म्युच्युअल फंडांत भर 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

अर्थनीती : शेअर बाजार
 

लॉकडाउनमुळे प्रवासी वाहन विक्रीत घट झाली आहे. त्याचा फटका आज ना उद्या बजाज ऑटो, मारुती उद्योग अशा कंपन्यांना बसेल. यंदाच्या जुलैमध्ये १,५७,३७३ प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या जुलै २०१९ मध्ये २,१०,३७७ प्रवासी वाहनांची विक्री झाली. होती.दुचाकी वाहनांच्या विक्रीत ३७.४७ टक्के, तीनचाकी वाहनविक्रीत ७४.३३ टक्के, व्यावसायिक वाहन विक्रीत ७२.१८ टक्के आणि वैयक्तिक वापराच्या वाहनांच्या विक्रीत २५.१९ टक्के घसरण झाली. जूनमध्ये याहूनही कमी वाहनविक्री झाली होती.  

एका वाहनामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष १० जणांना रोजगार मिळतो. वाहनचालक, क्लिनर, पेट्रोल, विक्रेते, रस्त्यावरील पंक्चर काढणारी दुकाने अशा अनेक ठिकाणी रोजगारनिर्मिती होत असते. त्यात घट झाल्यामुळे यंदा सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट - GDP) बरीच घट दिसेल. अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या विकासदरावरही त्याचा परिणाम होईल. 

सोने, चांदीचे भाव मध्यंतरी उच्चांकी दरावर गेले होते. बुधवारी १२ ऑगस्टला अचानक सोने, चांदीचे भाव गडगडले. त्यावेळी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ५००० रुपयांनी कमी झाला. यापूर्वी काही महिने सोन्या, चांदीचे भाव सतत वर जात होते. चांदीच्या भावातही एका किलोला ८ हजार रुपयांची घट झाली. 

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार घडणावळ आणि वस्तू सेवा कर वगळून शुद्ध सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ५२,६२६ तर स्टँडर्ड सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ५२,४१५ रुपये होता. चांदीचा भाव १ किलोसाठी ६५,७५० रुपये होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि त्यामुळे करण्यात येणाऱ्या लॉकडाउनमुळे ग्राहकांना येणारी अडचण लक्षात घेऊन भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने आयुर्विमा कंपन्यांना ऑनलाइन पद्धतीने विमा पॉलिसी देण्याची परवानगी दिली आहे. ही सवलत २०२०-२१ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या सर्व पॉलिसींना लागू होणार आहे. जीवनविमा आणि आरोग्य विमा कंपन्यांना, कोणत्याही ग्राहकाने पॉलिसीची कागदपत्रे मागितल्यास ती देणे बंधनकारक आहे. आयुर्विमा कंपन्यांना दर तिमाहीत त्यांच्या गुंतवणुकीची माहिती ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देण्याची परवानगी दिली आहे. 

कोरोनामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येत असल्याने अडचणीत येणारा कर्मचारी वर्ग त्या निवारण्यासाठी सोन्यावर कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडे वळत आहे. सोन्याच्या तारणावर विनाविलंब कर्ज मिळते. केपी एमजीच्या एका अहवालानुसार मार्च २०२० पर्यंत देशातील सोन्यावरील कर्जाची बाजारपेठ ४.६ लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. बँकांकडून सोन्यावर घेतली जाणारी कर्जे कर्जदार सहसा बुडवीत नाहीत, कारण सोन्याचे भाव सतत वाढत असतात आणि अडीअडचणीला किडूकमिडुकही उपयोगी पडत असते. स्टेट बँकेसारख्या बँकेकडून सोन्याच्या कर्जावर ७ ते साडेसात टक्के दराने व्याज लावले जाते. 

