क्रेडिट कार्ड

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

अर्थविशेष

क्रेडिट कार्डचा वापर योग्यरीतीने केला तर आपणास अनेक फायदे घेता येतात. याउलट जर चुकीच्या पद्धतीने केला तर आपण कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता आणि आर्थिक अडचणीत येऊ शकता. त्यादृष्टीने क्रेडिट कार्डबाबतची प्राथमिक माहिती कार्ड धारकास असणे आवश्यक आहे व ती खालील प्रमाणे आहे.

१) बिनव्याजी उचल मर्यादा (इंटरेस्ट फ्री क्रेडिट लिमिट) : प्रत्येक क्रेडिट कार्ड धारकास एक ठरावीक मर्यादेपर्यंत उचल घेता येते. यालाच कार्डची क्रेडिट लिमिट अथवा क्रेडिट लाईन असे म्हणतात. कार्ड धारकाची आर्थिक क्षमता विचारात घेऊन ही मर्यादा ठरविली जाते. उदा. आपल्या कार्डची क्रेडिट लिमिट एक लाख इतकी असेल तर आपल्याकडे पैसे नसतानासुद्धा एक लाखापर्यंत आपण खरेदी अथवा बिल पेमेंट करू शकता. विशेष म्हणजे याची परतफेड आपण बिलाच्या देय तारखेपर्यंत (ड्यू डेट) कधीही करू शकता आणि या रकमेवर कोणतीही व्याज आकारणी केली जात नाही. हा कालावधी किमान २० व कमाल ५० दिवसांच्या दरम्यान कितीही असू शकतो. 

उदा. एसबीआय क्रेडिट कार्डची बिल डेट प्रत्येक महिन्याची ९ तारीख अाणि पेमेंट डेट दरमहा २९ तारीख आहे. आता आपण बील कसे होते ते पाहू. समजा जुलै महिन्याचे बिल आहे. कार्डधारकाची क्रेडिट लिमिट २ लाख ५० हजार इतकी आहे, तर कार्डधारक १० जुलैपासून ते ९ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त २ लाख ५० हजारपर्यंतच आपल्या कार्डवर खरेदी अथवा बिल पेमेंट करू शकेल. समजा त्याने या कालावधीत वेळोवेळी केलेली खरेदी ८५ हजार रुपयांची असेल तर, त्याला १० ऑगस्टला ९ तारखेपर्यंतचे ८५ हजाराचे बिल पाठविले जाईल. या बिलाचे पेमेंट त्याने २९ ऑगस्टपर्यंत करणे आवश्यक असेल. जर त्याने १० जुलैला ३५ हजारांची, २५ जुलैला २५ हजारांची व ९ ऑगस्टला २५ हजारांची खरेदी केली असेल तर या एकूण ८५ हजारांचे पेमेंट २९ ऑगस्टपर्यंत देणे जरुरीचे आहे. 

२) केलेल्या व्यवहारांची नोंद (रेकॉर्ड ऑफ ट्रॅन्झॅक्शन) : क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटचे दरमहा स्टेटमेंट कार्ड धारकास मिळत असते, त्यामुळे वेगळे रेकॉर्ड ठेवण्याची गरज नसते. यामुळे आपण करत असलेल्या खर्चाचा तपशील व त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. आजकाल बहुतेक सर्व क्रेडिट कार्डचे मोबाईल अॅप असल्याने आपल्या कार्डवरील व्यवहार कधीही पाहता येतात. तसेच एक ठरावीक कालावधीतील व्यवहारही हवे तेव्हा मिळू शकतात.

३) विविध ऑफर्स : बहुतेक सर्व कार्डांवर वेळोवेळी निरनिराळ्या ऑफर्स देऊ केल्या जातात. तसेच कार्ड वापरावर रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. असे रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करता येतात, तर काही वेळा कार्डवर खरेदी केल्यास कॅश बॅकसुद्धा (५ ते १० टक्के) सुद्धा दिली जाते. अशा ऑफर्स साधारणपणे सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात असतात.

४) क्रेडिट कार्ड धारकास विविध प्रकारचे इन्शुरन्स कव्हर (कार्ड श्रेणीनुसार) खालीलप्रमाणे मिळत असते आणि बऱ्याचदा कार्ड धारकास याची माहिती नसते. सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम व प्रीमियम या प्रामुख्याने कार्डच्या श्रेणी असतात.

अ) कार्ड धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास १ ते ४ लाखापर्यंत (कार्ड श्रेणीनुसार) रक्कम वारसाला दिली जाते. विमान अपघातात मृत्यू झाला तर १० ते ४० लाख (कार्ड श्रेणीनुसार) रक्कम वारसाला दिली जाते. यासाठी मृत्यूच्या दाखल्यासह व अपघाताच्या अन्य तपशिलासह अपघात झाल्यापासून ३० दिवसांच्या आत क्लेम दाखल करणे आवश्यक असते. तसेच कार्ड धारकाच्या नावावर असलेल्या रकमेपैकी ५० हजारपर्यंतची रक्कम माफ केली जाते.

ब) कार्डवर खरेदी केलेल्या वस्तूंची खरेदी तारखेपासून १८० दिवसांच्या आत चोरी, खराबी अथवा आगीत जळणे असा प्रकार घडल्यास ५० हजारपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. कालावधी व नुकसान भरपाई कार्डनुसार कमी अधिक असू शकते.

