सप्टेंबरअखेर शेअर्स स्थिरावणार?

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागले आहेत. भाजप आणि शिवेसना यांच्या युतीबद्दल अद्यापही संभ्रम आहे. शिवसेना २८८ पैकी निम्म्या जागांवर जरी दावा करीत असली, तरी सध्याचे संख्याबळ लक्षात घेता शिवसेनेला ११५ ते १२० जागांवर समाधान मानावे लागेल. रामदास आठवले वगैरेंना १२ ते १५ जागा सोडल्यास भाजप १५५ ते १६५ जागांवर आपला हक्क सांगेल. युती झाली तर तिला २२० जागा सहज मिळाव्यात. हा तिढा आजपर्यंत सुटला असेल. कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक लोक भाजपमध्ये जात आहेत ते तिकिटाबाबतची आशा बाळगूनच. अशा ८, १० लोकांना सामावून घेण्यासाठीही भाजपला किंचित सामोपचाराचे धोरण ठेवावे लागेल. 
 
काही झाले तरी दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. नगरपालिकेचाही अनुभव नसणाऱ्या आदित्य ठाकरे यांनाही सध्या मनोरथाचे लगाम आवरावे लागतील. दिवाळीच्या आसपास मंत्रिपदाच्या खुर्चीकडे अनेकांचे डोळे लागले असतील. 

अर्थव्यवस्थेमध्ये सध्या मरगळ आलेली आहे. वाढीचा वेग पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला असल्यामुळे स्टीम्युलसची जरुरी होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बांधकामातील अपुरी कामे पुरी करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यातील ३०९ ठिकाणी ही कामे पुरी केली जातील. त्यासाठी २०२२ पर्यंत तीन वर्षांची कालमर्यादा आखली आहे. या कामामुळे ठिकठिकाणी रोजगार वाढेल. 

पावसाळा सध्या मंदावला आहे. पण आतापर्यंत झालेला पाऊस समाधानकारक आहे, त्यामुळे खरीप पिके चांगली आली आणि रब्बीची पेरणी चांगली झाली तर ग्रामीण भागातली सधनता वाढेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग साडेपाच ते सहा टक्‍क्‍यांपर्यंत जाईल. 

सप्टेंबर २०१९ तिमाहीचे व सहामाहीचे कंपन्यांचे आकडे (विक्रीचे व नफ्याचे) बऱ्यापैकी चांगले आले, तर शेअर बाजार जरा तरी स्थिरावेल. त्यामुळे निर्देशांक व निफ्टी पाच टक्‍क्‍यांनी वर जावा. 

पहिल्या सहामाहीपेक्षा कंपन्यांची दुसरी सहामाही चांगली जाते. दसरा, दिवाळी व नाताळसारख्या सणांमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी सहा बॅंकांच्या विलीनीकरणाची घोषणा जरी केली असली, तरी त्याबाबतचा विस्तृत तपशील अजून जाहीर झालेला नाही. कुठल्या बॅंकेसाठी किती शेअर्स दिले जातील हे जोपर्यंत स्पष्ट केले जात नाही, तोपर्यंत बॅंकांच्या शेअर्सना दिशा मिळणार नाही. राष्ट्रीयकृत बॅंकांकडे केंद्र सरकार काही भांडवलही 
घालणार आहे. स्टेट बॅंकेने मात्र आपल्याकडे पुरेसे भांडवल असून, जास्त भांडवलाची आवश्‍यकता नसल्याचे सांगितले आहे. स्टेट बॅंकेचा शेअर सध्या २७० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. तिच्या अनर्जित कर्जाची टक्केवारी यंदा घटलेली दिसावी. येस बॅंकेचा शेअरही हळूहळू सुधारत आहे. तो वर्षभरात ३० ते ३५ टक्के वाढावा व ३६० ते ३७५ रुपयांच्या पातळीवर यावा. जम्मू-काश्‍मीर ३७० कलम वगैरे बाबतीत पाकिस्तानवर भारताने केव्हाच कुरघोडी केली आहे. संयुक्त राष्ट्रांनीही भारताच्या बाजूंनी कौल दिला आहे. आता बोलणी फक्त पाकव्याप्त काश्‍मीरबद्दलच होतील असे भारताने स्पष्ट केले आहे. 

