शेअरबाजार तेजीच्या प्रतीक्षेत

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 22 जुलै 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

अर्थसंकल्प होऊन गेला, की पुढे काही महिने तरी अर्थव्यवस्थेत मरगळ दिसते. त्यामुळे ५ जुलैनंतर सध्या अर्थव्यवस्थेत व त्यामुळे शेअर बाजारात मरगळ आली आहे. निर्देशांक व निफ्टी, सापशिडी खेळाप्रमाणे खालीवर होत आहेत. गुंतवणूकदार कुठेही गुंतवणूक करण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

जून २०१९ तिमाहीचे कंपन्यांचे विक्री व नक्त नफ्याचे आकडे प्रसिद्ध होऊ लागले आहे. पण अजून दिग्गज कंपन्यांचे आकडे यायला वेळ आहे. ते आल्यावर चांगल्या कंपन्यांचे शेअर्स वर जातील.

गेल्या सोमवारी १५ जुलैला निर्देशांक ३८,९०० वर, तर निफ्टी ११,५८९ वर बंद झाला. तो इथेच काही दिवस घुटमळेल. वर जाण्यासाठी सध्या तात्कालिक कारण नाही. पावसाळा जुलै अखेर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात स्थिरावला, की मग बाजारातील तेजीची सुरुवात पुन्हा होईल.

मागच्या लेखातूनही जेएसडब्ल्यू स्टीलचा परामर्श घेतला असला तरीही पुनरुक्तीचा दोष पत्करून तो सध्या जरूर घ्यावा. पुढील तीन महिन्यांत तो ३०० रुपयांपर्यंत जाऊ शकेल. सध्या त्याचा भाव २७० रुपयांच्या आसपास आहे.

राष्ट्रीयकृत बॅंकांनी आपली अनार्जित कर्जे मोठ्या प्रमाणात कमी केली आहेत. फेडरल बॅंकेतील सध्या १०३ रुपयांच्या आसपास ७० ते ८० लाख शेअर्सचे व्यवहार होत आहेत. 

दिलीप बिल्डकॉनबद्दलही पुनरुक्तीचा दोष पत्करून तो सध्या ४१५ रुपयांच्या आसपास घ्यायला हरकत नाही. वर्षभरातील त्याचा उच्चांकी भाव ९१७ रुपये होता, तर नीचांकी भाव ३१२ रुपये होता.

राजकीय पटलावर सध्या कर्नाटकमध्ये बऱ्याच घडामोडी होत आहेत, सुदैवाने त्याचा शेअरबाजारावर काहीही परिणाम झालेला नाही.

काही काही वेळेला अंदाज न लागल्यामुळे वरच्या भावात गुंतवणूक होते, पण तो भाव पटपट खाली यायला लागतो. आर कॉम हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जानेवारी २००८ मध्ये हा शेअर ७९० रुपयांपर्यंत चढला होता. त्याच्यानंतर तो दीड रुपयासारख्या भावाला म्हणजे कचऱ्यासारखाही विकला जात नव्हता. शेअरबाजारात दरवेळेला मनात ठरविलेला किंवा इतरांनी सांगितलेला भाव मिळत नाही. त्यावेळेला खरेदीच्या भावात जर १० टक्के घट झाली, तर तिथून लगेच बाहेर पडावे. शेअरबाजारात लोभ आणि भीती यांचा पाठशिवणीचा खेळ चालत असतो. त्यामुळे वेळेवरच विक्री करून बाहेर पडण्याची भीती बाळगता कामा नये. 

डी मार्टने गेल्या पाच तिमाहीत सतत उच्चांकी भाव दाखवले आहेत. पण या शेअरमध्ये फारशी हालचाल होत नसल्याने गुंतवणूकदारांनी तिकडे दुर्लक्ष करावे.

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये (२०१८) येस बॅंकेमध्ये पडझड सुरू झाली. डिसेंबर २०१९ पर्यंत नव्याने पदभार सांभाळलेले प्रमुख आर्थिक अधिकारी रवणीत गिल यांना मात्र वर्षभरात बॅंक खूप सुधारेल अशी आशा आहे.

भारतीय म्युच्युअल फंडांनी जून २०१९ मध्ये ७६.६ अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुढील काही दिवसांत अमेरिका - चीन यांच्यामधील व्यापारातील शीतयुद्ध संपून नवीन करार-मदार जर झाले, तर जगातील सर्व शेअरबाजारात लक्षणीय सुधारणा होईल.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बॅंक इथे सध्या माफक प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही.

