अपघात विमा पॉलिसी

सुधाकर कुलकर्णी 
सोमवार, 8 मार्च 2021

अर्थविशेष

अपघात विमा पॅालिसी असणे ही आता गरजेची बाब झाली आहे. अन्य इन्शुरन्स पॉलिसीच्या तुलनेने कमी प्रीमियममध्ये जास्त जोखीम असे या पॅालिसीचे वैशिष्ट्य असून पॅालिसीधारकाचा जगात कुठेही आणि कधीही अपघात झाला, तरी नुकसानभरपाई मिळण्याची सोय या पॅालिसीत आहे.

दिवसेंदिवस होणारे वैद्यकीय संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान व त्यानुसार होणारी उपचार पद्धती, स्वतःच्या आरोग्याविषयीची वाढती जागरूकता याचा एकत्रित परिणाम म्हणजे वाढते आयुर्मान. ही जरी समाधानाची बाब असली तरी वाढती वाहनांची संख्या, अपुरे रस्ते, वाहतूक शिस्तीचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. भारतात दररोज सुमारे ११०० ते १२००च्या दरम्यान विविध प्रकारचे अपघात होत असतात. दरवर्षी सुमारे १.५ ते १.७५ लाख लोक अपघातामुळे मृत्युमुखी पडतात. याचा विचार करता व्यक्तिगत अपघात विमा पॅालिसी असणे ही आता गरजेची बाब झाली आहे. असे असले तरी याबाबत लोकांच्यात फारशी जागरूकता असल्याचे दिसून येत नाही. परिणामी आजही ही पॉलिसी घेणारे फार कमी लोक आढळून येतात. 

दंगल सदृश परिस्थिती किंवा कुठल्याही प्रकारचा अपघात होऊन मृत्यू, तसेच कायमचे अथवा तात्पुरते अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसाला नुकसान भरपाई देण्यात येते. तसेच ही पॅालिसी ५ ते ७० वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला घेता येते, शिवाय यासाठी वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नसते. वयोमर्यादा कंपनीनुसार कमी-अधिक असू शकते. साधारणपणे अर्जदाराच्या वार्षिक उत्पन्नाच्या ६ ते १२ पट कव्हर असणारी पॅालिसी मिळू शकते, मात्र कमाल कव्हरची मर्यादा इन्शुरन्स कंपनीनुसार कमी अधिक असू शकते. अशी पॅालिसी संपूर्ण कुटुंबासाठीसुद्धा खालील प्रमाणे घेता येते. साधारणपणे इन्शुरन्स कंपन्या ५ ते २५ लाख रुपयांपर्यंत (उत्पन्नाच्या पटीत) कव्हर देतात. (एक दोन कंपन्या १ ते २ कोटी रुपयांपर्यंत कव्हर देतात.)

 • पॅालिसी कव्हर हे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या पटीत मिळू शकते.
 • पती किंवा पत्नी कमावती नसल्यास अशा व्यक्तीला मिळणारे कव्हर कमावत्या व्यक्तीच्या ५० टक्के इतके असते.

    ५ ते २५ वर्षांपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी कव्हरच्या २५ टक्के मिळते.
अपघाती मृत्यू, पूर्णतः अपंगत्व/अंशतः अपंगत्व, तसेच कायमचे अपंगत्व किंवा तात्पुरते अपंगत्व  यासाठीची नुकसान भरपाई मिळू शकते.
या शिवाय अपघाती मृत्यू झाल्यास मृतदेह अपघात झालेल्या ठिकाणापासून घरी आणणे व अंत्यविधी यासाठी म्हणून २,५०० रुपयांपर्यंतचा खर्च दिला जातो. तसेच विमा धारकास अपघातात मृत्यू आल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन मुलांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे शिक्षण निधी म्हणून दिला जातो.

