बॅंकांच्या शेअर्सना अच्छे दिन!

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

गेला आठवडा हा अर्थकारणापेक्षा राजकारणात रंगला. एके काळचे प्रसिद्ध, कार्यक्षम आणि भारताचे उत्कृष्ट अर्थमंत्री असलेल्या पी. सी. चिदंबरम यांना घराच्या भिंतीवरून उडी मारून नाट्यमयरीत्या एन्फोर्समेंट डिपार्टमेंटकडून अटक करण्यात आली. ३० तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागेल. गदिमांच्या ''वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा'' या काव्यपंक्तीचा प्रत्यय आला. १० वर्षांपूर्वीच्या परदेशातील एका गुंतवणुकीमुळे ते अडचणीत आले आहेत. 

इकडे महाराष्ट्रातही अजित पवार हे मुंबईच्या बॅंक प्रकरणी अडकले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभांच्या निवडणुका ऑक्‍टोबरमध्ये होऊ घातल्या आहेत. शिवसेनेचा अर्ध्या-अर्ध्या जागा वाटून घेण्याचा निर्धार असला, तरी शेवटी भाजपला १५५ ते १५८ आणि उरलेल्या १३३ ते १३८ जागांवर शिवसेना आपला हक्क सांगेल. काही झाले तरी भाजपचा अश्‍वमेध  सुरूच मोर हतबल होणार आहेत. कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस निष्प्रभ ठरणार आहेत. 

भारताचे दीर्घकाल असलेले अर्थमंत्री हार्वर्ड विद्याविभूषित असलेले अरुण जेटली यांचे दीर्घकालीन आजाराने नुकतेच निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या आकस्मिक निधनानंतर भाजपला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. याआधीही काही महिने आधीच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आकस्मिक निधनाचा धक्का भाजपला बसलेलाच होता. जुन्या नेत्यांच्या जागी राजनाथ सिंह, अमित शहा आणि प्रकाश जावडेकर यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव मिळाला, तरी त्यांना २०२४ च्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत आपले बस्तान स्थिर करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खूप मोठी जबाबदारी यापुढे पडणार आहे. 

जम्मू-काश्‍मीरसाठी ३७० व ३५ अ ही कलमे रद्द करून ती केंद्राच्या अखत्यारीत आणण्यात आली आहेत. त्यामुळे काही काळ जरी तणाव निर्माण झाला होता, तरी तो गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर निवळला आहे. वरील कलमे रद्द झाल्यानंतर आता भारत काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकसंध देश झाला आहे. या निर्णयामुळे भारताचे राजकीय वातावरण जास्त स्थिर होईल. पाकिस्तानने याबाबत जरी आगपाखड केली असली, तरी अमेरिकेतील सिक्‍युरिटी काउन्सिलमध्ये भारताच्या पाठीमागे रशिया ठामपणे उभा आहे. पाकिस्तानचे सर्वेसर्वा इम्रान खान यांनी जरी खूप आगपाखड केली असली, तरी तिचा काहीही परिणाम झालेला नाही. 

बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांचे बुरूज हळूहळू ढासळत आहेत. उत्तरप्रदेशमध्येही योगी आदित्यनाथ यांनी आपले बस्तान नीट बसवले आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच बाजी मारून पुन्हा सत्तारूढ होईल. महाराष्ट्रातही ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच परत सत्तारूढ होईल. 

कर्नाटकातही भाजपने चांगले बस्तान बसवले आहे. भाजपच्या घोडदौडीपुढे कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना जेमतेम ६० जागा मिळतील. 

पुढील महिन्याच्या शेवटी २०१९-२०२० या आर्थिक वर्षाची पहिली सहामाही संपेल. देशातील मंदीमुळे या सहामाहीचे आकडे उत्साहवर्धक असणार नाहीत. मात्र, ऑक्‍टोबर २०१९ ते मार्च २०२० ही दुसरी सहामाही कंपन्यांसाठी चांगली ठरेल. याच दिवसांत नवरात्रापासून नाताळपर्यंत सण उत्सवाचे दिवस असतात. त्यामुळे कंपन्यांची विक्री चांगली होते व नफ्यातही वाढ दिसते. 

डिसेंबर अखेर निर्देशांक ४४ हजार रुपयांपर्यंत जावा. येस बॅंकेचा शेअर बराच घसरून ६० रुपयांपर्यंत आला आहे. तो ५० रुपयांपर्यंत आल्यास जोखीम घेऊन जरूर घ्यावा. वर्षभरात त्यात किमान ३५ टक्‍क्‍यांचा नफा मिळेल. खासगी क्षेत्रातील बंधन बॅंक सध्या ४७२ रुपयांना उपलब्ध आहे. वर्षभरात तो ५५० रुपयांपर्यंत जावा. 

पिरामल एंटरप्राइझेसचा सध्याचा भाव १,८४८ रुपये आहे. गेल्या शुक्रवारी त्यात एकदम ६० रुपयांची वाढ झाली. हाही शेअर वर्षभरात २,२०० रुपयांपर्यंत जावा. 