क) कार्ड चोरीला गेल्यास अथवा गहाळ झाल्यास व तशी नोटीस कार्ड कंपनीला दिल्यास तेथून पुढे होणाऱ्या व्यवहारांची जबाबदारी कार्ड धारकावर राहत नाही.

५) सिबिल स्कोअर : आजकाल कोणतेही कर्ज मंजूर करण्यापूर्वी सर्व वित्तीय संस्था सिबिल स्कोअर पाहतात व जर तो समाधानकारक असेल तरच कर्ज मागणी अर्ज विचारात घेतला जातो. हा स्कोअर ३५० ते ९५०च्या दरम्यान असतो व तो जितका जास्त तितका चांगला. आपण  

क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेत केले असेल व आपला क्रेडिट लिमिटचा वापर योग्य असेल, तर कार्ड धारकाचा क्रेडिट स्कोअर अपोआप चांगला राहतो व कार्ड धारकाची पत वाढते.

६) अडचणीच्या प्रसंगी क्रेडिट कार्ड खूप उपयोगी पडते (उदा. अकस्मात येणारे गंभीर आजारपण, अचानक करावा लागणारा प्रवास किंवा खरेदी). मात्र यासाठी कार्डची क्रेडिट लिमिट २ ते ३ लाखाची असणे आवश्यक असते. प्रसंगी क्रेडिट कार्डवर एटीएममधून रोख रक्कमसुद्धा काढता येते. शक्य तोवर क्रेडिट कार्डने एटीमवर रोख रक्कम काढण्याचे टाळावे कारण यासाठी चार्जेस जास्त असतात.

क्रेडिट कार्डचे तोटे

  •      पैसे नसतानाही अनावश्यक खरेदी केली जाऊ शकते.
  •      वाढीव लिमिट मिळाल्यास खर्च करण्याची प्रवृत्ती वाढू शकते.

     बहुतेक सर्व क्रेडिट कार्डधारकांना बिल पेमेंटसाठी ईएमआयची सुविधा देऊ करतात. पण वरकरणी ही सुविधा जरी आकर्षक वाटत असली तरी प्रत्यक्षात फसवी असते. वरील उदाहरणातील ८५ हजार बिल २९ ऑगस्टअखेर पूर्णपणे भरल्यास कार्डधारकास ही रक्कम वरील प्रमाणे बिनव्याजी मिळेल. मात्र काही कारणाने संपूर्ण रक्कम देय तारखेच्या आत भरणे शक्य नसेल, तर कार्ड धारक बिलाच्या किमान ५ टक्के रक्कम भरून (४,२५०) उर्वरित रक्कम १२ समान हप्त्यात भरू शकतो. यामुळे कार्डावरील नावेबाकी अनियमित होत नाही. मात्र पुढील महिन्यात १,६०,७५०पर्यंतच कार्डवर खरेदी करता येईल(२,५०,००० - ८५,००० + ४२५० = १,६०,७५०) व उर्वरित ८०,७५० (८५,००० - ४,२५०) रकमेवर १० ते १२ टक्के दराने व्याज आकारणी केली जाते. या सुविधेमुळे कार्ड धारकास अन्य कर्जासाठी करावी लागणारी पूर्तता (उदा. कर्ज मागणी अर्ज, जामीनदार, कर्जाचे कारण, तारण, डॉक्युमेंट) न करता अगदी विनासायास एक वर्षासाठी कर्ज मिळू शकते. ही सवलत वापरल्यास व्याजआकारणी अशी केली जाते -
  

 ८०,७५० X ३० X १२/३६,५०० = ७९६.४५ आणि जर कार्डवर १०,०००ची खरेदी १० ऑगस्टला केली असेल तर १०,००० X ३० X १२ = ९८.६५ म्हणजे ८९५.१० एवढे व्याज होईल. या व्याजावर १८ टक्के दराने जीएसटी आकारणी होईल, जी १६१.१० इतकी होईल. असे एकूण ८०,७५० + १०,००० + ८९५.१० + १६१.१० = ९१,८०६.२० एवढे बिल १० सप्टेंबरला येईल. पुढील महिन्यात केवळ १,५८,१९३.८० एवढीच लिमिट कार्डवर वापरता येईल. समजा कार्ड धारकाने पहिल्या वापरातच कार्डची सगळी लिमिट वापरली आणि पुढे दरमहा ५ टक्के इतकेच पेमेंट केले, तर ही २,५०,०००ची परतफेड करण्यास त्याला ४५ महिने इतका कालावधी लागेल. म्हणून ही सुविधा शक्यतो वापरू नये आणि काही अपरिहार्य कारणाने वापरावी लागली तर उर्वरित रक्कम पुढील एकदोन महिन्यातच चुकती करावी, जेणेकरून आपण कर्जाच्या सापळ्यात अडकणार नाही. शक्यतो पेमेंट लिमिटच्या ३० ते ३५ टक्क्यांपर्यंतच कार्ड वापरावे. एक किंवा दोन क्रेडिट कार्डच वापरावीत त्यापेक्षा जास्त कार्ड वापरणे योग्य नाही.

     जर कार्ड पेमेंट देय तारखेपर्यंत झाले नाही तर ३६ ते ४० टक्के इतक्या दराने व्याज आकारणी केली जाते, हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

     पुढीलप्रमाणे विविध चार्जेस आकारले जातात.

अ) वार्षिक फी तसेच नूतनीकरण फी, ब) लेट पेमेंट चार्जेस, क) रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम चार्जेस, ड) अवाजवी व्याज दर.

संबंधित बातम्या