अपघात विमा पॅालिसीत खालील बाबीं समाविष्ट नसतात :

 •     जाणूनबुजून करून घेतलेली दुखापत किंवा आत्महत्या
 •     दारू किंवा अन्य मादक पदार्थांच्या सेवनाच्या नशेत झालेला अपघात
 •     वेडाच्या भरात झालेला अपघात
 •     गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
 •     धोकादायक खेळ, स्पर्धा यांमध्ये झालेला अपघात

प्रीमियम आकारणी ही संबंधित व्यक्तीच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. उदा. कार्यालयीन काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा बांधकाम व्यवसायात प्रत्यक्ष कामाच्या साइटवर काम करणाऱ्या व्यक्तीच्या अपघाताची शक्यता जास्त असते. अशा व्यक्तीला जास्त प्रीमियम पडतो. यासाठी व्यवसायांचे जोखमीनुसार वर्गीकरण केले जाते.

 • गट (अ): डॉक्टर, वकील, सल्लागार, लेखक, प्राध्यापक, बँक पोस्ट, सरकारी कचेरी यांसारखे कार्यालयीन काम करणाऱ्या व्यक्ती
 • गट (ब) : बिल्डर, ठेकेदार, साइटवर काम करणारा सुपरवायझर, जनावराचे डॉक्टर, ड्रायव्हर इ.

गट (क): खाणीत काम करणारे कामगार, विस्फोटक पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यात काम करणारा कामगार, सर्कसमधील कलाकार व कर्मचारी आदींसारखे जोखमीचे काम करणाऱ्या व्यक्ती. अ गटासाठी सर्वसाधारणपणे २० लाख रुपयांच्या कव्हरसाठी २२०० ते २५०० रुपये इतका वार्षिक प्रीमियम पडू शकतो. प्रीमियम कव्हरची रक्कम व कंपनी यानुसार कमी अधिक असतो. यासाठी वैद्यकीय तपासणी होत नाही व प्रीमियम वयावर अवलंबून नसतो, तर तो अर्जदार वर उल्लेखिलेल्या कोणत्या गटात आहे पाहून जोखमीनुसार आकारला जातो.

अपघात विमा पॅालिसी क्लेम करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

 • अपघाताची लिखित सूचना व संपूर्ण तपशील विमा कंपनीला कळवावा लागतो.
 • कंपनीचा क्लेम फॉर्म पूर्ण तपशीलासह भरून देणे.
 • अपघाताचा पुरावा, त्या संबंधीचे अपघातस्थळाचे फोटो, पोलीस रिपोर्ट, पंचनामा इ.
 • अपघाती मृत्यू असल्यास पोस्टमोर्टम रिपोर्ट, मृत्यूचा दाखला.
 • कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.

पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला कव्हरइतकी रक्कम दिली जाते. पॉलिसी धारकाला अपघातामुळे पूर्णतः अपंगत्व आल्यास कव्हर इतकी रक्कम क्लेम पोटी दिली जाते. अंशतः अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणात क्लेम दिला जातो व हे प्रमाण अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या दाखल्यानुसार असते. उदा. कव्हर २० लाखाचे आहे व वैद्यकीय दाखल्यानुसार अपंगत्व ६० टक्के इतके असेल, तर पॉलिसी धारकाला १२ लाख क्लेम पोटी दिले जातील. अपघातामुळे झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्यास रोजचे ५०० रुपये इतकी रक्कम हॉस्पिटलमधील कालावधी व १०४ दिवस यातील कमीत कमी कालावधीसाठी प्रतिदिनी मिळतील.

या पॉलिसीचा कालावधी वार्षिक असून दरवर्षी पॉलिसीचे प्रीमियम भरून नूतनीकरण करावे लागते. काही इन्शुरन्स कंपन्या आता तीन वर्षे कालावधीची पॉलिसी देऊ करतात. अशी पॉलिसी घेण्याने प्रीमियममध्ये थोडी बचत होऊ शकते.

थोडक्यात असे म्हणता येईल, अपघाताबाबतची अनिश्चितता ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठी रिस्क आहे. दुर्दैवाने जर कोणाला यास सामोरे जावे लागले, तर यातून उद्‍भवणाऱ्या आर्थिक समस्येवर अपघात विमा पॉलिसी घेऊन काही प्रमाणावर मात करता येते, तेही अगदी नाममात्र खर्चात. अपघात कोणालाही, कधीही व कुठेही होऊ शकतो आणि म्हणून अपघात विमा पॉलिसी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.  

संबंधित बातम्या