बँकांच्या सेवाक्षेत्रात स्पर्धा 

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

अर्थनीती : शेअर बाजार

 बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक या चार राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाचे वृत्त आहे. त्यांच्या भांडवलात केंद्र सरकारचा सध्या ५२ टक्के हिस्सा आहे. मार्च २०२१ पूर्वी ही प्रक्रिया पुरी व्हावी असा अंदाज आहे. बँकांच्या खासगीकरणाबरोबरच बीईएल, बीईएमएल, इंजिनिअर्स इंडिया अशासारख्या कंपन्यांच्या खासगीकरणाचे प्रयत्न होतील. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचे करमहसुलाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे सरकार आपला हिस्सा कमी करून चालू भावाने ही रक्कम उभी करेल. यातून सरकारी प्रकल्पांना भांडवल पुरवले जाईल. 

सध्या बारा सरकारी बँका देशात कार्यरत आहेत. याखेरीज सरकारचा ४७ टक्के हिस्सा असलेली आयडीबीआय बँकदेखील कार्यरत आहे. उरलेला ५१ टक्के हिस्सा आयुर्विमा महामंडळाचा आहे. 

कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. ज्या चार बँकांचे खासगीकरण होईल, तिथेही आता नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार नाहीत. खासगीकरणानंतर बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवाक्षेत्रात स्पर्धा निर्माण होईल. ठेवी मिळविणे व कर्ज देणे इथे ही स्पर्धा होईल. सध्या नवीन उद्योग सुरू होत नसल्यामुळे आणि असलेले उद्योगही आपली व्याप्ती वाढवण्यास असमर्थ असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा रथ सध्या अडखळतच चालेल. त्यामुळे २०२१ च्या अर्थसंकल्पाकडेच तज्ज्ञांचे डोळे लागून राहतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पुढील वर्षात बऱ्याच जबाबदाऱ्यांचे ओझे पडणार आहे. 

निफ्टी बँक २२३७४ रुपयांच्या आसपास आहे. १८ ऑगस्ट रोजी काही शेअर्सचे भाव पुढीलप्रमाणे (रुपयात) होते - 
बजाज फिनसर्व्ह ६३७३, बजाज फायनान्स ३४४३, लार्सन टुब्रो १०१८, जिंदाल स्टील २२७, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक २४३०, दिलीप बिल्डकॉन ३९१, जेएसडब्ल्यू स्टील २७६, एपीएल अपोलो २२८२, जे कुमार इन्फ्रा १०४, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज १५०, स्टेट बँक ऑफ इंडिया १९६, फेडरल बँक ५५, बँक ऑफ बडोदा ४७, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ९५, किं।उ गुणोत्तर ३.३६ पट, आरबीएल बँक १८४, डीएलएफ १५८, गुजराथ हेवी केमिकल्स १५६, पिरामल एंटरप्राइजेस १४४०, रेमंड २७८, जे के टायर ६२, बाळकृष्ण इंडस्ट्रीज १३३६, फिनिक्स मिल्स ६३९, बँक ऑफ महाराष्ट्र १२.५०, स्पाइस जेट ५१. 

वरीलपैकी बहुतेक शेअर्स सध्या गुंतवणुकीस योग्य वाटतात. 

एका आर्थिक वर्षात मोठ्या रकमांचे व्यवहार झालेले असल्यास ते दाखवणे अनिवार्य आहे, असे आधीचे वृत्त होते. पण प्राप्तिकर खात्याने त्याचा इन्कार केला आहे. तरीही या खात्याची नजर सर्व व्यवहारांवर असते, हे ध्यानात ठेवून करदात्यांनी प्रामाणिकपणे असे व्यवहार विवरणपत्रात जरूर दाखवावेत. 

  • वीस हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे हॉटेल बिल. 
  • आयुर्विम्याचा ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा हप्ता. 
  • आरोग्य विम्याचा २० हजार रुपयांहून अधिक रकमेचा वार्षिक हप्ता. 
  • एक लाख रुपयांपेक्षा जास्त भरलेले शिक्षण शुल्क. 
  • एक लाख व त्यापेक्षा जास्त रकमेच्या दिलेल्या देणग्या. 
  • बिझनेस क्लासमधून केलेला विमान प्रवास. 

हे सर्व तपशील, करखाते बाहेरून मिळवत असले तरी सुजाण नागरिक म्हणून आपणहोऊन ते देणे केव्हाही चांगले. 

देशांतर्गत शेअरबाजार आपल्या सर्वोच्च पातळीपासून आता ९ टक्के दूर आहे. कोरोनाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही बाजार वास्तवापासून दूर नाही. 

मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार यांच्या आकडेवारीनुसार १ फेब्रुवारी २०२० ला बीसईचा निर्देशांक ३९,७३५ च्या पातळीवर होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ऑगस्ट रोजी, ‘पारदर्शी करप्रणाली प्रामाणिकांचा सन्मान’ या नावाच्या प्राप्तिकराच्या प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले. एकविसाव्या शतकातील या नव्या व्यवस्थेमुळे करप्रणाली सुटसुटीत होईल. प्राप्तिकर खात्याला अनावश्‍यक खटल्यांपासून मुक्तता मिळेल. 

सध्या सोन्याचे भाव दहा ग्रॅमसाठी ५२ ते ५३ हजाराच्या पातळीवर आहेत. चांदीचा एक किलोचा भाव ६५,७५० इतका आहे. 

अरबिंदो फार्मा, कॅडिला, ल्युपिन, डी व्ही प्लॅन हे चार औषधी क्षेत्रातील शेअर्स आपल्या गुंतवणुकीत जरूर हवेत. कारण यूएसएफडीएने (युनायटेड स्टेटस फेडरल ड्रग्ज असोसिएशन) गेल्या तीन महिन्यांत अनेक कंपन्यांच्या नव्या उत्पादनाला मान्यता दिली आहे. कोरोनामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याबद्दल जागरूक झाला आहे, त्यामुळे या औषध कंपन्यांचे महत्त्व वाढलेले आहे. विशेषतः ज्या कंपन्यांचा अमेरिकेत व्यवहार आहे किंवा उत्पादन होत आहे, त्यांना प्राधान्य द्यावे. याशिवाय टेक महिंद्र आणि एसबीआय कार्ड या कंपन्यांतही गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

संबंधित बातम्या