बँकांची उद्योगधंद्यांना दिली जाणारी कर्जे सध्या कमी होत असल्याने सोनेकर्जाचा पर्याय त्यांना चांगलाच उपलब्ध झाला आहे. बचत खात्यावर बँका फक्त ४ टक्केच व्याज देतात. त्यामुळे व्यवस्थापन खर्च भरील धरूनही साडेसात टक्के व्याज चांगला परतावा देते. बँका आता मिळकतकर भरण्यासाठीही कर्जे देतात. नगरपालिका, महानगरपालिका सर्वसाधारपणे एप्रिल ते जून या कालावधीत मिळकतकराच्या नोटिसी पाठवतात. या दोन महिन्यात उद्योगधंदेही शिथिल असतात. सध्या हे शैथिल्य वाढत्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बँकांना हे नवे पर्याय उपलब्ध होतात. 

शेअरबाजारातील चढउतार आणि अर्थव्यवस्थेतील मरगळ या दोन बाबी सध्या जाणवत असल्या तरी जूनअखेर संपलेल्या तिमाहीत म्युच्युअल फंडांत १८ लाख नव्या खात्यांची भर पडली आहे. एकूण खात्यांची संख्या ९.१५ कोटींवर गेली आहे. जूनअखेरीस संपलेल्या तिमाहीत १७.९६ लाख नव्या खात्यांची भर पडली. ४५ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकूण खात्यांमध्ये मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत २६ लाखांची (खात्यांची) भर पडली. जूनअखेरीस संपलेल्या तिमाहीत गुंतवणुकदारांनी विविध म्युच्युअल फंड योजनांमध्ये १.२४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक १.१ लाख कोटी रुपये रोखे फंडात गुंतवली गेली, तर ११,७३० कोटी रुपयांची गुंतवणूक समभाग संबंधित फंडात गुंतवली गेली. 

अनेक गुंतवणूकदार एकाचवेळी बँकेत चालू खाते व कॅश क्रेडिट खाते अशा दोन्ही प्रकारे व्यवहार करतात; त्यातील अनिष्टतेवर उपाययोजना म्हणून रिझर्व्ह बँकेने बंधने आणली आहेत. 

व्यवसायासाठी बँकेतून सातत्याने उचल घेऊन तिची परतफेड करणे अर्थात ओव्हरड्राफ्ट सुविधा घेणे हा प्रकार अनेक वर्षे चालू आहे. एका बँकेत चालू खाते ठेवून. दुसऱ्या बँकेत ओव्हरड्राफ्ट खाते ठेवणे असेही, प्रकार सर्रास चालू असतात व ते वैधही आहेत. तरीही  याला आला घालण्यासाठी रिझर्व्ह बँक काही नवीन उपाय शोधत आहे. यामुळे बँकांच्या पतपुरवठ्याला शिस्त येईल, असे रिझर्व्ह बँकेला वाटते. 

गेल्या आठवड्यात १३ तारखेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८,३१० होता तर निफ्टी ११,३०० होता. काही महत्त्वाच्या शेअर्सचे भाव खालीलप्रमाणे होते - 
बजाज फायनान्स ३४१८, जिंदाल स्टील अँड पॉवर २१३, बजाज फिनसर्व्ह ६३५०, लार्सन टुब्रो ९९०, मॅक्स फिनान्शिअल ५३०, दिलीप बिल्डकॉन ३५१, जे एस डब्ल्यू स्टील २५८, येस बँक १६ रुपये (हा शेअर विक्रमी गडगडला असल्यामुळे त्याचे रोज ७० ते ९० कोटी शेअर्सचे व्यवहार होतात.) स्टरलाईट टेक्नॉलॉजीज सध्या १३२ रुपयांवर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या २०० ते २१० रुपयांच्या दरम्यान मिळतो. या भावाल कि./अु गुणोत्तर ८.३५ पट इतके आकर्षक आहे. फेडरल बँक सध्या ५५ रुपयाला उपलब्ध आहे. रोज सव्वादोन कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. सध्या किं./अु गुणोत्तर ६.७० पट आहे. तर एचडी एफसी बँक १०७० रुपयाला मिळत आहे. पिरामल एंटरप्रायझेस १४६० ते १४८० मध्ये उपलब्ध आहे. इंटरग्लोब एव्हिएशन ११६१ रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या आठवड्यात हा ९०० रुपयाला उपलब्ध होता. सध्याच्या भावात अजूनही ४० टक्के वाढ होऊ शकते. गेल्या वर्षातील किमान भाव ७७१ रुपये होते.

संबंधित बातम्या