तेलामुळे शेअर बाजार अस्थिर

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
शुक्रवार, 18 मे 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
 

गेल्या आठवड्यात भारतातील राजकारणाला वेगळे वळण देणारी घडलेली गोष्ट म्हणजे कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होत. अनेक वर्षे काँग्रेसची मिरासदारी असलेल्या कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदी व अमित शहा यांनी प्रचाराची राळ उडवली होती. महाराष्ट्रातल्या प्रकाश जावडेकरांवरही या मोहिमेत महत्त्वाची कामगिरी दिली होती. कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असे भाकीत मतदानोत्तर चाचण्यांनी उभे केले होते. कर्नाटकात हे भाकीत काही अंशी खरे ठरले. कर्नाटकात १०४ जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला तर, काँग्रेसने ७८ आणि जेडीएसने ३७ जागा जिंकल्या आहेत.

तसेच देशाच्या मंत्रिमंडळातही फेरबदल करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटली यांच्याकडील अर्थखात्याचा कारभार पियुष गोयल यांच्याकडे सध्या सोपवण्यात आला आहे. तर स्मृती इराणी यांच्याकडील सूचना व प्रसारण मंत्रालयाचा कारभार काढून घेऊन तो राजवर्धन राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

फ्लिपकार्टच्या प्रवर्तकांपैकी सचिन बन्सल बाहेर पडतील. वॉलमार्ट कदाचित गुगल कंपनीच्या प्रवर्तकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करील. फ्लिपकार्ट कंपनीचा ब्रॅंड मात्र वॉलमार्ट कायम ठेवणार आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना आत्मीयताच वाटेल. इकॉनॉमिक टाइम्सने २७ सप्टेंबर २०१६ मध्येच ही शक्‍यता, धूसर होती तरीही वर्तवली होती. खुद्द ॲमेझॉनने फ्लिपकार्टला २२.५ अब्ज डॉलर्स देऊ केले होते, पण काही रेग्युलेटरी निर्बंध त्यांना आडवे आले. फ्लिपकार्टच्या उदाहरणामुळे आता फ्युचर समूहाचे किशोर बियाणीसुद्धा दहा टक्के मालकी एखाद्या मोठ्या जागतिक कंपनीला विकण्याच्या खटपटीत आहेत. टायगर व सॉफ्टबॅंक कंपन्यांनी या व्यवहारात आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. मात्र सॉफ्टबॅंकला २ हजार कोटी रुपये कर भरावा लागेल.

पेट्रोलचे भाव जागतिक स्तरावर वाढण्याची चिन्हं आहेत. इराणबरोबर अण्वस्त्रांबाबत जो समझोता होता त्यातून अमेरिका बाहेर पडू बघत आहे. तसं झालं तर या राजकीय बातमीचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होईल. सुदैवाने भारत-इराण संबंध चांगले आहेत. इराणने आपल्याला रुपयाच्या चलनात किंवा भारतीय वस्तूद्वारा रक्कम घ्यावी असे भारताचे प्रयत्न चालू आहेत. त्याशिवाय सौदी अरेबियातूनही आपले बरेच पेट्रोल येत आहे.

बुद्धीची निर्यात (Brain Export) म्हणून एकवेळ थट्टेने संबोधलेल्या अनिवासी भारतीय रहिवाशांनी गेली कित्येक वर्षे विदेशी चलन पाठवून आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा भक्कम केला आहे. अमेरिकेतील भारतीयांनी २०१७ मध्ये ६९ अब्ज डॉलर्स (४४८५०० कोटी रुपये) भारतात पाठवले. चिनी नागरिकांनी चीनला ६४ अब्ज डॉलर्स पाठवले. फिलिपिनो नागरिकांनी फिलिपाईन्सला ३३ अब्ज डॉलर्स पाठवले. पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानला २० अब्ज डॉलर्स तर व्हिएटतनामींनी व्हिएतनामला १४ अब्ज डॉलर्स पाठवले. अमेरिकेखेरीज भारतीय अनिवासी नागरिक कॅनडा मध्य पूर्व आशियान, सिंगापूर, हाँगकाँग, ग्रेटब्रिटन इथेही आहेत. त्यांच्याकडून किती रकमा गेल्या वर्षी आल्या ते अजून प्रसिद्ध झाले नाही. पण डॉलर्स पाठवण्यात अमेरिकेतील भारतीय रहिवासी जास्त जागरूक आहेत.

