सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

अर्थविशेष

नोकरी करणाऱ्यास सर्वसाधारणपणे वयाच्या साठीच्या आसपास सेवानिवृत्त व्हावे लागते, तर व्यावसायिकास आपल्या सोयीनुसार व्यवसायातून निवृत्त होता येते. सेवानिवृत्तीनंतर आपले नियमित मिळणारे (पगार/व्यावसायिक उत्पन्न) थांबणार असते. असे असले तरी आपले नेहमीचे खर्च थांबणार नसतात, ते फक्त काही प्रमाणात कमी होतात. ज्या थोड्या लोकांना सरकारी निवृत्तिवेतन मिळते त्यांच्यासाठी हा प्रश्न फारसा उद्‍भवत नाही. मात्र ज्यांना निवृत्तिवेतन मिळणार नसते, त्यांना मात्र सेवानिवृत्तीच्यावेळी मिळणाऱ्या एकमुठी रकमेवर अवलंबून राहावे लागते (आपल्या मुलांवर अवलंबून राहणे सहसा कोणाला आवडत नाही) आणि म्हणून निवृत्तीच्यावेळी आपल्याकडे असणाऱ्या व मिळणाऱ्या पैशांचे योग्य आर्थिक नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. 

निवृत्तीनंतर प्रामुख्याने आपल्याला दैनंदिन घर खर्च, प्रवास, आपला आवडता छंद व आजारपण यावर खर्च करावा लागतो व या खर्चात महागाईनुसार नियमित वाढ होत असते. यातील दैनंदिन घरखर्चाचा व त्यात महागाईनुसार होणाऱ्या वाढीचा अंदाज घेऊन आपल्याकडे एकमुठी किती रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे हे ठरवावे. एवढी रक्कम योग्य त्या पद्धतीने गुंतवून अशा गुंतवणुकीतून येणाऱ्या नियमित उत्पन्नातून आपला दैनंदिन खर्च सहज भागविता येईल. उदाहरणार्थ, आपला निवृत्तीनंतरचा दरमहाचा घरखर्च ₹  ३० हजार आहे. यात महागाईनुसार वाढ होणार असून पुढील... किमान २० वर्षे आपणास यानुसार दरमहा रक्कम लागणार आहे असे गृहीत धरल्यास आपल्याकडे सुमारे ₹  ६० लाख एवढी रक्कम असणे आवश्यक आहे. आपल्या दरमहाच्या खर्चानुसार ही रक्कम कमी अधिक असेल. (यात आपल्या गुंतवणुकीवर सरासरी ७ टक्के इतका रिटर्न व सरासरी ५ टक्के महागाई वाढ व आयुर्मान ८० गृहीत धरले आहे.)

    वयाच्या साठीनंतर आजारपण, किरकोळ व मोठ्या शस्त्रक्रिया (पती-पत्नी दोघांच्याही ) यावर होणारा खर्च वाढण्याची शक्यता विचारता घेऊन योग्य ते कव्हर असणारी मेडिक्लेम पॉलिसी घेणे गरजेचे असते, अन्यथा आपल्याकडील शिल्लक रकमेतून हा खर्च करावा लागेल. परिणामी आपली शिल्लक कमी होऊन दरमहा खर्चास पुरेशी रक्कम मिळणे शक्य होणार नाही व होणारा खर्च टाळताही येत नाही. त्या दृष्टीने किमान ₹  ३ लाखाची फ्लोटर पॉलिसी व ₹  ५ लाख टॉपअप पॉलिसी घ्यावी. यामुळे आपल्या प्रीमियममध्ये बचत तर होईलच, शिवाय पुरेसे कव्हरही मिळेल. आपल्या पॉलिसीचे वेळेत नूतनीकरण होईल याची दक्षता घ्यावी.

    आपल्या चल अचल संपत्तीचे मृत्युपत्र आवर्जून करावे, जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचे हस्तांतरण सहजगत्या होऊन आपल्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद होण्याची शक्यता कमी होईल. नॉमिनेशनचे नियम समजून घेऊन योग्य गुंतवणुकीस योग्य असे नॉमिनेशन वेळीच करावे.

    आपल्याला सेवानिवृत्तीच्यावेळी मोठी रक्कम मिळणार असल्याचे आपल्या नातेवाइकांना तसेच मित्रांना माहीत असते. प्रत्यक्ष रक्कम मिळाल्यावर काही जण आपल्याला यातील काही रक्कम कर्जाऊ अथवा त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक म्हणून मागण्याची शक्यता असते. अशा वेळी भीड न बाळगता स्पष्टपणे नकार द्या, कारण रक्कम तर अडकतेच शिवाय असलेले संबंध बिघडण्याची शक्यता जास्त असते.