अपोलो टायर्सचा भाव गेल्या शुक्रवारी १६६ रुपये होता. या भावाला किं/उ गुणोत्तर १६.७५ पट दिसते. रोज १० लाख शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. वर्षभरात त्यात ४० टक्के वाढ व्हावी. 

बाळकृष्ण इंडस्ट्रीज सध्या ७४४ रुपयांना मिळत आहे. वर्षभरातील त्याचा उच्चांकी भाव १,४५३ रुपये होता व नीचांकी भाव ६३१ रुपये आहे. रोज सुमारे पावणेदोन लाख शेअर्सचा व्यवहार होतो. 

दिलीप बिल्डकॉन सध्या ३६० ते ३७५ रुपयांच्या पातळीत मिळत आहे. वर्षभरातील उच्चांकी भाव ८५८ रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १२ पट दिसते. सध्याच्या भावात खरेदी केल्यास वर्षभरात चांगला नफा व्हावा. 

सध्या आर्थिकमंदी असल्यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी आणण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दीर्घ भांडवली नफ्यावरील १० टक्के लावलेला कर काढून टाकण्याची शक्‍यता आहे. 

परदेशी गुंतवणुकीला जर प्रोत्साहन मिळाले, तर निर्देशांक बराच वर जावा. परदेशी गुंतवणूकदार जास्त काळ थांबण्याच्या मनस्थितीत नसतात. ''तुरत दान महापुण्य'' या म्हणीप्रमाणे ते अल्पावधीत नफा मिळवून बाहेर पडतात. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून इथल्याही गुंतवणूकदारांनी आपली धोरणे आखावयास हवीत. 
 राजकारणातील परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत बाजारातील तेजी कायमची टिकणारी नाही. 

बजाज फायनान्स सध्या ३,३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. रोज एक लाख डॉलर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. वर्षभरात तो चार हजार रुपयांपर्यंत जाईल. सध्या किं/उ गुणोत्तर ४४ पट आहे. 

बॅंकांच्या शेअर्सना सध्या चांगले दिवस आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडिया २८० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर कॅनरा बॅंक २२४ रुपयांवर आहे. फेडरल बॅंक ८२ रुपयांना मिळत असून, तो वर्षभरात ११५ रुपयांपर्यंत जाईल. बॅंक ऑफ बडोदा ९६ रुपयांपर्यंत उतरला आहे. वर्षभरातील त्याचा उच्चांकी भाव १५६ रुपये होता. रोज २१ कोटी शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. 

एचडीएफसी बॅंक गेल्या आठवड्यात वाढून २,२५५ रुपयांवर पोचला. बॅंकेच्या व्यवस्थापनाला हा शेअर अजूनही चांगली कामगिरी करेल असा विश्‍वास आहे. बॅंकेने नुकतीच श्रीनिवासन वैद्यनाथन यांची नेमणूक प्रमुख आर्थिक अधिकारी (CEO) म्हणून केली आहे. पूर्वी ते ग्रुप फायनान्सचे प्रमुख अधिकारी होते. त्यांच्या नेमणुकीमुळे बॅंक प्रगतिपथावर जाईल. ते बॅंकेचे सर्वेसर्वा जगदीशन यांच्याबरोबर काम करतील. वैद्यनाथन हे चार्टर्ड अकाउंटंट्सच्या इन्स्टिट्यूटचे फेलो आहेत. त्यांनी एमबीए डिग्रीही प्राप्त केली आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वस्तू सेवा कराबाबतही पुनर्विचार करणार आहेत. त्यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांबरोबर चर्चा केली. 
चीनने सोयाबीन्सच्या आयातीवर पाच टक्के जादा कर बसवला आहे. 
 बॅंकांच्या कर्जाबाबत पुन्हा एकदा वन टाइम सेटलमेंटचा प्रस्ताव येत आहे. गृहकर्जे व वाहनकर्जे याबाबतही पुनर्विचार केला जाणार आहे. गृहकर्ज कंपन्यांना २०० अब्ज रुपयांपर्यंत सवलत मिळण्याची शक्‍यता आहे. मध्यम व लघुउद्योग कंपन्यांना वस्तू सेवा करात परतीची रक्कम पुढील ३० दिवसांत दिली जाणार आहे. बॅंकांमधील मुदती गुंतवणुकीवर फक्त आठ टक्के व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यात अर्ध्या टक्‍क्‍याची भर घालण्यात येते. शेअरबाजारात जर सावधपणे गुंतवणूक केली आणि बजाज फायनान्स, पिरामल एंटरप्राइझेस, स्टेट बॅंक ऑफ इंडिया अशा शेअर्समध्ये जर गुंतवणूक केली, तर किमान १५ ते १६ टक्के नफा सहज होऊ शकतो. 

एचडीएफसी बॅंक नजीकच्या भविष्यात २० लाख हायब्रीड कार्डे देणार आहे. अर्थकारण याच्यापुढे चांगल्या परिस्थितीत राहील असा अंदाज आहे.   

संबंधित बातम्या