आयपीओ व किरकोळ गुंतवणूकदार

सुधाकर कुलकर्णी 
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

अर्थविशेष

आयपीओमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टी माहीत असणे अगदी आवश्यक असते आणि अशी माहिती न घेता गुंतवणूक झाल्याने बऱ्याचदा नुकसान होते. असा नुकसान झालेला गुंतवणूकदार मग शेअर बाजाराकडे पाठ फिरवून शेवटी आपलेच नुकसान करू घेतो. 

गेला महिना दीड महिना शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण दिसून येत आहे. या तेजीच्या वातावरणात एकूणच सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे आकर्षित होतो. या संधीचा फायदा घेऊन अनेक अनलिस्टेड कंपन्या बाजारात आपला शेअर इश्‍यू आणून व्यवसायवृद्धीसाठी लागणारे भांडवल उभारणी कताना दिसत आहेत. एकाच वेळी चार-पाच कंपन्यांचे आयपीओ (इनिशिअल पब्लिक ऑफर) गेले काही दिवस दिसून येत आहेत. बऱ्याचदा कुणीतरी सांगितले म्हणून, मित्राने अथवा नातेवाईकाने आयपीओला अर्ज केला म्हणून आणि आपणही यात मागे राहू नये म्हणून काही गुंतवणूकदार प्रथमच गुंतवणूक करतात. त्यादृष्टीने आयपीओला अर्ज करताना खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

आयपीओ घेऊन येणारी कंपनी आयपीओ प्रत्यक्ष बाजारात येण्यापूर्वी काही दिवस आपल्या इश्‍यूची जाहिरात विविध माध्यमातून  करत असते. या जाहिरातीवर विसंबून न राहता आपण कंपनीबाबतची माहिती घेणे आवश्यक असते. शक्य असल्यास कंपनीच्या अर्जाबरोबरचे माहितीपत्रक वाचून कंपनीची सध्याची आर्थिक परिस्थिती, इश्‍यूतून जमा झालेल्या रकमेची गुंतवणूक झाल्यावर त्यात होणारी वाढ आणि त्यासाठीचा अपेक्षित कालावधी विचारात घेणे आवश्यक असते.

आता सर्व कंपन्या आपला शेअर देऊ करताना प्राइस बँडमध्ये देऊ करतात. यातील खालच्या प्राईसला फ्लोअर प्राइस, तर वरच्या प्राईसला कॅपप्राईस असे म्हणतात. किरकोळ गुंतवणूकदाराला (रिटेल इन्व्हेस्टर) कॅपप्राईसलाच अर्ज करावा लागतो. मात्र जर शेअर मिळाले तर कट ऑफ प्राईसला मिळतात. ही कट ऑफ प्राइस कमीत कमी फ्लोअर प्राइस किंवा जास्तीत जास्त किंवा कॅपप्राईस दोन्हींमधील कोणतीही असू शकते. उदाहरणार्थ, प्राइस बँड १००-१२० रुपये असा आहे आणि शेअर मिळाले, तर प्रती शेअर किंमत कमीतकमी १०० रुपये किंवा जास्तीत जास्त १२० किंवा दोन्हीतील कोणतीही एक असेल. समजा ही कट ऑफ प्राइस ११७ आली आणि अर्जदारास शेअर मिळाले, तर त्याला प्रती शेअर ११७ रुपये ही किंमत असेल. थोडक्यात प्राइस बँडमुळे अर्जदाराला शेअर केवढ्यास मिळू शकेल याचा अंदाज येऊ शकतो. या किमतीला शेअर घेणे योग्य वाटले तरच अर्ज करावा.