टाटा समूह चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून एका लिथीयम बॅटरीचा कारखाना काढण्याच्या विचारात आहे. समूहातील कुठली कंपनी हा कारखाना काढेल हे मात्र अजून निश्‍चित नाही. ते नक्की झाले, की मग त्या कंपनीत गुंतवणूक करता येईल. या कारखान्यासाठी टाटा समूहाने १२६ एकरची जमीन विकत घेतली आहे. तिथे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पुढील दोन वर्षांत होईल.

बजाज फायनान्समध्ये सध्या रोज थोडा फार चढ-उतार होत असला, तरी ३,३०० च्या सुमारास तो जर आला तर जरूर गुंतवणूक करावी. नुकताच तो ३,३१५ रुपयांपर्यंत येऊन आता ३,४१५ रुपये झाला आहे.

गुंतवणुकीसाठी ज्या अन्य शेअर्सचा विचार करता येईल त्यात जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्‍ट्सचा विचार करावा. सध्या हा शेअर १४२ रुपयांच्या आसपास उपलब्ध असून रोज ५० हजार ते एक लाख शेअर्सचा व्यवहार होतो. मेट्रो रेल्वे बांधण्याबाबत या कंपनीचा नावलौकिक आहे.

अर्थसंकल्पातील अंदाजानुसार देशामध्ये ६४५ किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभे राहणार आहे. त्यामुळे जे कुमारला व्यवसाय वाढवायला खूप वाव आहे. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ६.२४ इतके आकर्षक आहे. 

नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांना बॅंकांकडून फारसा आर्थिक पुरवठा होणार नाही. त्यामुळे त्यांना स्वबळावरच ठेवीद्वारे रक्कम उभारावी लागेल. ही ताकद बजाज फायनान्स, मुथुट फायनान्स, एम अँड एम फिनान्शियल यांचा साकल्याने विचार करून गुंतवणूक करावी.

मिंडा इंडस्ट्रीज सध्या ३२० रुपयांना उपलब्ध आहे. या शेअर्समध्ये व्यवहार माफक प्रमाणात होत असतात. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायला हा शेअर उत्तम आहे. मिंडा इंडस्ट्रीजचा गेल्या वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे ४४९ व २५६ रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर २९.४ पट दिसते. भाग भांडार व्यापक असावे म्हणून मिंडा इंडस्ट्रीजसारखे काही शेअर्स माफक प्रमाणात त्यात असावेत.

एनएमडीसी, कल्पतरू पॉवर्स ट्रान्समिशन, आरइसी आणि स्पाइस जेट या कंपन्यांमध्ये बऱ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. स्पाइस जेट सध्या १२३ रुपयांना उपलब्ध आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यातही चांगली हालचाल होत आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, केंद्र सरकारचे आरइसीचे शेअर्स विकत घेणार आहे. आरइसी या कंपनीचे पूर्ण आग्रहण पुढील ६-७ महिन्यांत होईल. आरइसीने १,१४३ कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश सरकारला दिला आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन जरी आरइसीचे शेअर्स घेणार असली, तरी अन्य भागधारकांसाठी ती देकार देणार नाही. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा शेअर १२५ रुपयांना उपलब्ध आहे. रोज सुमारे ३५ कोटी शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर अत्यंत आकर्षक आहे. ते सध्या ३.३३ पट इतके आहे. इतक्‍या आकर्षक गुणोत्तराला दुसरी कुठलीही कंपनी उपलब्ध नाही.

एचडीएफसी बॅंकही सध्या डोळ्यांसमोर ठेवण्यासारखी आहे. तिचे नुकतेच नवे आर्थिक अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. त्यांना सध्या आदित्य बिर्ला यांचा पाठिंबा मिळवण्याची जरुरी आहे. एचडीएफसी बॅंकेच्या नोंदणी न झालेल्या पोट कंपनीचे आर्थिक मूल्य ८० हजार कोटी रुपयांच्यावर आहे. या कंपनीची नोंद होण्याची परिस्थिती जेव्हा निर्माण होईल, तेव्हा एचडीएफसी बॅंकेच्या भागधारकांना काही हक्कभाग मिळण्याची शक्‍यता आहे. ते मिळोत वा न मिळोत एचडीएफसी बॅंक ही एक गुंतवणूक करण्यासारखीच कंपनी आहे. विजय मल्ल्या ही एका वेळी प्रतिष्ठित व्यक्ती होती. त्यावेळेलाही त्याला कर्ज नाकारण्याचे धैर्य या कंपनीने दाखवले आहे.

संबंधित बातम्या