नॅशनल पेन्शन सिस्टीम

सुधाकर कुलकर्णी 
सोमवार, 31 मे 2021

अर्थविशेष

मागील लेखात आपण एनपीएस खाते कसे उघडावे याबाबतची माहिती घेतली. आज आपण अॅक्टिव्ह व ऑटो यातील फरक, एनपीएसमधील गुंतवणुकीतून मिळणारी प्राप्तिकरातील सूट व गुंतवणुकीचा कालावधी व केलेली गुंतवणूक यातून अंदाजे दरमहा किती पेन्शन मिळू शकेल ही माहिती घेऊ.

ॲक्टिव्ह पद्धतीने गुंतवणूक 
एनपीएस खातेदार गुंतवणुकीसाठी अॅक्टिव्ह किंवा ऑटो या दोन्हीतील एक पर्याय निवडू शकतो. अॅक्टिव्ह पर्याय निवडल्यास इक्विटी (शेअर्स), खासगी कर्ज रोखे, सरकारी कर्ज रोखे यात आपल्या मर्जीप्रमाणे गुंतवणूक करता येते व बाजारातील परिस्थितीनुसार त्यात बदल करता येतो. ज्यांना बाजारातील आर्थिक चढउतारांची माहिती असते व त्यानुसार आर्थिक निर्णय घेऊ शकतात, अशांसाठी हा पर्याय चांगला असून यातून ११ ते १२ टक्के इतका रिटर्न मिळू शकतो. यात वयाच्या ५० वर्षांपर्यंत आपण जास्तीतजास्त ७५ टक्के इतकी इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता, तर वयाच्या ५० वर्षांनंतर दर वर्षी हे प्रमाण २.५ टक्के कमी होऊन वयाच्या ६०व्या वर्षी ५० टक्के इतके होते. नुकताच यात एक नवीन पर्याय देऊ करण्यात आला आहे, त्यानुसार आपल्या गुंतवणुकीच्या ५ टक्क्यांपर्यंत मॉडगेज ब्लॉक्ड, सिक्युरिटीज, रिअल इस्टेट फंड यांसारख्या पर्यायी गुंतवणुकीचा विचार करू शकता.

ॲक्टिव्ह व ऑटो पद्धतीने गुंतवणूक 
सामान्य गुंतवणूकदारास बाजारातील आर्थिक चढउतारांची फारशी माहिती नसते. अशांसाठी ऑटो पर्याय असून यात ॲग्रेसिव्ह, मॉडरेट व कॉन्झर्व्हेटिव्ह हे पर्याय आहेत. 

  • यातील अॅग्रेसिव्ह पर्याय निवडला, तर खाते उघडल्यापासून वयाच्या ३५ वर्षांपर्यंत शेअर्समध्ये ७५ टक्के, खासगी कर्ज रोख्यात १० टक्के, तर सरकारी कर्ज रोख्यात १५ टक्के इतकी गुंतवणूक केली जाते. वयाच्या ३६ ते ४५ या दहा वर्षांच्या काळात शेअर्समधील गुंतवणूक ४ टक्के कमी करून त्यातील १ टक्के खासगी कर्ज रोख्यात, तर ३ टक्का सरकारी कर्ज रोख्यात दर वर्षी वाढविले जातात. परिणामी वयाच्या पंचेचाळीशीच्या शेअर्समध्ये ३५ टक्के, खासगी कर्ज रोख्यात २० टक्के, तर सरकारी कर्ज रोख्यात ४५ टक्के इतकी गुंतवणूक होते. पुढील १० वर्षांत (५५अखेर) हे प्रमाण शेअर्समध्ये १५ टक्के, खासगी कर्ज रोख्यात १० टक्के व सरकारी कर्ज रोख्यात ७५ टक्के आणले जाते व पुढे ते तसेच राहते.
  • मॉडरेट पर्याय निवडला तर खाते उघडल्यापासून वयाच्या ३५ वर्षांपर्यंत शेअर्समध्ये ५० टक्के, खासगी कर्ज रोख्यात ३० टक्के, तर सरकारी कर्ज रोख्यात २० टक्के इतकी गुंतवणूक केली जाते. वयाच्या ३६ ते ४५ या दहा वर्षांच्या काळात शेअर्समधील गुंतवणूक २ टक्के कमी व १ टक्का खासगी कर्ज रोख्यात कमी करून ३ टक्के सरकारी कर्ज रोख्यात दर वर्षी वाढविले जातात. परिणामी वयाच्या ४५अखेर शेअर्समध्ये ३० टक्के, खासगी कर्ज रोख्यात २० टक्के, तर सरकारी कर्ज रोख्यात ५० टक्के इतकी गुंतवणूक होते. पुढील १० वर्षांत (५५ अखेर) हे प्रमाण शेअर्समध्ये १० टक्के, खासगी कर्ज रोख्यात १० टक्के व सरकारी कर्ज रोख्यात ८० टक्के आणले जाते व पुढे ते तसेच राहते.
  • कॉन्झर्व्हेटिव्ह पर्याय निवडला तर खाते उघडल्यापासून वयाच्या ३५ वर्षांपर्यंत शेअर्समध्ये २५ टक्के, खासगी कर्ज रोख्यात ४५ टक्के, तर सरकारी कर्ज रोख्यात ३० टक्के इतकी गुंतवणूक केली जाते. वयाच्या ३६ ते ४५ या दहा वर्षांच्या काळात शेअर्समधील गुंतवणूक १ टक्का कमी व २ टक्के खासगी कर्ज रोख्यात कमी करून ३ टक्के सरकारी कर्ज रोख्यात दरवर्षी वाढविले जातात. परिणामी वयाच्या ४५ अखेर शेअर्समध्ये १५ टक्के, खासगी कर्ज रोख्यात २५ टक्के, तर सरकारी कर्ज रोख्यात ६० टक्के इतकी गुंतवणूक होते. पुढील दहा वर्षांत (५५ अखेर) हे प्रमाण शेअर्समध्ये ५ टक्के, खासगी कर्ज रोख्यात ५ टक्के व सरकारी कर्ज रोख्यात ९० टक्के आणले जाते व पुढे ते तसेच राहते. मागील पाच वर्षांत ॲग्रेसिव्ह, मॉडरेट व कॉन्झर्व्हेटिव्ह पर्यायातून अनुक्रमे सुमारे १० ते ११ टक्के, ९ ते १० टक्के व ६ ते ७ टक्के इतका रिटर्न मिळत असल्याचे दिसून येते.

