नाणार प्रकल्प डावलून आपणही नाकर्तेपणाने कुठेही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. केवळ काही लोक चांगल्या कामात, स्थानिकांना पुढे करून कसा कोलदांडा घालतात ते यातून स्पष्ट होते. अशा लोकांना ना शेती ना उद्योगांत स्वारस्य असते. प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची मुदत शासनाने वाढवली आहे. तरीही यावेळेला ३१ जुलैपर्यंत सुमारे ३ कोटी लोकांनी विवरणपत्रे सादर केली आहेत. गेल्या वर्षापेक्षा हा आकडा कितीतरी जास्त आहे. मात्र त्यामुळे त्यावेळी ‘रिफंड’ची संख्याही वाढेल. पुढच्या वर्षांत विवरणपत्रे भरणाऱ्यांची संख्या अजून एक कोटींनी वाढण्याची करखात्याला अपेक्षा आहे. गेल्या वर्षी २.९६ कोटी विवरणपत्रे भरली गेली. त्या आधीच्या वर्षासाठी हा आकडा १.७ कोटी होता.

यू.एस.एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) आणि भारतातील अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स यांनी भारताच्या विकासाबाबतच्या गरजांचे एक टिपण नुकतेच केले आहे. त्यानुसार माताबालक कल्याण योजना, क्षयरोग, एचआयव्ही व एड्‌सग्रस्त रुग्ण असे अनेक प्रकल्प त्यात समाविष्ट आहेत. भारतातील चेंबर्सच्या सदस्यांची संख्या ३१२ आहे.

सेबीने कर्जरोख्यांच्या बाबतीत विश्‍वस्तपदाबद्दलच्या निकषांचे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे तिला ३ लाख रुपयांचा दंड केला आहे. आय.एल. अँण्ड एफ.एस. या कंपनीबरोबर सेंट्रल बॅंकेने करार केले होते. ब्रिटानिया इंडस्ट्रीज, दीपक फर्टिलायझर्स अँड केमिकल्स या कंपनीच्या संदर्भात सेंट्रल बॅंकेने नियमांचा भंग केला होता.

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेमुळे तीस हजार चारशे सदतीस (३०,४३७) प्रकल्प २०१६-२०१८ या दोन वर्षांत सुरू झाले आहेत. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्‍मीर, बिहार, ओडिशा आणि गुजराथ राज्यांत हे प्रकल्प सुरू झाले आहेत. ग्रामीण भागात प्रकल्प सुरू केल्यास केंद्र सरकार ३५ टक्के अनुदान देते. नागरी विभागात अनुदान २५ टक्के दिले जाते. सर्वसाधारण विभागात स्त्रियांचे भांडवली योगदान फक्त ५ ते १० टक्के असावे लागते. ‘उद्यम सखी’ या नावाने ही योजना राबवली जाते. महिला काथ्या योजनेखाली ग्रामीण स्त्रियांना काथ्या कातण्याचे आणि त्याच्या अनेक वस्तू बनवण्याचे शिक्षण दिले जाते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगातर्फेही स्त्रियांना शिक्षण दिले जात आहे. २०१७-२०१८ मध्ये सुमारे ३६ हजार स्त्रियांना असे शिक्षण दिले गेले. मुंबई, कोलकता, अर्नाकुलम, भोपाळ, गोवा, पाटणा आणि दिल्ली इथल्या डिपार्टमेंटल स्टोअर्समधून स्त्रियांनी बनवलेल्या वस्तू विकायला ठेवल्या जातात.

‘उद्योगपतींबरोबर उभे राहण्यात मला काहीच संकोच वाटत नाही’. या पंतप्रधानांच्या घोषणेचे उद्योगपतींनी स्वागत केले आहे. अवैध काम करणाऱ्या उद्योगपतींची गय केली जाणार नाही असे सांगून चांगल्या उद्योगपतींनी पुढे यावे आणि राष्ट्र उभारणीस हात लावावा असे पंतप्रधानांनी नुकतेच आवाहन केले आहे.

नुकतेच अनेक बॅंकांचे व कंपन्यांचे जून २०१८ तिमाहीचे विक्री व करोत्तर नफ्याचे आकडे प्रसिद्ध झाले. त्यापैकी येस बॅंक, बॅंक ऑफ बरोडा, इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे आकडे पुढे दिले आहेत. ते कोटी रुपयांत आहेत. त्याचबरोबर लक्ष्मी विलास या खासगी बॅंकेचेही आकडे दिले आहेत.

बॅंक ऑफ बरोडा व इंडियन ओव्हरसीज बॅंकेत सरकारचे भांडवल अनुक्रमे ६३.७१ टक्के व ८९.७४ टक्के आहे. येस बॅंक व लक्ष्मी विलास बॅंक या खासगी क्षेत्रातील बॅंका आहेत. येस बॅंकेच्या उत्पन्नात जून २०१७ तिमाहीशी तुलना करताना ४३ टक्‍क्‍याने वाढ दिसते. नक्त नफ्यात ३०.५ टक्के वाढ दिसते. शेअरवरील उपार्जन ५.४७ रुपये आहे. जून २०१७ तिमाहीसाठी ते ४.२२ रुपये होते. येस बॅंकेकडे बचत व चालू खात्यातील ठेवींची (CASA) टक्केवारी ३५.१ टक्के आहे. एकूण ठेवीत गेल्या बारा महिन्यांत ४२ टक्के वाढ आहे. बॅंकेची ढोबळ व नक्त अनार्जित कर्जे अनुक्रमे १.३१ टक्का व ०.५९ टक्का इतकी कमी आहेत. प्रथम प्रतीच्या भांडवलाची टक्केवारी (Tier I) १७.३ टक्के आहे. तिच्या देशभरात ११०५ शाखा व ATMS १७५० पेक्षा जास्त आहेत. शेअरबाजाराने तरीही या आकड्याला नाके मुरडली आहेत. त्यामुळे गेल्या गुरुवारी त्याचा भाव ३६२ रुपयांपर्यंत उतरला. पण मार्च २०१९ व मार्च २०२० या वर्षासाठी नक्त उत्पन्न अनुक्रमे १६४२५ कोटी रुपये व २०२० कोटी रुपये व्हावे. वरील बॅंकांपैकी तीच बॅंक गुंतवणुकीला योग्य आहे. त्यानंतर नफ्यात आलेल्या बॅंक ऑफ बरोडाचा विचार करता येईल. बॅंक ऑफ बरोडाचा शेअरचा भाव सध्या १३७ रुपये आहे. मागील आठवड्यात तो १२० रुपये होता.