अर्ज करताना आपल्याला पाहिजे तेवढ्या नेमक्या शेअर्ससाठी अर्ज करता येत नाही. तर, अर्ज किमान एक लॉट व कमाल दोन लाख रुपयांत बसतील एवढ्याच लॉटसाठी करता येतो. एका लॉटची किंमत सुमारे १४ ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या आयपीओचा प्राइस बँड ५३०-५६० रुपये असा आहे, तर एक लॉट १५,०००/५६० = २७ शेअरचा असेल तर एका लॉटची किंमत ₹ १५,१२० असेल आणि अर्जदाराला एक किंवा त्या पटीत परंतु जास्तीत जास्त १३ लॉटसाठीच अर्ज करता येईल. (₹ २,००,०००/१५,१२० = १३)

जास्त लॉटसाठी अर्ज केला तरी जास्त शेअर मिळतीलच असे नाही. त्यासाठी शेअर वाटप कसे होते ते आता पाहू. उदाहरणार्थ, एखाद्या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टरसाठी एक लाख रुपये उपलब्ध आहेत आणि लॉट साईझ १० असेल, तर १० हजार अर्ज आल्यावर हा कोटा पूर्ण होतो व प्रत्येकास एक लॉट दिला जातो. मात्र जर अर्ज १० हजारांपेक्षा जास्त आले तर लॉटरी पद्धतीने ज्याचा नंबर लागेल त्याला एक लॉट दिला जातो, जरी त्याने एकापेक्षा जास्त लॉटला अर्ज केला असला तरी. यामुळे जास्त लॉटसाठी अर्ज करून सहसा जास्त शेअर्स मिळत नाहीत, हे अर्जदाराने लक्षात घेणे आवश्यक आहे.

आयपीओसाठी अर्ज करताना बरेचजण शेअर कट ऑफ प्राईसपेक्षा जास्त किमतीला शेअर लिस्ट होईल या अपेक्षेने लिस्टिंग झाल्यावर लगेचच विकून नफा घेण्याचा उद्देशाने अर्ज करतात. लिस्टिंगला शेअरची प्राइस फायदा देऊन जाईलच असे नाही. कधी कधी लिस्टिंग कट ऑफ प्राईसपेक्षा कमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत आणि म्हणून आयपीओमार्फत गुंतवणूक करताना केवळ त्वरित नफ्याचा उद्देश न ठेवता संबंधित कंपनीचे दीर्घकालीन भवितव्य चांगले असून भविष्यात ही कंपनी चांगला नफा मिळवेल व यातून गुंतवणुकीवर चांगला रिटर्न मिळेल या उद्देशाने गुंतवणूक करावी.

आपण प्रथमच शेअरमध्ये गुंतवणूक करणार असाल, तर आयपीओऐवजी गेली काही वर्षे सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर घेणे योग्य असते. शेअर बाजाराची पुरेशी समज आल्यावरच आयपीओमार्फत नव्या कंपनीचे शेअर घ्यावेत. आयपीओच्या बाबतीत शेअर मिळणे व मिळालेल्या शेअरमधून चांगला रिटर्न मिळणे या दोन्हीही बाबतीत खात्री नसते.

एवढे मात्र खरे की ज्याने सुरुवातीलाच आयपीओमार्फत शेअर घेतले आहेत व कंपनीची प्रगतीही चांगली झाली आहे, अशा गुंतवणूकदारास नंतर गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा निश्चितच जास्त फायदा होतो. थोडक्यात असे म्हणता येईल, की तेजीच्या काळातील प्रत्येक आयपीओला अर्ज न करता कंपनीची एकूण परिस्थिती पाहूनच गुंतवणूक करावी व अशी गुंतवणूक अल्पकालीन नफ्यासाठी न करता दीर्घकालीन उद्देशाने करावी.

आता आपण आयपीओसाठी घरबसल्या नेट बँकिंग/मोबाईल बँकिंगचा वापर करून अर्ज करू शकता, तसेच पेमेंटसाठी भीम अॅपचा वापर करू शकता. शेअरमधील गुंतवणूक हा सट्टा नाही; जोखीम समजून घेऊन गुंतवणूक केल्यास यातून मिळणारा रिटर्न हा अन्य गुंतवणुकीतून मिळणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा जास्त असतो.

संबंधित बातम्या