गुंतवणुकीचा विचार करता, बॅंक ऑफ महाराष्ट्रचा शेअर सध्या १२ रुपयांच्या आसपास घ्यायला हरकत नाही. जे कुमार इन्फ्रा ही कंपनी मेट्रोमार्ग बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सिडकोने तिला ४०६ कोटींची ऑर्डर दिली आहे. हा शेअर सध्या खूप स्वस्त मिळत आहे, त्यामुळे तो जरूर घ्यावा. गेल्या दहा दिवसांत तो बराच वाढला आहे, तरीही त्यात अजून १०० रुपयांची वाढ होऊ शकेल. 

गेल्या आठवड्यात बजाज फिनसर्व्ह वाढून ७,३८६ वर बंद झाला. बजाज फायनान्सही ३,४२५ रुपयांपर्यंत चढला आहे. हे शेअर्स अजूनही घ्यावेत. वर्षभरात त्यात ३० टक्‍क्‍यांनी वाढ सहज व्हावी. 

ओबेरॉय रिऍल्टी सध्या ५४६ रुपयांवर आहे. गेल्या दहा दिवसांत तो भरपूर वाढला आहे. अर्थमंत्र्यांकडून बांधकाम क्षेत्रांसाठी स्टीम्युलस दिला गेल्यामुळे ओबेरॉय रिॲल्टीचा शेअर सध्याच्या भावात घेण्यासारखा आहे. कंपनीचे ठाण्याच्या जवळपास बरेच बांधकाम सुरू आहे. ठाण्यामध्ये तिने नुकतीच मोठी गुंतवणूक करून ६० एकर जमीन मिळवली आहे. एक कोटी ते दीड कोटी स्क्वेअरमीटरचे बांधकाम तिथे उभे राहणार आहे, त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या दिवाळीपर्यंत मिळवल्या जातील. या भागात २०१७-२०१८ मध्ये साडेतीन लाख स्क्वेअर मीटरचे काम झालेले आहे. ठाण्याप्रमाणेच मुलुंडमध्येही असलेल्या घरांच्या किमती सतत वाढत आहेत. गुंतवलेल्या रकमेवर तिला ४० टक्के नफा सहज मिळत असतो. इथे निवासिकांना चांगली मागणी येते. याच परिसरात रेमंड आणि शापूर्जी नॉर्दर्न यांचीही कामे सुरू आहेत. ठाण्यापासून नव्या मुंबईपर्यंत ज्युपिटर हॉस्पिटल, पालम हॉस्पिटल, एसीइ हॉस्पिटल अँड हार्ड केअर, हिरानंदानी हॉस्पिटल, बेथानी हॉस्पिटल, वसंत विहार शाळा, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, एमएच हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, व्हीवीयाना मॉल आणि कोरम मॉल असे प्रकल्पही सुरू होत आहेत. त्यामुळे हा शेअर गुंतवणूकदारांना चांगला नफा देऊन जाईल. 

बांधकाम क्षेत्रातील दिलीप बिल्डकॉनचा शेअर ४४० ते ४५० रुपयांच्या दरम्यान घेतला, तर इथेही वर्षभरात ३० टक्‍क्‍यांची वाढ दिसेल. 