अलाहाबाद बॅंकेने मार्च २०१८ तिमाहीसाठी ३५१० कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. गेल्या वर्षीच्या या तिमाहीत बॅंकेचा नक्त नफा १११ कोटी रुपयांचा होता. यंदाच्या मार्च तिमाहीत एकूण उत्पन्न ४२५९ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी हाच आकडा ५१०५ कोटी रुपयांचा होता. अलाहाबाद बॅंकेने २०१७-१८ वर्षासाठी एकूण तरतुदी ४७८३ कोटी रुपयांच्या केल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीसाठी तरतुदी १४३० कोटी रुपयांच्या होत्या. बॅंकेची एकूण ढोबळ अनार्जित कर्जे २६५६३ कोटी रुपयांवर गेली आहेत.

हेगची मार्च २०१८ ची विक्री १२.०३ अब्ज रुपये आहे. मार्च २०१७ पेक्षा विक्री ५३ टक्‍क्‍याने जास्त आहे. हेगचा या तिमाहीचा ढोबळ नफा ९.५१ अब्ज रुपये आहे. मार्च २०१७ तिमाहीचा नक्त नफा फक्त २९.६ कोटी रुपये होता. करोत्तर नफा या मार्चला ६.३४ अब्ज रुपये आहे.

हेगला पुढील दोन वर्षे कुठलीही स्पर्धा असणार नाही. ग्रॅफाईट धातूचे सध्या जागतिक स्तरावर टनाला १२ हजार डॉलर्स ते १४ हजार डॉलर्स इतके भाव वाढल्याने आणि चीनमधील कंपन्यांचे उत्पादन वर्षभर जगात येऊ शकणार नसल्यामुळे भारतीय कंपन्यांना सध्या सोनेरी दिवस आहेत.

चौदा मे रोजी सोमवारी निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे ३५५५६ व १०८०६ ला बंद झाले. आठवड्यात फेडरल बॅंक, देना बॅंक, स्वराज ऑटोमोटिव्ह, कॅनरा बॅंक, इंगरसोल रॅंड, सन टीव्ही नेटवर्क, आरती इंडस्ट्रीज, सारेगामा, क्विक हील यांचे मार्च २०१८ च्या तिमाहीचे व वर्षाचे आकडे प्रसिद्ध झाले. देना बॅंकेने दाखवलेल्या तोट्यानंतर, रिझर्व बॅंकेने देना बॅंकेला यापुढे कर्जे देता येणार नाहीत, असे कळवले आहे. युको बॅंकेने मार्च २०१८ तिमाहीसाठी २१३४.३६ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. ढोबळ अनार्जित कर्जाची टक्केवारी २४.६४ टक्के इतकी झाली आहे. युको बॅंकेची एकूण ढोबळ अनार्जित कर्जे ३०,५५० कोटी रुपयांची आहेत. मागच्या वर्षी हा आकडा २२५४१ कोटी रुपयांचा होता. अनार्जित कर्जे एकूण १७.१२ टक्‍क्‍यावरून २४.६४ टक्‍क्‍यावर गेली आहेत.