आय.सी.आय.सी.आय बॅंकेचे जून २०१८ तिमाहीसाठी कर्जावरील व्याजाचे उत्पन्न १०९८१.८० कोटी रुपये झाले आहे. गुंतवणुकीवरचे उत्पन्न ३१३५.८२ कोटी रुपये होते. अन्य उत्पन्न ४४५७.४५ कोटी रुपये धरून बॅंकेचे एकूण उत्पन्न १८५७४.१७ कोटी रुपये झाले. अनार्जित कर्जासाठी ५९७१.२९ कोटी रुपयांची तरतूद १२८६.५६ केल्यामुळे बॅंकेला या तिमाहीत ११९.५५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बॅंकेचे भागभांडवल १२८६.५६ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन उणे ०.१८ रुपये आहे. बॅंकेच्या शेअरचा भाव सध्या ३०८ रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरातील किमान भाव २५५ रुपये तर कमाल भाव ३६५ रुपये आहे. काही विश्‍लेषक जरी खरेदीसाठी शिफारस करीत असले तरी कुठल्याच बॅंकेच्या मोहात गुंतवणुकीसाठी पडू नये.

गोदावरी पॉवर अँड इस्पातचे या तिमाहीचे उत्पन्न ७२०.०८ कोटी रुपये होते. करोत्तर नफा ५८.२२ रुपये होता. शेअरगणिक उपार्जन १७.०२ रुपये होते.

ओरिएन्टल कार्बनची विक्री ९२.०३ कोटी रुपयांची होती. करोत्तर नफा १६.४० कोटी रुपये होता. जून २०१७ तिमाहीची विक्री ८१.२३ कोटी रुपये होती व नक्त नफा १४.५६ कोटी रुपये होता. कंपनीचे भागभांडवल १०.३१ कोटी रुपये आहे. सध्या या शेअरचा भाव ११३० ते ११५० रुपयांमध्ये फिरतो. गेल्या बारा महिन्यांत शेअरने १५९० रुपयांचा उच्चांक दाखवला होता.

ल्यूमॅक्‍स इंडस्ट्रीजची जून २०१८ तिमाहीची विक्री ४९६.१९ कोटी रुपये होती. नक्त नफा २०.०४ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन २१.४४ रुपये पडते. सध्या या शेअरचा भाव २०७० रुपये इतका आहे. गेल्या बारा महिन्यांतील उच्चांकी भाव २५८० रुपये होता, तर नीचांकी भाव ११७६ रुपये होता. सध्याच्या भावाला किं/अु गुणोत्तर २७.१० पट इतके दिसते. विद्युत उपकरणे करणाऱ्या या कंपनीचा शेअर धीमेधीमे पण निश्‍चित वाढतो.

हिंडाल्को हा शेअर सध्या २१० रुपयांच्या आसपास घेण्यासारखा आहे. कंपनीचे नुकतेच ॲलेरिस या कंपनीचे आग्रहण केले आहे. अमेरिकेतील नॉव्हेलिस या कंपनीबरोबर तिचा सहयोग आहे. त्या कंपनीतर्फे हे आग्रहण २.६ अब्ज डॉलर्सला केले जाईल. या आग्रहणामुळे नॉव्हेलिसच्या उत्पादनात वैविध्य येईल. सध्याच्या भावाला शेअर विकत घेतल्यास वर्षभरात ५० टक्के नफा होऊ शकेल. कंपनीचे एक वर्षातील भावाचे लक्ष्य ३१५ रुपयांवर असेल असे अमेरिकेतील जेफरीज या ब्रोकरेज कंपनीने म्हटले आहे.

एक तारखेला हेगडे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर तो सध्यापेक्षा ५ ते ७ टक्के वाढू शकेल. त्यावेळी त्याची विक्री करून ती रक्कम ग्राफाईट इंडियामध्ये गुंतवावी. सहा महिन्यांत ग्राफाईट बाराशे रुपयांची सीमा ओलांडेल. त्याचा परिणाम होऊन ग्राफाईट इंडियाही वाढून ११०० रुपयांवर जाईल.

कोटी रुपयांत    येस बॅंक    बॅंक ऑफ बरोडा    इंडियन ओव्हरसीज बॅंक    लक्ष्मी विलास बॅंक 
कर्जावरील व्याज    6578.00    7986.11    2903.91    555.91 
गुंतवणुकीचे उत्पन्न    -    -    -    - 
अन्य उत्पन्न    1694.18    2997.86    1207.12    169.24 
एकूण उत्पन्न    8272.18    12787.71    5326.71    787.51 
तरतुदी    625.65    2165.64    2400.60    161.52 
नक्त नफा    1260.36    -    (तोटा 919.44)    (तोटा 123.87) 
भागभांडवल    461.14    -    4870.77    256.05

संबंधित बातम्या