 एनपीएस गुंतवणुकीतून प्राप्तिकरात खालीलप्रमाणे सवलत मिळविता येते.

  • यातील गुंतवणूक ८०सीअंतर्गत असून ही गुंतवणूक १.५ लाखात समाविष्ट करता येते.
  • सरकारी व खासगी आस्थापना जर एनपीएसशी संलग्न असतील, तर कंपन्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार व महागाई भत्ता यांच्या एकत्रित रकमेच्या १४ टक्के (सरकारी कर्मचारी) व १० टक्के (खासगी कर्मचारी) एवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यात भरत असतात. ही रक्कम ८०सीसीडी(२)नुसार करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र असते. ही वजावट ८०सीच्या १.५ लाख रुपयांच्या वजावटीच्या अतिरिक्त असते.
  • याशिवाय ८०सीसीडी(१बी)नुसार ५० हजार रुपयांपर्यंतची एनपीएसमधील गुंतवणूक करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र असते. ही वजावटसुद्धा ८०सीच्या १.५ लाख रुपयांच्या वजावटीच्या अतिरिक्त असते.

या तिन्हीही वजावटीचा एकत्रित परिणाम पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल.
अमर यांचा मूळ पगार ६ लाख रुपये असून महागाई भत्त्यापोटी त्यांना ३ लाख रुपये मिळतात व त्यांच्या कंपनीमार्फत त्यांच्या एनपीएस खात्यात ९० हजार रुपये (१० टक्के) टाकले जातात. त्यांच्या पीएफमध्ये ६० हजार रुपये टाकले जातात, १० रुपये आयुर्विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता भरला जातो. गृह कर्जाच्या परतफेडीतील मुद्दल ४० हजार रुपये इतके आहे. ही एकत्रित रक्कम १ लाख १० हजार रुपये आहे. अजून ४० हजार रुपये एनपीएसमध्ये गुंतविल्यास त्यांची १ लाख ५० हजार रुपये मर्यादा पूर्ण होत आहे. मात्र त्यांनी ९० हजार रुपये एनपीएसमध्ये गुंतविले असल्याने त्यांना

पुढीलप्रमाणे वजावट मिळेल -

  • ₹ १,५०,००० - ८०सीनुसार 
  • ₹ ९०,००० - ८०सीसीडी(२)नुसार 
  • ₹ ५०,००० - ८०सीसीडी(१बी)नुसार (९०,०००-४०,०००) अशी एकूण २.९ लाख रुपये इतकी वजावट मिळेल.

आता गुंतवणुकीचा कालावधी व केलेली गुंतवणूक यानुसार ६० वर्षांनंतर एकमुठी रक्कम व पेन्शन किती मिळू शकते हे पाहू (६० वर्षांनंतर मिळणारी एकमुठी रक्कम व पेन्शन हे गुंतवणुकीचा कालावधी, रक्कम व पर्याय यावर अवलंबून असते). अमर याचे वय २८ असून वयाच्या ६०पर्यंत ते दरमहा ५ हजार एनपीएसमध्ये नियमित भरणार असे गृहीत धरल्यास, तो पुढील ३२ वर्षांत १९.२ लाख एवढी रक्कम भरणार आहे. त्याने ऑटोमधील मॉडरेट हा पर्याय स्वीकारला व त्यास १० टक्के सरासरी रिटर्न मिळेल असे गृहीत धरल्यास ६०व्या वर्षाअखेर सुमारे १.४ कोटी जमा होतील. यातील जास्तीत जास्त ६० टक्के म्हणजे ८४ लाख एवढी रक्कम त्याला करमुक्त घेता येईल व उर्वरित ४० टक्के म्हणजे ५६ लाखाच्या अॅन्युइटी घेणे बंधनकारक असेल. यातून तहहयात २८ हजार इतके पेन्शन मिळेल (अॅन्युइटी रिटर्न ६ टक्के गृहीत धरून). एकमुठी रक्कम घेतलीच पाहिजे असे नाही. आपण २० टक्के किंवा ४० टक्के इतकीसुद्धा घेऊ शकता. एकमुठी रक्कम घेतलीच नाही, तर दरमहा ७० हजार एवढे पेन्शन मिळेल. थोडक्यात जेवढी एकमुठी रक्कम जास्त घ्याल तेवढे पेन्शन कमी. विशेष म्हणजे मृत्यू पश्‍चात वारसाला पेन्शन धारकाने ज्या रकमेच्या अॅन्युइटी विकत घेतल्या असतील तेवढी रक्कम वारसाला दिली जाते. अमरने ५६ लाख रुपयाच्या अॅन्युइटी विकत घेतल्या व उर्वरित ६० टक्के रक्कम एकमुठी घेतली तर त्याच्या पश्चात ५६ लाख एवढी रक्कम त्याच्या वारसाला मिळेल.

थोडक्यात असे म्हणता येईल की एनपीएस हा रीटायरमेंट प्लॅनिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे.

संबंधित बातम्या