पीपीएफमधील प्रमुख बदल

सुधाकर कुलकर्णी 
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

अर्थविशेष

नोकरी तसेच व्यवसाय करणारे बहुतेक जण सुरक्षित गुंतवणूक व प्राप्तिकरात ईईई (एक्झम्प्ट, एक्झम्प्ट, एक्झम्प्ट) पद्धतीने मिळणारी करसवलत विचारात घेऊन पीपीएफमध्ये गुंतवणूक करीत असतात. यातून कर बचत तर होतेच, शिवाय दीर्घकालीन उद्दिष्टांची तरतूदसुद्धा केली जाते. अशा या बहुगुणी गुंतवणूक पर्यायाची लवचिकता आणखी वाढवून जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून केंद्र सरकारने यात काही बदल केले आहेत.

पूर्वी पीपीएफ खात्यात एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १२ वेळा रक्कम जमा करता येत होती. आता ही मर्यादा काढली असून आपण एका आर्थिक वर्षात कितीही वेळा गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक ₹  ५० व ५०च्या पटीत असणे आवश्यक आहे. एकूण गुंतवणुकीची मर्यादा पूर्वीप्रमाणेच ₹  १.५ लाख इतकी असेल.

पीपीएफ खातेदारास खाते उघडल्यापासून तिसऱ्या ते सहाव्या आर्थिक वर्षापर्यंत जी कर्ज मिळण्याची सुविधा आहे, त्या कर्जावरील व्याजदर आता १ टक्क्याने कमी केला असून आता कर्ज घेताना पीपीएफवर जो व्याज दर मिळत असेल त्यापेक्षा १ टक्के जास्त दराने कर्ज मिळेल. याआधी २ टक्के जास्त दराने कर्ज मिळत असे. 

उदाहरणार्थ, सध्या पीपीएफवर ७.१ टक्के इतक्या वार्षिक दराने व्याज मिळते आणि जर नियमानुसार कर्ज घेतले, तर कर्ज रकमेवर ८.१ टक्के वार्षिक दराने व्याज आकारणी केली जाईल. विशेष म्हणजे ज्या महिन्यात कर्ज घेतले असेल, त्या महिन्याच्या पहिला दिवसापासून ते ज्या महिन्यात कर्जाचा शेवटचा हप्ता भरला असेल त्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत व्याज आकारणी केली जाईल. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपण घेतलेल्या कर्ज रकमेवर जरी केवळ १ टक्के दराने व्याज आकारणी होत असली, तरी कर्ज रकमेइतक्या पीपीएफमधील रकमेवर कर्ज फिटेपर्यंत व्याज मिळत नाही.

पंधरा वर्षांची पीपीएफ खात्याची मुदत संपल्यावर खाते बंद केलेच पाहिजे असे नाही. तर, आपण खात्याची मुदत ५ वर्षांच्या पटीत कितीही वेळा वाढवू शकता व आता अशी मुदत वाढविण्यासाठी दोन पर्याय आहेत. अ) योगदानासहित मुदत वाढ (वुईथ कॉन्ट्रिब्युशन), ब) योगदानाशिवाय मुदत वाढ (विदाऊट कॉन्ट्रिब्युशन). यातील योगदानासहित मुदत वाढीचा पर्याय स्वीकारला, तर आधीच्या प्रमाणे दर वर्षी किमान ₹   ५०० तर कमाल ₹ १.५ लाख करता येईल. योगदानाशिवाय पर्याय स्वीकारला तर खात्यात रक्कम जमा करायची नसून शिल्लक रकमेवर कर मुक्त व्याज मिळत राहील. खात्याची मुदत वाढविण्यासाठीचा आधीचा फॉर्म रद्द झाला असून आता ‘फॉर्म ४’ भरून पीपीएफ खात्याची मुदत पुढील ५ वर्षांसाठी वाढविता येते. मात्र यासाठी एक वर्षाच्या आत ‘फॉर्म ४’ भरून देणे आवश्यक आहे व या फॉर्ममध्ये आपणास कोणता पर्याय हवा आहे याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. तसेच ५ वर्षांची मुदत संपल्यावर मुदत वाढीसाठी याप्रमाणे पूर्तता करावयाची आहे. 

