वित्तीय तूट कमी होणार?

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 29 जुलै 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

गेल्या आठवड्यात माझ्या वैयक्तिक दृष्टीने दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. जुलै १९४२ मध्ये मी ‘सकाळ’ समूहातील ‘स्वराज्य’ या साप्ताहिकात माझी पहिली लघुकथा लिहिली. १९ जुलै १९६९ ला १४ बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाले. त्यात बॅंक ऑफ महाराष्ट्र चौदाव्या स्थानावर होती. त्यावेळच्या बॅंकेच्या वरिष्ठांना राष्ट्रीयीकरण मान्य नव्हते. पण मी राष्ट्रीयीकरणाच्या बाजूने होतो. त्याच बॅंकेचा मला १९७७ पासून १९८३ पर्यंत अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला. पुण्याचे वैभव असलेल्या लोकमंङ्‌गल या महाराष्ट्र बॅंकेच्या मुख्य कार्यालयाचे त्यावेळचे पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनी उद्‌घाटन केले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८१ मध्ये महाराष्ट्रातील ५०० व्या शाखेचे लोकार्पण केले.

योगायोगाने गेल्या आठवड्यात माझ्या जुन्या स्नेही आणि सध्याच्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे याही त्यांच्या पुण्याच्या दौऱ्यात आवर्जून भेटीला आल्या होत्या.

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्‍टोबरमध्ये होऊ घातल्या आहेत. त्यात भाजप-शिवसेना युतीने महाष्ट्रात २८८ पैकी २२२ जागा (सुमारे ७३%) जिंकण्याचे लक्ष ठेवलेले आहे. त्या विधानसभेच्या सभापतिपदी बहुधा डॉ. गोऱ्हे असतील.

देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे इस्रोने सोमवारी २२ जुलैला चांद्रयान-२ अंतराळात यशस्वीरीत्या सोडल्याने चंद्रावर यान पाठवणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश ठरला आहे.

शेअरबाजारात सध्या स्थैर्य टिकून आहे. २२ जुलैला निर्देशांक ३८ हजारांवर स्थिर होता. तसेच निफ्टीही ११,३२५ वर थांबला होता. जेएसडब्ल्यू स्टील २६२ वर स्थिर आहे. पुढील दोन महिन्यांत तो ३०० ते ३१० रुपयांवर जाऊ शकेल. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ८.३ पट दिसते. रोज एक लाख शेअर्सपेक्षा जास्त शेअर्सचा व्यवहार होत आहे.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ऑक्‍टोबर २०१८ मध्ये ७० रुपयांच्या किमान भावाला होता. तिथून तो आता १२१ रुपयांपर्यंत चढला आहे. रोज सुमारे ५० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ३.२ पट इतके आकर्षक आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये रूरल इलेक्‍ट्रीफिकेशन कॉर्पोरेशनचे विलीनीकरण नजीकच्या भविष्यात होण्याची शक्‍यता आहे. पॉवर फायनान्समध्ये काही गुंतवणूक करायला हरकत नाही.

येस बॅंक ८० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. तो ६० रुपयांपर्यंतही उतरण्याची शक्‍यता आहे. वर्षभरात तो तिथून दुप्पट होऊन १२० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. धाडसी गुंतवणूकदारांनी जोखीम घेऊन इथे जरूर गुंतवणूक करावी.

सध्या मंदीची धारणा असल्यामुळे बजाज फायनान्स ३,१८५ रुपयांपर्यंत खाली आला आहे. तो तीन हजार रुपयांपर्यंत मिळाला, तर जरूर घ्यावा.

उगार शुगर वर्क्‍स सध्या १३ रुपये ५० पैशांपर्यंत खाली आला आहे. या शेअरमध्ये फार व्यवहार होत नसले, तरी पाच हजार शेअरपर्यंत गुंतवणूक करायला हरकत नाही. गेल्या ५२ आठवड्यांतील ९१७ रुपयांचा उच्चांकी भाव दाखवणारा दिलीप बिल्डकॉन ४०० रुपयांच्या आसपास मिळत आहे तो जरूर घ्यावा. या कंपनीचे गोव्यामध्ये खूप मोठे प्रकल्प सुरू आहेत. वर्षभरात इथेही किमान ४० टक्के नफा मिळू शकेल.

शेअरबाजारात तेजी टिकून राहावी अशी काहीही चिन्हे नाहीत. त्यामुळे ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन - SIP’चा जरूर अवलंब सुरू करावा.

लार्सेन अँड टुब्रोने माईंड ट्रीचे आग्रहण केल्यानंतर तिचे विलीनीकरण करण्याचे ठरवले आहे. तरीही माईंड ट्रीचा शेअर खाली जात आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या प्रचंड गंगाजळीचा मुद्दा केंद्र सरकार आणि बॅंक यांच्यात कळीचा ठरत आहे. ही गंगाजळी सरकारकडे तीन ते पाच वर्षांत वर्ग व्हावी असे त्याबाबत नेमल्या गेलेल्या जालन समितीने सुचवले आहे. तसे झाल्यास वित्तीय तूट एकदम कमी होऊन जाईल. 

