इव्हेंट इन्शुरन्स पॉलिसी

सुधाकर कुलकर्णी 
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

अर्थविशेष

नियोजित समारंभ काही कारणाने रद्द करावा लागला, तर आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणाच होते. हे नुकसान समारंभ विमा घेऊन टाळता येऊ शकते.

व्यक्ती किंवा संस्था प्रसंगानुरूप विविध समारंभ आयोजित करीत असतात व आपण आयोजित केलेला समारंभ निर्विघ्नपणे पार पडावा, असे प्रत्येकालाच वाटते, तथापि कधीकधी तसे होत नाही. आपला समारंभ सुरू असताना काही समस्या उद्‍भवतात, तर काही वेळा समारंभापूर्वी एखादी घटना  घडल्यामुळे समारंभ रद्द करावा लागतो अथवा लांबणीवर टाकावा लगतो. या प्रकारात मानसिक त्रास तर होतोच, शिवाय आर्थिक नुकसानही होते. यातील मानसिक त्रास काही काळानंतर कमी होतो किंवा त्याचा विसर पडतो, पण झालेले आर्थिक नुकसान भरून येत नाही. हे आर्थिक नुकसान टाळता येते,  मात्र त्यासाठी आवश्यक ते कव्हर असणारी इव्हेंट इन्शुरन्स (समारंभ विमा) पॉलिसी घेणे गरजेचे असते. अशा प्रकारे एखाद्या समारंभाचा इन्शुरन्स करता येतो याची माहिती बहुतेकांना नसल्याचे दिसून येते. त्या दृष्टीने आज इथे आपण याबाबत आवश्यक ती माहिती घेऊ.

समारंभाचे विविध प्रकार असतात. यातील काही प्रमुख कौटुंबिक प्रकार म्हणजे साखरपुडा विवाह, बारसे, मुंज, एकसष्टी, पंच्याहत्तरी, सहस्रचंद्र दर्शन; तर संस्थेच्या बाबतीत रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, हीरकमहोत्सव, संस्थेस मिळालेला बहुमान यासाठीचे सेलिब्रेशन, स्पर्धेचे आयोजन, स्नेहसंमेलन, क्रिकेट, फुटबॉल किंवा अन्य खेळांचे सामने इत्यादी. यापैकी कुठलाही समारंभ/कार्यक्रम  अनपेक्षितरीत्या एखाद्या कारणाने नियोजित वेळी करणे शक्य होत नाही. प्रसंगी सदरचा समारंभ/कार्यक्रम रद्द करावा लागतो किंवा लांबणीवर टाकावा लागतो. विशेषतः एखाद्या खेळाचा सामना प्रत्यक्ष सुरू असताना एखाद्या घटनेमुळे पुढे सुरू ठेवता येत नाही. यासाठी बहुतांश खर्च झालेला असतो. जो खर्च वसूल होऊ शकत नाही अशा झालेल्या खर्चाचा क्लेम मिळू शकेल, अशी इन्शुरन्स पॉलिसी मिळू शकते. 

या प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीमुळे खालील बाबींसाठी इन्शुरन्स कव्हर मिळू शकते.

 • समारंभ रद्द अथवा लांबणीवर पडणे 
 • वस्तूंचे नुकसान (मटेरियल डॅमेज)
 • वैयक्तिक अपघात (पर्सनल अॅक्सिडेंट)
 • सार्वजनिक दायित्व (पब्लिक लायबिलिटी)

यातील प्रत्येक बाबींसाठी इन्शुरन्स कव्हरची व्याप्ती ही अशी असते.

    समारंभ रद्द अथवा लांबणीवर पडणे : समारंभाच्या ठिकाणी आग लागणे, ठिकाण पुराच्या लोंढ्यात सापडणे, भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या कारणाने समारंभ रद्द करावा अथवा लांबणीवर टाकावा लागणे; प्रमुख सहभागी व्यक्तींपैकी एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू, अपघात, गंभीर आजारामुळे हॉस्पिटलायझेशन होणे (प्रमुख व्यक्तींच्या नावांचा पॉलिसी घेताना उल्लेख करणे आवश्यक असते). 

वरील दोन्हीपैकी कोणत्याही कारणाने समारंभ रद्द  झाल्यास अथवा लांबणीवर पडल्यास वसूल होऊ न शकणारी रक्कम अधिक समारंभातून मिळणारे संभाव्य उत्पन्न किंवा विमा कव्हर यातील कमी असलेल्या रकमेचा क्लेम मिळतो.

जर आयोजकांनी समारंभ रद्द केला असेल, प्रमुख व्यक्ती हेतुपुरस्सर गैरहजर असेल, किंवा संयोजकातील आपापसातील मतभेदांमुळे समारंभ होऊ शकत नसेल, तर क्लेम मिळणार नाही.

    वस्तूंचे नुकसान (मटेरियल डॅमेज) : समारंभाच्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे काही वस्तूंचे नुकसान झाले, तर झालेले नुकसान व विमा कव्हर या दोन्हीतील कमीतकमी असलेल्या रकमेचे क्लेम मिळू शकेल.