कॅनरा बॅंकेने मार्च २०१८ तिमाहीसाठी ४८५९.७७ कोटी रुपये तोटा दाखवला आहे. मागच्या वर्षीच्या मार्चमध्ये बॅंकेने २१४.१८ कोटी रुपयांचा करोत्तर नफा दाखवला होता. मार्च २०१८ तिमाहीसाठी बॅंकेने अनार्जित कर्जासाठी ८७६२.५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या मार्च तिमाहीत ती तरदूत २९२४.०८ कोटी रुपयांची होती. २०१७-१८ पूर्ण वर्षासाठी बॅंकेचा तोटा ४२२२.२४ कोटी रुपये होता. मागच्या वर्षी याच कालावधीत बॅंकेने ११२१.९२ कोटी रुपयांचा नक्त नफा दाखवला होता. २०१७-१८ तिमाहीसाठी बॅंकेचे एकूण उत्पन्न ११५५५.११ कोटी रुपये झाले होते. यंदाच्या पूर्ण वर्षाचे एकूण उत्पन्न ४८१९४.९४ कोटी रुपये झाले. गतवर्षीच्या ४८९४२ कोटी रुपयांपेक्षा ही रक्कम थोडी कमी आहे. बॅंकेची ढोबळ अनार्जित कर्जे एकूण कर्जाच्या ११.८४ टक्के झाली आहे. गेल्या वर्षीची टक्केवारी ९.६३ होती. गेल्या वर्षी ढोबळ अनार्जित कर्जे ३४२०२ कोटी रुपयांची होती. नक्त अनार्जित कर्जे ७.४८ टक्के होती. (२८५४२) कोटी रुपये होती. या वर्षी तरतुदीची रक्कम १४८८२.७० कोटी रुपये आहे. गतवर्षी हा आकडा ७४३७.७७ कोटी रुपये होता. ज्वेलरी धंद्यातील फटक्‍यामुळे यंदा बॅंकेची दुर्दशा झाली आहे.

देना बॅंकेचा मार्च २०१८ तिमाहीचा नक्त तोटा १२२५ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी हा नक्त तोटा ५७५.२६ कोटी रुपयांचा होता; २०१७-१८ वर्षासाठी एकूण तोटा १९२३ कोटी रुपये आहे. २०१६-१७ वर्षासाठी हा तोटा ८६३.६३ कोटी रुपये होता. बॅंकेने २०१४-१५ मध्ये २६५.४८ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. २०१७-१८ वर्षासाठी बॅंकेचे एकूण उत्पन्न १००९५.७५ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी हे उत्पन्न ११४६३ कोटी रुपये होते. बॅंकेची एकूण ढोबळ अनार्जित कर्जे १२६१८ कोटी रुपयांवरून १६३६१ कोटी रुपयांवर गेली आहेत. गेल्या मार्च तिमाहीत तरतुदी ८७८ कोटी रुपयांच्या होत्या. या वर्षीच्या या तिमाहीसाठी २१५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पूर्ण वर्षासाठीच्या तरतुदी आता ४२८१ कोटी रुपयांवर गेल्या आहेत.

ग्रॅफाईट इंडिया कंपनीत गुंतवणूक करण्याबद्दल या लेखमालेत अनेकदा लिहिलं गेलं आहे. या कंपनीचा मार्च २०१८ तिमाहीचा नफा ४५४ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०१७ तिमाहीपेक्षा तो ७ पट जास्त आहे. कंपनीची या मार्च तिमाहीची विक्री १२१२ कोटी रुपये होती. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीची विक्री ३७३ कोटी रुपये होती. कंपनीने शेअरमागे १२ रुपयांचा लाभांश जारी केला आहे. कंपनीचा शेअर सध्या ७४५ रुपयाला मिळत असून तो पुढील ७, ८ महिन्यात १००० रुपयाचा टप्पा ओलांडेल. शेअरचे भाव जेव्हा थोडे कमी असतील त्या दिवशी हा शेअर आवर्जून घ्यावा व २ वर्षे जपून ठेवावा. कंपनीचे मार्च २०२० वर्षाचे शेअरगणिक उपार्जन १०० रुपये अपेक्षित आहे. ग्राफाईटप्रमाणेच हेगची खरेदी ३२०० रुपयांपर्यंत हवी. हा शेअर वर्षभरात ४००० रुपयांची सीमा ओलांडेल. 

संबंधित बातम्या