नॅशनल पेन्शन सिस्टीम

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 17 मे 2021

अर्थविशेष

वाढते आयुर्मान, विभक्त कुटुंबपद्धती व झपाट्याने बदलत जाणारे राहणीमान यामुळे निवृत्तीनंतरचे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान हा एक चिंतेचा विषय बनला आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये नुकत्याच आलेल्या एका बातमीत २०५०पर्यंत ६१ टक्के ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असेल असे म्हटले आहे. या दृष्टिकोनातून आजच्या तरुण पिढीने आपल्या निवृत्तीची काळजी वेळीच घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच यासाठी असलेल्या ‘एनपीएस’ या एक अगदी योग्य अशा पर्यायाची आज आपण सविस्तर माहिती घेऊ.

संसदेने मंजुरी दिल्यानुसार पेन्शन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटीची (पीएफआरडीए) स्थापना २३ ऑगस्ट २००३ रोजी करण्यात आली. या संस्थेला वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत. सर्व पेन्शन फंडांचे नियंत्रण व त्यात सुधारणा करणे हे ‘पीएफआरडीए’चे मुख्य काम आहे. हे सर्व करण्याची गरज पडण्याचे मुख्य कारण म्हणजे, सरकारी तिजोरीवर पडणारा कर्मचारी पेन्शनचा बोजा सरकारला कमी करावयाचा होता. त्यानुसार १ जानेवारी २००४पासून नोकरीला लागलेल्या केंद्र/राज्य/अन्य सरकारी संस्था, सरकारी बँका यांना पूर्वी असणारी पेन्शनची सुविधा कायमस्वरूपी रद्द करण्यात आली. मग ‘पीएफआरडीए’ने ‘नॅशनल पेन्शन सिस्टीम’ (एनपीएस) ही योजना सुरुवातीला केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली व नंतर १ मे २००९पासून सर्वांसाठी खुली केली. या योजनेची आपण आता तपशिलात माहिती घेऊ.

‘एनपीएस’ योजनेत वय वर्षे १८ ते ७०च्या दरम्यानची कोणतीही भारतीय अथवा अनिवासी भारतीय व्यक्ती भाग घेऊ शकते. यासाठी संबंधित व्यक्तीला पोस्ट, बँक अथवा कॅम्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन किंवा कार्वी यासारख्या आपल्या सोयीच्या ठिकाणी आपले खाते सुरू करता येते. ही सुविधा राष्ट्रीयकृत व मोठ्या खासगी बँकांच्या काही ठरावीक शाखांमध्येच उपलब्ध आहे व अशा बँका व त्याच्या शाखांची यादी ‘पीएफआरडीए’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. खाते उघडण्यासाठी विहित नमुन्यातील फॉर्म भरावा लागतो व त्याबरोबर पॅन कार्ड, आधार कार्ड, नवीन फोटो, बँक खात्याचा चेक (ज्यावर आपला खाते नंबर, नाव, आयएफएससी कोड आहे) असणे आवश्यक आहे. 

आता हे खाते ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड लिंक करूनही उघडता येते. याला ई-एनपीएस असे म्हणतात. यासाठी एनपीएस ट्रस्टच्या संकेतस्थळावर जाऊन ई-एनपीएस फॉर्म डाऊनलोड करावा व आपले आधार कार्डवरून रजिस्ट्रेशन करावे. यासाठी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक असते. खाते उघडताना

किमान ५०० रुपये जमा करणे आवश्यक असते. हे झाल्यावर भरलेल्या फॉर्मची 

प्रिंट घेऊन त्यावर आपला फोटो चिकटवावा व सही करून फॉर्म सीआरए (सेन्ट्रल रेकॉर्ड एजन्सी)कडे पाठवावा. (एनएसडीएल सीआरडीए म्हणून काम पाहत आहे) 

आता आपण ई-केवायसी पद्धतीनेसुद्धा खाते उघडू शकता. यात सीआरडीए फॉर्म स्पीड पोस्टने पाठवावा लागत नाही. खाते उघडल्यानंतर एका आठवड्यात स्पीड पोस्टने आपल्याला ‘प्रान’ कार्ड मिळते (प्रान म्हणजे पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर). हा प्रत्येक खात्यासाठी युनिक नंबर असल्याने हे खाते संपूर्ण भारतात कोठेही वापरता येते (कामाचे गाव तसेच राज्य बदलले तरी).

एनपीएस योजनेत आपल्याला टियर-१ व टियर-२ अशी दोन खाती उघडता येतात. मात्र यातील टियर-१ खाते उघडणे बंधनकारक असून टियर-२ उघडणे ऐच्छिक असते. यातील टियर-१ खात्यास पेन्शन अकाउंट असे म्हणतात व 

या खात्यात दरवर्षी किमान १००० 

रुपये इतकी रक्कम भरावी लागते. या खात्यावर वर्षभरात कितीही वेळा व 

कितीही रक्कम जमा करता येते. मात्र एका वेळी किमान ५०० रुपये जमा करणे आवश्यक असते. खात्यातील रक्कम आपल्याला हवी तेव्हा काढता येत नाही. शिल्लक असलेल्या रकमेनुसारच पेन्शन दिले जाते. 

आता आपण जमा केलेली रक्कम 

कशी गुंतविली जाते हे पाहू. जमा

होणारी रक्कम पीएफआरडीएच्या मान्यताप्राप्त फंडामार्फतच गुंतवली जाते. या सर्व फंडांची नावे फॉर्ममध्ये दिलेली असतात. आपणास योग्य वाटेल तो फंड आपण निवडू शकता. प्रत्येक फंडाचा रिटर्न कमी अधिक असू शकतो. आपण निवडलेला फंड आपण बदलू शकता. यासाठी नाममात्र फी लावली जाते. यातील काही प्रमुख पेन्शन फंड खालीलप्रमाणे आहेत.

१) एचडीएफसी पेन्शन फंड

२) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फंड 

३) एसबीआय पेन्शन फंड

४) रिलायन्स पेन्शन फंड

५) कोटक पेन्शन फंड 

६) यूटीआय रिटायरमेंट सोल्युशन फंड 

७) एलआयसी पेन्शन फंड 

यातील कोणत्याही फंडात गुंतवणूक करताना ऑटो किंवा अॅक्टिव्ह यातील एक पर्याय निवडावा लागतो. 

या खात्यास नामांकनाची (नॉमिनेशन) सुविधा असून जास्तीत जास्त तीन नॉमिनी देता येतात व देण्यात येणारा हिश्‍श्‍याचाही उल्लेख करता येतो. 

पुढील लेखात आपण ऑटो किंवा अॅक्टिव्ह यातील फरक व कोणता पर्याय निवडणे योग्य राहील, यातील रक्कम काढण्याचे नियम, खातेदारास द्यावे लागणारे विविध चार्जेस, गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कर सवलती यांची माहिती घेऊ. तसेच गुंतवणुकीचा कालावधी, दरमहाची गुंतवणूक व गुंतवणुकीचा पर्याय यानुसार दरमहा किती पेन्शन मिळू शकेल याची माहिती घेऊ.

संबंधित बातम्या