    आपल्याला एकमुठी मिळणाऱ्या रकमेची गुंतवणूक विचारपूर्वक करावी. जास्त परताव्याच्या (रिटर्न) मोहाने चुकीची गुंतवणूक होणार नाही यासाठी शक्यतो गुंतवणूक तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. रिटायरमेंट गुंतवणुकीसाठी प्रामुख्याने पुढील पर्याय आहेत.  

(अ) सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (ज्येष्ठ नागरिक ठेव योजना) ः यामुळे दर तिमाही व्याजाने नियमित रक्कम मिळू शकते. गुंतवणूक कालावधी ५ वर्षे असून पती पत्नीच्या संयुक्त नावाने ₹  १५ लाख प्रत्येकी एवढी जास्तीत जास्त गुंतवणूक करता येते. मात्र यासाठी दोघांचेही वय साठच्या वर असले पाहिजे.

(ब) पंतप्रधान वय वंदना योजना ः ही एलआयसीमार्फत दिली जाते. यातून पुढील १० वर्षांसाठी दरमहा पेन्शन मिळू शकते. या योजनेत एका कुटुंबास जास्तीत जास्त ₹  १५ लाख एवढी गुंतवणूक करता येते. या दोन्हीही गुंतवणुकीतून सध्या ७.४ टक्के दराने व्याज मिळते.

 (क) पोस्टाची मंथली इंटरेस्ट योजना ः यात एकाच्या नावाने जास्तीत जास्त ₹  ४.५ लाख व संयुक्त नावाने ₹  ९ लाख एवढी गुंतवणूक करता येत. व्याजाचा सध्याचा दर ६.६ टक्के इतका असून दरमहा व्याज दिले जाते. या तिन्ही योजनांतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असून या नियमित उत्पन्न देणाऱ्या आहेत. यात पती पत्नी मिळून जास्तीत जास्त ₹  ५४ लाख एवढी गुंतवणूक करता येते. 

(ड) अशी सुरक्षित गुंतवणूक केल्यावर उर्वरित रकमेतील काही रक्कम थोडी जोखीम घेऊन म्युच्युअल फंडाच्या एसडब्लूपी योजनेत हायब्रीड अथवा इक्विटी फंडात गुंतवून १० ते १२ टक्के इतका रिटर्न मिळविता येतो व दीर्घकालीन (५ वर्षांपेक्षा जास्त) गुंतवणूक केल्यास गुंतवलेली रक्कम थोडी वाढूही शकते. उदा. समजा इक्विटी म्युच्युअल फंडात ₹  ३० लाख ५ वर्षांसाठी गुंतविले व यावर सरासरी १२ टक्के रिटर्न गृहीत धरल्यास, आपण जर दरमहा ₹  २०,००० पुढील ५ वर्षे घेतले तर ५ वर्षांनंतर सुमारे ३३ ते ३५ हजार मिळू शकतील. याउलट एवढी रक्कम बँकेत मासिक व्याज योजनेत ५ वर्षे मुदतीने गुंतविल्यास दरमहा जास्तीत जास्त ₹  १५,००० मिळतील व मुदतीनंतर ₹  ३० लाखच मिळतील. मात्र एसडब्लूपी गुंतवणुकीतून नेमकी किती रक्कम मिळेल हे खात्रीशीरपणे सांगता येत नाही.

(ई) पी२पी ः या पर्यायात गुंतवणूक केल्यास १२ ते १३ टक्के रिटर्न 

मिळू शकतो. यात जास्तीत जास्त ₹  १० लाख गुंतविता येतात व गुंतवणुकीचा कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षे असतो. अशा प्रकारे उपलब्ध पर्यायांत आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक केल्यास सरासरी ९ ते १० टक्के रिटर्न मिळू शकतो. याशिवाय रक्कम कधीही काढता यावी म्हणून ६ महिन्यांच्या गरजेइतकी रक्कम बँकेत बचत खाते व अल्पमुदत ठेवीत ठेवावेत.

  • निवृत्तीनंतर जीवन विमा पॉलिसी, पीपीएफ, दीर्घ मुदतीचे सरकारी कर्ज रोखे यात गुंतवणूक करू नये.
  • काही कारणाने आर्थिक समस्या उद्‍भवली तर आणि आपले राहते घर आपल्या मालकीचे असेल तर रिव्हर्स मॉर्गेज योजनेअंतर्गत नियमित रक्कम बँकेमार्फत मिळविता येते.
  • कुठल्याही परिस्थितीत आपल्या चल/अचल संपत्तीचे नियंत्रण दुसऱ्याच्या हातात देऊ नये. जेणेकरून आपले आर्थिक स्वातंत्र्य आपण हयात असेपर्यंत अबाधित राहील.
  • आपले उत्पन्न कर पात्र असेल 
  • तर शक्य असेल तेवढी कर सवलत मिळू शकेल अशी गुंतवणूक करावी व आपले टॅक्स रिटर्न वेळेतच भरावे.

संबंधित बातम्या