केवळ ५९ मिनिटांत कर्ज

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

विशेष
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघू व मध्यम व्यावसायिकांना २ नोव्हेंबर २०१८ रोजी दिवाळीसाठी खास भेट देऊ केली आहे, काय आहे ही दिवाळी भेट? तर ही भेट म्हणजे www.psbloanin59minutes.com हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर कोणीही मायक्रो, स्मॉल व मीडीयम(एमएसएमई) म्हणजेच सूक्ष्म, लघू अथवा मध्यम व्यावसायिक आपल्या चालू व्यवसाय वाढीसाठी लागणारे भांडवल कर्ज रूपाने उभारण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कर्ज मागणी करू शकतो. या योजनेस psbloanin59minutes असे म्हणतात. ही योजना काय आहे व याचा  लाभ कसा घेता येतो हे आता आपण पाहू.

 सध्या व्यवसाय करीत असलेल्या लघू अथवा मध्यम व्यावसायिकासच व्यवसाय वाढीसाठी भांडवल हवे असल्यास या योजनेत भाग घेता येतो.

 • या योजनेअंतर्गत किमान एक लाख व कमाल पाच कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी किमान व्याजदर ८.५ टक्के आहे. 
 • या कर्जासाठी वर उल्लेखिलेल्या पोर्टलवर ई-मेल व मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावे लागते.
 • यानंतर कन्सेंट पेजवर असणाऱ्या विविध स्टेटमेंट्सना आपली सहमती (कन्सेंट) द्यावी लागते.
 • यानंतर येणाऱ्या जीएसटी पेजवर आपले जीएसटी युजर नेम व जीएसटीएन नंबर टाकल्यावर आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा. जर आपले एकाहून अधिक जीएसटी रजिस्ट्रेशन असेल, तर उर्वरित जीएसटीवरील प्रमाणे नोंदवावेत.
 • जर आपल्या व्यवसायास जीएसटी नोंदणी करणे गरजेचे नसेल, तर सेल्फ डिक्लेरेशन करावे.
 • यानंतर येणाऱ्या आयटीआर पेजवर आपले गेल्या तीन वर्षांचे आयटीआर रिटर्न्स एक्सएमएल (XML) पद्धतीने अपलोड करावेत.
 • यानंतर आपल्या बँक खात्याचे मागील सहा महिन्यांचे स्टेटमेंट पीडीएफ(PDF) पद्धतीने जोडावे. आपली एकापेक्षा जास्त बँकेत खाती असतील, तर आपण जास्तीत जास्त तीन बँक खात्यांची स्टेटमेंट्स जोडू शकता.
 • यानंतर येणाऱ्या लोन पेजवर आपल्या व्यवसायाचा तपशील (प्रोप्रायटर, पार्टनर, डायरेक्टर यांची नावे व पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य तपशील यांची माहिती भरावी. तसेच सध्या असलेल्या विविध कर्जाचा तपशील द्यावा. तसेच वाढीव कर्ज कशासाठी व किती हवे आहे व त्यासाठीची पूरक माहिती द्यावी.
 • वरीलप्रमाणे एकाहून अधिक बँकांकडे अथवा एनबीएफसीकडे एकाच वेळी कर्जाची मागणी करावी.
 • हे पोर्टल जीएसटी, इन्कमटॅक्स व बँका यांच्याशी सलग्न (इंटिग्रेट) केले असल्याने आपण दिलेल्या माहितीची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर लगेचच केली जाते व आपण मागणी केलेल्या कर्जाबाबतचा निर्णय ५९ मिनिटांच्या आत घेतला जातो.
 • आपल्या कर्ज मागणीस मिळणारा प्रतिसाद पाहून त्यातील कर्ज रक्कम, व्याज व परतफेड याबाबत आपल्याला सोयीस्कर असलेल्या बँकेचा अथवा एनबीएफसीचा पर्याय स्वीकारावा व त्याबरोबर कन्व्हीनिअन्स फी भरावी.
 • यानंतर आपल्याला तत्त्वतः कर्ज मंजुरी पत्र (इन प्रिन्सिपल अप्रुव्हल) आपल्या ई-मेलवर व जी बँक/एनबीएफसी आपण स्वीकारली आहे, त्या बँकेस/एनबीएफसीस पाठविले जाते. ही सर्व प्रक्रिया केवळ ५९ मिनिटांतच पूर्ण होते.
 • यानंतर संबंधित बँकेशी संपर्क करून कर्ज वितरणासाठी आवश्यक असणारी पूर्तता (उदा: लोन डॉक्युमेंट्‌स, चार्ज क्रिएशन) केल्यावर प्रत्यक्ष कर्ज रक्कम अदा केली जाते. असे करताना संबंधित बँकेकडून दिलेल्या कर्जाचा विनियोग कर्ज मागणी करताना केलेल्या उद्देशानुसारच होत असल्याची खातरजमा केली जाते (end use of funds) यासाठी सुमारे ८-१० दिवसांचा कालावधी लागू शकतो. आपण ही पूर्तता लवकर केली, तर कर्ज वितरण यापेक्षा कमी कालावधीतही होऊ शकते.
 • जर आपण या पद्धतीने कर्ज घेण्यास पात्र ठरत नसाल, तर आपण बँकेशी प्रत्यक्ष संपर्क साधून कर्ज मागणी अर्ज करू शकता.
 • या पोर्टलचे खास वैशिट्य असे, की आपण बँकेशी संपर्क न करता आपल्या कर्जास तत्त्वतः मंजुरी (इन प्रिन्सिपल अप्रुव्हल) मिळवू शकता ती फेसलेस पद्धतीने. यामुळे होणारा निर्णय केवळ कर्ज प्रकरणाच्या मेरिटवर घेतला जातो (कर्ज मंजुरी करणाऱ्या व्यक्तीच्या वेस्टेड इंटरेस्टचा किंवा पूर्वग्रह असण्याचा कर्ज मंजुरीच्या निर्णय प्रक्रियेवर कुठलाच परिणाम होत नाही).

 तरी या योजनेचा लाभ एमएसएमई उद्योजकांनी जरूर घ्यावा व आपल्या व्यवसायाची वाढ करून आपल्याबरोबर अन्य गरजूंना रोजगार उपलब्ध करून द्यावा.   

संबंधित बातम्या