विशेष म्हणजे योगदानासहित मुदत वाढ केल्यास गरज पडल्यास यातील रक्कम काढता येते. ती या प्रमाणे - मुदत संपताना खात्यावर शिल्लक असलेल्या रकमेच्या ६० टक्के इतकी रक्कम एकदा किंवा पुढील ५ वर्षांत कधीही वर्षातून एकदाच या पद्धतीने ६० टक्क्यांपर्यंत काढता येईल. उदाहरणार्थ, आपल्या खात्याची मुदत मार्च २०२१ला संपली असून खात्यात ₹  २० लाख रक्कम शिल्लक आहे.  खात्याची मुदत योगदानासहित वाढविली असेल, तर मुदत वाढवताना एकरकमी ₹  १२ लाख किंवा पुढील ५ वर्षांत मिळून ₹  १२ लाख, तेही एका वर्षी एकदाच या पद्धतीने काढता येतील. याउलट जर आपण खात्याची मुदत योगदानाशिवाय पद्धतीने वाढवली असेल, तर पुढील ५ वर्षांत ₹  २० लाख ही रक्कम आपण एकरकमी किंवा त्याहून कमी, परंतु वर्षातून एकदाच काढू शकाल. पीपीएफवर घेतलेले कर्ज ३६ महिन्यांत फेडायचे असून या कालवधीत कर्ज परतफेड पूर्णपणे झाली नाही किंवा अंशतः झाली, तर ६ टक्के अधिक दराने व्याज द्यावे लागेल. मुदतपूर्व पीपीएफ खाते बंद करण्याच्या दृष्टीने आता काही बदल करण्यात आले आहेत. आता खाते उघडून ५ आर्थिक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल, तर खालील कारणास्तव खाते मुदतपूर्व बंद करता येईल. 

    खातेदार स्वतः किंवा पत्नी/पती, अवलंबून असणारी मुले व आई/वडील यांच्या गंभीर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी. 

    स्वतःच्या तसेच पत्नी व मुलांच्या शिक्षणासाठी (यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या/संस्थेचा प्रवेशाची व फी यांसारखी कागदपत्रे द्यावी लागतात).

    खाते उघडल्यानंतर खातेदार नोकरी, व्यवसायानिमित्त परदेशी गेला असल्यास व तो आता अनिवासी भारतीय असेल, तर त्याला आपले खाते मुदतपूर्व बंद करता येते. त्यासाठी पासपोर्ट, व्हिसा यांसारखी कागदपत्रे सोबत जोडावी लागतात.

आता आपले पीपीएफ खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत अथवा पोस्टात किंवा पोस्टातून बँकेत ट्रान्स्फर करता येते. तसेच एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस, आयडीबीआय यांसारख्या खासगी बँकेत उघडता किंवा ट्रान्स्फर करता येते.

पीपीएफ खात्याला आता नॉमिनेशन देणे बंधनकारक असून आपण एक किंवा त्याहून अधिक नॉमिनी देऊ शकता. जर आपण एकापेक्षा जास्त नॉमिनी देणार असाल, तर प्रत्येक नॉमिनीचा किती हिस्सा असेल याबाबत उल्लेख करता येतो. उदा, आपण पत्नी/पती व दोन अपत्ये असे नॉमिनेशन करणार असाल तर आपण पुढीलप्रमाणे आपल्याला हव्या त्या टक्केवारीनुसार नॉमिनेशन करू शकता. 

    पत्नी ५० टक्के, अपत्यांना प्रत्येकी २५ टक्के 

    पत्नी ४० टक्के, अपत्य एक ४० टक्के व अपत्य दोन २० टक्के

    पत्नी ३४ टक्के, अपत्यांना प्रत्येकी ३३ टक्के 

तरी पीपीएफ खातेदाराने वरील बदल समजून घेऊन आपल्या खात्यावरील व्यवहार करावेत.

संबंधित बातम्या