    वैयक्तिक अपघात (पर्सनल अॅक्सिडेंट) : पॉलिसी घेताना उल्लेख केलेल्या व्यक्तींपैकी एक किंवा अनेक व्यक्ती समारंभात आकस्मित मृत्यू, अपघातात कायमची अथवा तात्पुरती अपंग झाली असल्यास क्लेम मिळू शकेल. मात्र मुद्दामहून करून घेतलेली दुखापत, आत्महत्या, मद्य अथवा मादक पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यू झाल्यास क्लेम मिळत नाही.

    सार्वजनिक दायित्व (पब्लिक लायबिलिटी) : समारंभाच्या ठिकाणी  अपघातामुळे काही दुखापत अथवा नुकसान झाल्यास थर्ड पार्टीस द्यावी लागणारी नुकसान भरपाई यात समाविष्ट असते. मात्र असे नुकसान अथवा दुखापत नैसर्गिक आपत्ती, हेतुपुरस्सर केलेली कृती यातून झाले असेल तर क्लेम मिळत नाही. 

अशा पॉलिसीत प्रामुख्याने पुढील खर्चाचा समावेश असतो

समारंभासाठी प्रत्यक्ष झालेला खर्च, हॉलसाठी दिलेले भाडे/आगाऊ रक्कम, केटरिंग, फोटो/व्हिडिओ, डेकोरेशन, करमणूक कार्यक्रम, कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या वस्तू (ज्या परत वापरता येत नाहीत किंवा परतही करता येत नाहीत), प्रवासी तिकिटे रद्द केल्याने किंवा करता न आल्याने होणारे नुकसान. जप्त होणारी अनामत रक्कम, कामगार नुकसान भरपाई व हॉलमुळे होणारे थर्ड पार्टी नुकसान. 

ही पॉलिसी वेडिंग बेल इन्शुरन्स (लग्न समारंभ विमा पॉलिसी) म्हणून घेतली असेल, तर यात प्रामुख्याने खालील रिस्कचा समावेश असतो.

 • नवरा/नवरी यांना लग्न समारंभाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनातील बिघाड, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल किंवा भूकंप, चक्रीवादळ, अतिवृष्टी यांसारखी नैसर्गिक आपत्ती आल्याने उपस्थित राहता न येणे.
 • नवरा/नवरी अथवा त्यांचे जवळचे नातेवाईक (ज्यांच्या नावाचा पॉलिसीत उल्लेख आहे असे) यापैकी कोणाचा आकस्मित मृत्यू. 
 • पॉलिसी धारकाचे दागदागिने (मौल्यवान), पोशाख, भेटवस्तू इ.चा समावेश असतो.
 • वेडिंग बेल पॉलिसीचा क्लेम खालील परिस्थितीत मिळू शकत नाही.
 • वधू किंवा वर यातील एकजण पळून गेल्यास, अथवा लपून बसून लग्न समारंभास गैरहजर राहिल्यास 
 • वधू-वर पक्षात आपापसात मतभेद झाल्याने समारंभ रद्द झाल्यास 
 • विवाह समारंभ बेकायदा असल्यास
 • समारंभ मद्य किंवा मादक पदार्थांच्या अमलाखाली झाल्यास 
 • समारंभ प्रसंगी गुन्हेगारी कृत्य अथवा गैरवर्तन झाल्यास 

या पॉलिसीचा कालावधी समारंभ सुरू होण्याच्या आधी चोवीस तास व समारंभ सुरू झाल्यापासून पुढे एक दिवस असा असतो. मात्र कालावधी इन्शुरन्स कंपनीनुसार कमी अधिक असू शकतो.

 • पॉलिसीमध्ये पुढील बाबींचा उल्लेख असतो.
 • समारंभाचा एकूण खर्च (तपशिलासह)
 • भाड्याने घेणार असणाऱ्या वस्तूंचा तपशील (किमतीसह), 
 • अन्य वस्तूंचा तपशील (किमतींसह)

बहुतेक सर्व जनरल इन्शुरन्स कंपन्या ही पॉलिसी देऊ करतात. पॉलिसीच्या अटी समारंभाच्या स्वरूपावर अवलंबून असतात. पॉलिसी प्रीमियम घेण्यात येणारे कव्हर व समारंभाचे स्वरूप व तदनुषंगिक रिस्क यावर अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे दोन लाख रुपयांच्या कव्हरसाठी ₹   ४,०००- ५,०००च्या आसपास; तर आठ लाख रुपयांच्या कव्हरसाठी ₹   १५,००० ते १६,००० एवढा प्रीमियम पडू शकतो. मात्र इन्शुरन्स कंपनीनुसार प्रीमियम कमी अधिक असू शकतो. थोडक्यात असे म्हणता येईल की कोणताही समारंभ आयोजित करताना जर समारंभाचा खर्च विचारता घेऊन योग्य ते इव्हेंट इन्शुरन्स कव्हर घेतल्यास समारंभ रद्द होण्याने अथवा लांबणीवर पडल्याने होणारे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

संबंधित बातम्या