लार्सेन अँड टुब्रोला नवीन २,८०० कोटी रुपयांची कामे मिळाली आहेत. ही एकच कंपनी पुढील काही महिन्यांत नव्या मुंबईत २३ हजार निवासिका बांधणार आहे. इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रकडून तिला ही कामे मिळतील. महाराष्ट्र आवास योजनेची ही कामे आहेत. १३ ते २० मजल्यांच्या या इमारती असणार आहेत. एल अँड टी समूहातील एल अँड टी टेक्‍नॉलॉजी सर्व्हिसेस या संलग्न कंपनीला युरोपियन ऑटोमोबाईल ''ओइएम''कडून विद्युतीकरणाची कामे मिळाली आहेत. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेमध्ये २०२२ पर्यंत ३९० शहरांत दोन लाख घरे बांधली जाणार आहेत. खासगी भागीदारीत हा उपक्रम राबवला जाईल. मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या एक ते दीड कोटी रुपयांच्या निवासिकांची ही कामे असतील. अर्थात त्यांना बॅंकांच्या गृहवित्त योजनांमधूनच कर्जे घ्यायला लागतील. बॅंकांना हा एक चांगला कर्जासाठीचा उपक्रम मिळणार आहे. रोटी, कपडा आणि मकान या मूलभूत गरजांपैकी ही एक गरज आहे. देशात साखरेचे उत्पादन भरपूर वाढले आहेत, त्यामुळे ती निर्यात करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. त्या कारखान्यातून इथेनॉलचीही उपलब्धता वाढणार आहे. पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्यास इथेनॉलला मोठी मागणी येईल. मद्यनिर्मितीसाठी केंद्र सरकार व राज्यसरकारांना धोरण बदलावे लागणार आहे. इथेनॉल मिश्रणाचे प्रयोग २००४ पासून सुरू आहेत. बलरामपूर चिनी, रेणूका शुगर, डालमिया शुगर या कंपन्यांचे शेअर्स त्यामुळे तेजाळतील. वाहनांच्या विक्रीत सध्या वाढ होत नसल्यामुळे मारुती सुझुकीचा शेअर सध्या वाढत नाही. सध्या तो ६,४५० रुपयांच्या आसपास असला, तरी नजीकच्या भविष्यात तो ५,९०० पर्यंत घसरेल. 

आयडीएफसी सिक्‍युरिटीजने एसआरएफची शिफारस केली आहे. सध्या हा शेअर २,७०० रुपयांच्या आसपास आहे. तो ३,३४५ रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. पुढील दोन वर्षांत स्पेशॅलिटी केमिकल्स आणि रेफ्रीजरंट्स व्यवसाय वाढणार आहे, त्यामुळे या कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. 

बलरामपूर चिनीचा आधी उल्लेख आलाच आहे. सध्या हा शेअर १४७ रुपयांना मिळत आहे. वर्षभरात तो ५० टक्‍क्‍यांपर्यंतही वाढू शकेल. मात्र, अशा मिड कॅप शेअर्समध्ये जोखीम भरपूर असते. तेव्हा गुंतवणूकदारांनी आपली जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. जेएसडब्ल्यू स्टीलने ‘एनसीएलएटी’कडे भूषण स्टीलबद्दल कुणीही दाद मागू नये म्हणून अभययाचना केली आहे. एपीएल अपोले ट्यूब सध्या १,२६७ रुपयांना उपलब्ध आहे. जे कुमार इन्फ्राबद्दल पूर्वी लिहिलेलेच आहे. तो सध्या ५.६२ पट किं/उ गुणोत्तराला उपलब्ध आहे. रोज त्यात ४-६ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेची उभारणी करण्यासाठी तिला मोठी ऑर्डर मिळाली आहे. 

लार्सेन टुब्रो सध्या १,३४२ रुपयांना उपलब्ध आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर २०.६ पट इतके दिसते. रोज १० ते १५ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. 
मॅक्‍स फिनान्शिअल सर्व्हिसेसचा भाव सध्या ४१२ रुपये आहे. वर्षभरातील त्याचा किमान व कमाल भाव ३५० रुपये व ४८९ रुपये होता. रोज त्यात पाच लाख शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. उगार शुगर वर्क्‍सचा शेअर सध्या १३१ रुपयांना विकत घेतल्यास त्यात २५ टक्के वाढ सहज व्हावी.

संबंधित बातम्या