एचडीएफसी बॅंक आपल्या १० रुपयांच्या शेअर्सचे विभाजन दोन रुपये दर्शनी किमतीच्या पाच भागांत करणार आहे. विभाजन पूर्व हा शेअर सध्या जरूर घ्यावा. विभाजनासाठी बॅंकेने २० सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट केली आहे. एचडीएफसी बॅंकेचा एप्रिल-जून २०१९ तिमाहीचा नफा ५,५६८ कोटी रुपये झाला आहे. नफ्यातील ही वाढ २१ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. कंपनीचे व्याजाव्यतिरिक्त उत्पन्न वाढत असल्यामुळे ही वाढ दिसत आहे. या तिमाहीसाठी हे उत्पन्न १३,२९४ कोटी रुपये झाले होते. जून २०१८ च्या याच तिमाहीचे उत्पन्न १०,८१३ कोटी रुपये होते. बॅंकेने या तिमाहीत अनार्जित कर्जासाठी २,६१४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत हे उत्पन्न १४,६३१ कोटी रुपये होते. या वर्षीच्या या तिमाहीत व्याजाव्यतिरिक्त उत्पन्न १८,२६४ कोटी रुपये आहे. तरतूद जास्त करूनही यावेळी उत्पन्न वाढलेले आहे. बॅंकेने दिलेली सध्याची कर्जे २०१९ तिमाहीअखेर ८.२९ ट्रिलीयन रुपये होती. बॅंकेच्या ठेवी ९.५ ट्रिलीयन रुपये आहेत. बॅंकेची भांडवली पर्याप्तता १६.९ टक्के आहे. कंपनीची एचडीबी फिनान्शियल सर्व्हिसेस ही एक उपकंपनी आहे. बॅंक त्या उपकंपनीचे काही शेअर्स वर्षभरात विकायला काढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सध्या एचडीएफसी बॅंकेत थोडीतरी गुंतवणूक करावी.

चीनने परत अमेरिकेबरोबर व्यापार बोलणी सुरू केल्यामुळे जागतिक अर्थकारण सुधारणार आहे. त्याचा फायदा भारतीय शेअर बाजाराला नक्की होईल. हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, लार्सेन टुब्रो, आयसीआयसीआय बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, झी एंटरटेनमेंट, आयडीएफसी फर्स्ट बॅंक, अंबुजा सिमेंट, बायोकॉन, एबीबी इंडिया, मारुती सुझुकी या कंपन्यांचे जून २०१९ तिमाहीचे आकडे बघून गुंतवणुकीचा पुढील आराखडा ठरवावा. तत्पूर्वी म्युच्युअल फंडांनी बाजारातील गुंतवणूक हे आकडे आश्‍वासक नसतील म्हणून काढून घ्यायला सुरुवात केली आहे. याउलट विदेशी गुंतवणूकदारांनी मात्र गुंतवणूक वाढवली आहे. जुलै २५ ला महिन्यातील वायदे बाजाराची पूर्ती झाली. 

आयटीसी कंपनीच्या अध्यक्षांनी २०३० पर्यंत आपला व्यवसाय एक लाख कोटी रुपयांपर्यंत होईल असे भाकीत केले आहे. त्यामुळे आयटीसीमध्ये काही गुंतवणूक अवश्‍य हवी. इंडू सिंड बॅंकेने या तिमाहीत ३८ टक्के नफा जास्त दाखवला आहे. हा शेअरही सध्या गुंतवणुकीस चांगला आहे.

केंद्र सरकारने नुकतीच ओपन एकरेज लायसेन्सींग पॉलिसी जाहीर केली आहे. त्यानुसार तेल व नैसर्गिक वायूचे ३२ ब्लॉक्‍स विकायला काढले होते. ३२ पैकी ऑइल इंडियाने १२ ब्लॉक्‍स हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. ऑइल इंडियात माफक प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही.

सिप्ला कंपनीने चीनमध्ये आपले व्यवहार वाढवण्याचे ठरवले आहे. ही वाढ कंपनीच्या युरोपियन क्षेत्राद्वारे केली जाईल. 

जेएसडब्ल्यू स्टीलने आपली टीनप्लेट कपॅसिटी वाढवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ४१९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निश्‍चय केला आहे.

देशातील पिण्याच्या पाण्याची तसेच उद्योगांना लागणाऱ्या पाण्याची टंचाई लक्षात घेता ION Exchange मध्ये गुंतवणूक हितावह ठरेल.

सॅनोफी येत्या काही दिवसांत बरेच नवीन प्रॉडक्‍ट्‌स विकायला काढणार आहे. इथे थोडी गुंतवणूक अवश्‍य हवी. पुढच्या आठ-नऊ महिन्यांत केंद्र सरकार राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील आपली गुंतवणूक कमी करण्याची शक्‍यता आहे.

एतिहाड आणि हिंदुजा समूह सध्या डबघाईस आलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्याची शक्‍यता आहे. 

एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या मतानुसार विदेशी चलनांच्या संदर्भात सुधारणारा रुपया आणि सकल राष्ट्रीय उत्पादनातील थोडी घट यामुळे महागाई ४.१ टक्के असण्याची शक्‍यता आहे. ३४५ इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रकल्पांचा खर्च ३१ लाख कोटी रुपयांनी वाढणार आहे. याचा परिणाम या प्रकल्पांची गती मंदावण्यात होईल. रेल्वे मंत्रालयाने तीन ट्रिलियन रुपये गुंतवून तीन फ्रेट कॉरिडॉर्स बांधण्याचे ठरवले आहे. पिरामल एंटरप्रायझेसने स्टॅनचार्ट बॅंकेच्या माध्यमातून अपरिवर्तनीय कर्जरोखे १५०० कोटी रुपयांपर्यंत उभे करायचे ठरवले आहे.

संबंधित बातम्या